घरफिचर्स महानाट्याची तिसरी घंटा...  

 महानाट्याची तिसरी घंटा…  

Subscribe
एरव्ही संयमी, शांत आणि ‘इनोसंट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आदित्य ठाकरेंच्या भोवती संशयाचं धुकं तयार झालं आहे. त्यांना असलेला शिवसेनाप्रमुखांचा वारसा आणि रश्मी व उद्धव ठाकरे यांचे संस्कार यामुळे आदित्य यांच्याकडून खून किंवा बलात्कार यातली एकही गोष्ट घडणार नाही. हे  त्यांना ओळखणारं कुणीही छातीठोकपणे सांगू शकतो. पण त्यांना घेरलेल्या अभिनेता डिनो मोरिया, सुरज पांचोली सारखे बदमाश, अपयशी फिल्मी मित्र असू द्या, मावस भाऊ वरुण सरदेसाई किंवा मित्र अमेय घोले यांच्यासारखे कोरोनाच्या महामारी काळातही अपारदर्शी, संशयास्पद व्यवहार करणारे सहकारी असू द्या. या सगळ्यांना घेरण्याची रणनीती भाजपमध्ये व्यवस्थित बनली आहे. त्यातूनच सीबीआय, आयकर आणि ईडीच्या कारवाईचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळेच थेट दिल्लीतून दिग्दर्शित होणारं हे सत्तेचं महानाट्य प्रत्येक कलाकाराला आणि त्याच्या कलागुणांना मर्यादित वाव देणारं असलं तरी दिवाळी नंतरच्या महानाट्याची तिसरी घंटा तर झालीय. त्यात सह कलाकार अर्नब गोस्वामी असो किंवा देवेंद्र फडणवीस-नारायण राणे..खरा शोमॅन मात्र दिल्लीतच आहे.

 

कोकणातील मालवणात रविवारी संध्याकाळी एका कोविड – १९ लॅबच्या उद्घाटन प्रसंगी भाजप खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचं राज्यातलं सरकार दीड महिन्यात कोसळेल, अशी आणखी एक भविष्यवाणी खास राणे स्टाईलमध्ये केली. नारायण राणे यांचे व्यासपीठावरून उच्चारलेले शब्द हवेत विरतात न विरतात तोच तिथेच शेजारी बसलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चेहर्‍यावरती कमालीचा तणाव आला. गोर्‍यापान लालसर गालांवर नाराजीची काळसर छटा झळकली… कारण राणेंच्या तोंडून गेलेलं वाक्य हे महानाट्याच्या ‘स्क्रीप्ट’ मध्ये नव्हतं…आणि जे दिल्लीतून आलेल्या स्क्रीप्टमध्ये लिहिलेलं नाही, सांगितलं नाही ते उद्धृत करायचं नाही. असा भाजपात सध्या दंडक आहे…याच राणेंना पक्षात घ्यायला फडणवीस-पाटील या जोडगोळीसह तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचाही विरोध होता. तरी अमित शहांनी राणेंची गरज ओळखून त्यांना पक्षात घेतलं.

- Advertisement -

 

२०१८ मध्ये कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रचंड अस्वस्थतेतून भेट घेतली. ही त्यांची अस्वस्थता त्यांच्याच भागातील उत्तर भारतीय बिल्डर, काँग्रेस नेते रमेश ठाकूर यांना प्रदेश नेतृत्व भाजपमध्ये प्रवेश देत असल्याच्या चिंतेतून होती. भातखळकरांना आपल्या आमदारकीला धोका वाटत होता. भातखळकरांच्या भेटीत शहा म्हणाले,‘आप फिलहाल विधायक हो ना..| जाओ मुंबईमें जाकर चुनावक्षेत्र में काम करो| पार्टी में किसको लेना, किसको क्या काम देना, यह पार्टी का काम है, वो पार्टी को करने दो| आप निश्चिंत होकर अच्छा काम करो|याच अतुल भातखळकर यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर तरुण मंत्र्याच्या भूमिकेबाबत आणि मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत ट्विट केलं आणि गदारोळ उडाला. अर्थात त्याआधी फडणवीस यांनी ट्विट केलं होतं. पण त्यानंतर भातखळकर यांनी केलेल्या ट्विटचा तिखटपणा ‘मेड इन दिल्ली’ होता.

 

- Advertisement -
मुलुंड पूर्वेला एक ज्येष्ठ फिजीशियन डॉक्टर होते. या डॉक्टरांच्या घरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जुन्या जनसंघाच्या काळापासून ज्येष्ठ भाजप नेत्यांची उठबस असायची. अगदी स्व. अटलजींशीही त्यांचा स्नेह होता. आता त्यांचा रेडिओलॉजिस्ट डॉक्टर मुलगा याच भागात छान प्रॅक्टिस करतो. त्याने तो अध्यक्ष असलेल्या निलम नगर जवळच्या महाविद्यालयात कोविड काळात हजारच्या आसपास पोलिसांची, राज्यभरातील शंभर डॉक्टरांची आणि पाचेकशे वैद्यकीय स्वयंसेवकांची अनेक दिवस राहण्याची,जेवण्याची सोय केलीय. यात त्यांची संस्था आणि काही संघनिष्ठ सोडले तर थेट कुठेही राजकीय व्यक्तीचा सहभाग नव्हता. या मंडळींनी धारावी, कुर्ला, चेंबूर,पवई आणि कल्याणमधील झोपडपट्ट्यांत जाऊन कोरोनावरील उपचारांचं खूपच वाहवा मिळवणारं काम झालं. हे सगळं होत असताना या डॉक्टरांना खूप मोठी अडचण आली. काहींनी भागातील राजकीय नेत्यांची नावं सुचवली. पण विचलीत न होता त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह काम सुरूच ठेवलं आणि अडचण खूपच वाढेल असं वाटत असतानाच एका रात्री दिल्लीहून फोन आला. पलीकडच्या गृहस्थानं अमितभाई शहा बोलतील असं सांगितलं आणि त्यानंतर मुलुंडमधून सुरू असलेलं कोरोनाचं काम, त्यातल्या अडचणी, त्यांची कारणं, ते निर्माण करणारे घटक, त्यांच्यावर शांतपणे मात कशी करायची याचं मार्गदर्शन अवघ्या काही मिनिटांतल्या ‘सूक्ष्म’ सूचना अमित शहा यांनी दूरध्वनीवरुन केल्या. ते ऐकून मुलुंडच्या अनेक क्रीडा आणि सामाजिक संस्थांशी संबंधित हे डॉक्टरही अवाक झाले.

 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी फडणवीस यांचं काम आणि प्रतिमा कारणीभूत असल्याचा संदेश जावा ही दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच इच्छा होती. राज्यातला  सत्तेचा पेपरही सोपा होता. पण फडणविसांना आव्हान पेलवलं नाही…ते कमी पडले…त्याला फडणवीस यांचा अती आत्मविश्वास आणि आजुबाजूच्या लोकांनी घात केल्याचं  मुंबई ते दिल्ली व्हाया नागपूर सगळ्यांनाच कळलं. पण तोपर्यंत उशीर होऊन एक प्रमुख राज्य भाजपने गमावलं होतं. याचा भाजपात सगळ्यांनाच मनस्ताप झालाय. त्यानंतर आता सूत्रं दिल्लीनं हाती घेतलीत.

 

अमित शहा हे गुजरातमध्ये गृह राज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांचा दिल्लीतला प्रवास आणि त्याचं संघटनात्मक आणि पहिल्यांदाच थेट देशाचे गृहमंत्री म्हणून केलेलं काम अख्ख्या जगानं पाहिलंय. यावर सेना नेते खासदार संजय राऊत म्हणतात, अनुभव आणि गुणवत्ता यांचा काही संबंध नाही. तुम्हाला काम करता आलं आणि त्यात दर्जा राखता आला की तुमचं कौतुक होतंच’. यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे घटना आणि घटक कसे योग्य वेळी अचूक प्रमाणात वापरायचे ह्याचा परिपाठच जणू अमित शहांनी घालून दिलाय. नारायण राणेंना २०१८ मध्ये त्यांनी भाजपात घेतलं आणि आपल्या तिखट वाणीसाठी ओळखल्या जाणार्‍या या कोकणी नेत्याला पक्षाच्या व्यासपीठावरून पहिल्या ‘अधिकृत’ पत्रकार परिषदेत बोलू दिलं ते २०२० च्या जुलैमध्ये. म्हणजे साधारण अडीच वर्षांनी…विषय होता मुख्यमंत्री ठाकरेंसह सेनेवरचा हल्ला…पक्षात टिव-टिव करू न शकणारे अनेकजण असताना ठाकरे आणि सरकार या दोघांनाही हादरवणारं ट्विट सुशांत सिंह राजपूत मृत्यू तपासावर भातखळकर करतायत… पालिकेत सेनेनं केलेल्या कोविडमधील भ्रष्टाचारावर आशिष शेलार, मनोज कोटक नाही तर कागदोपत्री पुराव्यानिशी प्रवीण दरेकर बोलतायत. देवेंद्र फडणवीस यांचा पिंड खरं तर बोलक्या नेत्याचा…आक्रमकपणे लढवय्या असा हा वैदर्भीय गडी…पण त्याच्या आक्रमकतेला मुरड घालून त्याला संसदीय कामकाजावरच लक्ष द्यायला भाग पाडण्याची नितीही दिल्लीचीच… सेनेतील वाचाळवीरांनी भाजपला दुखावल्यानंतरही मातोश्रीचे युवराज अडचणीत आहेत असं दिसल्यावरही झटपट ‘सामना’ न संपवता प्रतिस्पर्ध्याची पूर्ण ‘कसोटी’ बघणारी चाणाक्ष रणनीतीही गुजरातीच…आमदारांना ‘नेते’ वाटणारे राष्ट्रवादीचे अजित पवार असोत की सेनेचे एकनाथ शिंदे अथवा मंत्रिपदी असूनही नांदेडचे नाराज अशोक चव्हाण असोत किंवा काँग्रेसमध्ये असूनही भाजपला ‘पोषक’ राजकारण करणारे बिहारी संजय निरुपम… दिवाळी नंतरच्या सत्तेच्या महानाट्यातली प्रत्येकाची भूमिका ठरली आहे.

 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अर्नब गोस्वामी आणि त्यांची वाहिनी ज्या शैलीत पत्रकारिता करतायत तो तर राजापेक्षा राजनिष्ठ होण्याचाच प्रकार आहे. अर्थात या संपूर्ण प्रकरणात एरव्ही संयमी, शांत आणि ‘इनोसंट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या  आदित्य ठाकरेंच्या भोवती संशयाचं धुकं तयार झालं आहे. त्यांना असलेला शिवसेनाप्रमुखांचा वारसा आणि रश्मी व उद्धव ठाकरे यांचे संस्कार यामुळे आदित्य यांच्याकडून खून किंवा बलात्कार यातली एकही गोष्ट घडणार नाही. हे  त्यांना ओळखणारं कुणीही छातीठोकपणे सांगू शकतो. पण त्यांना घेरलेल्या अभिनेता डिनो मोरिया, सुरज पांचोली सारखे बदमाश, अपयशी फिल्मी मित्र असू द्या, मावस भाऊ वरुण सरदेसाई किंवा मित्र अमेय घोले यांच्यासारखे कोरोनाच्या महामारी काळातही अपारदर्शी, संशयास्पद व्यवहार करणारे सहकारी असू द्या. या सगळ्यांना घेरण्याची रणनीती भाजपमध्ये व्यवस्थित बनली आहे. त्यातूनच सीबीआय, आयकर, आणि ईडीच्या कारवाईचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळेच थेट दिल्लीतून दिग्दर्शित होणारं हे सत्तेचं महानाट्य प्रत्येक कलाकाराला आणि त्याच्या कलागुणांना मर्यादित वाव देणारं असलं तरी दिवाळी नंतरच्या महानाट्याची तिसरी घंटा तर झालीय. त्यात सह कलाकार अर्नब गोस्वामी असो किंवा देवेंद्र फडणवीस-नारायण राणे..खरा शोमॅन मात्र दिल्लीतच आहे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -