घरफिचर्सढोपर्‍या शंख

ढोपर्‍या शंख

Subscribe

तशी शनिवारी आपली लोकल खाली असतीय, म्हणजे त्या दिवशी लोकलमध्ये नीट उभं राहायला मिळतंय. आता काही लोकायला प्रश्न पडला असल की, शनिवारचं लोकलनं जायलाच कशाला पायजे? तर महागुरू! यावरून हे लक्षात घ्यावं की 5 दिवसांचा वर्किंग हफ्ता काउंट नं होणारी जनता बी मुंबईत बक्कळ आहे आणि त्यात आम्ही बी आलोच. आम्ही आलो मनल्यावर लोकलचा टाईमपास म्हणून हसनी खुसनीत तावातावाने चाय नस्ताळा बी होणारी चर्चा आली. कायाय पैले फुकटचा डाटा नव्हता तवा चर्चेचे विषय नवकरी, बॉस, बजेट, डाळीचा भाव, लेकरायची फीस, वाढती गर्दी, टीव्हीवरल्या सीरिअली, क्रिकेट, शिनेमा इतकीच होती पर आता डेटा फुकट तसं मंग धर्म, समाज, अतिभव्य भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद, पुष्पक विमान, हेल्थ, विश्व, अंतरिक्ष, तारांगण, अमेरिका, आफ्रिका, ब्रह्मांड, कवाबवा काश्मीर अन् पाकिस्तान, ब्रेकिंग बॅड, गेम ऑफ थ्रोन, केजरीवाल, गांधी, पटेल, नेहरू, अर्णब, रवीश कुमार, राजकारणी घराण्याचा इतिहास, गो गोमूत्र गवर्‍या, गंगा नदी, बाबा की बुटी, सरकारनं नं फेडलेलं तेलाचं कर्ज, शेरोशायरी, चायना, काश्मीर, पाकिस्तान, घातलेले डिझायनर कपडे त्याचा लिलाव त्यातून होणारी सेवा, परदेश दौरे उपलब्धी, शेर इट, फॉरवडेड व्हिडिओ, वगैरे वगैरे अशे एक ना हजार झालेत.
खोटं कोणतं?
खरं कोणतं?
खरं खोटं कोणतं?
खरं खरं कोणतं?
याचं निरंतर दळन लय चलतंय लोकलमधी. तसं ते आज बी चल्लालतं. आमचा जिग्नेसभाई तावा तावानं भांडूलालता
तुम्हाला वर्ल्ड रिकॉर्ड नाही दिसत, अरे इतना बडा स्टेचू बनाया तो बोल रहे हो आदिवासी का क्या? … हां बोला थोडा झूठ जितने के लिये सभी तो बोलते है … क्या पैले के गव्हर्नमेंटने आपल्या लोकाला फेवर नाही केलं का? जादू से नही होगा अरे याला थोडा वेळ तर द्या ने

फिर यार तुम भी तो वैसे हि हुये ना … वो झुठे थे आप चौकीदारी करने को रेडी थे इसलिये हमने आपको चुना… आन तुम्हीच लावताय चुन्ना जगताप बोलला

- Advertisement -

उस्मानभाई खो खो हसला पण बोलला कैचनी.

भाई इसके आगे ना पीछे, मग हा कुणासाठी खाणार?अरे पैलेवालोने खजाना खाली किया था ये बेचारा तो वो भर रहा

- Advertisement -

भर रहा है? किसकी जेबे? ज्याची इनमीन बारा दिस जुनी कंपनीआय तसल्या लोकाची जगताप बोलला

आवर नोटाचा फास हे ऐकू आलं पण बोललं कोण आठवना गेलंय

देखो देश के प्रगती के लिये थोडा पिसना पडता है… अरे जादू की छडी थोडी ना है उसके पास थोडा वक्त तो दो ने, नही तो फिर साठ साल से जीन लोगो ने कूछ भी नही किया उन्हीको लाओ फिर…अरे वेळ द्या थोडा
पर हर विषयात आपली राय देणार उस्मानभाई नुसता ऐकूलालता, नाहीतरी उसवल्याकारणाने त्येनं ह्या विषयावर मौनव्रत घेतलंय.
एवढ्यात मिसराचा मोबाईल वाजला त्येनं वरच्या खिशातून मोबाईल काढत म्हणला
मेसेज है. जरा देखु तो मेरे खाते में पंधरा लाख आये क्या?
आता हासायची मिट्टी उठली अन जिग्नेसभाई आता निस्ता पेटला होता सेवकाचा रेस्पेक्ट अन पुन्ना पुन्ना मागच्या साठ वर्षाचा इतिहास चवताळून सांगूलालता
बिना फाईटचं वातावरण टाईट झालतं
तवा मंग आमचे टापशेगुर्जी मधी पडले म्हणले
ढोपर्‍या शँखाची गोष्ट ऐकलीय का?
सगळ्यांनी ना ची मुंडी हलवली. त्यांनी मग गोष्ट सुरु केले.
कोने एके काळी आटपाट नगरात एका महाराजाकडे इच्छा पूर्ण करणारे दोन शंख होते. त्याच्याकडे एक गरीब माणूस आला. महाराजांनी त्याला दोन्ही शन्ख दाखवले आणि सांगितलं

पहिला शन्ख खूप खूप रडल्यावर कधीतरी एखादी तुमची अगदी बेसिक मागणी पुरवतो शंभरात एखादी. दुसरा शन्ख अजून मी ट्राय नाही केला पण तो तुमच्या मागणीपेक्षा कितीतरी भारी कितीतरी उजव्या गोष्टीचं ऑप्शन देतो म्हणे. अर्थात गरीब माणसाने
बेसिक मागण्यासुद्धा रडून रडूनसुद्धा पुरविल याची खात्री संपलेल्या शंखाला पाठ दाखवली आणि दुसर्‍या शंखाला घेऊन घरी आला. आणि शंखापुढे आपली मागणी सांगितली म्हणाला
मला पंचपक्वान्नांचा जेवण दे
शंख म्हणाला तुला छप्पन भोग दिले तर?
चालेल जिभल्या चाटत गरीब म्हणाला
छप्पन भोग काय इथलाच शेवटी त्यापेक्षा चायनीज?
चालेल गरीब म्हणाला
मला वाटतं काँटिनेंटल ट्राय करायला पाहिजे तू
चालेल भुकेने कळवनारा गरीब म्हणाल
त्यापेक्षा तू सुशी ट्राय कर नाहीतर टर्की नाहीतर रशियन
आता भुकेने अर्धमेला झालेला गरीब म्हणाला
हे बघ शिळी भाकरी पण असली तर चालेल रे
तेंव्हां शंख त्याला झिडकारत म्हणाला मित्रा! आलास बेसिक औकातीवर
गरिबाने म्हटलं अरे काहीतर दे तू नुसतेच ऑप्शन देतोयस
तेंव्हां शंख म्हणाला हो. फक्त ऑप्शन द्यायचं काम होतं माझं ते मी दिलं. तू वेडा मी खरंखरं कंस्ट्रक्टिव्ह असं काही देईन समजलास
टापशेगुर्जीची कहाणी संपली. तात्पर्य शंखाच्या नादाला लागणार्‍याच्या नशिबात शंख करणं असंच आसल,असो.
मी गुर्जीला विचारलं गोष्टीचं नाव काय होतं?
ढोपर्‍या शन्ख गुर्जी म्हणले.
मी मुंडी हलवली. गोष्ट संपली होती कुणाला कळली होती आणि जिग्नेशभाई पुन्हा सुरु झाले होते
बुलेट ट्रेन.. काला पैसा, हर गरीब के अकाउंट में पैसा, देखो ने थोडा टाइम दो पेट्रोल, गॅस सब सस्ता हो जायेगा, और करप्शन का नामोनिशाण मीट जायेगा
मिसरा मध्ये सही है सही है करूलालता. उस्मानभाई मक्ख चेहर्‍यानं खिडकीबाहेर बघूलालता. अन् माझ्या डोक्यात ढोपर्‍या शंखाची गोष्ट फिरू लागली.

– प्रसाद कुमठेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -