घरफिचर्सआजच्या विछिन्न अर्धनागर जगाची बखर

आजच्या विछिन्न अर्धनागर जगाची बखर

Subscribe

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ही कथा मागील पंचवीस वर्षातील हिंदू-मुस्लीम संघर्षातून निर्माण झालेला धार्मिक उन्माद, पाणी आणि मूल्यहीन राजकारणाने घडवलेला भवताल, शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा तीव्र बनत गेलेला प्रश्न, आरक्षणातून निर्माण झालेले पेच अशा या काळाला भारीत करणार्‍या स्थित्यंतरात्मक घटीतांना मुखरीत करते.

साचेबंद रचनेची तंत्रशरण चौकट भेदून मराठी कथा आज बरीच पुढे आलेली आहे. त्याची सुरुवात ऐंशीच्या दशकातच झालेली होती. आज तिचा पैस आशयाविष्काराच्या दृष्टीने विकासात्मक दिशेने विस्तारलेला आहे. तिच्या संरचनेत समष्टीनिष्ठ बहुआवाजी चित्रणक्षेत्रे आणि काळस्वरीय माणूसकेंद्री अनुभवप्रदेश सामावल्याने ती सांगण्याच्या दृष्टीने अधिक खुली झालेली आहे. ही कथा जगण्याचा विविधकोनी वास्तवशोध घेत वर्तमान समाजगुंत्यांची अन्वयार्थक उकल करते आहे. ती फाटलेल्या-दुभंगलेल्या व्यामिश्र जगाची कहाणी नव्या कल्पिताच्या रचितासह मांडत अर्थवत्त झालेली आहे. निरनिराळ्या समाजस्तरातील लेखक या काळाने घडवलेले समाजशास्र समजून घेत आपल्या काळाची नवी कोरी गोष्ट सांगत आहेत. सत्त्वशील तपशील, अनेकपदरी अनुभवविश्व, कथाबांधणीतील रूढ संकेतमुक्तता हे आजच्या मराठी कथाविश्वाचे वैशिष्ठ्य आहे.

नव्या कथनशक्यता आजमावत अशी कथा निर्मिणार्‍या आजच्या कथाकारांत बालाजी सुतार यांचे नाव शीर्षभागी आहे. त्यांनी अर्धनागरी जगाचे बहुजिनसी ताण आपल्या कथेतून मांडत नवी कथाशैली घडवली आहे.

- Advertisement -

ते नव्वदोत्तर ग्रामीण-अर्धनागरी काळाचे सहप्रवासी आणि त्या काळाच्या स्थित्यंतराचे बिनचूक आकलन असलेले कवी-लेखक आहेत. त्यांनी नियतकालिकांतून मोजक्या परंतु अभिजात अशा कथा लिहून कथाकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेली आहे. त्यांच्या कथा-कवितांचा ‘गावकथा’ हा रंगाविष्कारही लक्षवेधी ठरलेला आहे. त्यांचा आठ कथांचा ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा पहिलाच कथासंग्रह आजच्या मराठी कथेला समृध्द करणारा आणि नवे वळण देण्याची क्षमता बाळगून असलेला सत्त्वशील संग्रह आहे. गाव-शहराच्या आणि विसाव्या-एकविसाव्या शतकाच्या सांध्यावरील बहुविध समाजवास्तवातील अंत:रचनेला ही कथा थेट भिडते. वर्णनपरता टाळत जागतिकीकरणोत्तर काळातील पृष्ठस्तरीय वास्तवाच्या आतील कोलाहलाची सखोल चिंतनमीमांसा करत मुक्तबंधातून अभिव्यक्त होते.

‘विछिन्न भोवतालाचे संदर्भ’ ही पहिलीच कथा जगण्याने छिलून-सोलून काढलेल्या माणसांच्या व्यथांचे तुकड्या-तुकड्यात विभागलेले वास्तव मांडते. ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन. हे शहर आहे की स्मशान?’ असा प्रश्न विचारत जर्जर झालेल्या एकूण भोवतालाच्या बकालपणाचा चित्रफलक उभा करते. वाट्याला आलेले आयुष्य गपगुमान जगणार्‍या परिस्थितीशरण जगाचे बधीर करणारे संदर्भ या कथेतून उजागर होतात. ‘डहूळ डोहातले भवरे’ ही कथा नीती-अनीतीच्या भोवर्‍यात अडकलेल्या, मानसिक-शारीरिक गुलामीच्या बळी ठरलेल्या, अडलेल्याचा फायदा घेणार्‍या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रवृत्तीचा वेध घेणारी आहे.

- Advertisement -

जग तांत्रिकदृष्ठ्या कितीही विस्तारले, सामाजिक समतेचे अवकाश जरी मोकळे झाले असले तरी स्रीचं जीवशास्रीय ‘मादी’ असणं आणि पुरुषातला ‘नर’ उफाळून येणं या स्री-पुरुष आदिम वस्तुस्थितीचे अधोरेखन ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’ ही कथा करते. साहित्यिक आणि शेती अशा दोन्ही जगात वावरणार्‍या व्यक्तीच्या मानसिक संघर्षाचे सत्यान्वयी दर्शन ‘दोन जगातला कवी’ या कथेतून घडते. साहित्य आणि वास्तवाच्या अंतरायाचाही निर्देश यातून होतो. ग्रामीण-शहरी जीवनरीतीतील ताण आणि खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्था, तीमधील संस्थाचालकांची सरंजामी वर्तवणूक, त्यात अनुदानाच्या अपेक्षेने गुलामासारखी राबणारी तरुणाई, त्यात त्यांचे हुरूळून गेलेले भौतिक-अभौतिक स्वप्ने-इच्छा-आकांक्षा यासह आजच्या तरूणाच्या जैविक-अजैविक पराभवाचा नकाशा ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’ या कथेतून साकारतो.

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ही कथा मागील पंचवीस वर्षातील हिंदू-मुस्लीम संघर्षातून निर्माण झालेला धार्मिक उन्माद, पाणी आणि मूल्यहीन राजकारणाने घडवलेला भवताल, शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा तीव्र बनत गेलेला प्रश्न, आरक्षणातून निर्माण झालेले पेच अशा या काळाला भारीत करणार्‍या स्थित्यंतरात्मक घटीतांना मुखरीत करते. नगर परिषदेच्या अभद्र राजकारणामुळे शहरात वसणार्‍या अनधिकृत झोपडपट्ट्या, त्यातील बकालपण, दारिद्य्राच्या हतबलतेतून स्रीने धनाढ्याशी अनैतिक शरीरसंबंध ठेवत मुकाट्याने आपला संसाराचा गाडा हाकत राहणे, राजकीय डावपेचाच भाग म्हणून वरचड ठरू पाहणार्‍याचा खून होणे, त्याच्या आरोपात गरिबाला गोवले जाणे, त्यातून हिंदू-मुस्लीम असा अस्मितावादी राजकारणाचा खेळ खेळत समूहा-समूहात वैरभाव निर्माण करत स्वत:चा स्वार्थ साधणे या वृत्तीचे संवेदन ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’ या कथेतून उजागर होते. वर्तमानाचे अध:पतित चरित्र म्हणून ही कथा लक्षणीय आहे. ‘संधिकाळातले जहरी प्रसंग’ ही या संग्रहातील शेवटची कथा दिवसेंदिवस जगणे निस्तेज होऊन नासत चालल्याची जाणीव प्रभावीरित्या व्यक्त करणारी आहे.

उपरोक्त कथासूत्रांसह वास्तवाच्या अनेकविध कंगोर्‍यांना रिचवत व्यापक काळपटावरील विनाशकारी समाजचित्र ही कथा उभे करते. भांडवलीकरणाच्या परिणामातून वाढीस लागलेले तंत्रज्ञानाधिष्ठित आर्थिक शोषण, सरंजामीपणाचे विविध रूपे, सावकारीने सामान्य माणसांभोवती आवळलेले फास, मूल्यर्‍हास आणि भ्रष्टाचाराचा विळखा, शिक्षणाला-ज्ञानाला प्राप्त झालेले बाजारूपण, तारूण्यातील जीवशास्रीय नैसर्गिक लैंगिक जाणीवा आणि परिस्थिती-परंपरेमुळे त्या जाणीवांचा होणारा कोंडमारा, सामाजाच्या दृष्टीने अनैतिक असलेले शरीरसंबंध, राजकारण्यांनी विकासाच्या नावाने केलेले भकासीकरण, समाजमाध्यमांनी वाढवलेले एकलकोंडेपण, सामाजिक व्यवस्थांचे पोखरलेपण, शेतीमधील भावकीचे वाद, बलात्कार, लफडी, वासनांधता, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपण, आत्महत्या, लोडशेडींग अशा अनेकस्तरीय संदर्भांना उजागर करत ही कथा वंचितांच्या स्थितीगतीचा लेखाजोखा मांडते. तरूणांचे वर्तमानिक जग, स्त्रियांचे अबोलविश्व आणि शोषक-शोषित पुरुषांचे आजचे वास्तव या कथेतून सूक्ष्मरित्या ठळक झाले आहे.

आजूबाजूच्या एकंदरीत पर्यावरणाने जगण्याला आलेला कोरडेपणा-पोकळपणा-कंटाळा याचा अनुभव घेणारा राघव. थिजलेला-कोडगा-एकलकोंडा आणि भणंग झालेला हरिश्चंद्र शेकाटे. सामाजिकदृष्ठ्या परंपरेच्या काचात असलेली आणि खाजगीत सोशल मीडियातून मन मोकळे करणारी चित्रा. शेतीवास्तवात जगत कवितेच्या किरटेपणाची अनुभूती घेणारा राजा. एकेकाळी देशमुखी असलेला आणि वर्तमानात तुटपुंज्या वेतनावर सीएचबी करत घुसमटणारा तरुण. असाह्य परिस्थितीच्या दाबातून राजकीय पुढार्‍याच्या मुलाशी राजीखुशीने अनैतिक शरीरसंबंध प्रस्थापित करणारी अनुबाई. रसवंती चालवणारा पिचलेला एकनाथ, शेतीअडचणीत आल्याने मेटाकुटीला येऊन आत्महत्या करणारा शीर्पतनाना.

वजनदार नगरसेवक करीम पठाण, नुसत्या पोरीच होतात म्हणून नवर्‍याकडून सारखा छळ होऊन आत्महत्या करणारी सुखदेव मास्तरची बायको, दीडशे रूपयाची लाच घेताना पकडला गेलेला लक्षीमन ग्रामसेवक, व्यापारी वृत्तीचा छैनु वाणी, अहिल्या, रईसा, अभिमान, शांताराम, मोहन, नाम्या, भोसले-शर्मा मॅडम, शेंडगे पाटील, बिलाल, शिंदे आमदार यासारखी या कथेतील सर्वच पात्रे आपल्या आजच्या सभोवतालातील माणसांचे प्रतिनिधीत्त्व करणारी आहे. या माणसांसह येणारा भवताल नि त्यांच्या बहुपरिणामी दुखर्‍या कहाण्यांना ही कथा वाट करून देते. म्हणूनच आपल्या काळाचे बहुदृष्टीने वाचन करत त्याचे पिळ उकलून सांगणारी ही गोष्ट आपली आणि आपल्या जगाची वाटते.

आजच्या विदीर्ण जगाच्या जीवनरहाटीचा भोवंडून टाकणारा मूल्यात्मक आशय आणि आशयाच्या तीव्र दाबातून साकारलेला चिरेबंद भाषिक रूपबंध हा या कथेचा मूलभूत विशेष आहे. कथागाभा विशद करणारी प्रतिकात्म कथाशीर्षके, आशयार्थाचे सरळ सूचन करणारी कथासुरुवात आणि कथारचितात रिकाम्या जागा ठेवत वाचकांना तपशील भरायला लावणारे अस्वस्थकारी कथाशेवट, विचारसंपृक्त सुविचारमय निवेदनपध्दती, शब्द-वाक्यांची काटेकोर रेखीव बांधणी, कथारचनेची प्रयोगशील परंतु अर्थसंगत कुतूहलपर मांडणी, चित्रात्मक-फोटोग्राफीक कथनशैली, कथा जोडणीत काव्य-संवाद व उपरोधाचा साधलेला अटीव मिश्रसंयोग, ढबदार मराठवाडी हिंदी-मराठी बोलभाषा आणि प्रमाणभाषेचे सफाईदार उपयोजन, छोटे-छोटे प्रसंगतुकडे आणि घटना समूहांची घट्ट वीण या सार्‍यांच्या सप्रमाण एकतेतून या कथाघाटाची बांधणी झालेली आहे. हा रूपबंधाचा ढाचा रूढ मराठी लघुकथेचा साचा मोडत नव्या कथनमार्गाची पायवाट निर्मिणारा आहे.

अर्धनागरी जगाच्या पोटातील घुसमट, तगमग, दमन, आक्रोश, असहायता, हतबलता, सोशिकता, परिस्थिती शरणता, विखंडितता, संघर्षशीलता, तुटलेपण, फसवणूक, अवहेलना, उपेक्षा, चीड, संताप अशा अनेकविध जाणिवांना ही कथा सामावून घेत या काळाची चित्रलीपी साकारते. शेती, पाणी, जात, धर्म, शिक्षण, राजकारण, बेकारी, लैंगिकता, तंत्रज्ञान, प्रशासन या अनुषंगाने आकाराला आलेल्या आजच्या पराभूत-परात्म-पीडित जगाचा तंतोतंत वास्तवपट आणि व्यवस्थेच्या दणकट चरकात पिळून निघत चिपाड झालेल्या माणसांच्या आयुष्याचा दर्दभरा आलेख मांडते. आसुडाने फटकारावे तशी वाचकांना हाबाडा देत भानावर आणणारी ही कथा ‘आजच्या विछिन्न अर्धनागर जगाची बखर’आहे. गेल्या पावशतकाने घडवलेले समाजरचित आणि त्याच्या भविष्य वाटचालीचे सूतोवाच करणारी ही कथा सामाजिक इतिहासाचा सत्याधारित दस्तावेज आहे. सामाजिकतेचे कलापूर्ण शिल्पन म्हणूनही ही कथा वाङ्मयाच्या इतिहासात श्रेष्ठ ठरणारी आहे.

-केदार काळवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -