घरफिचर्सगोष्ट एका व्हॅक्सिनची!

गोष्ट एका व्हॅक्सिनची!

Subscribe
‘ज्याप्रमाणे रशियाने १९५७ साली अमेरिकेच्या आधी अवकाशात पहिला उपग्रह स्पुटनिक सोडून जगाला आश्चर्यचकित केलं आणि अमेरिकेला धक्का दिला, त्याचप्रमाणे आता देखील कोरोनावर पहिल्यांदा रशियाच लस आणून अमेरिकेला आश्चर्यचकित करेल’, असं रशियाने थेट जाहीर करून टाकलं. जसजशा अमेरिकन कंपनी असलेल्या मॉडेर्नाच्या लसीच्या चाचण्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक निष्कर्ष दाखवत होत्या, तसतशी रशियामध्ये अस्वस्थता वाढू लागली. मग रशियाने थेट त्यांच्या लसीची बाजारात येण्याची तारीखच जाहीर करून टाकली. १० ऑगस्ट! रशियन लसीची कोणतीही चाचणी किंवा कोणत्याही टप्प्याची चर्चा किंवा वृत्त नसताना थेट लसीची तारीख जाहीर होणं हा अमेरिकेसोबतच अख्ख्या जगातल्या नागरिकांनाच नाही तर खुद्द WHO ला देखील धक्का बसला होता. जागतिक आरोग्य संघटनेने देखील यावर चिंता व्यक्त केली.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या हुबेई प्रांतात सापडला. पुढचे ८ ते १० महिने हा डोळ्यांना न दिसणारा विषाणू अख्ख्या जगाला अक्षरश: आपल्या ताळ्यावर नाचवणार आहे, अशी सूतराम शक्यता चीनच्या त्या हुबेईमधल्या त्या रुग्णाची चाचणी करणार्‍या त्या प्रयोगशाळेतल्या त्या लॅब टेक्निशियनला वाटली नसेल. पण, झालं तसंच. आजघडीला जगातले २ कोटींहून जास्त लोक कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यातले १ कोटी ३० लाख बरे देखील झाले असले, तरी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडले हे एक भीषण वास्तव आहे. पण, त्याहून भीषण बाब म्हणजे आतापर्यंत या विषाणूने ७ लाख ६० हजारांहून जास्त लोकांचे जीव घेतले आहेत आणि हे आकडे फक्त आजपर्यंतचे आहेत. कोरोनाची लस येईपर्यंत आणि ती जगातल्या सर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी देखील अजून वर्षभराचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे हे आकडे तोपर्यंत किती भीषण रूप धारण करतील, याचा अंदाज करणं आत्ता तरी कठीण आहे. सुरुवातीला फक्त चीनच्या हुबेई आणि वुहान या भागांमध्येच आढळणारे हे विषाणू हा हा म्हणता जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले. एक-दोन नव्हे, तर या विषाणूचे १० हून जास्त प्रकार आजवर सापडले आहेत. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे कोरोना किती गंभीर आहे आणि किती गंभीर होऊ शकतो, याचा अंदाज यावा हे आहे. कारण याच भीषण कोरोनापुढे माणसाने जो काही तमाशा लावला आहे, तो पाहून कोरोना देखील पोट धरून हसला असेल हे नक्की!
याचं नुकतंच एक मोठं उदाहरण याच कोरोनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषय असणार्‍या लसीबाबत समोर आलं आहे. वास्तविक जग दोन महासत्तांमध्ये विभागलं जाणं आणि त्या गटांमध्ये स्पर्धा होणं हा काळ आता फार जुना झाला. पण, कोरोना लसीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याच दोन महासत्तांमधल्या (किंवा स्वत:ला महासत्ता समजणार्‍या) देशांमध्ये असलेल्या ‘जीवघेण्या’ स्पर्धेची झलक पहायला मिळाली. इथे ‘जीवघेण्या’ हा शब्द फार प्रयत्नपूर्वक आणि हट्टाने वापरला आहे. कारण कोरोनावरच्या लसीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक विषयावर जर स्पर्धा होत असेल आणि तिच्यासाठी अहमहमिका लागली असेल, तर समस्त मानवजातीचं त्याहून दुसरं दुर्दैवं दुसरं कुठलं नसेल!

कोरोनावरून अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये अटीतटीची भांडणं लागल्याचं सगळ्या जगानं पाहिलं. चीनने त्यांच्याच देशात उगम झालेल्या (किमान आतापर्यंत तरी हेच सत्य मानलं जात आहे!) कोरोनावर नियंत्रण कसं मिळवलं? जगभरात कोरोना वाढत असताना चीनमध्ये तो कसा आवरला? या मुद्यांवरून चीनवर अमेरिकेकडून बरीच आगपाखड करून झाली. चीनने देखील अमेरिकेसहित अनेक देशांना ‘आले अंगावर, घेतले शिंगावर’ करत थेट वाद उभा केला. पण, या दोघांच्या वादात अचानक रशिया नावाचा तिसरा भिडू आला आणि सगळं चित्रच बदललं. अचानक अमेरिका विरूद्ध चीन असा सामना सुरू असताना अमेरिका विरूद्ध रशिया अशी ‘लढत’च पहायला मिळू लागली. मुद्दा होता कोरोनावरची लस कोण आधी तयार करून बाजारात आणतं हा! खरंतर अख्खं जग ज्या लसीची जीवाच्या आकांताने वाट पाहात आहे आणि ज्या लसीशिवाय रोज हजारोंचे बळी जात आहेत, त्या लसीच्या मुद्यावरून देखील स्पर्धा करणं हा निर्भावतेचा कळसच म्हटला पाहिजे.

- Advertisement -

‘ज्या प्रमाणे रशियाने १९५७ साली अमेरिकेच्या आधी अवकाशात पहिला उपग्रह स्पुटनिक सोडून जगाला आश्चर्यचकित केलं आणि अमेरिकेला धक्का दिला, त्याचप्रमाणे आता देखील कोरोनावर पहिल्यांदा रशियाच लस आणून अमेरिकेला आश्चर्यचकित करेल’, असं रशियाने थेट जाहीर करून टाकलं. जसजशा अमेरिकन कंपनी असलेल्या मॉडेर्नाच्या लसीच्या चाचण्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक निष्कर्ष दाखवत होत्या, तसतशी रशियामध्ये अस्वस्थता वाढू लागली. मग रशियाने थेट त्यांच्या लसीची बाजारात येण्याची तारीखच जाहीर करून टाकली. १० ऑगस्ट! रशियन लसीची कोणतीही चाचणी किंवा कोणत्याही टप्प्याची चर्चा किंवा वृत्त नसताना थेट लसीची तारीख जाहीर होणं हा अमेरिकेसोबतच अख्ख्या जगातल्या नागरिकांनाच नाही तर खुद्द WHO ला देखील धक्का बसला होता. जागतिक आरोग्य संघटनेने देखील यावर चिंता व्यक्त केली. आपल्या धसमुसळ्या आणि विचित्र वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या लसीवर सावध प्रतिक्रिया देत ‘सर्वात आधी कोण लस आणतं हे महत्त्वाचं नसून सर्वात प्रभावी लस कोण आणतं हे महत्त्वाचं आहे’, अशा आशयाचं स्पष्टीकरण वॉशिंग्टनकडून देण्यात आलं. पण, रशिया ऐकायला तयार नव्हता.

शेवटी ११ तारखेला रशियाने WHO ला विरोध करूनच आपली लस प्रसिद्ध केली. खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीला पहिला डोस देऊन लस तयार झाल्याची घोषणा देखील केली. पण, WHO कडून मात्र या लसीवर चिंता व्यक्त केली. तसेच, त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्याचे कोणतेही पुरावे नसताना ही लस मोठ्या प्रमाणावर वापरली जाणं, हे गंभीर असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आलं. दुसरीकडे अमेरिकेकडून या लसीला मान्यता मिळणं म्हणजे अशक्यप्राय गोष्टच होती. अमेरिकेने त्याला कडाडून विरोध केला. रशियाने स्वत:हून लस अमेरिकेला पुरवण्याचा प्रस्ताव ठेवला. पण त्यावर ट्रम्प प्रशासनाने ‘अमेरिका कदापी ही लस मान्य करणार नाही’, असं ठामपणे सांगून टाकलं (जे अपेक्षितच होतं!). ’आमची लस अत्यंत कठोर चाचण्यांमधून जात असून तिसर्‍या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे रशियाची लस स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही’, अशी भूमिका अमेरिकेकडून घेण्यात आली. अर्थात,‘मॉडेर्ना’ कडून बनवली जाणारी लस देखील किती प्रभावी आहे, हे अंतिम निष्कर्ष आल्यानंतरच जगासमोर येऊ शकेल. कारण या लसीविषयी जी काही माहिती समोर येत आहे, ती अमेरिका सरकार आणि अमिरेकी माध्यमांमधून येत आहे!

- Advertisement -

मुळात इथे प्रश्न फक्त कुणाची लस सर्वात आधी बाजारात येते, हा नसून त्यामागच्या अर्थकारणाचा देखील इथे मोठा प्रभाव सहज लक्षात येईल. कोविड-१९ सारख्या भीषण आणि जीवघेण्या आजारातून वाचवणारी लस कुठलीही, कुणाकडूनही किंवा कितीही किमतीला असली, तरी ती खरेदी होणार हे लस बनवणार्‍या सर्वच कंपन्यांना पुरतं ठाऊक आहे. मग ती खरेदी वैयक्तिक स्तरावर लोकांकडून होवो किंवा सार्वजनिक स्तरावर सरकारांकडून, पण लस बाजारात येताच तिची कोट्यवधींच्या संख्येत मागणी होणार आणि त्यामागे हजारो-लाखो कोटींचे व्यवहार देखील होणार. त्यामुळे जागतिक आरोग्यासोबतच ही (कदाचित आजतागायतची सर्वात मोठी) लॉटरी किंबहुना जॅकपॉट कोणत्या कंपनीला लागणार? कुठल्या देशातल्या कंपनीला लागणार? त्यातून त्या कंपनीला आणि ती असणार्‍या देशाला किती फायदा होणार? ही आर्थिक गणितं देखील गुंतलेली आहेत. ऑक्सफर्डच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्युट देखील एका लसीवर काम करत असून तिचे देखील पहिल्या काही टप्प्यांचे निष्कर्ष आशादायी आहेत. पण, स्पर्धा मात्र मॉडेर्ना आणि रशियन लसीमध्येच होत असल्यामुळे त्याला आर्थिक हितसंबंधांसोबतच या दोन्ही देशांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची चाललेली अहमहमिका देखील कारणीभूत आहे हे स्पष्टच आहे.

खरंतर या दोन देशांमध्ये किंवा जगातल्या लस बनवणार्‍या कंपन्यांमध्ये कोणत्या आर्थिक किंवा कुरघोडीच्या स्पर्धा रंगत आहेत, त्याच्याशी भारतातल्याच काय, पण जगभरातल्या सामान्य माणसांना काहीही देणंघेणं नाही. त्यांना त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य सुस्थितीत ठेऊन त्यांचे जीव वाचवायचे आहेत. पण, असं असलं, म्हणून या कंपन्यांना किंवा देशांना सामान्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार आहे किंवा संधी आहे असा मात्र त्याचा अर्थ होत नाही. रशियाने घाईघाईत आणलेली लस आणि तिच्याविषयी फक्त अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगभरातल्या सरकारांमध्ये असलेलं संशयाचं आणि अविश्वासाचं वातावरण कोरोनाची भीषणता अजूनच वाढवायला हातभार लावत आहेत हे नक्की आणि हा सगळा तमाशा फक्त दोनच घटक शांतपणे बसून पाहात आहेत. एक आहे कोरोनाचा रुग्ण आणि दुसरा आहे खुद्द कोरोना!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -