पावसाने झोडले….राजाने मारले?

रोम जळत असताना फिडल वाजवणारा राजा निरो आणि परतीच्या पावसाने राज्यातील पिके आडवी केली असताना सत्तास्थापनेसाठी ‘आपल्या बाजूने पडणार्‍या आकड्यांच्या खेळात’ रमलेले राजकारणी यात गुणात्मकदृष्ठ्या फरक नसतो. भिजलेल्या नेत्यांसाठी संवेदनशील होणार्‍या सभागृहातील दोन्ही बाकांवरच्या महाराष्ट्राने आता भिजलेल्या पिकांमुळे आणि पुरात वाहून गेलेल्या शेतकर्‍यांसाठी आपापल्या सत्तेच्या आकडेवारीचा खेळ तातडीने संपवून निदान शेतकर्‍यांसाठी तरी एकत्र काम करण्याची गरज आहे.

यंदा राज्यात पाऊस उशिराने दाखल झाल्यावर त्याची आतुरतेने वाट पहिली जात होती. मात्र, उशिराने आलेल्या पावसाने शेतकर्‍याला दिलासा देण्यापेक्षा त्याला आणखीणच अडचणीत टाकले. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना उशिराने आलेला हा पाहुणा दिवाळी झाली तरी जाण्याचे नाव घेत नाही. मागील एक महिन्यापासून वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर परतीच्या पावसाने नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हा परतीचा पाऊस परतण्याचे नाव घेत नाही. ऋतुचक्र एक महिन्याने पुढे सरकल्याचा हा पुरावा मानावा काय? तर त्याची भौगोलिक कारणे शोधण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत या पावसामुळे गुदरलेल्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना आणि नियोजन करण्याची गरज आहे, परंतु निवडणुकीचा ज्वर अद्याप पुरता उतरलेला नाही. जागावाटप, सत्ता समीकरण, आकड्यांचा खेळ यातच अडकलेल्या राजकीय पक्षांना या सत्तेपुढे शेतकर्‍याच्या व्यथा समजण्याचे शहाणपण यायला अजून अवकाश आहे. यात काही अंशी विरोधकही आहेतच. सत्तेसाठी एकमेकांना कोंडीत पकडण्याच्या स्पर्धेत विजयाचे फटाके फोडणार्‍यांना शेतकर्‍यांचा आक्रोश ऐकू जात नाही. ऐन दिवाळीत शेतकर्‍यांच्या घरात अंधार झाला आहे. मात्र, एकमेकांच्या विजयाचे कौतुकसोहळे संपण्याची वाट पाहण्याशिवाय राज्यापुढे सध्यातरी गत्यंतर नाही.

प्रचारसभेत नेत्यांना भिजवून सत्तेची राजकीय गणिते बिघडवणारा हा पाऊस नेत्यांना उपकारक ठरला असेलही. मात्र, या ‘न परतीच्या’ पावसाने शेतकर्‍याला पुरते उद्ध्वस्त केले आहे. पुरातून सावरलेल्या शेतकर्‍याने उभे केलेले उरलेसुरले पीकही पावसाने आडवे केले आहे. ठाणे, रायगड, पालघरमध्ये आलेल्या पूरस्थितीतील बाधितांना अद्याप पुरेशी सरकारी मदत मिळालेली नाही. त्यासाठी आदिवासी शेतकर्‍यांचे मोर्चे निघत असताना हातातोंडाशी आलेले पीकही पावसाने निदर्यपणे हिसकावून नेले आहे. या तीनही जिल्ह्यात २५ टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज असताना नेते मात्र सत्तास्थापनेच्या आकडेवारीत गुंतले आहेत. ठाणे ग्रामीण भागातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील भातपिकाला मोठा फटका बसला आहे. याआधी विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णयप्रक्रियेत झालेल्या विलंबानंतर आता सत्तेच्या खेळात शेतकरी नाडला जात आहे. कृषी विभागाकडून या भागात पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र, शेतकर्‍याला तातडीच्या मदतीची गरज आहे. एकट्या पालघरमध्ये जवळपास दोनशे हेक्टर भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

भाताचे कोठार मानल्या जाणार्‍या वाडा, वसई, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, पालघर तालुक्यातील भाताची नासाडी झाली आहे. न परतीच्या पावसामुळे दसर्‍याला दारात येणारा गरवे आणि हळव्या भाताला मोड आले आहेत. रायगड जिल्ह्यात आणि पुढे कोकणातही वेगळी स्थिती नाही. एकट्या रायगडमध्ये पाच हेक्टरवरील पीक आडवे झाले आहे. भिजलेले कुजलेले धान शेतातल्या पाण्यात तरंगत आहे. जवळपास १५ हेक्टर पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील उर्वरित भागातही न परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील इतर भागात बरसणारा पाऊस यंदाही मराठवाड्यावर रुसल्यामुळे शेतकर्‍याला कोरड्या दुष्काळाची भीती होती. चारा छावण्या सुरू केल्या जात असतानाच परतीच्या पावसाने चाहूल दिली. थोडासा ओला दिलासा मिळाला असतानाच कमी पावसात कशीबशी जगवलेली पिकं न परतीच्या या पावसाने हिसकावून नेली आहेत. बीडमध्ये मागील १५ दिवसांपासून पावसाने कोसळधार सुरूच ठेवली आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, बाजरीचे उभे पीक आडवे झाले आहे. उस्मानाबादमध्येही पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून लातूरमध्ये पीक पंचनामे सुरू झाले आहेत. विदर्भातही जवळपास ६० ते ७० टक्के पिकाची नासाडी झाली आहे. दहा लाख हेक्टरमधील पिकाने मान टाकली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत पुरस्थितीशी झगडणार्‍या शेतकर्‍याला पावसाने दुहेरी फटका दिला आहे. भरपाई मिळवण्यासाठी शेतकर्‍यांचे मोर्चे निघत आहेत. पूर आणि परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या नाशिकमध्येही वेगळी परिस्थिती नाही. जवळपास २० हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकाची नासाडी झाली आहे, तर खान्देशातील धुळे, जळगावमध्ये जवळपास दोन लाख हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. राज्यातील बहुतांशी भागात दिवाळीची सुगी पावसाने आडवी केली आहे.

राज्यातील स्थिती अशी भयानक असताना सत्तास्थापनेत मश्गुल असलेल्या सत्ताधार्‍यांनी आता निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यावर सत्तेच्या मूळ उद्दिष्टांकडे लक्ष देण्याची गरज आहे. निवडणुकीतील जाहीरनामे आणि आश्वासनांपेक्षा सद्यस्थितीत पिकांसह कणाही मोडलेल्या शेतकर्‍याला उभे करण्याची गरज आहे. निवडणुकीआधी, प्रादेशिक अस्मिता, सुरक्षा, धार्मिक, जातीय आणि ध्रुवीकरणाचा खेळ संपवून राज्यातला शेतकरी पुन्हा ताठ मानेच्या पिकासारखा कसा उभा करता येईल, याकडे लक्ष द्यावे,अन्यथा येत्या काळात शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती आहे. राजकारण्यांसाठी निवडणुकीतील दहा रुपयातली थाळी पिकवणार्‍या शेतकर्‍याच्या ताटात त्याची आसवे पडत असताना सत्तेचे संधीसाधू राजकारण पाहण्यात आणि दाखवण्यात माध्यमंही मश्गुल आहेत. सत्तेच्या आकड्यांची जुळवाजुळव करणार्‍यांचे तोंडदेखले हेवेदावे दाखवले जात असतानाच राज्यात सारे कसे आलबेल आहे? असे चित्र जाणीवपूर्वक रंगवले जात आहे. त्यामागचे राजकीय हेतू लपून राहिलेले नाहीत. खातेवाटपात सत्ताधार्‍यांचे एकमत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे चर्चेचे हे गुर्‍हाळ आणखी काही दिवस सुरूच राहील. मात्र, तोपर्यंत सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍याने जीव सोडलेला असेल, असे होता कामा नये.

आर्थिक मंदीचे मळभ दाटून आलेले आहेत. दिवाळीच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले आहे. आर्थिक विकासाचा दर गाठताना सरकारची कसरत होत आहे. त्यातच या ना परतीच्या पावसाने स्थिती आणखी गंभीर केली आहे. त्याचे परिणाम येत्या काळात बाजारात दिसू लागतील. अन्नधान्याचा तुटवडा, पावसाच्या मरणदाढेतून वाचवलेल्या उरल्या सुरल्या पिकाचा हमी भाव, खरेदी केंद्र आणि साठेबाजी ही आव्हाने पुढे आहेतच. पावसाने झोडले आहेच, आता राजानेही मारले तर तक्रार कुणाकडे करायची? अस्मानीने लुटले आता सुलतानीने तरी दिलासा द्यावा, एवढीच अपेक्षा या मातीचे मोल जाणणार्‍याला आहे. सत्तेचा खेळ ताबडतोब थांबवून सुलतानी राजाने आतातरी या मातीचे मोल ओळखावे…अन्यथा सुलतानीची आणि राजपदाचीही माती होण्यास वेळ लागणार नाही.