घरफिचर्ससजन रे झूट मत बोलो... हा संदेश देणारा 'तिसरी कसम'

सजन रे झूट मत बोलो… हा संदेश देणारा ‘तिसरी कसम’

Subscribe

तिसरी कसम या चित्रपटाला राष्ट्रती पदक मिळाले हे चांगलेच झाले, असे आपल्याला वाटते. एकच वाईट झाले, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसा उभा करण्यासह, इतर अडचणींमुळे शैलेंद्र त्रासून गेला होता. त्यातच त्याचा अंत झाला. राज कपूर, वहिदा रहमान, दुलारी, इफ्तिकार, आसित सेन, केश्तो मुखर्जी अशा सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे.

महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा प्रचार थांबला आहे. उद्या, सोमवारी मतदान. यावेळच्या प्रचारात खूपच धामधूम होती. आरोप प्रत्यारोप तर नेहमीचेच. पण एक महत्त्वाचा मुद्दा लोकांच्या ध्यानात राहण्याजोगा होता आणि तो म्हणजे खोटे आणि फक्त खोटेच बोलून भुलवणार्‍यांच्या थापांना बळी पडू नका. ज्यांच्याविरुद्ध हा प्रचार होता, त्यांना याचे प्रत्युत्तर करणे शक्य होत नव्हते. कारण खोटे आणि फक्त खोटे बोलण्याच्या शिकवणीचा आदर्श त्यांना त्यांच्या श्रेष्ठींनी घालून दिला आहे. त्यामुळे ते राज्याशी काहीही संबंध नसणारे विषयच बोलत होते. वर त्यांचा बादरायण संबंध जोडून आम्ही राज्याचेच हित पहातो, असेही सांगत होते. या सर्व गदारोळात गांधीजींच्या सत्यमेव जयतेचा विसर, त्यांच्या स्वच्छता मंत्राचा घोष करणार्‍यांना पडला होता.

… आणि त्यामुळे आठवत होते एक अजरामर, आजही ओठावर यंणारे, सजन रे झूट मत बोलो… हे गीत. ते ‘तीसरी कसम’ या चित्रपटातील आहे. साधारण 53 वर्षांपूर्वीचा चित्रपट. आजही तो पाहणार्‍यांना तितकीच मोहिनी घालतो. कवी शैलेंद्र यांची ही निर्मिती. ते त्यांचे स्वप्नच होते. त्यासाठी त्यांनी शक्य ते सारे प्रयत्न केले होते. फणीश्वर नाथ मरेणूय यांची मारे गये गुलफाम ही कथा शैलेंद्र यांच्या मनात घर करून बसली होती. ती जशीच्या तशी रुपेरी पडद्यावर आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. कथेशी पूर्णपणे प्रमाणिक राहताना त्यांनी क्वचितच स्वातंत्र्य घेतले. (फणीश्वर नाथ यांनीच संवाद लिहिले होते). म्हणून ही कलाकृती महान ठरली.

- Advertisement -

कथा म्हटले तर, साधी. पण नीट विचार केला, तर बरेच काही सांगून जाणारी. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे गाणी. कथेतून वेगळी काढताच येणार नाहीत अशी. ती कथानकाचाच भाग बनतात. त्यांच्यातूनच कथा पुढे जाते. त्यांच्याविना चित्रपट अपुराच वाटला असता. असा प्रकार दुर्मिळच. अलीकडे तर एखादे आयटेम साँग असते. त्याचा ना कथानकाशी संबंध ना पात्रांशी. केवळ उल्लूमशालांचे मनोरंजन हाच हेतू त्यामागे असतो. त्यामुळेच कथेचा अविभाज्य भाग असलेली गीते असलेला, तीसरी कसम हा चित्रपट ध्यानात राहातो.

चित्रपटाची सुरुवातच सजन रे झूट मत बोलो…या गीताने होते. चित्रपट-शौकिनांना ते आजही ताजेच वाटते. गाडीवान हिरामन ते गाणे गात गाडी हाकत असतो. एकदा त्याच्या गाडीत चोरीचा माल भरलेला असतो आणि नेमकी तेव्हाच पोलिसांची धाड पडते. तेव्हा कसाबसा निसटून गेलेला हिरामन शपथ घेतो की चोरीच्या मालाची ने आण गाडीतून पुन्हा करणार नाही. ही पहिली कसम. ही शपथ पाळण्यासाठी तो जास्त देऊ केलेले पैसेही नाकारतो. नंतर एकदा बांबू गाडीतून नेताना एक अपघात होतो. त्याला बराच मार खावा लागतो. तेव्हा तो पुन्हा बांबू गाडीतून नेणार नाही अशी शपथ घेतो. ही दुसरी कसम. आणि तीसरी कसम कोणती ते सांगण्यासाठी, चित्रपट पुढे जातो.

- Advertisement -

नवी गाडी खरेदी करून घरी येताना वाटेत एका ठिकाणी गर्दीने रस्ता भरलेला असतो. तो वाट मागतो, तेव्हा त्याला काय चालले आहे, ते बघ असे लोक सांगतात. एकजण तर्रर होऊन घराच्या छपरावर बसलेला असतो. खाली उतरतच नाहीये. तो मौसीने आश्वासन दिले तरच उतरेन असे सांगतो. पण मौंसी येते ती हातात झाडू घेऊनच. पुढचे न पाहता, हिरामन घराकडे येतो. नवी गाडी पाहताच भावजय त्याला विचारते, नवी गाडी घ्यायला पैसे कोठून आणलेस? त्यावर तो सारे हिशेब पुरे करून हे पैसे मिळाले, असे सांगतो.

स्टेशनवर सवारी घेण्यासाठी तो थांबलेला असतो. तेव्हा एकजण गाडी नेणार का, असे विचारतेा, तेव्हा हिरामन त्याला चोरीचा माल नाही ना? असे विचारतो. नाही हे उत्तर आल्यावर पुन्हा विचारतो, बांबू तर न्यायचे नाहीयेत ना? जादा पैसे दिलेत तरी नेणार नाही. त्यावर नौटंकीतली बाई जत्रेपर्यंत न्यायची आहे, असे सांगतो. व्यवहार ठरतो. प्रवास सुरू हातो. वेळ रात्रीची. हिरामनला भीती वाटते, बाई म्हणजे हडळ वगैरे तर नाही ना…

पण तो गप्प राहून गाडी चालवत असतो. चंद्रप्रकाशात अचानक त्याला तिचा चेहरा दिसतो. ये तो परी है परी, असे म्हणतो. ती एकदम कुठाय परी, असे विचारते. नंतर चिठ्ठी वाचू लागते ते पाहून हिरामन गाऊ लागतो, सजनवा बैरी हो गये हमार, चिठियाँ हो तो हरकोई बाचे भाग न बाचे कोय…. ती खुश होते. छान गातोस म्हणते. त्याचे नाव विचारते. हिरामन असे तो सांगतो. त्यावर ती प्रथम त्याला भाई म्हणते. पण नंतर म्हणते, मी तुला मितवा, अंहं, मीताच म्हणेन. बाईचे नाव हिराबाई असते. ती त्याला तू नौटंकी पाहिली आहेस का? असे विचारते. त्यावर तो नाही, त्यातील बाया वाईट असतात असे म्हणतो. त्यावर ती म्हणते मी वाईट आहे का? त्यावर तो नाही, म्हणून गप्प बसतो. तिला गोष्टींची आवड आहे, ती त्याला गोष्ट सांगायला सांगते. तिला गाणे आवडते, हे माहीत झाल्याने म्हणतो, मी गाण्यातच गोष्ट सांगतो, असे म्हणून ‘दुनिया बनाने वाले काहेको दुनिया बनाई, क्या तेरे मनमें समाई’ या गाण्यातून महुआची प्रेमकथा सांगतो. दोघांचेही डोळे पाणावलेले. तो म्हणतो, तू म्हण ना. ती नेमकी त्या गाण्यातील सपने दिखाके तुने, काहे को दे दी जुदाई.. या ओळी म्हणते. तो तिच्या आवाजाची तारीफ करतो. प्रवास संपतो. ती त्याला नौटंकीचा खेळ पाहायला यायला सांगते.

त्याला त्याच्या मित्रांना ती पास देते. ते रुबाबात येतात. दारात अडवल्यावर पास आहेत, असे म्हणतात. तोच आधी ओळख झालेला गुरखा ती हिराबाईची माणसे आहेत असे सांगतो. आत जाताच ते वाट पाहू लागतात. कुणी बोलले तर गप्प बसायला सांगतात. सुरुवातीच्या गाण्यानंतर हिराबाई पान खाए सैंया हमारो.. हे गाणे आणि नृत्य सुरू करते. ते संपताच कुणीतरी तिच्याबाबत वाईट बोलते म्हणून हिरामन भडकतो आणि मारामारी सुरू करतो. ती कशीबशी थांबते.

हिराबाई त्याला बोलावून घेते आणि कारण कळल्यावर मला बोलत होते ना, तुझं त्याच्याशी काय देणेघेणं.. असे रागाने विचारते. तो निराश होतो. मारे गए गुलफाम.. या नृत्यगीताने खेळ पुन्हा सुरू होतो. नंतर हिरामन भेटत नाही, म्हणून ती त्याला बोलावून घेते. जत्रेत चोरीची भीती, म्हणून पैशाचा बटवा तिच्याकडे सांभाळायला देतो. कार्यक्रमात ती लैला बनते. हिरामनला त्याने आणलेला गजरा द्यायला संकोचतोे. तेवढ्यात जमीनदार आल्याने तो निराशेने निघून जातो.

जमीनदाराला कटवून, ती हिरामनला भेटून देवळात जाऊ असे सुचवते. तो होकार देतो. देवाजवळ काय मागणार? असे तिने विचारल्यावर म्हणतो, ते देवालाच ठाऊक! नटलेली हिराबाई गाडीत पाहून गावातल्या मुली-मुले तिला नवी नवरी समजून नाचत गाडीमागून, लाली लाली डोलीमे लायिरे दुल्हनिया, हे गाणे म्हणत जातात. दोघेही मनोमन खुश होतात. परतल्यावर तो गाडीत विसरलेली साडी तिला देतो. तेवढ्यात जमीनदार येतो. पुन्हा रागावून हिरामन निघून जातो. जमीनदाराच्या विनवणीला ती दाद देत नाही, तो रागावतो; पण ती त्याला जायला सांगते. निराशेने हिरामन घरी परततो. त्याला मआऽ आऽऽ आभिजा, रात ढलने लगी, चाँद छुपने लगाय हे गीत ऐकू येते. जमीनदार हिराबाईवर जबरदस्तीचा प्रयत्न करतो; पण ती तो फोल ठरवून पळते. कंपनी सोडून जायचे ठरवते. इतरजण तिची समजूत काढायचा अयशस्वी प्रयत्न करतात.

पण तिचा निश्चय कायम राहातो. ती निघते. हिरामन तिला भेटायला येतो. त्याला फलकावर नव्याच बाईचे चित्र दिसते. त्याला हिराबाई कंपनी सोडून गेल्याचे कळते. तो स्टेशनकडे गाडी दौडवते. थोडा काळ त्यांची भेट होते, ती त्याचा बटवा परत देते. भेट म्हणून शाल देते. नोकराने घाई केल्याने गाडीत बसते. गाडी सुटते. हिरामन सुन्न मनाने परततो. गाडीत बसून बैलांना मारायला चाबूक उगारतो. तेव्हा हिराबाईचे त्यांना मारू नको हे शब्द आठवतात आणि तो चाबूक खाली ठेवतो. पार्श्वभूमीवर जीवनके पथमे मीत मिलाए, मीत मिलाके तूने सपने सजाये, सपने दिखाके तूने, काहे को दे दी जुदाई या ओळी ऐकू येत असताना चित्रपट संपतो.

तिसरी कसम या चित्रपटाला राष्ट्रती पदक मिळाले हे चांगलेच झाले, असे आपल्याला वाटते. एकच वाईट झाले, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसा उभा करण्यासह, इतर अडचणींमुळे शैलेंद्र त्रासून गेला होता. त्यातच त्याचा अंत झाला. राज कपूर, वहिदा रहमान, दुलारी, इफ्तिकार, आसित सेन, केश्तो मुखर्जी अशा सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे. तत्कालीन खेडेगावांचे वातावरण अस्सल आहे आणि लोकांचे स्वभावदर्शनही! शंकर जयकिशन यांचे संगीत त्यांच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळे असणे आवश्यक होते आणि तसे असल्यानेच प्रभावी झाले आहे. दिग्दर्शक बासू भट्टाचार्यचे काम अफलातून. त्याचा सहाय्यक म्हणून बासू चतर्जीचे नाव आहे. अन्य तांत्रिक बाबींमध्येही काही त्रुटी नाहीत.

तिसरी कसमचा प्रभाव जाणवतो त्यातील सजन रे झूट मत बोलो या संदेशाने, त्याच्या शपथ पाळण्यातील सच्चाईने आणि दुनिया बनानेवाले या गीताने. झूट मत बोलो बरोबरच आश्वासने देऊन भलतेच का घडवलेस अशी साक्षात परमेश्वराबद्दलची तक्रार बोचत राहाते. आजही असेच वास्तव आहे. भरभरून स्वप्ने दाखवणार्‍यांनी स्वतःचीच स्वप्ने खरी केली, स्वतःला आणि आपल्याच लोकांना अच्छे दिन दाखवले! याची खंत आहे. त्यानुसार उद्या, सोमवारी, मतदानाला जाताना लोक सावधतेने निर्णय घेऊन मतदान करतील, अशी अपेक्षा. हीच एक कसमच आहे जणू …

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -