घरफिचर्ससमाजाने ‘बघ्या’ची भूमिका सोडावी

समाजाने ‘बघ्या’ची भूमिका सोडावी

Subscribe

अडचणीत असलेल्या त्यातही ज्याच्यावर प्राणघातक हल्ला होतोय, ज्याचा गंभीर अपघात झाला आहे, अशा पीडितांना मदत करणे हे सर्वसामान्य ज्ञान आहे, त्यात कुठेही तत्त्वज्ञान नाही, पण अशा वेळी पीडिताच्या मदतीला धावून जाण्यापेक्षा मनोरंजन म्हणून त्याच्या वेदना पाहण्यात धन्यता मानणारे महाभाग माणुसकीला कलंक आहेत. समाजाने आता ‘बघ्या’च्या भूमिकेतून बाहेर पडायला हवे.

शनिवारी, ११ मे रोजी मुंबई विमानतळातील टर्मिनस-२ मधील इमारतीच्या गच्चीवरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. हा तरुण आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर उभा होता, तेव्हा कुणीही त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी त्याने उडी मारून आत्महत्या केली. जमिनीवर कोळसल्यानंतर तरी त्या तरुणाच्या जवळ कुणीतरी धावत जाईल, असे वाटले होते, मात्र तसेही घडले नाही. अवतीभवती सर्वजण ‘बघ्या’च्या भूमिकेत राहिले. काही जण निर्विकारपणे, शांतपणे त्या तरुणाकडे दुर्लक्ष करत आपापल्या कामासाठी निघून जाताना दिसले. तर काहीजण त्या जमिनीवर कोळलेल्या तरुणाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात मग्न होते. हे सर्व दृश्य मन सुन्न करणारे होते. समाजाची ही असंवेदनशीलता माणसामाणसामध्ये अंतर निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. समाजामध्ये जर इतकी उदासीनता असेल, तर संवेदनशून्य मानवी देह आणि एखादे यंत्र यांमध्ये भेद काय उरतो?

समाजात दररोज कुठे रस्त्यावर तरुणीला जाळले जाते, तर कुठे तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले जातात, कुठे रेल्वे स्थानकावर माथेफिरू धारधार शस्त्राने प्रवाशावर वार करून ठार करतो, कुठे संकटाने त्रस्त व्यक्ती सर्वांसमक्ष उंच इमारतीवरून आत्महत्या करते, तर कुठे रस्ते अपघातात अनेकजण विव्हळत पडतात. अशा घटना दररोज कुठे ना कुठे घडत असतात, यातील प्रत्येक घटनेतील पीडित हा सहाय्यासाठी समाजाकडे टाहो फोडून हाका मारत असतो, परंतु समाज त्याकडे सहजतेने दुर्लक्ष करून निघून जातो. त्यातील काही जण घाबरून पुढाकार घेत नाही, काही जण पीडिताच्या वेदनांकडे मनोरंजन म्हणून बघत असतात, काही जण त्या वेदना कॅमेर्‍यात कैद करून सोशल मीडियातून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. या सर्व घटनांमध्ये पीडिताला वेदना देणारा जेवढा दोषी ठरतो, तेवढाच त्या वेदना तटस्थ होऊन पाहणारा समाजही दोषी ठरतो.

- Advertisement -

यानिमित्ताने रिंकू पाटील जळीत हत्याकांडापासूनच्या स्मृती जागृत झाल्या. त्याही आधीपासून समाजाच्या या विकृतीची उदाहरणे नक्कीच असतील. ३० मार्च १९९० रोजी हातात तलवार, पिस्तुल व पेट्रोलचा कॅन घेऊन उल्हासनगरमधील सेंचुरी रेयॉन हायस्कूलमध्ये घुसलेल्या चार गुंडांनी बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांवर हल्ला केला. परीक्षा केंद्राच्या टेलिफोनच्या वायर कापल्या. त्यानंतर परीक्षेसाठी बसलेल्या मुलामुलींच्या एका वर्गात शिरून त्यांनी दरवाजा आतून बंद करून घेतला आणि रिंकू पाटील या १६ वर्षीय मुलीला इतरांपासून वेगळे करून तिच्यावर पेट्रोल ओतले. रिंकू अक्षरशः कापरासारखी जळाली. जागेवरच तिचा कोळसा झाला. उल्हासनगरात रिंकूच्या पेटत्या देहाचे व्हिडिओ शूटिंग केले गेले होते आणि त्याच्या कॅसेट हजार-बाराशेला त्यावेळी विकल्या गेल्या होत्या. त्यावेळी तेथील शंभरेक जणांनी एकत्र येऊन या गुंडाचा प्रतिकार केला असता, तरी ते गुंड भेदरले असते, रिंकू वाचली असती. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही, उलट तिच्या जळत्या देहाचे शूटिंग करण्यात समाजाने धन्यता मानली. त्या कॅसेट विकून हजारो रुपये कमावले. १९९० च्या या घटनेप्रमाणे तीन दशकानंतरही २ मे २०१९ रोजी वसईत राहणारे समीर मर्चंट (52) हे कामानिमित्त चर्चगेटला जाण्यासाठी वसई स्थानकात आले होते. पादचारी पुलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जात असताना त्यांच्यावर माथेफिरूने टोच्याने भोसकायला सुरवात केली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करतच राहिला. त्यांच्या छातीवर, खांद्याला, हातावर दुखापत झाल्याने ते जमिनीवर कोसळले.

