घरफिचर्सयशाचा अंतिम मार्ग !

यशाचा अंतिम मार्ग !

Subscribe

जगभरात करोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. सुमारे अडीच लाखांवर रुग्णांचा जीव घेऊनही हा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाही. करोनावर मात करण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करत असलो, तरी रुग्णांची पुढे येत असलेली संख्या लक्षात घेता हे उपचार पुरे पडतील, अशी अजिबात शक्यता नाही. याही परिस्थितीत जगातील मृत्यूचा दर आपल्याकडे रोखण्यात भारताला आजतरी चांगलं यश आलंय, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. भारतात करोना रुग्णांच्या संख्येवर आपण बर्‍यापैकी अटकाव घालण्यातही यशस्वी ठरत असलो, तरी देखील रुग्ण संख्येत दररोज होणारी वाढ चिंताजनकच आहे.

लॉकडाऊन, क्वारांटाईन व कंटेन्मेंट, या तीन महत्त्वाच्या उपाययोजनांचा आपल्या देशात सुरू असलेला अंमल हेच ही मर्यादा राखण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे उपाय वेळीच सुरू झाले नसते तर इटली, अमेरिका, फ्रान्स सारख्या देशातील मृतांहून अधिक जीव आपल्या देशवासीयांचे गेले असते. विशेषत: संचारबंदीची प्रभावी अमलबजावणी हेच आपल्या यशाचं गमक म्हणता येईल. पण म्हणून आपण जिंकलो, अशा मानसिकतेत राहणं कदापि योग्य नाही. आतापर्यंत या उपायांच्या अंमल ज्या धडाकेबाजीने होत होता ती गती आज राखली जात नाही, हे उघड सत्य आपण लपवू शकत नाही. याचे घातक परिणाम आगामी काही काळात पाहायला मिळाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी देशवासीयांचीच असेल.

- Advertisement -

उद्योग, कृषी, शिक्षण, व्यापार ही रोजगार मिळवून देणारी महत्त्वाची क्षेत्रे आज पूर्णपणे ठप्प आहेत. आपल्या सरकारांनी मानवी जीवनाला सर्वाधिक महत्त्व दिलं. यामुळे सलग दोनवेळा लॉकडाऊन स्वीकारावा लागला. मानवी मुल्यांची जपवणूक करण्यासाठी आपण उत्पादकतेला दुय्यम स्थान दिलं. अशा कठीण परिस्थितीत ज्या मानवी मुल्याला जपण्याचा प्रयत्न झाला तोच माणूस आधाशाप्रमाणे सरकारच्या निर्णयाला हरताळ फासत आहे, असं दुर्दैवी चित्र आपल्या नजरेत येतं. आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही खबरदारी घ्या, या आवाहनाप्रमाणे नागरीक खबरदारीने वागले असते तर दुसर्‍या लॉकडाऊनवेळीच आपण यशाच्या किनार्‍यावर पोहोचलो असतो. दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही. यामुळे केंद्र सरकारला आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करावी लागली. सातत्याने लॉकडाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणारा नाही, हातावर पोट असलेल्या माणसाला आज रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. कामासाठी हात तयार आहेत; पण त्या हाताचा वापर केला तर संसर्ग जिवाची परवा करणार नाही. अशा कठीण परिस्थितीत देशाच्या कल्याणाबरोबरच आपल्या जीविताला अधिक महत्त्व देणं आवश्यक आहे. ही लढाई एकत्रित लढण्याची आहे.

या लढाईत दुफळी पडली की त्याचे व्हायचे तेच परिणाम दिसू लागतील. आज बळींची पन्नाशी गाठणारी संख्याही आपल्याला विदीर्ण करून टाकते. अमेरिकेत एका दिवसात दोन हजारांचे जीव जाताहेत. ती संख्या आपल्या देशाला अजिबात परवडणारी नाही. येणार्‍या काळात रोजगाराचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करणार आहे. उत्पादन प्रक्रियाच थंडावल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. ही लढाई दीर्घकाळ चालणारी असून तिच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत राहणं, हाच त्यावर एकमेव उपाय आहे. हे युद्ध आपण जिंकणारच आहोत, पण त्यासाठी संयमाने एकोपा दाखवण्याची आवश्यकता आहे. आज रथयात्रेच्या निमित्ताने आणि नमाज पडण्याचं कारण पुढे करत शेकडोंच्या संख्येने लोकं जमतात ही बाब त्या व्यक्तींपुरती मर्यादित नाही. एकेका व्यक्तीला धुंडून काढण्यात जाणारा वेळ आणि त्याकरता यंत्रणेपुढचा ताण याची तमा जणू कोणालाच राहिलेली नाही, अशा प्रकारे लोक वागतात तेव्हा त्यांची किव करावी तितकी थोडीच. यामुळे अशा व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता तिसर्‍या लॉकडाऊननंतरही बनली आहे.

- Advertisement -

करोनानंतर समोर उभे ठाकणारे युद्ध जिंकण्यासाठी सरकार व आपणा सर्वांना प्राणपणाने लढावे लागणार आहे. बेरोजगारी, अन्नधान्य उत्पादन, सक्षम आरोग्य यंत्रणा व उद्योगधंदे मूळ पदावर येणे, अशा नानाविध संकटांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी संयुक्त प्रयत्नाची गरज आहे. मुंबईतील हॉटस्पॉट असलेला वरळी परिसर आता करोनामुक्त झाला असून धारावीतही करोनाच्या फैलावाचा वेग आता मंदावत आहे. त्यामुळे सरकार हळूहळू लॉकडाऊन राज्यात तीन झोन निर्माण करण्यात आले आहेत. यातील रेडझोनमधील व्यक्तीला इतर ठिकाणी आणि इतर ठिकाणच्या व्यक्तीला रेडझोनमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यामानाने ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही बंधनं काही अंशी शिथिल केली जात आहेत. मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, मद्यविक्री व चैनीच्या वस्तू इ. दुकाने वगळता सरकार अन्य दुकाने सुरू करण्याच्या विचारात सरकार आहे. सरकारने अन्नधान्य वितरण व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे हाताळल्यामुळे लोकांना दिलासा मिळू शकला. पण भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणे, या काळात दुरापास्त झाले. लोक डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता तसेच स्वैर वागत असल्यामुळे आजही अनेक ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यात या जीवघेण्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली. हे जिल्हे, सतत गजबजलेले जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येथे फैलाव वेगाने होत गेला. मुंबईतील धारावी, या परिसरात मोठ्या प्रमाणात लागण झाली. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, या परिसरात आहे. येथील अस्वच्छता व दाटीवाटीने असलेल्या चाळी, यामुळे येथे करोनाचा फैलाव वेगाने झाला. या आक्रमणातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं. अशी जीवघेणी स्थिती निर्माण होईल, असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे सरकार देखील हडबडून गेले. गेल्या महिनाभरात केंद्र व राज्य सरकारांनी प्रभावी उपाययोजना केल्या व त्याचे दुष्परिणाम आपण पाहत आहोत. फैलावाचा वेग मंदावत असला तरी गाफील राहून चालणार नाही. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा इतर राज्यांच्या तुलनेने अधिक आहे, हे जरी खरं असलं तरी ही संख्या मोजण्याची चाचणी पध्दतही महाराष्ट्रानेच अधिक प्रभावीपणे अंमलात आणली आहे. देशात आताापर्यंत पार पडलेल्या चाचण्यांची संख्या सुमारे साडेसहा लाखांच्या घरात आहे. यातील एकट्या महाराष्ट्रात झालेल्या चाचण्या दीड लाख इतक्या आहेत. यावरून महाराष्ट्रातील काम किती पटीने पुढे आहे, हे लक्षात येतं. केवळ लॉकडाऊन हे या संसर्गावरील एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनच्या काळात अधिकाधिक चाचण्या घेऊन लागण झालेल्यांवर उपचार सुरू करण्याला अधिक चालना दिली पाहिजे. हेच काम महाराष्ट्रात अधिकतर दिसत आहे. अशावेळी आकडा वाढतो, असं म्हणणं खुळेपणाचं आहे.

हा संसर्ग काही एका राज्यापुरती गोष्ट राहिलेली नाही. आणि एकट्या महाराष्ट्राच्या दुर्लक्षामुळे ही साथ वाढली, असंही नाही. उलट ती वाढण्याची कारणं प्रामाणिकपणे शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यातून वेगळंच बाहेर येऊ शकतं. अशावेळी मुख्यमंत्र्यांचा आणि पंतप्रधानांचा राजीनामा मागणं हे केवळ अज्ञानमुलक आणि राजकारण करणार्‍यांची खेळीच म्हणता येईल. आजच्या घडीला सरकार करोनाशी अत्यंत प्रभावीपणे लढत आहे.त्याला जनतेने सहकार्य केलं तर लढाई जिंकणं शक्य आहे. यानिमित्ताने राज्यांतर्गत आणि देशांतर्गत परतणार्‍या या अपेक्षा वाढल्या आहेत. महिन्याभराच्या त्रासानंतर घरची ओढ लागणं हे स्वाभाविक असलं तरी संकटाला कवटाळून घरी जाण्यापेक्षा थोडा धीर धरला तर आपलाच फायदा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. संसर्ग न वाढता लोकांना त्यांच्या घरी सोडता येईल, अशी सुरक्षित सुविधा निर्माण होईपर्यंत जाणार्‍यांनी आणि सरकारनेही अतिघाई टाळली तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. जे इतर राज्यांमध्ये आणि जे इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेत त्यांच्या अडचणी सोडवण्याला पहिलं प्राधान्य दिलं तर घरी जाण्याचा हट्ट लोकं धरणार नाहीत. जगण्यात आबाळ झाली तर घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर चालून जाऊनही लोकं घर गाठतात, याची जाणीव यंत्रणांनी ठेवली तर अडचणी खूप कमी होतील. तिसर्‍या लॉकडाऊनला सर्वांनीच सकारात्मक घेण्याचे हे मार्ग निश्चित यशाकडे नेतील, यात संदेह नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -