घरफिचर्सअस्तित्व शोधाचा प्रवास - सरोवर

अस्तित्व शोधाचा प्रवास – सरोवर

Subscribe

मिलिंद बोकील यांची ‘सरोवर’ ही ‘तिची’ कहाणी आहे. तिच्या अस्तित्वशोधाची कहाणी. ही जी ‘ती’ आहे, ती अनामिक आहे. म्हणून ‘ती’ सर्वत्र आहे. धावणा-या गर्दीत, स्वयंपाक घरातील कोंदट वातावरणात, भाजीबाजारातील धावपळीत, कुटुंबाच्या चिंतेत, ती सर्वत्र आहे. सर्वत्र असूनही कधीही न दिसणा-या अदृश्य व्यक्तीला ही कहाणी कथन करते.

‘शाळा’ वाचली आणि खूपच आवडली. त्यानंतर मिळवून ‘समुद्र’ वाचली. ‘उदकाचिया आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ही मिळवले. ‘वाटा आणि मुक्काम’मधून लेखनाची भूमिका कळवून घेता आली. मग हाती आली ‘सरोवर’.

एका बैठकीत ‘सरोवर’ वाचून हातावेगळी झाली. वाचक म्हणून मीही पाण्यात पाय सोडून बसले. डोळे मिटले. ‘आणि मग डोळे मिटलेले असताना तिला ते दिसले, आपल्या मनाच्या अवकाशात तुडुंब भरलेले ते सरोवर. अपार, विस्तृत, सखोल. त्यावर चहूबाजूंनी ओठंगलेला निळाशार पाचूचा घुमट. सभोवताली हिमाच्छादित शिखरे. पाण्यात उमटलेली त्यांची शुभ्र प्रतिबिंबे. दूरवरुन येणारा सुगंधित वारा. पृष्ठभागावर झिरझिरित लाटा उमटत होत्या, पण त्याचा अंतर्भाग मात्र अथांग अमृताने भरलेला. तिला जाणवले की ते शीतल द्रव्य आपल्या धमन्यांमधून पसरतेय. रंध्रारंध्रातून पाझरतेय. सगळे शरीरच त्या द्रव्याने भरुन जातेय. आणि मग तिला कळले की तो साठा आपल्या अंतःकरणात भरलेला आहे. आणि जोवर तो तसा भरुन आहे तोवर आपल्याला कसलाच रितेपणा नाही. कसलीच पोकळी नाही. काहीच हरवून जाणार नाही. आणि हा साठा अक्षय आहे. कधीही न संपणारा. भरभरुन देऊनही परत उरणारा’

- Advertisement -

मिलिंद बोकील यांची ‘सरोवर’ ही ‘तिची’ कहाणी आहे. तिच्या अस्तित्वशोधाची कहाणी. ही जी ‘ती’ आहे, ती अनामिक आहे. म्हणून ‘ती’ सर्वत्र आहे. धावणा-या गर्दीत, स्वयंपाक घरातील कोंदट वातावरणात, भाजीबाजारातील धावपळीत, कुटुंबाच्या चिंतेत, ती सर्वत्र आहे. सर्वत्र असूनही कधीही न दिसणा-या अदृश्य व्यक्तीला ही कहाणी कथन करते.

अभयारण्याच्या निर्मनुष्य अवकाशात या कहाणीच्या व्यक्तीरेखा दोन दिवस एकमेकांसोबत घालवतात. ही सोबत त्यांना बोलकं करते. अर्थात ती आणि तो असे दोघे हे कथानक घडवत असले तरी मुख्य संवाद तिच्या एकटीच्याच बाजूने होत राहातो, या संवादाला त्याचा होकारार्थी प्रतिसाद आहे त्यामुळे संवाद प्रवाहित होत जातो आणि वाचकाला नातेसंबंधांची उकल होत जाते.

- Advertisement -

बँकेच्या कुठल्याशा ट्रेनिंगला आठवड्यासाठी घराबाहेर पडलेले दोन कर्मचारी. आडबाजूच्या अभयारण्यात जातात. या कर्मचा-यांपैकी एक ‘ती’ आहे आणि दुसरा ‘तो’ आहे. ‘तो’ यापूर्वीही कधीतरी या अभयारण्यात येऊन राहून गेलेला आहे. सध्या पर्यटनाचा मोसम नाही, शिवाय आडबाजूचं अभयारण्य, म्हणून टुरिस्ट लोक इकडे नाहीत. सबंध कथानकात ‘माणूस’ म्हणून कॅन्टीनचा वेटर दोनतीन वेळा तेवढा डोकावून जातो. बाकी इतर माणसांचा मागमूस नाही. अभयारण्याच्या बफर झोनमध्ये उभं असणारं गेस्ट हाऊस. तिथून फुटणा-या रानवाटा, आटून गेलेली नदी, मोकळी गवताळ मैदानं, दाट राई, नकाशात दाखवलेलं पण न सापडलेलं तळं, हरणांचा कळप, पायवाटेवर निर्धास्त बसलेला सरडा, पक्षांचे थवे, कोअर झोनमधून येणारे दूरचे आवाज, रात्रीचं चांदणं, झाडांच्या सावल्या, मोहाची फुलं आणि त्याचा गंध, रानभर पसरलेला उन्हाचा पिवळा प्रकाश आणि गवताचे, मातीचे, हिरवाईचे, कशाकशाचे वाससुवास यांच्या सोबतीने कथानक पुढेपुढे सरकत जातं.

कादंबरीत फार घटना नाहीत. अभयारण्यात जोडागोळीचं पोहचणं, त्यांनी गेस्ट हाऊस गाठणं, सायंकाळी- दुस-या दिवशी सकाळी, दुपारी आणि परतीच्या दिवशी पुन्हा एकदा जंगलात भटकंती करणं या कालपटावर कादंबरी आकार घेते. हा कालपट फारतर दोन दिवसांचा आहे. त्यातही फार लक्षवेधी काही घडतंय असं नाही, दोघेजण एकतर चालत आहेत नाहीतर निवांत बसलेले आहेत. पण तरीही ‘सरोवर’ वाचकाचा ताबा घेते. या दोघांचे भूतकालीन जगणे सबंध कादंबरीला साकार करते. अरण्याच्या, तेथील हिरव्या रासवट झाडांच्या, पिवळ्या सोनेरी उन्हाच्या पार्श्वभूमीवर आणि एखादवेळी चांदण्यांच्या साक्षीने हे उकलत जाणे, उमलून येणे आणि मोहरुन जाणे भयंकर सूंदर आहे. ते जराही व्यभिचारी नाही. किंवा विवाहबाह्य संबंधात दाखवतात तसे अंगावर येणारे नाही.

हे दोघे नवरा बायको नाहीत. मित्र आहेत. दोघांना त्यांची कुटुंबं आहेत. तिला नवरा आहे, मुलगा आहे. त्यालाही लेखिका असणारी बायको आणि जुळ्या मुली आहेत. मागच्या जुनपर्यंत दोघांची एकमेकांशी ओळख देखील नव्हती. तो बदली होऊन गावात आणि तिच्या सोसायटीत किरायेदार म्हणून आला. सकाळी तो खेळायला जाई तेव्हा सकाळची कामे करणा-या तिला दिसू लागला. पुढे सोसायटीच्या बैठकीत त्यांची ओळख झाली. ते एकाच बँकेत आहेत हे कळालं, नंतर ट्रेनिंगच्या निमित्ताने ती त्याच्या शाखेत आठवडाभर येऊन गेली. दोघे एकत्र येत गेले. मित्र झाले. प्रेमात पडले. हे असं प्रेम चूक आहे हे कळूनही सोबत राहिले. एकमेकांना सावरत राहिले, मदत करत राहीले. तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तो भावासारखा तिच्यापाठीशी उभा होता. कुठल्याशा निमित्ताने मुंबईला गेल्यावर भर पावसाळ्यात दोघेच समुद्राकाठानं भटकत राहिले. त्यांचं नातं समाजमान्य नाही. ते उघड व्यक्त करता येणारं नाही. बोकील यांनी ते खूप पारदर्शक आणि स्वच्छपणे मांडलं आहे.

भुतकाळात डोकावताना तिला लक्षात येतं की आपण त्याच्या प्रेमात पडलो आणि काय काय घडलं? तिला लक्षात येतं की त्याच्या प्रेमानं तिची भीती संपवली, संकोच संपवला, तिला व्यक्ती म्हणून उभं केलं आणि तिला ‘माणूस’ केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यावरील प्रेमामुळे ती ‘प्रेम’ करु लागली. लग्नाच्या नव-यावर प्रेम करु लागली. शेजा-यापाजा-यांवर, सर्वांवर प्रेम करु लागली. प्रेम आपल्या आत तुडूंब भरुन आहे याचा तिला प्रत्यय आला आणि म्हणून जेव्हा गवत खात अगदी जवळ आलेली हरणं तिला जराही न भीता, जरासुद्धा न बिचकता, तिच्या डोळ्यात डोळे घालून निर्धास्तपणे चरत राहिली तिला सर्वस्व सापडल्यासारखं वाटलं. आपल्याला हरणं भ्याली नाहीत ही जाणीव तिला मोहरुन टाकत राहिली. या अलौकिक आनंदात तिला ‘सरोवर’ सापडलं. तिच्या आतलं सरोवर. अगदी सुरुवातीला मी जो परिच्छेद नोंदवला ती अनुभूती तिच्या आत विस्तारत राहिली.

मिलिंद बोकील यांच्या या कादंबरीतील नवे शब्द, आवाज, प्रकाश, वास, शांतता, रंग यांच्या संदर्भातील प्रतिमा विस्ताराने लिहिता येईल. या सगळ्यांनी कादंबरीचा अवकाश ठळक केला आहे. निस्तब्ध, निराकार आकाशात तिच्या अस्तित्वाचा पिवळा प्रकाश त्यामुळे अधिक तेजस्वी झाला आहे.

[ सरोवर (कादंबरी) – मिलिंद बोकील / मौज प्रकाशन गृह, मुंबई / फेब्रुवारी २०१८ / पृष्ठे १०८ / किंमत एकसेपन्नास रुपये ]

-प्रा. विद्या सुर्वे बोरसे
-मराठी विभागप्रमुख, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -