घरफिचर्सज्येष्ठांची चिंता उचितच!

ज्येष्ठांची चिंता उचितच!

Subscribe

देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती पाहता त्यावर चिंता करावी, अशी वेळ आता येऊन ठेपली आहे. ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या प्रमेयाला अनुसरून गेल्या सहा वर्षांपासून पक्षाची राजकीय वाताहत सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या पक्षाचे आता काय होणार याबाबत निष्ठावानांकडून मत-मतांतरे व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. सलग दोन लोकसभा निवडणुका आणि त्यादरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षाची विविध राज्यांत खालसा झालेली सत्तारूपी संस्थाने फक्त आणि फक्त पक्षाच्या अभूतपूर्व अधोगतीची ग्वाही देतात. त्यावर पक्षातील वरिष्ठांनीही भाष्य करण्यास प्रारंभ केला आहे. अलीकडील लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी पदावरून पायउतार झाले. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तसे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. तथापि, निवडणुकांतील पराभव ही नवी बाब नसल्याने राहुल यांनी उचललेले पाऊल अनपेक्षित असल्याची व्यापक प्रतिक्रिया उमटली होती. किंबहुना, राहुल हे जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा टीकात्मक सूरही उमटला होता. त्यानंतर ते राजीनाम्यावर ठाम राहिले ते आजतागायत. काँग्रेस पक्षात यासंदर्भात दबक्या आवाजात चिंता व्यक्त केली जात असताना आता ज्येष्ठांची मते जनतेपर्यंत पोहचतील एवढे सार्वजनिक स्वरूप त्याला आले आहे. सुशीलकुमार शिंदे आणि सलमान खुर्शीद या ज्येष्ठ नेत्यांची खालावलेले पक्ष अस्तित्व अधोरेखित करणारी अलीकडील वक्तव्ये पाहता काँग्रेसमध्ये कमालीच्या चिंतेने घर केल्याचे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस थकल्याने ते एकत्र येतील, असे सूचक विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केले. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे यांना एकाकी पाडत ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, शिंदे यांनी स्वपक्षाची स्थिती सुदृढ नसल्याची अप्रत्यक्ष कबुली आपल्या वक्तव्यातून दिली. सलमान खुर्शीद यांनीही अध्यक्ष राहुल गांधी यांनी पद सोडल्यानंतर पक्षावरील संकट गडद झाल्याचे म्हटले आहे. लोकसभेतील पराभवानंतर एकत्र येऊन मंथन न करता खंत व्यक्त करताना, राहुल यांनी राजीनामा द्यावयास नको होता, अशी टिप्पणीही खुर्शीद यांनी केली. शिंदे व खुर्शीद हे दोघे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेतच, शिवाय आयुष्यभर काँग्रेससोबत, विशेषत: गांधी घराण्याशी निष्ठा ठेऊन आहेत. म्हणूनच पक्षाविषयी चिंता व्यक्त करण्याचा त्यांचा नैतिक अधिकार हिरावून घेता येणार नाही. काँग्रेसमध्ये सध्या जे चालले आहे. त्यावर कोणीतरी भाष्य करणे गरजेचे असताना या दोन नेत्यांनी आपापल्या वक्तव्यांतून वाहिलेली चिंता अनाठायी नाही. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांत साधे विरोधी पक्षनेतेपदही मिळवण्यात पक्ष अपयशी ठरला आहे. स्वत: राहुल गांधी यांच्या अमेठी या पारंपरिक मतदारसंघातील जनतेने त्यांना निवडणुकीत हात दाखवला. पक्षाचे इतर बडे नेतेही पराभवाचे धनी बनले. एकशे पस्तीस वर्षे जुन्या पक्षाला कोणत्या कारणांमुळे वाळवी लागलीय, याची कारणे शोधण्याची वेळ आज आली आहे. कधीकाळी देशातील दोन तृतीयांश राज्यांत अनभिषिक्त सत्ता उपभोगणार्‍या या पक्षाला इतके वाईट दिवस येतील, याची पुसटशी कल्पनाही तत्कालीन परिस्थितीत नेतृत्वाला आली नसावी. उत्तर भारतात दशकानुदशके सत्तेची मक्तेदारी अनुभवणार्‍या या पक्षाला आज अस्तित्वासाठी झगडण्याची नामुष्की आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार या मोठ्या राज्यांमधील पक्षाचे स्थान आज असून नसल्यासारखे आहे. मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्ये केवळ स्थानिक नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेपायी भाजपकडून सुटून काँग्रेसच्या ताब्यात आलीत. त्यामध्ये काँग्रेस पक्षनेतृत्वाचे कर्तृत्व मोजायचे ठरले तर तो संशोधनाचा भाग ठरावा. दाक्षिणात्य राज्यात तर पक्षाला कधीचीच घरघर लागलीय. लहान राज्यांनीही या पक्षाकडे पाठ फिरवली आहे. पक्षाच्या अवनतीचे वरवर निष्कर्ष काढायचे म्हटले तर गमावलेला जनाधार, रचनात्मक कार्याचा अभाव, पक्षनेते व जनतेमध्ये वाढलेले अंतर, कुचकामी नेतृत्व हे मुद्दे पुढे येतात. कधीकाळी आदिवासी, दलित, मुस्लीम या सुरक्षित व्होट बँका काँग्रेसच्या कोषागारात सदासर्वकाळ सुरक्षित होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत हे घटक पक्षापासून दुरावले आहेत. ते भाजपच्या तंबूत विसावलेत असेदेखील नाही. त्यांनी एकतर प्रादेशिक पक्षांशी सलगी केली किंवा स्वतंत्र