घरफिचर्सट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य

ट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य

Subscribe

अमेझॉन या ऑनलाईन दुकानात ‘फेक ब्लड कॅप्सुल’ हे प्रोडक्ट विक्रीसाठी आले आहे. स्त्रिला तिची व्हर्जिनीटी सिद्ध करण्याकरता मदत करणारी गोळी, असं सांगत या कॅप्सुलची जाहिरात होते आहे. ही कॅप्सुल घेताच सेक्सनंतर रक्त येईल, वगैरे गोष्टी म्हटल्या जात आहेत. आपण २०१९ मध्ये आहोत आणि तरीही व्हर्जिनीटीच्या मध्ययुगीन खुळचट कल्पनांमध्ये रुतून बसलो आहोत. फेक, खोटं रक्त आणता येईल, पण फेक प्रेमाचं काय करणार ?

लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करताना रक्त आलं नाही तर ती ‘सेकंड हॅण्ड माल’ आहे, असा शेरा सर्रास तिच्यावर मारला जातो. याच्यावरून लग्न मोडल्याचेही प्रसंग आहेत. काही जातपंचायतींनी कौमार्य चाचणीचे कठोर निकष लावले आहेत. कौमार्य चाचणी उत्तीर्ण असेल तरच लग्न होईल वगैरे अटी आहेत. या कौमार्य पुराणातून अनेक हिंसक गोष्टी घडतात. बाईच्या व्हर्जिनीटीला-योनीशुचितेला आत्यंतिक महत्त्वाचा भाग मानलं जातं. याभोवती तर नातेसंबंध आकाराला येतात. आपल्या उदात्त, भव्य-दिव्य संस्कृतीचं जतन करण्याचं काम स्त्रिचं आहे, असं आपण मानत आलेलो आहोत. या सार्‍यावर उपाय म्हणून एक अत्यंत विचित्र बाब अलीकडेच समोर आली.

अमेझॉन या ऑनलाईन दुकानात ‘फेक ब्लड कॅप्सुल’ हे प्रोडक्ट विक्रीसाठी आले. स्त्रिला तिची व्हर्जिनीटी सिद्ध करण्याकरता मदत करणारी गोळी, असं सांगत या कॅप्सुलची जाहिरात होते आहे. ही कॅप्सुल घेताच सेक्सनंतर रक्त येईल, वगैरे गोष्टी म्हटल्या जात आहेत. वैद्यकीय तथ्य काय, त्याचे फायदे-तोटे काय, हा वेगळा मुद्दा आहे, पण या प्रकारे एखादं प्रोडक्ट बाजारात येतं तेव्हा तरी आपण २०१९ मध्ये आहोत आणि तरीही व्हर्जिनीटीच्या मध्ययुगीन खुळचट कल्पनांमध्ये रुतून बसलो आहोत, हे कळायला हवं. फेक, खोटं रक्त आणता येईल, पण फेक प्रेमाचं काय करता येईल ?

- Advertisement -

नात्यांमध्ये जेव्हा विश्वास नसतो, प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची स्पेस नसते तेव्हा अशा प्रोडक्ट्सची आवश्यकता भासणं स्वाभाविक आहे. तो तिला, ती त्याला फसवत राहील, पण यात नक्की कोण फसेल ? आपण स्वतःच फसत चाललो आहोत, हरत चाललो आहोत, हे कसं कळेल ? सारे आवंढे गिळून ती नकली हसू आणेल किंवा तो उगाच तिच्या सुरात सूर मिसळत दोन अश्रू ढाळेल, पण आपण आपल्याशी प्रामाणिक नसू तेव्हा या सार्‍या नाटकाचा अर्थ काय? ‘मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया’ अशी सारी आपली गत झाली आहे. रडण्याकरता, हसण्याकरता माणसं नियुक्त करावी लागतील, किंबहुना तशी माणसं असतील तर आता आश्चर्य वाटायला नको, अशा स्थितीत आपण आहोत.

जग हे रंगभूमी आहे आणि आपण एक खोटी भूमिका वठवली पाहिजे, असा जणू नियमच असल्यासारखं आपण वागत राहतो. आपण जे जे नाहीत, ते ते दाखवण्याचा प्रयत्न आपण करत राहतो. १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ करणारे आपण दररोजच स्वतःला फूल करत असतो. उगाच खोटं बोलत राहतो. नेहमी खरं बोलावं, असे सुविचार सांगणारे आपण ‘जमलं तर खरं बोलावं’ असं मनातून म्हणत असतो. शंकराच्या पिंडीवर दूध ओतण्यासाठी सार्‍यांनी दूधात पाणी मिसळलं आणि मग सारं पाणीच दिसू लागलं, दूध सापडेचना, या गोष्टीसारखी आपली गत आहे.

- Advertisement -

वर्गात प्रॉक्सी करण्यापासून ते बॉसला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्यापर्यंत आपण ‘पोलिटिकली करेक्ट’ वागण्याच्या बहाण्यानं खोटं खोटं वागत असतो. खोटं सर्टिफिकिटपासून ते अगदी प्रेम दर्शवण्याचे खोटे मार्ग आपण शोधून काढले आहेत. अशा वेळी आपल्या सार्‍या असण्याला खोटं स्वरूप येत राहतं.

खोट्या आणि लबाड जगण्याला जेव्हा प्रतिष्ठा मिळू लागते तेव्हा त्याच समाजात सार्वजनिक जीवनातील व्यक्तीही बिनधास्त खोटं बोलतात. कारण असंच वागायचं असतं, असा पायंडा पडतो. सत्य ट्राफिक जॅममध्ये अडकल्याच्या काळात खोटं बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतं आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका अहवालानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दिवसातून १७ वेळा खोटं बोलतात. (आपल्याकडं असा अभ्यास केला जात नाही, हे किती बरंय !) राहत इंदौरी यांनी म्हटलं आहे…

झूठों ने झूठों से कहा है सच बोलो
सरकारी ऐलान हुआ है सच बोलो
घर के अंदर झुठों की एक मंडी है
दरवाजे पर लिखा है सच बोलो !

प्रत्येक वेळी आपण खरं बोलू शकत नसतो, हे अगदी खरंय, पण कुठंतरी खरं बोलण्याची स्पेस असली पाहिजे. त्याला तिच्याशी, तिला त्याच्याशी किंवा स्वतःला स्वतःशी तरी खरं बोलण्याचा अवकाश असला पाहिजे. खोटं रक्त आणता येईल, नक्राश्रू आणता येतील, पण तोवर बावनकशी खरेखुरे असणारे आपण हरवलेलो, संपलेलो असू. त्याचं काय? हे प्रश्नचिन्ह मोठं गंभीर आहे. आपल्याला आरशात पाहताना भीती वाटता कामा नये. आरशातल्या आपल्या प्रतिमेला भिडता आलं पाहिजे. स्वतःलाच काय खोटं खोटं पटवणार आपण?

लाय डिटेक्टर लावूनही सत्य सापडतच असं नाही, पण डोळ्यांच्या सरोवरात ते दिसू शकतं. नार्को टेस्ट घेऊन ते गवसेल असं नाही, पण श्वासांच्या बदलणार्‍या लयीत ते असू शकतं. फोटो, स्क्रीनशॉट, व्हिडिओ असूनही हाताला लागणार नाही सत्य, पण शरीरभर पसरलेल्या कंपनात सत्याचे अंश असू शकतात.

स्वतःच्या फेक असण्यापासून ते फेकू नेत्यापर्यंतच्या भवतालात स्वतःचं नकलीपण संपवणं हे मोठं आव्हान प्रत्येकासमोर आहे. कुणी फेकू नेता जेव्हा सर्वोच्च पदाला पोहोचतो तेव्हा जगण्यात यत्र तत्र सर्वत्र खोटेपणा दांभिकता ठासून भरलेली असते. अशावेळी गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे ‘बी द चेंज यु बिलीव्ह इन’ असं म्हणत हे नकली असणं दूर केलं पाहिजे. स्वतःला सोलताना असे स्वतःचे सत्याचे धागे विणता आले तर अजून काय हवं !

‘नही चाहिए सेकंड हॅण्ड जवानी’ असं गाणं म्हणताना जगण्यात ठायीठायी असलेल्या खोटेपणाला नाकारता येतं का ? क्रॅश व्हर्जन नको, लायसन्स कॉपी हवी, असा आग्रह धरताना आपल्या स्वतःची भ्रष्ट आवृत्ती निर्माण होत नाही ना, हे काळजीपूर्वक पहायला हवं.

व्हर्जिनीटी तपासता येईल कदाचित किंवा लपवताही येईल, पण स्वत्वाची, सत्याची लिटमस टेस्ट कशी घेणार ? या लिटमस टेस्टमध्ये पास होता आलं तरच तुकारामांच्या मागे उभे राहून ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही/मानियले नाही/ बहुमता’ म्हणत कोरसमध्ये सामील होता येतं.

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -