Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स गृहीत धरलेलं नातं

गृहीत धरलेलं नातं

जन्म झाल्यापासून मरेपर्यंत कोणावर प्रेमच केलं नाही असा माणूस सापडणं विरळाच. जगण्यासाठी प्रेम खूप गरजेचं असतं. मग ते कोणत्याही नात्यातलं असो. प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. कोणतंही नातं हे दोन्हीकडून जपणं गरजेचं असतं.

Related Story

- Advertisement -

जन्म झाल्यापासून मरेपर्यंत कोणावर प्रेमच केलं नाही असा माणूस सापडणं विरळाच. जगण्यासाठी प्रेम खूप गरजेचं असतं. मग ते कोणत्याही नात्यातलं असो. प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. कोणतंही नातं हे दोन्हीकडून जपणं गरजेचं असतं. पण वास्तविक नातं तुटायला सुरुवात होते ती गृहीत धरण्यामुळं. नातं कोणतंही असो पण जेव्हा समोरचा व्यक्ती सतत गृहीत धरायला लागतो तेव्हा त्या नात्याला तडा जाणं साहजिकच आहे.

प्रेम करणं ही सहजवृत्ती आहे, मात्र प्रेम निभावणं ही प्रयत्नांनी साध्य होणारी गोष्ट आहे. यामध्येच सर्वात मोठं काम करतं ते, नात्यामध्ये सतत गृहीत न धरणं. आपला समाज तसं बघायला गेलात तर पुरुषप्रधानच. त्यामुळं सर्वच बाबीत स्त्रीला गृहीत धरलं जातं. त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल जाणवतो, पण तो अगदीच मोजकाच आहे. नातं टिकवण्याकरिता पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक मेहनत घेतात. अर्थात त्याचा अर्थ पुरुष घेत नाहीत असा नाही. पण पुरुषांकडून प्रेमाचा उच्चार करून तसं वागणं हे फारच कमी प्रमाणात होतं. कारण बर्‍याचदा ते नातं गृहीत धरतात. तिनं वा त्यानं आपली प्रत्येक गोष्ट समजून घेतलीच पाहिजे यामध्ये ते नातं गुदमरू लागतं. प्रत्येक व्यक्तीची समजून घेण्याचीही एक मर्यादा असते. त्यानंतर ती व्यक्तीही गुदमरू लागते आणि या गृहीत धरण्यामध्ये नात्याचा शेवट मात्र कटू होतो.

- Advertisement -

अर्थात हे नातं फक्त नवरा – बायको वा प्रियकर – प्रेयसीच असायला हवं असं नाही. हे नातं आई – वडील, आई – मुलं असंही असू शकतं. बर्‍याचदा मुलंही आई – वडिलांना प्रचंड प्रमाणात गृहीत धरत असतात. पण त्याचा शेवट कटू न होता निराशेमध्ये नक्कीच बदलतो. वास्तविक प्रश्न नक्कीच पडतो की, समोरचा माणूस इतकं का गृहीत धरायला लागतो? त्याचं कारण मुळातच आपण असतो. न सांगता समजून घ्यायची सवय आपणच लावतो आणि नंतर त्याचा त्रासही आपल्यालाच व्हायला लागतो. कारण समोरच्या माणसाला तोपर्यंत इतकी सवय झालेली असते की, आपण कितीही समजून सांगितलं तरीही समोरचा माणूस समजून घ्यायला तयार नसतो. त्याला आपण वागतो तेच बरोबर वाटत असतं. परिस्थिती कशीही असो, पण जर समोरचा माणूस तुमच्यासाठी सर्व काही अ‍ॅडजस्टमेंट करायला तयार आहे आणि तरीही प्रत्येक बाबीमध्ये तुम्ही कारणं देऊन समोरचा समजेलच हे गृहीत सतत धरत असाल तर खरंच हे नातं तुम्ही जपताय का? हा प्रश्न तुम्ही तुमच्याही मनाला विचारायला हवा.

अपेक्षा तिथे अपेक्षाभंग आहेच असं म्हटलं जातं. पण हा अपेक्षाभंग सतत होत राहिला तर त्या गृहीत धरण्यामुळंच नात्यांना तडा जातो. समोरचा माणूस आपल्यावर अतोनात प्रेम करत आहे हे दिसूनही कोणासाठी तरी त्या व्यक्तीला सतत दुखावत राहणं हा त्या गृहीत धरण्याचाच एक भाग आहे. तुझ्याशिवाय मी कोणाला सांगू समजून घ्यायला हे वाक्य प्रत्येकवेळी उपयोगी पडेलच असं नाही. समोरच्या माणसाचंही मन असतं, तेही जपणं गरजेचं असतं. आपल्यासाठी समोरचा माणूसही तितकाच झुरतो वा प्रेम करतो या भावनाही लक्षात घेऊन वागायला हवं. तरच कुठेतरी हे गृहीत धरणं कमी व्हायला लागेल. नात्यांमध्ये गृहीत धरणं कमी होणार नाही. पण ते अतिप्रमाणात होऊ नये याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळं कोणतंही नातं हे गृहीत न धरता ते व्यक्त करायला शिकल्यास, जपणं सहजसोपं होईल.

- Advertisement -