हल्ल्यासाठी वापरलेला टोचा मर्चंट यांच्या हातात खुपसून अनोळखी माथेफिरू पसार झाला. प्रवाशाला मदत करण्याऐवजी समाज त्याच्याकडे बघत राहिला. त्याच्या वेदनांचे मोबाईलमध्ये शूटिंग करत राहिला. असाच प्रकार २०१८ मध्ये विरार रेल्वे स्थानकातही घडला. विरार रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर एका माथेफिरूने एका प्रवाशावर धारधार चाकूने २२ वार केले. हे वार करत असताना इतर प्रवासी नुसते बघत होते. कुणीही हल्लेखोराला विरोध केला नाही. तो प्रवाशी ठार होईपर्यंत हल्लेखोर त्याच्या शरीरात चाकू खूपसत राहिला. तोही मदतीसाठी समाजाकडे हात पसरत होता, मात्र तिथेही समाज घाबरून तटस्थ राहून त्याच्या वेदना पाहत राहिला. त्यातील काही जणांनी त्या पीडिताच्या वेदना मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यात धन्यता मानली.

- Advertisement -

भर दिवसा, भर गर्दीत होणार्‍या हल्ल्यांच्या घटनांमधील समाजाच्या असंवेदनशीलतेची ही काही उदाहरणे होती. मात्र रस्त्यावरील अपघातांच्या प्रकरणांमध्येही समाजाच्या याच विकृत मानसिकतेचे दर्शन घडते. आटत चाललेल्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारी घटना औरंगाबादमध्ये नुकतीच घडली. सुमीत कवडे हा युवक बाईकवरून जात असताना त्याला ट्रकने धडक दिली, तो गंभीर जखमी झाला. त्याच जखमी अवस्थेत तो रस्त्यावर तासभर विव्हळत होता. मदतीसाठी हाका मारत होता. मात्र याही प्रकरणात त्या ठिकाणी समाज निष्ठूर बनला. आजूबाजूला जमलेली गर्दी या अपघाताचे आणि त्यात जखमी झालेल्या तरुणाचे मोबाइलमध्ये चित्रण करण्यात धन्यता मानत होती. या बघ्यांपैकी कोणालाही त्या तरुणाच्या मदतीला धावून जावे, रुग्णवाहिकेला बोलावून त्याला हॉस्पिटलात दाखल करून घ्यावे, असे वाटले नाही. दुर्दैवाने वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याने सुमीतचा मृत्यू झाला. ही घटना बघ्यांच्या माणुसकीहीन वृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे.
दोन वर्षांपूर्वी पिंपरी येथील सतीश मेटे या युवकाचाही असाच दुर्दैवी अंत झाला. वेगाने आलेल्या वाहनाने मेेटेला उडवले. तो दूरवर जावून कोसळला. तिथेही सतीश जखमी होऊन मदतीसाठी याचना करत होता, परंतु तिथेही जमलेली बघ्यांची गर्दी मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढण्यात, व्हिडिओ शूटिंग करण्यात मग्न राहिली. बर्‍याच वेळानंतर एका डॉक्टरने त्याला गाडीत ठेवून हॉस्पिटलात नेले, मात्र तोपर्यंत सतीशचा अंत झाला होता. माणसांच्या संवेदना अशा प्रकारे दिवसेंदिवस बोथट होत चालल्याचे हे लक्षण आहे. शिक्षणाने शहाणपण येतेच, असे नाही. याची ही ढळढळीत उदाहरणे आहेत.

अडचणीत असलेल्या त्यातही ज्याच्यावर प्राणघातक हल्ला होतोय, ज्याचा गंभीर अपघात झाला आहे, अशा पीडितांना मदत करणे हे सर्वसामान्य ज्ञान आहे, त्यात कुठेही तत्त्वज्ञान नाही, पण अशा वेळी पीडिताच्या मदतीला धावून जाण्यापेक्षा मनोरंजन म्हणून त्याच्या वेदना पाहण्यात धन्यता मानणारे महाभाग माणुसकीला कलंक आहेत. सहा महिन्यांपूर्वी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील लोणावळ्याजवळ कांद्यांनी भरलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक उलटला. त्यात अपघातग्रस्त चालक मदतीसाठी टाहो फोडत राहिला, परंतु त्याला मदत करण्याऐवजी किंवा अपघातामुळे झालेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सहाय्य करण्याऐवजी स्थानिक नागरिक विखुरलेले कांदे गोणीत भरून पळ काढण्यासाठी चढाओढ करत होते. रस्ते अपघातांमध्ये समाज असंवेदनशील राहण्यामागे ‘अपघातग्रस्तांना मदत केली तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल’, हे एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या २००४ साली प्रसिद्ध झालेल्या अहवालात २०२० सालापर्यंत भारतामध्ये रस्ते अपघात हे लोकांचे मृत्यू होण्याचे प्रमुख कारण असेल, असे म्हटले आहे. त्याच अहवालात एक महत्वाचे आणि विचार करण्याजोगे निरीक्षण नोंदवलेले आहे, ते म्हणजे रस्ता अपघात झालेल्या पीडित लोकांना ‘पोलीस केस’च्या भीतीमुळे आजूबाजूचे लोक मदत करायला कचरतात आणि अशामुळे जर ‘गोल्डन अवर’ मध्ये तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नाही तर ५० टक्क्यांहून अधिक जखमी लोक हे दगावण्याची भीती असते. सबब लोकांच्या मनातून ही भीती जावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अपघात झालेल्या लोकांना वेळेवर मदत करणारे जे लोक असतात त्यांना इंग्रजीमध्ये Good Samaritans म्हणतात. म्हणजेच थोडक्यात देवदूतच. त्यांना इंग्लंड, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या सारख्या देशांमध्ये कायदा करून संरक्षण पुरवलेले आहे. ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणार्‍या लोकांकडून जर अजाणतेपणे काही चूक झाली, तर त्यासाठी त्यांना दोषी ठरवता येत नाही, तसेच त्यांना योग्य ते कायदेशीर संरक्षणदेखील इतर बाबींमध्ये मिळते. असेच कायद्याचे संरक्षण भारतातही मिळाले आहे. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच दिलेेल्या एका अत्यंत महत्वपूर्ण निकालामुळे रस्त्यावरच्या ‘बघ्यांचे रूपांतर हे देवदूतामध्ये होईल’ (सेव्ह लाईफ फाऊंडेशन विरुद्ध भारत सरकार, एआयआर २०१६ एस.सी.) कारण अशा ‘देवदूतांना’ पूर्णपणे सरंक्षण पुरवले आहे आणि कुठलीही भीती मनात न बाळगता अपघातग्रस्तांना मदत करता येईल.

अशा प्रकारे कायद्याने जरी समाजातील या ‘बघ्यां’ची मानसिकता बदलण्यासाठी संरक्षण दिले असले, तरी समाजाची मूळ मानसिकता बदलणे, हे आव्हान आहे. कारण पीडिताच्या वेदना मनोरंजन म्हणून पाहत राहणे, त्याच्या वेदना पुन्हा पाहून अधिकाधिक मनोरंजन व्हावे याकरता पीडिताच्या वेदना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणे, यासारख्या विकृत मानसिकतेसाठी आता समाजमनाची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. आताच्या पिढीच्या मानसिकतेत याविषयी कितपत बदल होईल, हे सांगणे कठीण आहे. पण शालेय अभ्यासक्रमातून याविषयी शिक्षण दिल्यास येणार्‍या पिढीमध्ये थोड्याफार प्रमाणात तरी संवेदनशीलता वाढेल, अशी आशा आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -