घरफिचर्सबळ आहे तिच्या पंखात

बळ आहे तिच्या पंखात

Subscribe

तसं पाहता स्त्रियांचं एकूण चित्रण हिंदी चित्रपटातून बर्‍याच प्रमाणात रिग्रेसिव्ह असंच होत आलंय. एक आदर्श स्त्री, आदर्श आई,आदर्श पत्नी , आदर्श प्रेमिका ह्यातच तिला मोस्टली बंदिस्त करण्यात आलं आहे. तिचं स्वतःच असं अस्तित्व, तिचं जगणं, तिचे निर्णय असं फार थोडक्या चित्रपटांतून पाहायला मिळतं. स्त्रीच्या अस्तित्वाला प्राधान्य देणार्‍या दोन चित्रपटांविषयी मी आज लिहिणार आहे.

१९८२ सालचा अर्थ हा त्या काळातला पाथब्रेकिंग चित्रपट होता असं मला वाटतं. महेश भट यांनी बाईचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करणारा असा हा चित्रपट बनवून फार धाडस दाखवलं होत. शबाना आझमींचा नवरा तिला सोडून स्मिता पाटील बरोबर राहावयास जातो आणि शबाना एकटी पडते. या काळात तिला तिचा एक मित्र मदत करतो. पण नंतर तिला लग्नाची मागणी घालतो. तिचा नवरा सुद्धा उपरती झाल्यावर तिच्याकडे परत येऊ इच्छितो पण शबानाला आता दोघांपैकी कोणीही नको असतो आणि म्हणून ती दोघांनाही नाही असं सांगते आणि इथेच हा चित्रपट संपतो आणि एका बाईचा प्रवास सुरू होतो. स्वतःसाठी जगण्याचा.. या चित्रपटाची मला सगळ्यात आवडलेली बाब म्हणजे त्याचा शेवट.. कारण एका बाईला आपल्याला काय हवंय हे ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं. नाहीतर अगदी आजही कित्येक चित्रपटात नायिकेला नवरा /प्रियकर यांनी सोडल्यावर तीला तिच्या दुसर्‍या मित्राबरोबर दाखवलं जातं.

arth-movie

- Advertisement -

जणू काही एकटं राहणं हा बाईसाठी पर्याय असूच शकत नाही. तिला सतत कोणाच्या न कोणाच्या आधाराची गरज असणारच जणू… तेही एका पुरुषाचीच. ह्याच भ्रमाला तडा देणारा हा चित्रपट. आपल्या कामवालीच्या मुलीला चांगलं आयुष्य देणं आणि स्वतः कमकुवत न होता कोणत्याही पुरुषाच्या आधाराशिवाय जगण्याचा निर्णय घेणारी शबाना खूप प्रभावित करते. पुरुषाशिवाय बाईचं आपलं एक अस्तित्व असतं असं दाखवणारा हिंदी चित्रपट म्हणून ‘अर्थ’ मला अतिशय आवडतो. अगदी आजही बॉलिवूडमध्ये सो कोल्ड रेबल नायिका दाखवतात, नवरा आणि प्रियकराच्या कात्रीत सापडलेली किंवा दोन मित्रांमध्ये कोणाला निवडावं या गहन प्रश्नाचं उत्तर शोधणारी.. पण किती चित्रपटांमध्ये स्त्री स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्णय घेणारी दाखवली आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकेल.

pink-Movie

- Advertisement -

अनिरुद्ध रॉय चौधरी या प्रख्यात बंगाली दिगदर्शकाचा ‘पिंक’हा चित्रपट देखील आत्ताच्या नवीन चित्रपटांमधला हा लक्षात राहील असा चित्रपट. जर एखाद्या मुलीने हसून मुलाबरोबर एखादं ड्रिंक वगैरे घेतलं तर लगेच तिला हात लावायचा अधिकार त्या मुलांना मिळतो का? जर एखादी मुलगी डर्टी जोक सांगते, किंवा पॉर्न बघते तर तिचं चारित्र्य questionable (संशयास्पद) होतं का? डिनर, ड्रिंक्स, हसणं – खिदळणं इथपर्यंत जर एखादी मुलगी सहज घेत असेल तर तिची त्या मुला बरोबर सेक्स करण्यास संमती आहे असा ह्याचा अर्थ होतो का? जर एखादी मुलगी एकापेक्षा जास्त जणांबरोबर शारीरिक संबंध ठेवत असेल तर मग ती कोणाबरोबरही झोपायला तयार होईल आणि मग नाही म्हणायचा अधिकार किंवा त्या नाहीला काही अर्थ उरत नाही असा ह्याचा अर्थ होतो का? बाईचं सगळं सो कॉल्ड कॅरेक्टर ती कसे कपडे घालते, ती रात्री किती वाजता घरी येते,ती किती पुरुषांबरोबर कसे संबंध ठेवते,ती ड्रिंक करते किंवा पार्ट्या करते यावरूनच ठरतं का? सतत तिचं दिसणं,वागणं,बोलणं, हसणं, पर-पुरुषांशी मैत्रीचे किंवा तत्सम संबंध यावरून त्यांना तोलणारे…आणि चटकन जी बाई उपभोगायला मिळत नाही किंवा जिला नाही म्हणता येतं तिला रांड म्हणून मोकळा होणारा हा समाज …हे कधीपर्यंत चालणार? अश्या अनेक प्रश्नांनी हा चित्रपट डोकं भणाणून टाकतो.

बाईला एक माणूस म्हणून मूलभूत हक्क कधी मिळणार? चारित्र्य वगैरे अशा फुटकळ गोष्टीपासून बाई स्वतःला कधी मुक्त करणार? जेव्हा एखादी बाई नाही म्हणते तेव्हा तिचा अर्थ केवळ ‘नाही’ हाच होतो ….मग ती कुणासाठी प्रेयसी असो, हक्काची (?) बायको असो की मग वेश्या असो … शरीर हा आत्म्याचा भाग आहे आणि तो कोणासोबत शेअर करायचा हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक बाईला आहे. संमती आणि नकार हे ठरवण्याचा हक्क बाईला आहे. इतकं साधं ज्या नराधमांना कळत नाही, ज्या समाजाला कळत नाही अशा ठिकाणी बाई म्हणून राहणं ही केवळ शिक्षा आहे. आणि हीच या चित्रपटाची थीम आहे. नव्या पिढीचा, नव्या दमाचा हा चित्रपट. जर एखादी स्त्री शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असेल तर त्या नाहीचा अर्थ नाही असाच होतो.. असा मेसेज अत्यंत प्रभावीपणे हा चित्रपट देतो.

नुसतं छान छान कपडे घालून, चेहेर्‍यावर मेकअप थापून, हिरोच्या अवतीभोवती फिरून, प्रसंगी अश्रू गाळून, हिरोकडून सहार्‍याची अपेक्षा करणं… ह्यापलीकडे बाईचं अस्तित्व आहेचकी! आजकाल तिला छोटे कपडे देऊन, केस छोटे कातरून, बिन्धास वगैरे दाखवण्याचा ट्रेंड असला तरीही शेवटी हिरोकडून प्रेम मिळणं, तिच्या रुपात त्याने अडकणं आणि हिरोबरोबर तिचं एकदाचं लग्न किंवा लिव्ह इन वगैरे होणं हे फायनल डेस्टिनेशन.. स्वतंत्र, विचारी, स्वतःवर प्रेम करणारी, आयुष्य आपल्या नियमांवर जगणारी अशी स्त्री दाखवल्या जाणं फार गरजेचं आहे. मोजकेच सही पण श्याम बेनेगल (भूमिका), जब्बार पटेल( उंबरठा), केतन मेहता (मिर्च मसाला), क्वीन (विकास बेहल) अशा दिग्दर्शकांनी आपापल्या परीने बाईचा एक माणूस म्हणून होत असणार्‍या ह्या चितपटांमधील प्रवासात फार मोलाचं योगदान दिलं आहे. नटणं -थटणं, मुरडणं, सुंदर दिसणं, लाजणं,आदर्श स्त्री,आदर्श बायको,आदर्श गर्लफ्रेंड, आदर्श हे ,आदर्श ते आणि अशा आठशे एकसष्ट चौकटीत तिला बसवण्याची गरज नाहीये. नवरा/ प्रियकर/ पार्टनर/ मुलं/ संसार फक्त हेच तिचं आयुष्य नाही. जसं पुरुषाच्या आयुष्यातील हे टप्पे आहेत, तसेच तिच्यापण.. हे तिचं अंतिम मुक्कामाचं ठिकाण नाही.. तिचा हा प्रवास आहे स्वतःला शोधण्याचा… मार्ग शोधण्यासाठी तिला ना कोणा हिरोची गरज आहे, ना तिचा मार्ग कोणी तीनपाट व्हिलन रोखू शकतो… तिला पंख दिले आहेत ते उंच भरारीसाठी आणि जर कोणी ते छाटायचा प्रयत्न केला तर तिच्यामध्ये ताकद आहे पंखांची पुनर्निमिती करण्याची आणि पुन्हा एकदा आकाशात उडण्याची.. खुलेपणाने !

सानिया भालेराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -