घरफिचर्सकोरोनाबरोबर लढणार्‍या ‘चिनी रणरागिणी’

कोरोनाबरोबर लढणार्‍या ‘चिनी रणरागिणी’

Subscribe

कोरोनाचा धोका पुरुषांना अधिक व महिलांना कमी तसेच महिला व पुरुषांच्या मृत्यूदरातही तफावत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर चीन सरकारने आरोग्य सेवेतील महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले. देशाला वाचवण्यासाठी अनेक निवृत्त महिला नर्सेस, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुढे आल्या. मग काय समस्त महिला ब्रिगेडने शहरातील अधिकाधिक रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी कंबर कसली. काही ठिकाणी तर रुग्णालयांमध्ये फक्त महिला डॉक्टरच दिसू लागल्या. कारण पुरुष डॉक्टर मोठ्या संख्येने कोरोनोग्रस्त झाले होते. महिलांचा हा जोश बघून चीनमध्ये महिलांचे स्थान उंचावले. कोरोनाचे आव्हान चिनी महिलांनी स्वीकारले. आजपर्यंत ज्या समाजाने महिलांना दुय्यम स्थान दिलं तोच चिनी समाज आज महिलांचा उदोउदो करताना दिसत आहे.

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसच्या खाईत लोटणारा चीन आता पूर्वपदावर येत आहे. तेथील शाळा कॉलेजेस सुरू झाली असून ऑफिसेसही सोशल डिस्टन्सिंग सांभाळत सुरू झाली आहेत. चीनमधून कोरोनाचा संपूर्ण नायनाट जरी झाला नसला तरी तेथे सामान्य जीवन मात्र सुरू झालं आहे. चिनी लोक कोरोनाबरोबर जगायला बर्‍यापैकी शिकले आहेत. मृत्यूचीही भीती त्यांना आता थांबवू शकत नाहीये. यामुळे डिसेंबर ते मार्च या दरम्यान मृत्यूचं तांडव बघणार्‍या चिनी लोकांना मरणाची भीती कशी वाटत नाही असा प्रश्न सगळ्याच राष्ट्रांना पडला आहे.

पण ऐकून आश्चर्य वाटेल की याचे खरे श्रेय तेथील सरकारला व संशोधकाना नाही तर प्रत्येक चिनी महिलेला जाते. कारण चीनमध्ये कोरोनाबरोबर लढण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. यामागे अनेक वैद्यकीय कारणे जरी सांगण्यात येत असली तरी कोरोनाबरोबर लढण्यासाठी येथील महिलांनी जी हिंमत दाखवली त्याची एकट्या चीनच्याच नव्हे तर जगातील इतिहासात नोंद करता येण्यासारखी आहे.

- Advertisement -

भारताप्रमाणेच चीनमध्येही महिलांच्या तुलनेत सर्वच क्षेत्रात पुरुषांचे अधिक वर्चस्व आहे. यामुळे येथेही प्रत्येक महिलेला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी विविध पातळीवर लढावे लागते. पण कोरोनाने येथील महिलांचं जगचं बदलून टाकलंय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वुहानमध्ये कोरोनाचा कहर झाला. रोज शेकडो नंतर हजारो लोकांना संसर्ग होऊ लागला. तर तेवढेच मृत्यूमुखीही पडत होते. दवाखाने, रुग्णालय हाऊसफुल झाली होती. नक्की कोणता आजार पसरतोय हेच बर्‍याचजणांना कळत नव्हतं. सर्दी, खोकला लोकांच्या जीवावर बेतू लागला होता.

संशोधक दिवसरात्र या नवख्या व्हायरसच्या मूळापर्यंत पोहचण्याचे काम करत होते. तर दुसरीकडे व्हायरसमुळे रोज लोक जीव सोडत होते. काहीतरी भयंकर घडत आहे. हे तोपर्यंत चिनी नागरिकांना कळाले होते. कारण कोरोना व्हायरस जरी त्यांच्यासाठी नवीन असला तरी व्हायरसमुळे संसर्ग होण्याची ही चीनमधील पहिली घटना नव्हती. यामुळे लोक लवकर सतर्क झाले.

- Advertisement -

याच दरम्यान एका संशोधनात कोरोनाचा धोका हा पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी असल्याचं समोर आलं. पुरुषांच्या तुलनेत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडण्याचा महिलांचा आकडाही कमी होता. याचे कारण जाणून घेता महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्समुळे त्या कोरोनाचा सामना करू शकतात हे स्पष्ट झालं. चीनमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना अनेक पुरूष डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. अनेक जण व्हेंटिलेटरवर होते. तर अनेक वैद्यकीय कर्मचार्‍यांचा सतत रुग्णांच्या संपर्कात आल्याने लागण होऊन मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे आज ज्या प्रकारे भारतात दररोज कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तशीच वाढ वुहानमध्ये होत होती. रुग्णांना बघण्यासाठी डॉक्टरच नव्हते. कारण प्रत्येक रुग्णालयात पुरुष डॉक्टरांनाच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत होते.

पण ज्यावेळी कोरोनाचा धोका पुरुषांना अधिक व महिलांना कमी तसेच महिला व पुरुषांच्या मृत्यूदरातही तफावत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर चीन सरकारने आरोग्य सेवेतील महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले. देशाला वाचवण्यासाठी अनेक निवृत्त महिला नर्सेस, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुढे आल्या. तर काही सामान्य महिलांनीही कोरोना रुग्णांची सेवा करण्याची इच्छा सरकारपुढे व्यक्त केली. मग काय समस्त महिला ब्रिगेडने शहरातील अधिकाधिक रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी कंबर कसली. महिला असल्याने कोरोनाने दिलेल्या सवलतीचा पुरेपुर फायदा घेत प्रत्येक चिनी महिलेने रुग्णसेवेत स्वत:ला वाहून घेतले. यात एका नऊ महिन्याच्या गरोदर नर्सचा सहभाग सर्वात मोठा होता. ज्याची दखल जगाने घेतली. प्रत्येक महिला आरोग्य कर्मचार्‍याने रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली. यामुळे पुरुष डॉक्टरांनाही दिलासा मिळाला.

स्त्रीसुलभ स्वभावाला अनुसरून या महिला डॉक्टर व नर्सेस रुग्णांशी घरातल्या व्यक्तीप्रमाणे प्रेमाने संवाद साधत, त्यांची प्रेमाने चौकशी करत रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत होत्या. यामुळे रुग्णांमधील कोरोनाची भीती निवळू लागली. जेवढ्यांना संसर्ग व्हायचा तेवढेच बरेही होऊ लागले. काही ठिकाणी तर रुग्णालयांमध्ये फक्त महिला डॉक्टरच दिसू लागल्या. कारण पुरुष डॉक्टर मोठ्या संख्येने कोरोनोग्रस्त झाले होते. यामुळे महिला आरोग्य कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येऊ लागला. पण तरीही न थकता सर्वच महिला टीम चीनमधील प्रत्येक रुग्णालयात जोमाने काम करत होती. महिलांचा हा जोश बघून चीनमध्ये महिलांचे स्थान उंचावलं. कोरोना चिनी महिलांच्या पथ्यावर पडला. आजपर्यंत ज्या समाजाने महिलांना दु्य्यम स्थान दिल तोच चिनी समाज आज महिलांचा उदोउदो करताना दिसत आहे. Wuhan Union Hospital and Beijing Tongren Hospital ने तर आपल्या अहवालात महिला ब्रिगेडचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

कोरोना आणि महिलांचे आरोग्य यांना डोळ्यासमोर ठेवून या काळात चीनमध्ये काही कंपन्यांनी, हॉटेल्सनी डिलिव्हरी एजंट म्हणून महिलांना नोकर्‍या दिल्या. महिलांना रोजगार मिळाला. लॉकडाऊननंतर अटीशर्तीवर सुरू झालेल्या कंपन्याचे, हॉटेल्सचे पार्सल घरोघरी पोहचवण्याचे काम चिनी महिला करत होत्या. कोरोना संसर्गाच्या भीतीने ज्यावेळी एक कुत्राही चीनच्या रस्त्यावर फिरत नव्हता तेव्हा चिनी महिला मात्र मोठ्या प्रमाणावर लोकांची सेवा करत होत्या. तर घरातील पुरुष मात्र संसर्गाच्या धोक्यामुळे घरातच राहिला. महिलांच्या या समर्पण भावनेस सगळ्या चिनी नागरिकांनी सलाम तर केलाच पण महिलांचा नवीन आदर्शही समाजात निर्माण झाला. विशेष म्हणजे यात अनेकजणींना कोरोनाची लागणही झाली व त्या बर्‍याही झाल्या. नंतर पुन्हा रुग्णसेवेस हजर झाल्या. यातील अनेकजणींनी मृत्यू जवळून बघितला, पण त्याची तमा न बाळगता चिनी महिला कोरोना रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या.

पण कोरोनाच्या या काळात कधी नाही तेवढे मृत्यू बघून आणि कामाच्या बोझ्यामुळे काहीजणींचे मानसिक स्वास्थही बिघडले. पण आज त्या पूर्णपणे बर्‍या झाल्या असून चीनमध्ये उसळलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही रुग्णांच्या व देशाच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. यामुळे देशाला कोरोनाबरोबर जगण्याचे सामर्थ्य देणार्‍या या चिनी रणरागिणींना मानाचा मुजरा करायलाच हवा.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -