जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश

कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरुन जो काही निर्बुद्ध गदारोळ आपल्या समाजात सुरू आहे.तो पाहाता आपल्या एकंदर समाजानेच सारासार विचारशक्ती गमावली आहे की काय, याची रास्त शंका यावी अशी परिस्थिती आहे. अलिकडे संस्कृतीरक्षणाकडे लोकांचा ओढा जरा वाढलाच आहे. संस्कृतीरक्षकही वाढले आहेत. पुन्हा संस्कृती म्हणजे काय, याची ठराविक अशी व्याख्या नाही. एखाद्याला एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर ते संस्कृतीभंजन समजलं जातं. इतक्या उथळपणे आपण वागू लागलो आहोत.

Poet Dinkar Manvar Controversy
कवी दिनकर मनवर यांची वादग्रस्त कविता

जात-धर्म यांच्याबद्दलच्या जाग्या झालेल्या टोकाच्या अस्मिता आणि आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या उत्कर्षासाठी त्या पुन्हा कधीही झोपू नयेत याची व्यवस्थित काळजी घेणार्‍या स्वार्थांध राजकारण्यांनी देशातील माणसांनी विचार करुच नये, याची व्यवस्थित काळजी अगदी लोकांच्या शाळेपासूनच घेतलेली आहे. त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत व यापुढेही भोगावे लागणार आहेत.

दिनकर मनवर यांची कविता मी वाचली. दोन पानाच्ंया त्या कवितेत आणखीही बरंच काही अर्थपूर्ण आहे. मनवरांनी त्या कवितेतून ‘पाणी’ हे प्रतिक घेऊन आपल्याकडच्या सामाजिक परिस्थितीमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न कवितारुपाने समाजासमोर ठेवले आहेत, ते गांभिर्याने विचार करण्यासारखे आहेत.

जवळपास 50 ओळींच्या या कवितेत कविने समाजासमोर आजच्या वर्तमानातलं दाहक वास्तव मांडलं आहे. किंवा अदिवासी पोरींच्या स्तनांसारखं जांभळं या पाच शब्दांच्या ओळीकडे सर्वांचं लक्ष गेलंय. त्यातही या ओळीतील पाच शब्दांमधील ‘स्तन’ ह्याच शब्दाकडे जास्त लक्ष गेलं असण्याचीच शक्यता जास्त आणि मग पुढचं सगळं घडलं असावं. ‘या ओळींमळे मनात लज्जा उत्पन्न होते’ अशा आशयाचं विधान काही राजकीय नेत्यांकडून केलं गेलं (खरं तर निर्लज्जपणा कोळून प्यायलेल्या राजकीय लोकांच्या मनातही लाज उत्पन्न झाली, ही या कवितेची आनुषंगिक जमेची बाजू पकडायला हवी). मला आश्चर्य वाटतं की, याच कवितेच्या एका कडव्यात…

पाणी स्पृष्य असतं की अस्पृष्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रम्ह?
पाणी ब्राम्हण अस्तं की क्षत्रिय की वैश्य?
पाणी शुद्र असतं की अतिशुद्र?
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

या कविने विचारलेल्या आणि समाजाचा घटक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला आपलीच लाज वाटावी अशा प्रश्नाबाबत मात्र कुणालाच लाज का वाटत नाही, किंवा कुणाच्याही मनात लज्जा का उत्पन्न होत नाही? याचं उत्तर कुणाकडेच नाही. या कडव्यात आणि एकूणच कवितेत दिलिप मनवरांनी विचारलेला प्रश्न कुणाला बोचत नाही. अस्वस्थ करत नाही आणि स्तन मात्र अस्वस्थ करतात, हे माझ्या तरी आकलनाच्या पलिकडचं आहे.

स्त्रियांच्या शरिराच्या एका किंवा अनेक भागांचं वर्णन वाचून अस्वस्थ होणार्‍यांना, तिच्या शरिराचे त्यांच्यासहित अनेकांनी अनेकांगानी घेतलेले भोग मात्र अस्वस्थ करत नाहीत. तिचे भोग घेतले जात असताना मात्र ती आपल्या जाती-धर्माची आहे का नाही आणि भोग घेणारा कोणत्या जाती-धर्माचा आहे…यावर ज्या समाजाचा पावित्रा अवलंबून असतो त्या समाजाचं भवितव्य फार चांगलं नसतं. मनवरांनी आपल्या कवितेत ‘अदिवासी’ पोरीचा केवळ उल्लेख केलाय म्हणून अदिवासी समाज, म्हणजे अदिवासी नेते भडकले. त्या जांभळ्या स्तनांच्या अदिवासी पोरीच्या जागी कोणत्याही रंगाचे स्तन आणि तो तो रंग धारण करणार्‍या कोणत्याही समाजाची पोरगी असती तरी त्या त्या समाजात हेच झालं असतं यात शंका नाही.

स्त्री म्हणजे फक्त तिचे स्तन किंवा जननेंद्रिय इतकंच असतं. हेच आपला बहुसंख्य समाज समजतो. दुसर्‍याला त्या अवयवांचा प्रतिकात्मक म्हणून उल्लेख करायची मुभा नाही. असा काहीतरी आपला समज अलिकडे झालाय. तो तसा उल्लेख का झालाय यासाठी त्या लेखक/कविंची ती पूर्ण कलाकृती समजून घ्यावी लागते, हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. अशा लोकांना विंदांच्या ‘झपताल’ या कवितेतल्या, आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते… आणि मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात… या ओळींमधे सेक्सच दिसणार आणि त्या ओळी वाचून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होणार.

‘प्रेम कुणावर करावं’ या कवितेतील ‘प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,..प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं.. या कुसुमाग्रजांच्या ओळीत अश्लिलता दिसते, असे लोक आज आपल्या समाजाचे नेतृत्व करत आहेत. हे दुर्दैवी आहे. उद्या या नितांतसुंदर कवितांवरही बंदी आणल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या व अशांसारख्या कवितांवर बंदी आणायची झुंडशाही मागणी विंदा किंवा कुसुमाग्रजांनी या कविता लिहिल्या तेव्हा केली गेली नाही, याचा अर्थ आपला पूर्वीचा अशिक्षित व अर्ध शिक्षित समाज आताच्या सुशिक्षित उच्च शिक्षित समाजापेक्षा जास्त शहाणा होता, असा होतो. शिक्षणाने पगार आकाशाच्या दिशेने वाढले, अक्कल मात्र जमिनीच्या दिशेने निघाली. आपल्या शिक्षणातच मोठी खोट आहे, असे मी सुरुवातीस म्हणालो ते याचमुळे.

माझी आई रोज देवी महात्म्य वाचते. गेली तीस-पस्तिस वर्ष तरी मी ते ऐकत आलो आहे. त्यातील पंधराव्या अध्यायातील काही श्लोकांत देवीच्या रुपाचं वर्णन आहे. श्लोक सांगतात,

आतां सर्व देवशरिरांपासूनी ।
जी कां प्रकट जाहली भवानी ।
अमितप्रभा त्रिगुणरुपिणी ।
महालक्ष्मी प्रत्यक्ष ॥ 11 ॥

महिषमर्दिनी ती जाण ।
श्र्वेत असे तियेचे आनन ।
जियेचे भुजं नीलवर्ण ।
श्र्वेत स्तनमंडल जिचें ॥ 12 ॥

रक्तमध्य शरीर जाण ।
रक्त असती जियेचे चरण ।
जंघा ऊरु रक्तवर्ण ।
अत्यंत मद जियेचा ॥ 13 ॥

अत्यंत चित्र जियेचे जघन ।
चित्रमाल्यांबरभूषण ।
अंगी शोभे चित्रानुलेपन ।
कांतिरुप सौभाग्य शील ॥ 14 ॥

या ओळींचा सोप्या मराठीतील अर्थ, महिषासुरमर्दिनी म्हणजेच साक्षात त्रिगुणात्मिका महालक्ष्मीच आहे. तिचं मुख शुभ्र धवल, हात निळे, तिची स्तन मंडलं अत्यंत शुभ्र, कंबर, पाय व जांघा हे अवयव रक्तासारखे लाल असून, ती मद्यपानामुळे उन्मत्त अवस्थेत असते. तिचा जघन भाग चित्रविचित्र असून, तिने चित्र विचित्र रंगाच्या माळा, वस्त्र व अलंकार परिधान केलेले आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी उट्या अंगाला लावल्या आहेत व तिच्या ठायी कांती, सौंदर्य व सौभाग्य यांचा प्रकर्ष झालेला आहे असा आहे. साक्षात देवीबद्दल असा विचार करणारे शेकडो वर्षांपूर्वीचे ते स्तोत्रकर्ते अधिक शहाणे होते की आताचे स्वत:ला नेते मानणारे अश्लिलमार्तंड अधिक शहाणे, हे मला कळत नाही.

दिनकर मनवरांच्या कवितेबद्दल जो काही हिडिस तमाशा आपल्याकडे सुरू आहे. त्यामुळे मला काही वर्षांपूर्वी तालिबान्यांनी अफगाणीस्तानातल्या बामियान येथील पुरातन बुद्ध मूर्ती तोफा लावून उध्वस्त केल्या होत्या ती घटना आठवली. मुनवरांच्या कवितेसंबंधी जो धुडगूस घातला गेला, तो मला तालिबान्यांनी बुद्धमूर्ती उध्वस्त केल्यासारखाच वाटतो. हुल्लडबाजी करुन यावर बंदी, त्यावर बंदी अशा मागण्या आणि त्या बेलगाम झुंडशाहीपुढे झुकणारे लोकनियुक्त सरकार अशा अलिकडच्या वारंवार घडणार्‍या घटना पाहिल्या की, आपण जागतिक महाशक्ती होण्याच्या दिशेने चाललोय की वेगाने तालिबान्यांच्या दिशेने चालू लागलो आहोत, हेच कळेनासे होते.

गोरेपान स्तन आणि लाल जांघा असलेली ती महिषासूरमर्दीन लवकरात लवकर अवतार घेवो आणि आजच्या समाजाचं नेतृत्व करणार्‍या महिषांचं पुन्हा एकदा निष्ठूरतेने मर्दन करो, हेच तिच्याकडे येणार्‍या नवरात्रानिमित्त मागणं. शेवटी आपातकालीन स्थितीत देवमंडळाने देवीची मनधरणी केल्याचे व देवीने देवांना तारल्याचे अनेक दाखले पुराणांत आहेतच. आपल्याला तारण्यासाठी तोच नुस्खा आपण मर्त मानवांनी पुन्हा एकदा अजमावावा असं मला तीव्रतेने वाटू लागलं आहे.

-नितीन साळुंखे
(लेखक साहित्यविषयाचे अभ्यासक आहेत)