घरफिचर्सजगायला लावणारं गाणं! 

जगायला लावणारं गाणं! 

Subscribe

‘जगायला लावणारं गाणं’ हे शीर्षक तसं अतिरंजित किंवा मेलोड्रॅमॅटिक वाटण्याची शक्यता आहे. पण काही वेळा सत्य हे जसं कल्पितापेक्षा अजब असतं तसंच काही गोष्टी माणसाच्या आयुष्यात चमत्कारिक पध्दतीने घडून जात असतात. खरंच काही गाणी तशाच काही लोकांना जगायला लावतात, जगणं नकोसं झालेलं असतानाही जगायला लावत असतात!

वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची अशीच एक गोष्ट आहे. रविंद्र नाट्य मंदिरात सुप्रसिध्द भावगीत गायक अरूण दातेंचा ‘शुक्रतारा’ हा कार्यक्रम होता. त्यांच्यासोबत अनुराधा पौंडवाल गाणार होत्या. अरूण दाते हे गायकाचं नाव आणि जोडीला ‘शुक्रतारा’ हे कार्यक्रमाचं नाव म्हणजे कार्यक्रम शंभरनंबरी भावगीतांनी ओथंबलेला असणार हे नक्की होतं. पण ह्या कार्यक्रमासाठी रविंद्र नाट्य मंदिरात पाऊल टाकताच दिसत होतं ते भलतंच दृश्य…

कळ्याफुलांची, चंद्रचांदण्यांची, भावभावनांची ही भावगीतं, पण ती ऐकण्याच्या वेळी थिएटरात कामजीवनावरची पुस्तकं हारीने मांडली होती. केळीच्या पानावर मटण वाढल्यासारखंच वाटत होतं ते. थोड्या वेळाने समोरच्या बॅनरकडे लक्ष गेलं आणि खरा प्रकार लक्षात आला. झालं होतं असं की कामजीवन प्रकाशनाच्या डॉ. जीवन मोहाडीकरांनी अरूण दातेंचा ‘शुक्रतारा’ प्रायोजित केला होता. पण तरीही भावगीतं आणि कामजीवन ह्या विषयावरची पुस्तकं हे विसंगतच वाटत होतं. ‘शुक्रतारा’ आणि कामजीवनाचा संबंध काय, असं भलंमोठं प्रश्नचिन्हं तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होतं. अखेर न राहवून काही जणांनी आपलं हसू लपवतच; पण ह्यामागचं कोडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला…आणि त्यांना जे सत्य कळलं त्यानंतर त्यांनी तो कार्यक्रम जरा जास्तच गंभीरपणे घेतला. कारण जीवन मोहाडीकरांच्या आयुष्यात घडलेली गोष्टही तशीच गंभीर होती…

- Advertisement -

काय असतं की दहा दिशांनी संकटं फणा काढून उभी राहिली की एखाद्या माणसाला जगातून, एकूण आयुष्यातून पळ काढावासा वाटतो. मोहाडीकरांच्या आयुष्यातही असा एक काळ आला होता की आता हे आयुष्य संपवून टाकावं असं त्यांना सतत वाटू लागलं होतं. जगण्याच्या कोंडीतून मरणाला मुक्त करण्याशिवाय आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही असा विचार त्यांच्या मनात गर्दी करू लागला होता. मरणाच्या दारात शिवशिवणारा पाय पुढे टाकण्याची आता जवळजवळ त्यांची तयारी होऊ लागली होती. पण तसं काही करायला ते धजावणार इतक्यात त्यांच्या कानावर ते गाणं पडलं, अरूण दातेंनी गायलेलं, मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आणि यशवंत देवांनी संगीतबध्द केलेलं – ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!’…त्या गाण्यातले जगण्याची उर्मी देणारे ते शब्द, जगण्याचं बळ देणारे ते सूर मोहाडीकरांच्या मनाला संजीवक स्पर्श करून गेले…आणि त्यांच्या मनात येणारे ते निराशेचे विचार क्षणात निघून गेले. पण गाणं संपलं, गाण्याचा अंमल संपला की पुन्हा तो स्वत:ला संपवायचा तो वाईट विचार त्यांच्या मनात बळावयाचा. पण ह्यापुढे त्यांना आपल्या मनातल्या त्या निराशेच्या काळ्या ढगांवर औषध सापडलं होतं. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ह्या गाण्याच्या रूपाने. हे गाणं ते पुन्हा पुन्हा ऐकायचे आणि आपल्या मनातलं ते घनघोर निराशेचं मळभ दूर हटवून टाकायचे. जेव्हा जेव्हा त्यांना मरणाचा मोह व्हायचा तेव्हा तेव्हा त्यांना हे गाणं मरणाच्या दारातून माघारी फिरवायचं. शेवटी मोहाडीकरांच्या आयुष्यातले ते काळ्या ढगांचे दिवस पुढे तसेच राहिले नाहीत, सारं काही आलबेल झालं. पण मोहाडीकर आपल्यावर असलेले त्या गाण्याचे ऋण विसरले नव्हते…आणि म्हणूनच त्यांनी अरूण दातेंचा ‘शुक्रतारा’ प्रायोजित केला होता.

मरणाच्या दारातून मागे फिरवायला कधी कधी जिथे वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र थकतं तिथे कधी कधी सात सुरांचं शास्त्र उपयोगी पडतं ते असं. त्याकाळी म्हणे दीप राग आळवून दिवे प्रकाशमान केले जायचे, मल्हार राग आळवून पाऊस पाडला जायचा. खरंखोटं आपल्याला माहीत नाही. पण कधी कधी गाणं जगण्याला आशाआकांक्षांचं इंधन देऊन जातं हे ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ह्या गाण्याने नक्कीच दाखवून दिलं आहे!…एखादं गाणं जगायला लावतं ते असं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -