माणुसकीचा धर्म…

कोणतीही धार्मिक स्थळे, स्मारके किंवा वास्तूंच्या उभारणीमागे एक निकोप दृष्टिकोन असायला हवा. श्रद्धास्थळे प्रेरणास्थळे व्हायला हवीत. अशा वास्तूंच्या आडून कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाऊ नये. वा सामाजिक द्वेषाचा इतिहास सांगितला जाऊ नये. परस्परांचा सन्मान करणं आणि देशाच्या सार्वभौमत्वाला, एकोप्याला कोणतीही बाधा येईल असं वागणं, हे अंतिमतः अहिताचेच ठरण्याची शक्यता असते. शेवटी देव, धर्म आणि त्यामागची आस्था ही व्यक्तिगतच बाब असायला हवी. आपला देश असंख्य विचारधारा आणि अस्मितांत विभागला गेला आहे. अशावेळी वैचारिक परिपक्वता दाखवून अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीची घटना धर्मनिरपेक्ष भारतातली महत्त्वाची घटना असली तरी हा कुणाचा विजय अथवा पराजय नाही. त्यादृष्टीने याकडे पाहिले जाऊ नये. माणुसकीचा धर्म सगळ्यांनी जपायला हवा.

एकोणिसाव्या शतकातील विचारवंत कृ. अ. केळुसकर यांनी साधारण शतकभरापूर्वी ‘समाजास धर्माची आवश्यकता आहे काय? ’ असा लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी एका तत्वज्ञाचा हवाला देत असे म्हटले की, ‘निरपेक्षपणे परोपकार करण्याची बुद्धी मानवास प्राप्त होण्यास त्याच्या अंगी उदात्त अशा धर्माची तत्वे बिंबली पाहिजेत. या शतकाच्या आरंभी फ्रान्समध्ये कामटी नामक एका तत्त्वज्ञाने चालू ख्रिस्ती धर्मात अशी वृत्ती मनुष्याच्या ठायी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नाही, असे पाहून त्याने Religion of humanity असा नवाच धर्म स्थापिला, त्याचा हेतू इतकाच, मनुष्याने अदृष्ट, अज्ञेय अशा कोणातरी काल्पनिक शक्तीस प्रसन्न करून घेण्याच्या हेतूने जगात खटपट करण्यापेक्षा या जगातील मनुष्यजातीच्या हितासाठी झटणे हाच आपला धर्म आहे, असे मानून चालण्याने मनुष्याकडून उत्तमप्रकारचे नित्याचरण घडते.’ आज आपल्या देशात धर्म ही किती महत्त्वाची गोष्ट झाली आहे, हे आपण सर्व जाणतोच. पण मानवतेचा धर्म ही कल्पनाच मोठी अनोखी वाटते. म्हणून हे अवतरण मुद्दामच अधोरेखित केले. आज संपूर्ण जगात धर्म ही एक प्रबळ शक्ती झाली आहे.

मागच्या आठवड्यात भारतातल्या बहुसंख्य हिंदू धर्मियांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या निमित्ताने मोठा जल्लोष केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्यानगरीत झालेला हा उत्सव अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असाच होता. ’राम जन्मभूमीच्या पवित्र स्थानावर भव्य राम मंदिर उभारणे हे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य आहे. हे मंदिर भारताच्या आधुनिक संस्कृतीचे प्रतीक बनेल, आपल्या शाश्वत आस्थेचे, राष्ट्रीय भावनेचे आणि कोट्यवधी लोकांच्या सामूहिक संकल्पशक्तीचे प्रतीक बनेल. हे मंदिर सत्य, अहिंसा, आस्था व बलिदानाला न्यायप्रिय भारताने दिलेली भेट आहे. यामुळे भारताची कीर्तीपताका युगानुयुगे दिगंतात फडकत राहील.’ असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे की, कोणतीही वास्तू राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असायला हवी. राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा या शतकातला एक सर्वोच्च सोहळा नक्कीच होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे भूमीपूजन वैशिष्ठ्यपूर्ण होते. आधी झालेले विविध राजकीय वादविवाद आणि माध्यमांनी घडवून आणलेल्या चर्चेमुळे संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे लागले होते. विविध वाहिन्यांवर साधू महंतांसह, अभ्यासक, नेते आणि पॅनलिस्टच्या चर्चेने माध्यम जगत व्यापून गेले होते.

अयोध्येतील राम मंदिर हा भारतातील एक अत्यंत संवेदनशील मुद्दा होता. तो केवळ हिंदू आणि मुस्लीम एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता, तर त्याला खूप व्यापक असा सांस्कृतिक संदर्भ होता. मागच्या शंभरेक वर्षात कितीतरी वेळा या मंदिराच्या निमित्ताने कायदेशीर आणि राजकीय लढाया लढल्या गेल्या. कित्येक लोकांचा यात बळी गेला. मागची किमान तीन दशकं तर हा मुद्दा भारतीय राजकारणाचा एक प्रमुख मुद्दा राहिला आहे. विशेषतः 1990 नंतर हा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेमुळे तर संपूर्ण देश ढवळून निघाला होता. याचा फायदा अर्थातच भाजपला झाला. पुढच्या काळात म्हणजे 1992 साली लाखो कारसेवकांनी अयोध्येतल्या बाबरी मशिदीचे घुमट पाडले. याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला. धार्मिक दंगलीत अनेकांनी आपला जीव गमावला.

मुघल सम्राट बाबराच्या सेनापतीने सोळाव्या शतकाच्या प्रारंभी ही मशीद बांधली होती, असे सांगितले जाते. आणि विशेष म्हणजे याच जागेवर रामाचा जन्म झाल्याची हिंदू धर्मियांची श्रद्धा आहे. पुढे न्यायालयाच्या आदेशानुसार या जागेचे उत्खननही झाले. आणि वादग्रस्त जागा राम मंदिरासह निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात बरोबरीने विभागून देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय ज्या दिवशी झाला त्यादिवशी संपूर्ण देशात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला होता. मात्र मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने वादग्रस्त जमिनीचा निर्णय सुनावला आणि राम मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.

अर्थात ही सगळी प्रदीर्घ आणि प्रचंड वादग्रस्त अशी स्थिती लक्षात घेता मंदिराच्या भूमीपूजनाकडे सर्वांचे डोळे लागणे स्वाभाविक होते. भारतीय राजकारणाला या मुद्याने नवे वळण दिले. हिंदू, अ-हिंदू अशी सरळ सरळ विभागणी झाली. संशय, संभ्रम, हिंसा आणि द्वेषाने संपूर्ण देश काही काळ तरी नक्कीच भरडला गेला. विशेषतः नव्वदचे दशक हे त्यादृष्टीने अत्यंत तणावाचे होते. भाजप, विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेच्या ज्वलंत हिंदुत्वाने तेव्हाची तरुण पिढी प्रचंड प्रभावित झाली होती. गावोगावी असे भारावलेले शेकडो तरुण त्या काळात दिसत होते. पुढे पुढे सत्ताकारणाची, राजकारणाची समीकरणे बदलत गेली. आणि कधीकाळी अत्यंत कडवे हिंदुत्व जपणारी पिढी जरा मवाळ होत गेली. ज्या मुद्याने अनेकदा सामाजिक सलोखा बिघडला. राष्ट्रवादाच्या संकल्पना बदलल्या. जातीय आणि धार्मिक विद्वेष वाढला. तोच मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सहज सुटला. या निर्णयाचा कुठेही हिंसक प्रतिवाद झाला नाही. कारण नवी पिढी ही विवेकी आहे. विचारी आहे. याचा प्रत्यय आला. मंदिराचे भूमीपूजन ठरले असतानाही ही पिढी यासंदर्भात फार व्यक्त झाली नाही. म्हणजे श्रद्धेचा किंवा आस्तिक नास्तिकतेचा मुद्दा बाजूला ठेवला तरी नव्या पिढीने या घटनेकडे खूप समंजसतेने पाहिले आहे, हे महत्त्वाचे. विशेषतः आजचा सोशल मीडियाधारित अफवांच्या काळात कुठेही या घटनेचे नकारात्मक पडसाद उमटले नाहीत. देव, धर्म किंवा तत्सम गोष्टींनी समाजाला एक भान द्यायला हवे असं मानणारी आजची पिढी आहे.

भारत हा बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक देश असल्यामुळे प्रत्येकाच्या आस्थेचे, श्रद्धेचे केंद्र भिन्न असणे स्वाभाविक आहे. तथापि अशा केंद्राकडे कोणत्याही धार्मिक वा अस्मितेच्या पूर्वग्रहातून न पाहता किंवा एकमेकांच्या भावनांचा अनादर न करता सन्मान करणे ही कृती यापुढच्या काळात अधिक महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारात धार्मिक निवड आणि स्वातंत्र्याचा हक्क समाविष्ट आहेच. त्यामुळे एकमेकांच्या रूढी परंपरांचा आणि श्रद्धेचा अवमान करण्याचे काहीच कारण नाही. ‘मर्यादा पुरुषोत्तम’ अशी मान्यता असलेला राम हा पुरातन काळापासून भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीला प्रारंभ होणे ही घटना भारतीय इतिहासातील मोठी घटना आहे. पक्षीय विचारधारा वगैरे बाजूला ठेऊन अनेकांनी याचे स्वागत केले. हेही मुद्दामच नमूद करायला हवे. कारण प्रत्येकालाच एक आदर्श राज्य हवे आहे. यानिमित्ताने त्या पर्वाची सुरुवात होत असल्याची अनेकांची भावना असू शकते.

खरं तर कोणतीही धार्मिक स्थळे, स्मारके किंवा वास्तूंच्या उभारणीमागे एक निकोप दृष्टिकोन असायला हवा. श्रद्धास्थळे प्रेरणास्थळे व्हायला हवीत. अशा वास्तूंच्या आडून कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाऊ नये. वा सामाजिक द्वेषाचा इतिहास सांगितला जाऊ नये. परस्परांचा सन्मान करणं आणि देशाच्या सार्वभौमत्वाला, एकोप्याला कोणतीही बाधा येईल असं वागणं, हे अंतिमतः अहिताचेच ठरण्याची शक्यता असते. शेवटी देव, धर्म आणि त्यामागची आस्था ही व्यक्तिगतच बाब असायला हवी. ती इतरांवर लादली जाऊ नये. तसा प्रयत्न झाला तर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच आपला देश असंख्य विचारधारा आणि अस्मितांत विभागला गेला आहे. अशावेळी वैचारिक परिपक्वता दाखवून अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. ही घटना धर्मनिरपेक्ष भारतातली महत्त्वाची घटना असली तरी हा कुणाचा विजय अथवा पराजय नाही. त्यादृष्टीने याकडे पाहिले जाऊ नये. धर्माला वगळून कोणत्याही समाजाला आज जगता येणे कठीण झाले आहे. धर्माची ही अनिवार्यता पुढेही कमी होईल असे वाटत नाही. फक्त अपेक्षा एवढीच की धर्माने द्वेषाच्या भिंती उभ्या राहू नयेत. धर्म हा माणुसकीचा असावा. ‘रिलीजन ऑफ ह्युमॅनिटी’. अपेक्षा करूया की पुढचा काळ हा अशा ’माणुसकी’ धर्माचा नक्कीच असेल.

-पी. विठ्ठल