पर्यावरणपूरक सण-उत्सवांची गरज

नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रमजान ईद, मोहर्रम, कृष्णाष्टमी, बैलपोळा, गणेशोत्सव, स्रियांच्या बाबतीतील विविध व्रत-वैकल्ये, पितृपंधरवडा, नवरात्र, दसरा-दिवाळी, ईद-ए-मिलाद, ख्रिसमस इत्यादी सण उत्साहात साजरे केले जातात. या सणांच्या काळात संपूर्ण निसर्ग बहरलेला असतो. सौंदर्याने सृष्टी नटलेली असते. प्राणी-पक्षी आनंदून गेलेले असतात. खरा देव, धर्म, अध्यात्म ह्या सर्वांच्या रूपाने निसर्गात बहरलेला, आनंदलेला, फुललेला असतो. या निसर्गाशी साधर्म्य साधणारे अनेक सण-उत्सव, नव्या रूपाने आपण साजरे करू शकतो. मात्र पारंपरिकतेत अडकल्याने, कालबाह्य झालेल्या चालीरिती, व्रतवैकल्ये पाळण्याची, जोपासण्याची बंधनं असल्याने, जसेच्या तसे पाळण्याकडे आणि करण्याकडे समाजाचा कल जास्त असतो, पण हे सण-उत्सव आता पर्यावरणपूरक करण्याची गरज आहे.

माणसाच्या जीवनात जो शांतपणा, जे स्वास्थ्य असावं लागतं ते, आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात तो हरवून बसलेला आहे, असे प्रकर्षाने जाणवते. याचाच परिणाम म्हणून समाजात कुठलीही विधायक गोष्ट घडण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. धकाधकीचं आयुष्य जगणार्‍या माणसाच्या मनात विधायक कामाच्या कल्पना आकारही घेऊ शकत नाहीत. कारण लांब पल्ल्याची कामगिरी डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा तो, चटकन हाती लागेल अशा चटपटीत सुखाकडे वळतो. त्यामुळेच आजची पिढी, जी संथपणा सहन करू शकत नाही, ती कर्तृत्वानं थिटी निघणार, तिच्यातील विजिगिषा वृत्ती लवकर लोप पावणार, असे जाणवते. त्यामुळे ती निसर्गाशी निकटचं नातं जोडू शकणार नाही. हा धोका आपण लक्षात घ्यायला हवा.

आपल्याकडील सर्व सण-उत्सव पाहिले तर निसर्गाशी नातं सांगणारी, जवळीक असणारी अशीच त्यांची पूर्वापार रचना आहे. मुळात माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. निसर्गात जगता जगता त्याने सृष्टीतील घटनाक्रमात होणारे बदल निरीक्षण करून हळूहळू ओळखले. निसर्गातील प्रत्येक घटनेमागील नियम शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यांचं, आपल्या जीवनाशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून स्वतःला आणि इतरांना मानसिक समाधान, आनंद मिळतो, याची खात्री माणसाला पटली. एकत्र येण्याने चर्चा, सुसंवाद घडतात. त्यामुळे वैयक्तिक, सामाजिक आणि सामूहिक ताणतणाव हलके होतात, निवळण्यास मदत होते. माणसाचा वैयक्तिक आणि सामूहिक शहाणपणा वाढतो, समस्यांवर मात करण्याचे बळ, पाठिंबा, उत्साह व प्रेरणा मिळते, असाही त्याला अनुभव आला आणि त्याने मग त्या सर्व सण-उत्सवांची त्या, त्या ऋतुमानानुसार संगती लावली. स्री, पुरूष, आबालवृद्ध यांच्यासाठी सण उत्सवांची विभागणी केली. सृष्टीतील इतर सजीवांप्रती सतत प्रेम, भूतदया, मैत्रं जपण्याच्या शुद्ध हेतूने त्याने, कृतज्ञतेपोटी खास त्यांच्या नावाने, सहभागाने सण-उत्सवाचे आयोजन केले. यातून स्वतःचा व समूहाचा आनंद द्विगुणित करण्याचा माणसाने नेहमीच प्रयत्न केला.

या सर्व सण-उत्सवांना त्या त्या धर्माच्या, धार्मिक जाणिवांचा, परंपराचा पक्का आधार असतो, असे लक्षात येते. त्यामुळे सहजासहजी सण-उत्सवातील लहानसा बदलसुद्धा स्वीकारला जात नाही. मग त्यामागची तपासणी, चिकित्सा करणे ही तर फार लांबची गोष्ट ठरते. प्रत्येक धर्मातील चालीरिती, रितीरिवाज, प्रथा-परंपरा यामध्ये विविधता आढळते. एकूणच मानवी संस्कृती-उपसंस्कृती यातून घडत जाते, विकसित होत जाते. पुढे पुढे तिची जडणघडण होत राहते. मानवी नात्यातील वीण अधिक घट्ट व्हावी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळावा, तिचा सन्मान व्हावा, आदर राखला जावा, शक्य तेवढ्या प्रकारची विचार, वस्तू यांची देवाण-घेवाण व्हावी, एकोपा वाढावा, प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा अशा विविध विधायक उद्देशाने माणसाने या सर्व सण-उत्सवांची मांडणी केल्याचे दिसून येते. पृथ्वीच्या वार्षिक गतीशी निगडित आणि त्यांना विविध धार्मिक जाणिवा, कल्पना, कथा, पुराणे, कर्मकांडे यांची जोड देऊन, त्या त्या धर्मांच्या व्यक्ती हे सण-उत्सव व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा सामूहिकपणे एकत्र येऊन साजरे करीत असतात.

जसा काळ पुढे सरकतो तसे सृष्टीचे कोडे हळूहळू उलगडत जाते. त्याआधारे ह्या सर्व सण उत्सवांच्या इष्ट-अनिष्टतेची चिकित्सा, पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे. पण तसे घडत नाही. कारण मोठ्या प्रमाणात दैववादात गुरफटलेल्या समाजाला हे मनोमन पटत असले, मान्य असले तरी वैज्ञानिक विचारांनुसार इष्ट बदल करायला समाज लगेच तयार होत नाही. शिक्षणातून समाजाच्या आचरणात असा योग्य बदल घडणे अपेक्षित होते. मात्र रूढींग्रस्ततेमुळे सर्वसामान्य माणूस सोडाच. परंतु, अनेक उच्च शिक्षण घेतलेली माणसंसुद्धा रूढी, प्रथा, परंपरेत अडकलेले, कालबाह्य झालेले सण-उत्सव साजरे करण्यात आनंद मानताना दिसतात. तेसुद्धा सण-उत्सवांमध्ये योग्य दिशेने बदलवण्यासाठी धाडस दाखवू शकले नाहीत आणि सामाजिक दबावापोटी दाखवू शकत नाहीत, हे आजचे वास्तव आहे. त्यामुळे आजही सण- उत्सव साजरे करण्यात फार काही इष्ट, कालसुसंगत बदल झाला, असे दिसत नाही. उलट, ह्या निमित्ताने अनेक प्रकारच्या आपत्ती, पर्यावरणाला धोके, अनावश्यक खर्चिक बाबींना प्रोत्साहन, असे विपरीत घडत राहिले. त्याचा दुष्परिणाम म्हणून, भाजी-भाकरी बरी पण कंबरडे मोडणारे सणसुद नको, अशी निराशाजनक मानसिकता सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. दुसरीकडे सण-उत्सवाच्या निमित्ताने रोजच दिवाळी, ईद, ख्रिसमस साजरे करणारे महाभाग येथे आहेत. समाजातील आर्थिक, सामाजिक, मानसिक विषमतेला खतपाणी घालणारे, पर्यावरणाचा विध्वंस करणारे आणि माणसामाणसात, धर्माधर्मात भेदभाव, वैर निर्माण करणारे, वाढवत नेणारे कोणतेही सण-उत्सव साजरे करणे, कुणाही सूज्ञ व्यक्तीला पटणारे नाही आणि परवडणारेही नाही.

श्रावण, भाद्रपद आणि अश्विन ह्या तीन महिन्यांत जवळपास सर्वच धर्मांच्या लोकांमध्ये विविध व्रतवैकल्ये, धार्मिक सण-उत्सव, कर्मकांडे यांची रेलचेल असते. या काळात ठळकपणे साजरे केले जाणारे काही सण-उत्सव असे…. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रमजान ईद, मोहर्रम, कृष्णाष्टमी, बैलपोळा, गणेशोत्सव, स्रियांच्या बाबतीतील विविध व्रत-वैकल्ये, पितृपंधरवडा, नवरात्र, दसरा-दिवाळी, ईद-ए-मिलाद.इ. खरं तर, या तीन महिन्यांच्या काळात संपूर्ण निसर्ग बहरलेला असतो. सौंदर्याने सृष्टी नटलेली असते. प्राणी-पक्षी आनंदून गेलेले असतात. खरा देव, धर्म, अध्यात्म ह्या सर्वांच्या रूपाने निसर्गात बहरलेला, आनंदलेला, फुललेला असतो. या निसर्गाशी साधर्म्य साधणारे अनेक सण-उत्सव, नव्या रूपाने आपण साजरे करू शकतो. मात्र पारंपरिकतेत अडकल्याने, कालबाह्य झालेल्या चालीरिती, व्रतवैकल्ये पाळण्याची, जोपासण्याची बंधनं असल्याने, जसेच्या तसे पाळण्याकडे आणि करण्याकडे समाजाचा कल जास्त असतो. आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्राणी, पक्षी, वेली, झाडे, शेती, डोंगर अशा विविध निसर्गातील घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांनाही मानाचे स्थान देणे, त्यांच्या प्रत्येकाबाबत दयाभाव दाखवणे, म्हणजे एका अर्थाने निसर्गाचे जतन, संवर्धन करणे, परिसंस्था टिकवणे अशा गोष्टींशी गुंफण घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते.

हा मूळ उद्देश बाजूला ठेवून, आता केवळ दिखाऊपणा, बेगडीपणा, तत्कालिक आनंद मिळवणे, स्पर्धा करणे, अहंम प्रदर्शित करणे, आधुनिक विज्ञानाच्या साधनसंपत्तीचा भलत्याच कारणांसाठी उपयोग करणे अशा विकृती मोठ्या आणि विस्तृत प्रमाणात घडताना दिसतात. दिवाळी, ख्रिसमस हे सण सलग आठवडाभर किंवा अधिक दिवस साजरे केले जातात. मात्र फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही, असे समजण्याची दुष्प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. वास्तविक फटाके वाजवून एकही फायद्याची गोष्ट घडत नाही. उलट हवा, ध्वनी यांचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. इतर अनेक दुष्परिणाम होत असतात. बकरी ईद हा सण साजरा करण्यामागे खरं तर परोपकार, त्याग, इतरांना मदत करणे असा उदात्त हेतू आहे. कोणतीही हिंसा करण्यापेक्षा, समाजात अहिंसा हे मूल्य रूजविण्याची आज मोठी गरज आहे. अशा सणांच्या माध्यमातून ते समाजात मोठ्या प्रमाणात रूजवणे सहज शक्य आहे. आज कोरोनाच्या भयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण समाज भयभीत झाला आहे. अशाकाळात लोकांना मानसिक धैर्य देणं, त्यांना शांती मिळावी, उपचारासाठी मदतीचा हात पुढे यावा अशी समाजमनाची घडण ख्रिसमससारख्या सणातून मोठ्या प्रमाणावर करता येईल.

वास्तविक जसजसा काळ पुढे सरकला तसतसे सर्व सण-उत्सव व ते साजरे करण्यामध्ये कालसुसंगत, विधायक बदल होणे, अपेक्षित होते. तसे ते करताही येतात. अनेक कुटुबियांत, समाजसमूहात असे समाजाभिमुख बदल झालेले, आपणास पाहायला मिळतात. पुरणपोळी होळीत न जाळता, भूकेलेल्याच्या पोटातील आग विझवण्याचा प्रयत्न अनेक कुटुंबे, सामाजिक संघटना सातत्याने करीत आहेत. बकरी ईदच्या दिवशी रक्तदान शिबिरे आयोजित होत आहेत. अशाप्रकारे मानवतेच्या भावनेतून, सण-उत्सवांत वैज्ञानिक दृष्टिकोनातून नवीन भूमिका, मांडणी, रचनात्मक बदल होत आहेत. याचप्रकारे सांस्कृतिक-सामाजिक परिवर्तन जर जाणीवपूर्वक घडविले तर, समाजात आनंद, एकोपा, उत्साह अशा विधायक प्रेरणा आणि भावना वृद्धिंगत होण्यास बळ मिळते. आनंद वाटतो आणि वाढतो. मात्र परंपरेने चालत आलेल्या रूढी, प्रथा, परंपरा पाळण्यात, जपण्यात, जोपासण्यात आणि जतन करण्यात धन्यता मानणारा आणि त्याच बाजूने सतत कल असणारा, त्याचप्रमाणे सण-उत्सवाच्या निमित्ताने गैरप्रवृत्तींना, व्यसनांना, चंगळवादाला मोकळीक देणारा आपला समाज, या सर्व सण-उत्सवांना खरंच विधायक रूप देण्यास तयार आहे का, होईल का, हा खरा प्रश्न आहे. याची दुसरी बाजू म्हणजे, सर्व सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, सणवार काबूत ठेवू पाहणारी, वर्चस्व गाजवणारी, स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे बाजारीकरण, व्यापारीकरण करणारी आणि या सर्वांना संरक्षण, प्रोत्साहन देणारी धार्मिक कट्टरता आज समाजात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. ही प्रवृत्ती, असा विधायक समाजाभिमुख, पर्यावरण संतुलन साधणारा बदल सहजासहजी स्वीकारील का, हा मूळ आणि गंभीर प्रश्न आहे.

देव,धर्म आणि अध्यात्माच्या नावाने सण-उत्सव साजरे करण्यासाठी, लोकांना भरीस घालणारी, त्यासाठी लोकांकडून मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी गोळा करून, टगेगिरी आणि मौजमजा करायला सवकलेली ही गुंडप्रवृत्ती कशी आणि कोण थोपवणार, थांबवणार, हा भयंकर मोठा सामाजिक प्रश्न आहे.

थोडक्यात, भारतीय समाजातील विविध जाती धर्माच्या लोकांचे सण-उत्सव जरी वेगवेगळे असले तरी, प्रत्येक जाती-धर्मात शेवटी माणसंच असतात. त्या सर्वांना सण-उत्सव प्रिय असतात. आवश्यक वाटतात. फक्त हे सर्वधर्मीय सण, उत्सव, व्रतवैकल्ये, विधी, जत्रा-यात्रा, यज्ञयाग, उपास-तपास, वारी, वाढदिवस, लग्नसमारंभ, प्रार्थना या सगळ्यांना एक विधायक रूप देऊन, मानवतेच्या भावनेतून, पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख करता येऊ शकेल,असे प्रयत्न विस्तृत स्वरूपात होणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सणाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देता येईल. त्यामुळे अनेक विकृतींना थारा असणार नाही. मात्र अशा प्रकारची भूमिका समाजधुरीण, शिक्षण व्यवस्था, राजकीय व्यवस्था, प्रसार माध्यमं यांनी जाणीवपूर्वक, समाजामध्ये सातत्याने रुजवणे आवश्यक आहे. पुढील काळाची ती अत्यंत महत्त्वाची गरज आहे.

सर्व माणसांना सण-उत्सव हवेच असतात, भावनेचा हा समान धागा सर्वांमध्ये समान असतो. सर्वांचे, सर्व सण-उत्सव सर्वांनी एकत्र येऊन आपले मानून, एकमेकांमध्ये मिळून-मिसळून साजरे केले तर, सामाजिक पातळीवरील शत्रुत्व, वैरभाव, भेदभाव, तेढ कमी होण्यास मदत होईल. वैयक्तिक आणि सामाजिक ताणतणाव कमी होऊ शकतील. सर्वांना आनंद घेण्याची संधी मिळेल. सर्वांच्या भावना जपल्या जातील. आताची आणि पुढील काळाचीही ती एक अपरिहार्य गरज आहे, एवढे मात्र नक्की !!!

– ठकसेन गोराणे