विचारांना पुतळ्यांचा कारावास!

ज्यांचे विचार पाळणं कठीण असतं अशा महान व्यक्तिमत्वांची व्यक्तमत्वंच विसरून त्यांना एका मातीच्या (किंवा तत्सम पदार्थांच्या) पुतळ्यामध्ये कैद केलं की आपली जबाबदारी संपली आणि आपण काहीही न करता त्यांचे तथाकथित आदरकर्ते आणि फॉलोअर झालो असं मानणार्‍यांची संख्या अफाट आहे...आणि म्हणूनच अशा पुतळ्यांचीही...! पण त्यामुळे एकवेळ पुतळ्यांसाठीच्या मातीला इथे खप आहे पण त्या व्यक्तींच्या विचारांना मात्र नाही... अर्थात, जर त्या मातीप्रमाणेच हे ‘पुतळीत’ व्यक्तींचे विचारही घडवणार्‍याच्या इच्छेप्रमाणे आणि फायद्याप्रमाणे वापरता येणार असतील तर मात्र त्यांचा काही विचार होऊ शकतो...अन्यथा.....!

जवळपास १३ वर्षांपूर्वी आलेला लगे रहो मुन्ना भाई भलताच चर्चेत राहिला. त्याच्या गांधीगिरीपासून ते संजय दत्तच्या टपोरी भाषेपर्यंत अनेक गोष्टी ‘चाहत्या’ प्रेक्षकवर्गानं आत्मसात केल्या. ट्रॅफिक सिग्नलवर गुलाबाची फुलं देणारी गांधीगिरी त्यानंतर अनेक ठिकाणी दिसली, पण त्यातल्या एका महत्त्वाच्या वाक्याचा तमाम प्रेक्षकांना विसरच पडला किंवा तो सोयीस्कररीत्या पाडला गेला. या चित्रपटात गांधीजी म्हणतात, ‘या देशातले माझे सगळे पुतळे, भिंतींवर लावलेले फोटो काढून टाका. जर कुठे ठेवायचंच असेल, तर मला तुमच्या ह्रदयात ठेवा.’ गांधीजी म्हणा किंवा मग आणखी कुणी या देशातली महान व्यक्ती, आम्ही त्यांना पुतळ्यात, फोटोंमध्ये अडकवून ठेवण्यात आणि त्यांची पूजा-अर्चा करण्यातच धन्यता मानतो. एकदा का ही मंडळी त्या मातीच्या किंवा धातूच्या किंवा अगदी गेला बाजार प्लास्टिकच्या पुतळ्यात किंवा फ्रेममध्ये बंदिस्त झाली, की आम्ही त्यांच्या नावाने आदळ-आपट करायला मोकळे. वर्षातून एकदा त्यांच्या नावाने जयघोष करायचा आणि वर्षभर त्यांच्याच विचारांची होळी करत त्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, अशी नवीन ‘पुतळेगिरी’ या देशानं जन्माला घातली त्याबद्दल समस्त विश्वाने भारताचे आभारच मानायला हवेत!

गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये कुठल्या एका ठिकाणी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथल्या स्थानिक महानगरपालिकेनं काढल्यावरून मोठा गहजब उडाला आहे. खरंतर, तो पुतळा तिथून हटवला यामध्ये त्या पालिका अधिकार्‍यांचं (सौंसर महानगरपालिका, छिंदवाडा जिल्हा) काहीही चुकलं नव्हतं. शहरातल्या कुठल्याशा युवा संघटनेनं शिवरायांचा पुतळा एका मुख्य चौकाच्या मध्यभागी उभारण्याची आणि त्या चौकाला शिवाजी महाराजांचं नाव द्यायची मागणी केली. आता वर्दळीच्या चौकात ऐन मध्यभागी पुतळाच काय, काहीही उभारलं तरी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार हे पाचवीतलं पोरगंही सांगेल. त्याच आधारावर पालिकेच्या अधिकार्‍यांनी परवानगी नाकारली, तर या कथित ‘शिवाजी महाराजांच्या विचारांनी पेटलेल्या (!)’ युवकांनी पालिकेच्या परवानगीशिवायच तो त्या चौकात उभा केला. आता जी गोष्ट बेकायदेशीररीत्या उभी आहे, ती हटवून रस्ता मोकळा करणं ही पालिकेची जबाबदारीच आहे. त्यानुसारच पालिका अधिकार्‍यांनी तो हटवला. दिवसा हटवला असता तर पुन्हा काही तथाकथित शिवप्रेमींच्या भावना दुखावून धिंगाणा झाला असता, म्हणून त्यांनी रात्री हटवला. तर त्यावर कोण गहजब सुरू झाला. पार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि शिवराजसिंह चौहान यांनी देखील ’हा शिवरायांचा अपमान आहे, काँग्रेसच्या राज्यात शिवरायांचा अपमान होत आहे याची दखल महाराष्ट्रातलं सरकार घेईल काय?’ असा अनाकलनीय प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने देखील या विषयावर राजकारण तापत असल्याचं पाहात लागलीच तो पुतळा तिथेच बसवण्याचा निर्णय देखील जाहीर करून टाकला! हे जास्त भीषण!

मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयामुळे अशा उपटसुंभ टीनपाट संघटनांच्या अनागोंदी हट्टापुढे नियमाला धरून काम करणार्‍या पालिका अधिकार्‍यांना झुकावं लागलं. शिवाय, असा काही राडा केला की अधिकारी, सरकार झुकतं आणि आपलं ऐकतं असा ‘विजयी गैरसमज’ या लोकांमध्ये निर्माण होणार. पुढच्या वेळी आणखी कुठेतरी अजून कुणीतरी अजून कुणाचातरी पुतळा ठेऊन देईल आणि त्यावर आकांडतांडव घालत बसेल आणि त्याहीवेळी या मुद्यांवर असाच निराधार गहजब माजेल.
या देशातल्या महान व्यक्तिमत्वांचे पुतळे हे एखाद्या लाईव्ह डिटोनेटर्ससारखे झाले आहेत, हे अतिशय जबाबदारीने म्हणावं लागेल. कारण इथल्या कोणत्याही समाजात अशांतता निर्माण करायची असेल, तर फार काही कष्ट घ्यावे लागत नाही. कुठेही उभ्या असलेल्या कुणाही ऐतिहासिक मोठ्या व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याची विटंबना केली, की ते पाहणारा जमाव आपोआपच एकमेकांच्या विरोधात उभा राहतो. त्यात आपल्या राजकीय पोळ्या भाजणार्‍या नेतेमंडळींची देशात अजिबात कमी नाही. मध्य प्रदेशात शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला म्हणून महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकारला आणि त्यांच्या आडून शिवसेनेला लक्ष्य करणार्‍या भाजप नेत्यांची वर्गवारी याच श्रेणीतली आणि अशी कूपमंडूक वृत्ती फक्त एकाच पक्षामध्ये आहे असं नाही. ही सर्वपक्षीय समस्या आहे.

एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा पुतळा उभा केला किंवा फोटो भिंतीवर लावला, त्याला हार-फुलं घातली आणि नमस्कार केला की आपण त्या व्यक्तीच्या उपकारांमधून उतराई होतो, त्याच्या विचारांचे पाईक असल्याचं सिद्ध होतं आणि तो शिक्का डोक्यावर घेऊन समाजात भाषण ठोकायला मोकळे होतो. मग ते भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत, सरदार वल्लभभाई पटेल असोत, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा मग अगदी छत्रपती शिवाजी महाराज असोत. या सर्व मंडळींना वेगवेगळ्या जातीधर्मांनी आपापल्या पद्धतीने वाटून घेतलं आहे. जणूकाही त्यांच्या रूपाने प्रत्येक समाजाकडे किंवा धर्माकडे असणारं क्षेपणास्त्रच. तुम्ही नेहरूंबद्दल बोला, आम्ही सावरकरांबद्दल बोलतो. तुम्ही पटेलांचा पुतळा उभा करा, आम्ही तुमच्याही पेक्षा उंच शिवरायांचा पुतळा उभारू. कुणी उभारलेल्या पुतळ्याची उंची जास्त, त्यावरून ज्याची-त्याची मोठाईकी ठरणार! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करणार्‍या किंवा त्यांच्या पुतळ्यासाठी भांडणार्‍या कुणीही पुरुषाने छातीवर हात ठेऊन मनापासून सांगावं की त्यांच्या विचारांचे आपण खरे पाईक आहोत. मध्य प्रदेशात पुतळा लावणार्‍या आणि तो हटवला म्हणून राडा घालणार्‍या तरुणांपैकी किती जणांना शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, त्यांचे खरे विचार माहिती असतील, हा संशोधनाचाच विषय ठरावा. छत्रपतींच्या अरबी समुद्रातल्या हजारो कोटींच्या पुतळ्यापेक्षा त्यांच्या गडकिल्ल्यांचं जतन केल्यास महाराजांच्या विचारांचं, पराक्रमाचं ते खरं संवर्धन आणि प्रतीक ठरेल ही राज ठाकरेंची भूमिका याच तत्वाला धरून आहे, पण सगळ्याच महापुरुषांना, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या विचारांना पुतळ्यांच्या किंवा फोटोंच्या कोंदणात अडकवून टाकण्याची अहमहमिका आमच्यात लागली आहे. हीच गत महात्मा गांधी, पटेल, आंबेडकर, जोतिबा फुले या सगळ्यांच्याच पुतळ्यांसाठी भांडणार्‍यांची आहे.

मुळात पुतळे उभारल्यामुळे नक्की होतं काय? असा मूलभूत प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. या देशात सगळ्यात जास्त पुतळे किंवा फोटो हे महात्मा गांधींचे असतील. सगळ्यात जास्त चौकांना, रस्त्यांना, उड्डाणपुलांना, नगरांना, इमारतींना, पुस्तकांना, शाळांना, सामाजिक संस्थांना आणि सगळ्यात जास्त म्हणजे नोटांना-चलनाला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं आहे, पण त्यामुळे देशात गांधीजींचे विचार किती लोकांपर्यंत पोहोचले? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. उलट त्यांची निर्भत्सना करण्यातच समाजातले काही गट आजही धन्यता मानतात. त्यामुळे या अशा प्रतीकांमुळे त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रसार होतो की कल्पना आता कालबाह्य करण्याची वेळ आली आहे. विचार हे आचारातूनच प्रसारित आणि प्रचारित होऊ शकतात, हेच सूत्र प्रतीकांपेक्षा जास्त वास्तव असू शकेल.

पुतळे, फोटो किंवा नावांच्या स्वरूपात जितकी जास्त प्रतीकं आपण महापुरुषांची तयार करू, तितकं त्यांच्या विचारांचं एक आभासी जगच आपण निर्माण करत असतो. त्या प्रत्येक नव्या भर पडणार्‍या प्रतीकाच्या रूपाने आपल्यावर त्या व्यक्तीच्या विचारांची जास्त जबाबदारी पडतेय, याचं भान कुणालाच राहिलेलं नाही. फक्त जागोजागी अशी प्रतीकं उभी केली, की आपण पापमुक्त झालो अशा आविर्भावात या प्रतीकांच्या नावाने कंठशोष सुरू होतो. त्यातून या देशात या महापुरुषांच्या विचारांना किती मान आहे, असं चित्र निर्माण होतं आणि मग प्रश्न निर्माण होतो की इतके महापुरुष, त्यांचे इतके विचार असून देखील देशात इतक्या समस्या का आहेत? वास्तवात या प्रत्येक प्रतीकातून आपापली शस्त्रागारं अधिक सज्ज करण्याचाच केविलवाणा आग्रह त्यातून प्रतीत होत असतो.

ज्यांचे विचार पाळणं कठीण असतं अशा महान व्यक्तिमत्वांची व्यक्तिमत्वंच विसरून त्यांना एका मातीच्या (किंवा तत्सम पदार्थांच्या) पुतळ्यामध्ये कैद केलं की आपली जबाबदारी संपली आणि आपण काहीही न करता त्यांचे तथाकथित आदरकर्ते आणि फॉलोअर झालो असं मानणार्‍यांची संख्या अफाट आहे…आणि म्हणूनच अशा पुतळ्यांचीही…! पण त्यामुळे एकवेळ पुतळ्यांसाठीच्या मातीला इथे खप आहे पण त्या व्यक्तींच्या विचारांना मात्र नाही… अर्थात, जर त्या मातीप्रमाणेच हे ‘पुतळीत’ व्यक्तींचे विचारही घडवणार्‍याच्या इच्छेप्रमाणे आणि फायद्याप्रमाणे वापरता येणार असतील तर मात्र त्यांचा काही विचार होऊ शकतो…अन्यथा…..!