तिसरी लाट तीव्र मात्र, सौम्य लक्षणांमुळे नियंत्रणात

वैद्यकीय क्षेत्राकडून रुग्णांच्या योग्य समुपदेशनाची व्यवस्थेची अपेक्षा

Oxford AstraZeneca researchers warn Future epidemics are even more deadly than corona

डॉ. समीर अहिरे

बघता बघता कोरोनाने जनमाणसाचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. दिवसाला 2 लाखांहून अधिक (ज्यांनी तपासणी केली आहे अशांची ही संख्या. न तपासलेले कितीतरी पटीने आहेत) रुग्ण सापडत आहेत. एक मात्र खरं की दुसर्‍या लाटेत ज्याप्रमाणे रुग्णसंख्या वाढण्यासोबतच उपचारासाठी दाखल होणार्‍यांचं प्रमाणही मोठं होतं. त्यावेळी तर अक्षरशः तयारी करण्यासाठीदेखील आरोग्य यंत्रणेला वेळ मिळाला नव्हता. सुदैवाने यावेळी तसं होताना दिसत नाहीये.

बहुतांश रुग्णांमध्ये (साधारण 90-95%) साध्या व्हायरल आजारांसारखी लक्षणं दिसताहेत आणि ते सर्वसाधारण उपचाराने बरेही होताहेत. ही खूप सकारात्मक बाब आहे. परंतु, या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांमध्ये एक गल्लत होतेय, ती म्हणजे लक्षणे साधी आहेत म्हणून बहुतांश व्यक्ती चाचणी करण्याचे टाळत आहेत. त्यासाठीची कारणंदेखील मोठी मजेशीर आहेत. मात्र, यातून आपला निष्काळजीपणा दिसतोय.

अर्थात, एक बाब चांगली आहे ती म्हणजे, लक्षणं गंभीर नाहीत. परंतू, अजून आपल्या घरातील लहान मुलं ज्यांचे लसीकरणही झालेले नाही आणि इतर दुर्धर आजार (को-मॉर्बिड) असलेले जेष्ठ मंडळी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. आपल्या निष्काळजीपणाचा परिणाम त्यांना भोगावा लागू नये, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. तेव्हा आता काय केलं पाहिजे? तर, शासकीय पातळीवरदेखील काही बदलाची आवश्यकता आहे. त्यासाठी तपासण्यांची संख्या वाढवावी. अफवा अथवा चुकीची माहिती, विधानं करणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, मग तो सामान्य माणूस अथवा लोकप्रतिनिधी का असेना. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या जाहीर करू नये.

कारण ही संख्या सामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करते. ज्यांच्याकडे पैसे किंवा इन्शुरन्स आहे असे रुग्ण या भीतीच्या वातावरणात बेड्स अडवून ठेवायची शक्यता असते. संख्या जाहीर न करता थेट त्या व्यक्तीला रिपोर्ट कळवला तर तो व्यक्ती लक्षणांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊ शकतो. यामुळे जो घरी राहून बरा होऊ शकतो. ज्यांना उपचार आणि खरोखरच दाखल करुन घ्यायची गरज आहे, त्यांनाच दाखल करून घेता येईल.

परिणामी योग्य त्या व्यक्तीला बेड्स व ऑक्सिजनपासून औषधांपर्यंत वेळेवर मिळून मृत्यूचं प्रमाण कमी करता येईल. दाखल होणार्‍यांची आणि मृत्यूची संख्या मात्र जाहीर करावी. हे एक राष्ट्रीय संकट आहे. याकडे स्वतःच्या फायद्याची संधी म्हणून बघण्यापेक्षा लोकमदतीची संधी म्हणून राजकारणी, वैद्यकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, व सामान्यांनी पाहिलं तर या अग्नीकुंडातून सहीसलामत बाहेर पडू यात शंकाच नाही!

चाचण्या टाळण्यामागील कारणं

डॉक्टर थोडं वातावरण बदललं टेस्ट केली की पॉझिटीव्हच येते उगाचच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर टेन्शन वाढतं चाचणी पॉझिटिव्ह आली तर विनाकारण औषधं घ्यावे लागतील चाचणी पॉझिटिव्ह आली तर इतरांच्याही चाचण्या कराव्या लागतील चाचणी पॉझिटिव्ह आली तर घरातली कामं कोण करणार? मी पॉझिटिव्ह आलो तर मागे बघणारं कुणीच नाही.

वैद्यकीय क्षेत्राकडून अपेक्षा

आयसीएमआरने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार लॅब टेस्ट व उपचार पद्धतीचा अवलंब करावा. रुग्णांच्या योग्य समुपदेशनाची व्यवस्था करावी.

कोविड नियंत्रणासाठी ही घ्या काळजी

  • गर्दीत जाणं टाळावं
  • हात वारंवार धुवावेत
  • मास्कचा कटाक्षाने वापर करावा
  • वॅक्सिन घेतले नसेल तर त्वरित घ्यावे लक्षणं दिसताच स्वतःला इतरांपासून विलग करून घ्यावे आरटीपीसीआर चाचणी करावी (लक्षणं कितीही सौम्य असली तरी)
  • पॉझिटिव्ह आल्यास घरातील इतरांची चाचणी करून घ्यावी
  • लक्षणांच्या तीव्रतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत
  • पॉझिटिव्ह व निगेटिव्ह यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करावी

(लेखक भारत ज्ञान विज्ञान समुदाय, नाशिकचे उपाध्यक्ष तथा लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक आहेत)