जिल्ह्यातून कोरोना होतोय हद्दपार…!

कोरोनाचा हाःहाकार माजवलेल्या पालघर जिल्हयात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. या जानेवारी महिन्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे.

Health workers avoid taking the corona vaccine

कोरोनाचा हाःहाकार माजवलेल्या पालघर जिल्हयात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. या जानेवारी महिन्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रूग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्याचबरोबर रूग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील दुपटीने वाढले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात जिल्हा कोरोनाला हरवण्यात यशस्वी होईल, असे एकंदर चित्र आहे. कोरोना आटोक्यात येत असतानाच लसीकरणालाही सुरुवात झाल्याने पालघरवासियांना दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पालघर जिल्हयात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. एप्रिल महिन्यात पालघरसह वसई तालुक्यात रूग्ण आढळण्यास सुरुवात झाली. पालघर-वसईतून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्याकडे अनेकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण, सरकारी यंत्रणा ढिम्म राहिल्याने जिल्ह्यात कोरोनाला रोखणे अवघड होऊन बसले होते.

कोरोना लस

कोरोनाने हाःहाकार माजवल्याने सरकारी हॉस्पीटलमध्ये जागा नसल्याने रुग्णाना खाजगी हॉस्पीटलशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कुणाचाही अंकुश नसल्याने कोरोना काळात खाजगी हॉस्पीटल्सनी रुग्णांची अक्षरशः लाखो रुपयांची लुटमार केली. जिल्हयात लॅब नसल्याने चाचणीसाठीही एकेका कुटुंबाला हजारोंचा फटका बसला. सरकारी क्वारंटाईन सेंटरही फुल झाले होते. वसई विरारसारख्या शहरात रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा मिळेनाशी झाली होती. पहिले काही महिने त्याठिकाणी जेवणासाठीही पैसे मोजावे लागत असल्याने महापालिकेची उदासिनता दिसून आली. विक्रमगड येथील हॉस्पीटलमध्ये तर एका रुग्णाने आत्महत्या केल्याने सरकारी कारभाराचे वाभाडे निघाले. पण, जिल्हयास्तरीय आणि वसई विरार महापालिका आरोग्य विभागाने रुग्णांसाठी सुविधा देण्यास हळूहळू का होईना सुरुवात केली. डहाणूत कोरोना चाचणी लॅब सुरु झाली. ग्रामीण भागासह वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना हॉस्पीटल्स सुरु झाली. त्यामुळे रुग्णांची खाजगी हॉस्पीटलच्या आर्थिक जाचातून मुक्तता मिळाली. दुसरीकडे, कोरोनाने हाःहाकार माजवला असताना हजारो कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली होती. याही ठिकाणी सरकारी यंत्रणा तोकडी पडली. पण, अनेक सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करीत अनेक महिने गरीबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंसह जेवणांचा पुरवठा करून माणुसकीचे दर्शन घडवले. विरारच्या जीवदानी देवी मंदिर ट्रस्टने तर मोफत जेवण देण्याचे काम गेल्या काही महिन्यांपर्यत सुरुच ठेवले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र दिवाळी सणानंतर पुन्हा कोरोनाने आपला इंगा दाखवण्यास सुरूवात केली. सुरक्षेचे नियम न पाळता तसेच मास्कविनाच बाहेर फिरणार्‍या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका पुन्हा डोके बाहेर काढू लागला होता. मात्र, आता जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने खाली आला आहे.

मागील नऊ महिन्यांत शासकीय आरोग्य यंत्रणेने याकामी दाखवलेली जिगरबाज वृत्ती आणि रूग्णांवरील उपचारासाठी घेतलेली मेहनत यामुळेच आज कोरोनाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यास मदत झाली. गेल्या काही दिवसांपासून कोरोना जिल्हयातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच गेल्या शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात झाल्याने लोकांच्या मनातील कोरोनाची भिती दूर होण्यास मदत होणार आहे. २५ जानेवारीपर्यंत जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या ४५ हजार ५३ वर गेली होती. त्यातील ४३ हजार ५२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाने जिल्हयात १ हजार १९६ जणांचे प्राण घेतले. त्यातील सर्वाधिक ९४२ मृत्यू एकट्या वसई तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल पालघर तालुक्यात कोरोनाने १५० लोकांचे बळी घेतले. वाडा तालुक्यात ४२ तर डहाणू तालुक्यात कोरोनाचे ३९ बळी गेले. सध्या जिल्हयात अवघे ३३५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. वसई विरार महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा तीस हजारच्या घरात पोचला असताना आता अवघे २५९ रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा –

हुश्श! अखेर नवा पत्रीपूल कल्याणकरांच्या सेवेत दाखल