अस्तित्वाचा शंखनाद केला. मात्र, या समाज घटकांच्या दुरावण्याने काँग्रेसचा कणा मोडला. ज्या पक्षाची देशभर सत्ता असताना त्याच्याविरोधात एकीची मोट बांधण्यासाठी विरोधक एकत्र येत, त्या काँग्रेसला आज भाजपविरोधात उभे राहताना लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेण्याची नामुष्की आली आहे. मग प्रश्न येतोय तो काँग्रेस नेतृत्वाच्या क्षमता व व्यापकतेचा. सोनिया गांधी यांच्याकडे पक्षनेतृत्वाची धुरा असेपर्यंत पक्षाला सुगीचे दिवस होते. त्यांच्या काळात भाजप प्रबळ नव्हता असे नाही, तथापि भाजपच्या कपाळी जातीय राजकारणाचा मळवट भरत राजकीयदृष्ठ्या अस्पृश्य ठरवण्याची सोनियांची खेळी वर्षानुवर्षे यशस्वी ठरली. शिवाय, तत्कालीन परिस्थितीत तिसर्‍या आघाडीचा राजकीय आलेखही समाधानकारक होता. देशातील ही तिसरी शक्ती भाजपशी हातमिळवणी करणार नाही, याची काँग्रेस नेतृत्वाने पुरेपूर दखल घेतली होती. गेल्या दशकभरात काँग्रेस पक्षाचे सुकाणू सांभाळण्यासाठी राहुल गांधी यांचे नाव पुढे आले. तव्दतच भाजपची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडे आली. मोदी यांची आक्रमकता, संवादकौशल्य, शास्त्रोक्त आधारावरील पक्षबांधणी, शिस्त या बाबी स्वकियांना जितक्या भावल्या, तितक्याच त्या सामान्यांवर प्रभाव टाकणार्‍या ठरल्या. स्वाभाविकच दोन राष्ट्रीय पक्षांतील म्होरक्यांची तुलना व्हावयास प्रारंभ झाला. त्यामध्ये मोदी उजवे ठरत गेले आणि राहुल यांच्या नेतृत्वकौशल्यावर टीका व्हायला लागली. अलीकडील लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणाने प्रचारापासून दूर राहिल्याने काँग्रेस पक्षाचे एकछत्री नेतृत्व राहुल यांच्याकडे आले. त्यांनी कथित राफेल घोटाळा, नोटाबंदी, जीएसटी, अडचणीत आलेले उद्योगविश्व, शेतकर्‍यांची दैनावस्था आदी मुद्द्यांवर सत्ताधार्‍यांना घेरत चांगली वातावरणनिर्मिती केली होती. त्यांच्या प्रचारसभांना मिळणारा मोठा प्रतिसाद आणि निवडणूक निकालपूर्व आलेली सत्ताधार्‍यांविरोधातील सर्वेक्षणे यांचा मेळ साधला गेल्याने राहुल भारतीय राजकारणात ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. तथापि, २०१४ च्या निवडणुकांचीच पुनरावृत्ती होऊन काँग्रेसला जबरदस्त पिछेहाटीला सामोरे जावे लागले. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राहुल पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. पक्षासाठी हा अनपेक्षित व धक्कादायक निर्णय होता. स्वत: सोनिया, प्रियंका गांधी व पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी राहुल यांची समजूत काढून त्यांना राजीनामा मागे घेण्यासाठी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते ठाम राहिल्याने पक्षाची धुरा पुन्हा सोनियांकडे देण्याची अपरिहार्यता आली. मुळात, काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे असे पहिल्यापासूनच समीकरण राहिल्याने अध्यक्षपद इतर कोणी घेण्यास धजावत नाही. समजा तसे झाले तरी अवघ्या निर्णय प्रक्रियेपासून गांधी घराणे अलिप्त राहील, याची सुतराम शक्यता नाही. राहुल यांच्या नेतृत्वावर जशी शंका उपस्थित होतेय, तशीच अवस्था निवडणूकपूर्व काळात राजकीयदृष्ठ्या कार्यप्रवण झालेल्या प्रियंका गांधी यांची झाली आहे. काँग्रेससाठी त्या ‘ब्रम्हास्त्र’ असल्याचा निष्कर्ष काढणार्‍यांची संख्या कमी नव्हती. त्यामध्ये काही बोरूबहाद्दरांचाही समावेश होता. तथापि, प्रियंका यांची कॅप्टनशीपही काँग्रेसची नौका तारू शकली नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात काँग्रेसला वाचवणे गरजेचे असल्याचा टाहो शिंदे व खुर्शीद यांच्यासारखे बुजुर्ग फोडत असतील तर त्यांचे काय चुकले? सोनियांना प्रकृतीच्या कारणांनी घेरले आहे. प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा विविध आरोपांचा सामना करीत आहेत. गांधी घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणी पक्षाची कमान सांभाळायला तयार नाही. अशा परिस्थितीत राहुल यांच्याशिवाय पक्षाला पर्याय नाही. त्यांनी आडमुठी भूमिका सोडत अध्यक्षपद स्वीकारले नाही तर पक्ष अधिक गाळात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक म्हटली की जय-पराजयाचे आडाखे समजण्याजोगे असतात. इंदिरा गांधी यांना आणीबाणीनंतर मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. तथापि, त्यांनी दोनच वर्षांत उभारी घेत पक्ष पुन्हा सत्तेत आणण्याची किमया केली होती. मोदी-शहांचे नेतृत्व म्हणजे अमरपट्टा नव्हे की सदासर्वकाळ भाजप सत्तेवर राहणार आहे. राजकीय अनिश्चितता उद्या भाजपच्याही वाट्याला येऊ शकते. तेव्हा काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची चिंता हा परिपाठ मानून राहुल यांनी पक्षकार्यात सक्रिय होणे राजकीय शहाणपण व परिपक्वतेचे लक्षण ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -