घरफिचर्सप्रयोगाचे शीर्षक- गांधी वाचलाय का रे कुणी...?

प्रयोगाचे शीर्षक- गांधी वाचलाय का रे कुणी…?

Subscribe

एका वळणावर एक मोर्चा येताना दिसला. आम्ही त्यातल्या एका पुढार्‍याला विचारलं, "साहेब गांधी वाचलाय का हो?" आमच्याकडे तुसड्या नजरेनं पाहत तो पुढारी म्हणाला, "नाही वाचलाय. आणि का वाचू? सांग ना... अरे हा गांधी धड हिंदूंच्या व्याख्येत बसत नाही. राम, राम करतो म्हणून मुसलमानांत मोडत नाही. अजून कोणा दलित, अस्पृश्यांतही गणत नाही. मग का वाचू आम्ही तुझा हा गांधी...? काय केलंय त्यानं आमच्यासाठी?

साहित्य :- मी, आम्ही आणि तुम्ही, अर्थात आपण…
प्रास्तविक :- आम्ही काही प्राण्यांचा अभ्यास करायचा ठरवला. प्रयोगाची सुरुवात कुठून करायची हा प्रश्न होता. मग आम्हाला थोर संशोधक, ज्याने सत्य नावाच्या गोष्टीवर महाभयंकर प्रयोग केले, तो गांधी नावाचा प्राणी सापडला. मग आमची शोधमोहीम सुरू झाली. ‘गांधी वाचलाय का रे कुणी…?’

कृती क्र.1 :- सुरुवातीलाच आम्हाला एक कार्यकर्ता भेटला. “गांधी वाचलाय का रे कुणी?” “अरे ए बाबा, इथं टाईम हाय का कुणाला? तुला माहितेय आम्ही रोज किती व्यस्त असतो. रोजच्या रोज ती उपोषणं, मोर्चे, सत्याग्रह, असहकाराची आंदोलनं. आता यातून वेळ कधी काढणार आणि तुझा गांधी कधी वाचणार, तूच सांग?” आम्ही त्याला रामराम करून पुढे निघालो.

- Advertisement -

कृती क्र.2 :- वाटेत काही फार मोठे व्यावसायिक भेटले. आम्ही त्यांनाही विचारलं, “वो सर गांधी वाचलाय का हो कुणी?” सुरुवातीला शांतपणे आमच्या तोंडाकडे पाहून नंतर फिदी फिदी हसत ते आम्हाला म्हणाले, “गांधी…? अरे बाळांनो, ही काय वाचायची गोष्ट आहे का…? अरे त्याला तर आम्ही रोजच पाहात असतो. खेळत असतो तो आमच्याच हातात, पाचशे-हजाराच्या नोटांवर. पण त्याला साठवून ठेवायला गेलं ना तर थांबत नाही रे तो. फारच चंचल आहे रे, तुझा हा गांधी…” आम्ही त्यांनाही थँक्यू म्हणून पुढे निघालो.

कृती क्र.3 :- आम्ही विचार करत चाललो असतानाच एक मुलगा आम्हाला धडकला. डोक्यावरचे हेडफोन काढून फारच सौजन्याने आम्हाला म्हणाला, ’What the F***…? Are you blind? Nonsense…” अजून अशाच काही सौजन्यपूर्ण उपाध्या दिल्यानंतर तो जायला निघाला. आम्ही त्याला थांबवलं आणि अतिशय निर्लज्जपणे त्याला ‘सॉरी’ म्हणत विचारलं, “भावा, गांधी वाचलास का रे…?” (असा निर्लज्जपणा आमच्या रक्तात आणि या मातीत कुठून आला, ते त्या देवालाच माहीत.) तो चकीत होऊन विचार करू लागला. “गांधी…? हू इज गांधी? ओहो, ते पोर होय. अजून कच्चबच्चच आहे रे ते. What…? ओह नो! ते होय. ते पण गांधीच का? ओह् यस! हा तोच ना old man जो Indian currency वर असतो. ‘बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है…’ ए, ए… Wait, wait… Somewhere I had heard, की त्यांच्याकडे कोणतीतरी weapons होती. त्या base वर त्यांनी ब्रिटिश Empire ला Vanquish केलं. Something like that – सत्य, अहिंसा, बंधुता. म्हणजे Indian हरी पॉटरच की रे हा. म्हणजे गांधी हेदेखील कोणत्यातरी फिल्ममधलं ‘character’ असेल. I think… मुन्नाभाई ना… त्यातूनच घेतलाय ना तुमचा हा गांधी…” आम्ही परत निर्लज्जपणे त्याला थँक्यू म्हणत पुढे निघालो.

- Advertisement -

कृती क्र. 4 :- एका वळणावर एक मोर्चा येताना दिसला. आम्ही त्यातल्या एका पुढा़र्‍याला विचारलं, “साहेब गांधी वाचलाय का हो?” आमच्याकडे तुसड्या नजरेनं पाहत तो पुढारी म्हणाला, ‘‘नाही वाचलाय. आणि का वाचू? सांग ना… अरे हा गांधी धड हिंदूंच्या व्याख्येत बसत नाही. राम, राम करतो म्हणून मुसलमानांत मोडत नाही. अजून कोणा दलित, अस्पृश्यांतही गणत नाही. मग का वाचू आम्ही तुझा हा गांधी…? काय केलंय त्यानं आमच्यासाठी? आम्ही फक्त आमच्याच पूर्वजांना वाचतो…” आमचा रामरामही न घेता तो मोर्चा घेऊन गेला. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली.

कृती क्र.5 :- आम्ही शाळेत आलो. एका मुलाला विचारलं, “बाळा, गांधी वाचलेस का रे तू?” “हो… आम्ही वाचलेत. पंचावन्न कोटी, पाकिस्तानची फाळणी, अस्पृश्यांच्या मतदारसंघाचा विरोधक, मुस्लीम धार्जिणा, भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांना फाशीपासून न वाचवणारा गांधी… वगैरे, वगैरे… ‘असा हा गांधी’ या आमच्या गुरुजींच्या पुस्तकातली ही अशी सारीच ‘प्रकरणं’ वाचलीत आम्ही. त्यातून ‘गांधी’ हे प्रकरणं नेमकं काय होतं ते समजलं आम्हाला.” असं म्हणत बाळ खेळायला गेला. आम्ही हसत निघालो.

कृती क्र.6 :- तेवढ्यात प्रार्थनेचा स्वर ऐकू आला. आम्ही तडक निघालो. आलो. विचारलं. त्यांनी सांगितलं, ” हो मग! ते स्पिकरवर ‘वैष्णव जन तो’ उगाचच वाजतंय का?
हे बघा, हे आमच्या प्रभूचं भलंमोठं मंदिर. आता बाबरी पाडलीय ना, तिथे याहूनही मोठं बांधू. बापू आस्तिक होते ना आमचे. चला, बाजूला व्हा. बापू येताहेत. नाही हो, ते नाहीत. हे नवीन आहेत ‘सत्संग’वाले ‘आसारामबापू…’
म्हणजे कसं, यांच्या नावातच आसा ‘राम’ आणि ’बापू’… डिट्टो अगदी कृष्णावतार हा. बघायचंय? हो, मग या ना. पापक्षालन होईल तुमच्या खानदानाचं. पण एक अट आहे. आत येताना त्या चपलांसोबत मेंदूही इथेच ठेवून यायचा. म्हणजे कसं सिद्धावतार आहेत ना ते, त्यांना आत कोणतीही गडबड नकोय…” आम्ही दुरूनच नाक घासून निघालो.

कृती क्र.7 :- तेवढ्यात एक ‘टोपीवाला’ भेटला. आम्ही उत्सुकतेने विचारलं. तेही उत्सुकतेने सांगू लागले. हो मग, आम्ही वाचलाय, आम्ही. अरे ‘कॉपीराईटच’ आहे तो आमचा. अगदी शे-दीडशे वेळा ‘सत्याचे प्रयोग’ नुसते घोकून घोकून पाठ केलेत आम्ही. तुरुंगातही गेलोत कित्येकदा. कायदेभंग तर रोजच. सदासर्वदा बापू आमच्या हृदयाच्या कप्प्यात बंदिस्थ असतात. त्या मारुतीसारखी ही छाती फाडली ना, तर त्यातून केवळ गांधीच डोकावतील.‘अहिंसा परमो ध्येयः’ हेच एक सूत्र आम्ही बाळगतो. हे बघा, हे गाल लाल झालेत ते कोणा प्रेमिकेच्या प्रेमानं नव्हेत. हे चापडं खावून सुजलेयत आमचे. पण तरीही आम्ही कधी ‘ब्र’ देखील काढला नाही या तोंडातून. कित्येक जीव फुका गेले तरीही चालेल; पण आम्हास शपथ आहे त्या महात्म्याची. ही सत्य-अहिंसा मात्र आम्ही कधीच सोडणार नाही.” आम्ही ‘आगे बढो’ म्हणत पुढे आलो.

कृती क्र.8 :- तेवढ्यात कानावर ‘मनातलं’ काहीतरी ऐकू आलं. आम्ही थांबलो. थबकलो. बोललो. तेही बोलले. “देखो, भाईयो और बेहनो. अगदी लहानपणापासून त्यांचं नाव ऐकत आलोय आम्ही. अगदी संतपुरुष होते रे. म्हणूनच आम्ही ते कत्तलखाने बंद करून तिथेच गोरक्षणाच्या संस्था चालवतोय. हल्लीच दारुबंदी केलीय इथे. हा, काही स्वदेशी बिअर बार सुरु केलेत. कारण रोजगारही मिळतो ना या बेरोजगारांना. हरिजनांना ‘अ‍ॅस्ट्रॉसिटी’चं कवचकुंडल दिलंय. ते 370, 35-ए वगैरे सगळं काढून सर्वधर्मसमभाव वाढू घातलाय. खादी, योगाला तर अखिल भारताच्या अस्मितेचच प्रतिक बनवलंय. आणि आता बापूंच्या स्वच्छ चष्म्यातून आम्ही स्वच्छ भारताचं स्वप्न पाहतोय. तेही लवकरच पूर्ण करू आणि लाठी… ती तर आमचा स्वाभिमान आहे रे. कारण त्यावरच तर आम्ही ‘झेंडा’फडकवतोय आमचा. जुयो, सारा दिवसो दूर नथी.” आम्ही त्यांच्या पाया पडून पुढे निघालो.

कृती क्र.9 :- चालताना वाटेत एक ‘भक्त’ भेटले. आम्ही भीतभीतच त्यांना विचारलं, “महाराज, गांधी वाचलेत का?” आपलं मौनव्रत अर्ध टाकून ते आमच्याकडे डोळे वटारून पाहू लागले. “ए, त्या थेरड्याचं परत इथं नाव काढलंस तर जिता गाडीन तुला हिथंच. अरे, अखंड हिंदुराष्ट्राचे तुकडे पाडलेत त्याने. लाखोंचा जीव घेतलाय त्या म्हाता़र्‍याने. तो अजून जगला असता ना, तर आम्हां हिंदूंना डोकं टेकायला जागा उरली नसती येथे. पण धन्य ते महात्मा गोडसेजी. अगदी कायमचा काटा काढला त्याचा. त्या जर्मनीच्या हिटलर आणि रशियाच्या स्टॅलिनपेक्षा काही वेगळा नव्हता रे तुझा हा भारतातला गांधी…” आम्ही त्यांचा रुद्रावतार पाहून जीव मुठीत घेऊन धूम ठोकली आणि इथवर कसेतरी येऊन पोहोचलो.
समारोप :- शेवटी एवढ्या सा़र्‍या धावपळीनंतर आमच्या प्रयोगातून एक निष्कर्ष मिळाला.
प्रयोगातून मिळालेला निष्कर्ष:- गांधी येथे कुणीच ‘वाचवला’ नाहीय…

-श्रेयश अरविंद शिंदे.
-कळसुली-कणकवली-सिंधुदुर्ग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -