घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचं वैभव जपण्याची वेळ अजूनही आपल्या हातात

नाशिकचं वैभव जपण्याची वेळ अजूनही आपल्या हातात

Subscribe

विकासकामांचे निर्णय घेताना पर्यावरणाशी तडजोड नको

शेखर गायकवाड

नाशिक शहराचा विकास होत असताना पर्यावरणाबाबत बरंच काही घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळनंतर थंड हवेचं ठिकाण म्हणून नाशिकचं नाव घेतलं जायचं. नाशिकचं भौगोलिक वातावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे येथील हवामानात एक वेगळा असा आल्हाददायकपणा जाणवत होता. त्यामुळेच नाशिकला मुंबईकर अन पुणेकरांनीसुद्धा सतत पसंती दिली.
नाशिकचं हे ’वैभव’ कालौघात हरवलं. त्यामागे विविध कारणंही आहेच. त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे स्थानिक प्रशासनाने दूरदृष्टी न ठेवता शहर विकासावर केंद्रीत केलेलं लक्ष. प्रशासनाने विकासाला ’शाश्वत’ शब्दाची अन् कृतीची जोड प्रशासनाने दिली नाही. परिणामी अनेक गोष्टी नाशिककर गमावून बसले, हे आपल्या लक्षातही येत नाहीये. गमावलेलं आपण शंभर टक्के परत मिळवू शकत नाही. पण, किमान ज्या चुका त्याची पुनरावृत्ती टाळू शकतो. आपण पुढील विकास साधताना आत्मपरीक्षण करत दूरदृष्टीकोन ठेवत शाश्वत विकासाची कास धरणे अपेक्षित नव्हे तर काळाची गरजच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

कुठलीही घाई न करता आगामी काळात शाश्वत विकासाची आपण धरलेली कास सुटता कामा नये. कुठल्याही प्रकारचे विकासकामांचे निर्णय घेताना याच्याशी तडजोड होता कामा नये. ’पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीने आपण काम केले पाहिजे. सुवर्णत्रिकोणातून आपली वाटचाल होत असताना आपल्या टोकाला असलेली दोन प्रमुख मेट्रो शहरे आणि तेथील विकास (?) फुगवटा, तेथे झालेल्या चुका व ’शाश्वत’सोबत तेथे झालेली प्रतारणा यामुळे त्या शहरांच्या विकासादरम्यान त्यांनी काय चुका केल्या, हे लक्षात ठेवावं.

आपण ज्या दोन शहरांकडे पाहून विकासाचं स्वप्न बघत आहोत त्यात आपण नेमकं कायमस्वरूपी काय नष्ट करू पाहतोय, याचा सखोल विचार आताच करणे गरजेचे आहे. कारण अजूनही आपल्या हातातील वेळ गेलेली नाही. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. आपल्याकडे त्यातुलनेत अजूनही चांगलं वातावरण आहे. आपल्याकडे जागा आणि वेळ आहे. सर्वप्रथम चांगला पाऊस पडूनही भूजल पातळी खालावण्यामागील कारणांचा शोध घेतला पाहिजे.

- Advertisement -

पूर्वी काही परिसरात 15 ते 20 फुटांवर पाणी लागायचं आता ते 75 ते 100 फुटांपेक्षा खाली गेले आहे. इमारत व त्यांच्या आवारातील काँक्रिटीकरण, रस्त्याकडेला असलेले पेव्हर ब्लॉक्स, भूमीगत पावसाळी गटारी हीदेखील प्रमुख कारणं आहेत. यामुळे भूजल पातळी खालावण्यासोबतच शहराचं कमाल तापमान थेट चाळीशीपार जाऊ लागलंय. नदी शहर व पर्यावरणाचा मोठा स्रोत मानला जातो. मात्र, जिथून गोदावरी उगम पावली तिथला आढावा घेतल्यास मोठी शोकांतिका दिसते. ब्रह्मगिरी पर्वतावर उगमस्थानीच म्हणजे त्र्यंबकेश्वरी गोदावरीचा गळा घोटला गेलाय.

त्र्यंबकमध्येच गोदावरी नदीचा शोध घ्यावा लागतो. ज्या गोदावरीमुळे पंचक्रोशीची आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे, तिचं सौंदर्य वाढवण्यासाठी केलेलं एक कामही इथे शोधून सापडणार नाही. प्रत्येक व्यक्ती फक्त गोदावरीचं नाव घेत फक्त ’कमाई’ करण्यात व्यस्त आहे. गोदावरी नदी प्रदुषणाबाबत १ टक्के नागरिकांचा अपवाद सोडला तर अन्य कुणालाही काही घेणंदेणं वाटत नाही. गंगा गोदावरीवरील नाशिकचे वैभव समजलं जाणार्‍या अहिल्याबाई होळकर पुलापासुन ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत रामकुंड, लक्ष्मण कुंड, सीताकुंड अशी जागतिक किर्तीची धार्मिक स्थळं आहेतच. या काठावर असंख्य लहान-मोठी कलाकुसर असलेली मंदिरं होती. संपूर्ण परिसर घडवलेल्या दगडांचा होता. काँक्रीटकरण्याच्या नादात हा ठेवा नष्ट होईल, याचं भान इथल्या प्रशासनाला राहिलं नाही.

गोदावरी पात्रातली जिवंत जलस्रोत काँक्रीटमध्ये दबली गेली. काही गोदाप्रेमींनी याविरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर आता कुठे काही ठिकाणचे काँक्रीट काढून नैसर्गिक स्रोत पुन्हा शोधण्याची धडपड सुरू झालीय. आता तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुन्हा दगडी फरशा लावण्याचा प्रताप का आणि कशासाठी केला जातोय, हे त्या गोदामाईलाही समाजण्यापालिकडे आहे. रामायणाला ज्या ठिकाणावरुन कलाटणी मिळाली व सुरांचा विनाश होण्यास सुरूवात झाली तो तपोवन परिसरच आज वनवास भोगतोय. नाशिकची ओळख, शुर्पनखे नाक लक्ष्मणाने जिथं कापले, त्या प्रसंगामुळे नासिका नाव पडलं, असं अभिमानाने म्हटलं जातं. मात्र, ते वैभव जपण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत.

पवित्र गंगा गोदावरीच्या काठावरचं हे पौराणिक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण. मात्र, आज त्याची काय अवस्था झालीय हे गोदाकाठी फेरफटका मारल्यावर कळतं. पर्यटक जेव्हा तपोवन पाहण्यासाठी येतात आणि त्याच तपोभूमीत उभं राहून विचारतात “भैया यह तपोवन किधर है” त्यावेळी आपल्याला आपली लाज वाटते. तेव्हा वाटतं की, स्थानिक यंत्रणांना आपणही विचारावं साहब, मेरा तपोवन किधर है!

मी स्वतः आजवर अनेकदा स्थानिक जनतेचे कैवारी (?) अन् विकासाचं स्वप्न दाखवणार्‍या लोकप्रतिनिधींना भेटून तपोवनाची व्यथा सांगण्याचा अन् गतवैभव प्राप्त करुन देण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र, त्यांनी एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून दिलं, हे खेदाने सांगावंसं वाटतं. तपोभूमीत शाश्वत विकास कसा साधला जाईल, येणार्‍या भाविक, पर्यटकांना तपोभूमीत आल्याचं समाधान, जाणीव कशी करुन द्यायची याविषयीची सविस्तर माहितीपूर्ण आराखडा सादर केला. अंदमानला जसं स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर आधारित लेझर शो विकसित केला गेला त्या धर्तीवर तपोवनात रामायण साकारता येईल. केवळ भिंतीवर रामसृष्टी उद्यान लिहून जबाबदारी झटकण्यापेक्षा राशीवन, नक्षत्रवन, चरकवन, नाशिकचा धार्मिक-पौराणिक वारसाची सफर घडविणारी सुसज्ज आर्ट गॅलरी, प्रदेशनिष्ठ झाडांची लागवड (अगोदर मी केली, ती जगवली) करण्यावर सातत्याने भर द्यायाला हवा. सुसज्ज मूलभूत सुविधा असल्याशिवाय भाविक पर्यटक सुखावणार नाहीत.

ज्या शहराला गड, किल्ले, पर्वतरांगा, हिरवाईचं वैभव प्राप्त झालंय, जिथं कधी पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसायचे तिथं आता आता पिंडाला शिवायला कावळा लवकर मिळत नाही. एवढी पर्यावरण अन् जैवविविधतेची हानी झालीय. नांदुरमध्यमेश्वरही प्रदूषणाच्या विळख्यात सापडलंय. त्यामुळे आता वेळ आलीय वन्यप्राण्यांचा अधिवास शाबूत ठेवायची, गिधाडांचं महाराष्ट्रातील एकमेव वस्तीस्थान जोपासण्याची आणि नाशिकचं वैभव जपण्याची!

(लेखक आपलं पर्यावरण संस्थेचे प्रमुख आहेत)

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -