घरफिचर्सलग्नाळू मित्राची गोष्ट

लग्नाळू मित्राची गोष्ट

Subscribe

अरेंज पद्धतीत मुलींचीच नव्हे तर संवेदनशील मुलांचीही घुसमट होत राहते. त्या मुलीचाही तो विचार करत होता. मुद्रा पुन्हा म्हणाली, तू बोलतोयस, अरे पण तू एकदा भेटलास आणि बोललास तरी तुला काय कळणार आहे. आता असा वैतागू नको. मला इतकंच म्हणायचं आहे की, तुम्ही नक्कीच भेटायला, बोलायला हवं. पण तू मुळातच अरेंज पद्धतीवर अविश्वास दाखवत आहेस. याही पद्धतीने तुला तुझी सोलमेट मिळू शकेलच. यु नेव्हर नो. तू आधीच का नकारात्मक विचार करत आहेस.

आमीर, माझा मित्र. त्याच्या पोटात काहीही राहत नाही. तो आम्हा तिघा-चौघा मित्र मैत्रिणींना भेटायला आला की आदल्या दिवशीचं सांगण्यासारखं काहीतरी त्याच्याकडं असणारच याची खात्री असते. तसंच झालं. आदल्या रविवारी त्याला लग्नासाठी मुलगी पहायला जबरदस्ती नेण्यात आलं होतं. बर्‍याच दिवसांपासून तो ‘पाहण्या’च्या कार्यक्रमाला टाळत आला होता. मात्र घरात उठसुठ सतत त्याच विषयावर होणारं महाभारत पाहून त्यानं शरणागती पत्करली. इकडं आम्ही उत्सुक. पुढं काय झालं हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमचे कान टवकारले.

तो सांगू लागला-
संध्याकाळच्या वेळेस मामा आला. आणि आल्या आल्या म्हणाला, ‘चल, जल्दीसे तैयार हो, अपनेको लडकी देखने को जानेकाय. ’
मला कुणी काहीही बोलू दिलं नाही आणि इतक्यांदा यावर वाद घालून झाला होता की शेवटी म्हटलं एकदाच जाऊनच यावं. गेलो ना आठ दहा माणसं आम्ही. इतके लोक कशाला लागतात काय माहीत, पण गेलो.
ही मुलगी आयटीतली आहे. चाळीस एक हजार कमवत असेल. पण ती समोर येऊन बसल्यावर तिला मी विचारलं की तुला माझी माहिती असेल ना, बायो-डाटा तो देखाही होगा. तिने नकारार्थी मान हलवली. मी गडबडलोच ना यार तिचे वडील मध्येच म्हणाले, ‘सबकुछ पसंद रह्या तो मालुम पडनेचवालातो.’ आता मी काय बोलणार. जाम वैतागलो.
तो आल्यापासूनच वैतागत बोलत होता म्हणून जरा चीडवावं म्हणून त्याला म्हटलं, ‘‘अरे मुलगी कशी आहे ते तर सांग?’’
‘‘कशी आहे म्हणजे ? चांगलीच होती..म्हणजे खरंतर काय सांगणार.. चांगली-वाईट कसं म्हणायचं. आपण कोणाला कसं जज करणार? मला ते पटतच नाही. दिसण्यावरून वगैरे तर कोणाबाबत काहीही म्हणायला मला अजिबात आवडत नाही. किती अपमानजनक वाटत असणार त्या मुलीला. शिकून सवरून ही हीच तर्‍हा.
मला मुळातच हे असं पाहणं-बघणं काही पटतच नाही. आपण असतोच कोण मुळात असं कोणाला बघायला जायला. ही कल्पनाच किती विचित्र आहे. मुलगी येऊन बसणार आणि तिला काहीतरी प्रश्न विचारायचे आणि मग निर्णय घ्यायचा. शुद्ध जुगार.

- Advertisement -

आमीरच्या बोलण्यात तथ्य होते, पण त्यावर आमच्या मैत्रीणीने मुद्राने त्याला विचारलं, ‘‘तुम्ही बोललात का? जरा आतल्या खोलीत बसून.. किंवा खाली चक्कर मारून येतो असं म्हणून.. ’’

‘‘पाच मिनिटात तिच्या वडिलांनी तिला आत जायला सांगितलं. आणि काय बोलणार तिला माझ्याविषयी कागदावरचीसुद्धा माहिती नव्हती. मी बोलायचं आहे असं म्हटलं तरी वादळ येईल. मी घरी आल्याबरोबर माझ्या मागे लागले, मग काय ठरवत आहेस? लगेच कसं सांगणार. त्यांना म्हटलं मला एकदा तिला भेटायचं आहे. ते ही बाहेर. माझ्याच घरातल्या माणसांनी लगेच घर डोक्यावर घेतलं. छुट दिये तो ज्यादाच करने लगा है, उसके घर के लोग कैसे तयार होंगे. वो लडकी क्या रस्ते पर पडी क्या ? मला तर हे झेपलंच नाही. रस्ते पर पडी क्या म्हणजे? माझ्याशी बोलण्याने काय लगेच तिचं शील कमी होणार आहे. नोकरी करते. तर तिला काय मित्र नसतील का? मला तर हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. माझ्यावर इतकं प्रेशर आहे तर तिच्यावर किती असेल. म्हणूनच ही पद्धत मला आवडत नाही.

- Advertisement -

त्याच्या या म्हणण्यावर मी अवाक् राहिले. तो किती बारकाईने विचार करत होता. अरेंज पद्धतीत मुलींचीच नव्हे तर संवेदनशील मुलांची ही अशी घुसमट होत राहते. त्या मुलीचाही तो विचार करत होता. मुद्रा पुन्हा म्हणाली, तू बोलतोयस. अरे पण तू एकदा भेटलास आणि बोललास तरी तुला काय कळणार आहे. आता असा वैतागू नको. मला इतकंच म्हणायचं आहे की, तुम्ही नक्कीच भेटायला, बोलायला हवं. पण तू मुळातच अरेंज पद्धतीवर अविश्वास दाखवत आहेस. याही पद्धतीने तुला तुझी सोलमेट मिळू शकेलच. यु नेव्हर नो. तू आधीच का नकारात्मक विचार करत आहेस.

‘हो मला मान्यच आहे. पण मला त्याची प्रक्रिया जी आहे ना ती खटकते. आधी मुला-मुलींनी भेटावं आणि मग त्यांचं पटतंय असं वाटलं की मग आईबापांनी त्या नात्यात यावं ना पुढं. एक दोनदा भेटून काही असा लगेच साक्षात्कार होणार नाहीच, पण आपापल्या मनात काही ठोकताळे असतात. बेसिक विचार असतात. तुम्ही एक दोनदा फेक वागू शकता सतत नाही. आणि अगदीच न बोलता, न भेटता होकार देण्यापेक्षा तर हे लाख पटीने चांगलं आहे की. पण आमच्या घरात, फक्त काय आमच्याच नाय आमच्यासारख्या सगळ्यांच्याच घरात चारही बाजूने घरातले बसतात आणि तशात पाहण्याचा कार्यक्रम होतो.’

आमीर जे सांगत होता ते करणं काही अवघड नव्हतं, जगावेगळं तर अजिबात नव्हतं. अनेकदा लग्न प्रक्रियेत मुलांच्या अशा खुल्या विचारांचा अजिबात विचार होत नाही. तुझं पुढारलेपण बाहेर, घरात चालणार नाही असं म्हणून त्यांच्या मताकडे दुर्लक्ष केले जाते. पुरुषी पद्धतीने किंवा आपल्याला मुलगी आवडली नं बस असा विचार न करता आपली सोबत कराव्याशा वाटणार्‍या मुलीचा ही इतका बारकाईने विचार करणं, तिचा हक्क मान्य करणं, तिच्या बाजूने, तिला काय वाटत असेल याचा सारासार विचार करणं ही कौतुकास्पद गोष्ट नसली तरी प्रोत्साहनपर नक्कीच आहे. आणि कौतुकास्पद नाही असं म्हणतेय ते यासाठी की, खरंतर लग्न ठरविण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक मुलाने आणि मुलीने असाच एकमेकांच्या बाजूचा विचार करायला हवाच. आमीरच्या ही बोलण्यामधील, सांगण्यातील भाव तो काहीतरी फार वेगळं बोलतोय असा नव्हताच. त्याच्या लेखीही ही गोष्ट सामान्यच होती. ही मंडळी तर उलट आपल्या लाइफ पार्टनरकडे अधिक गांभिर्याने पाहत असतात. इथं ही तसंच घडत होतं.

शेवटी आमीर म्हणाला, आणखी एक काल घरी आल्या आल्या मी मम्मी पप्पांना समोर बसवलं, म्हटलं तुम्हाला जे काही बोलायचं आहे. विचारायचं आहे. किंवा सांगायचं आहे ते थेट मला सांगा. आपल्यात संवादच नाहीये. तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला कोणी काय सांगतं हे मला अन्य कोणी तरी सांगावं किंवा तुमचं मत मला मामा नाहीतर आणखी कोणाकडून सांगावं हे काय आहे. मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही माझे आई बाबा. मग आपल्यात थेट संवाद हवा. मध्ये कशाला कोणी हवंय. त्यांना ही पटलंय बहुदा कारण यावर ते काही react नाही झाले.

ही सगळीच किती सकारात्मक आणि जमेची बाजू होती. त्यामुळे सुरुवातीला खरंतर लग्नाळू मित्र असं म्हटलंय. मित्रापेक्षा मित्राचं घरपरिवारच त्याच्या लग्नासाठी जास्त उत्सुक आहे. हे उघडच आहे. मात्र या किश्श्यामुळेच असेल खरं लग्न प्रक्रियेकडे पुरुषही वेगळ्या पद्धतीने पाहू लागलीत हे जाणवू लागलं.

– हिनाकौसर खान-पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -