घरफिचर्सद अनसंग ह्युमॅनिस्ट : हमीद दलवाई

द अनसंग ह्युमॅनिस्ट : हमीद दलवाई

Subscribe

13 व 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात, विद्यापीठाचा मराठी विभाग, साधना साप्ताहिक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या वतीने हमीद दलवाईंचे साहित्य आणि समाजकार्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी दलवाईंवर ‘द अनसंग ह्युमॅनिस्ट’ या नावाने तयार केलेला माहितीपट दाखवण्यात आला. तो प्रभावी आणि प्रत्ययकारी आहे. यातून दलवाईंच्या कार्याची नव्याने ओळख झाली.

तारुण्यात पदार्पण करतानाच विसाव्या वर्षी त्यांनी पहिली कथा लिहिला. नंतर साधारणपणे पंधरा वर्षांच्या काळात त्यांनी जवळपास पन्नास कथा लिहिल्या. कादंबरीही प्रसिद्ध झाली. तिला मोठा लौकिक मिळाला. त्यांच्या समाजाच्या तोवर फारशा ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टी त्यांच्या साहित्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळेच त्यांच्या साहित्याकडे वेगळे तरीही मोठे सामाजिक काम करणारे साहित्य, या दृष्टीनेही पाहिले जाऊ लागले. ते नवीन काय लिहिणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती; पण त्यांनी नवीच वाट धरली.

त्यांच्या कादंबरीमुळे त्यांना मूलतत्त्ववाद्यांचा रोष पत्करावा लागला होता, कदाचित तेही एक कारण असू शकेल. पण आता आपल्याच नाही तर सर्व समाजातच राष्ट्रीय एकात्मकतेसाठी बदल घडवण्याची आवश्यकता आहे, असे त्यांना वाटू लागले होते. नंतर 1965 मधील पाकिस्तानबरोबरच्या युद्धानंतर काश्मीरचा दौराही केला. मग 1966 मध्ये केवळ सात तलाक पीडित महिलांचा मोर्चा मुंबईत काढला. तोंडी तलाक, बहुपत्नीत्व व तत्सम परंपरांच्या विरोधात, समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ तो मोर्चा होता. त्याचे वर्णन विजय तेंडुलकर यांनी ‘एक चिमुकला मोर्चा’ या नावाने महाराष्ट्र टाइम्स मधील त्यांच्या कोवळी उन्हे या सदरात लेख लिहिला होता. पण या चिमुकल्या मोर्चाची कीर्ती मात्र देशभर इतकेच नव्हे, तर परदेशांपर्यंत पोहोचली आणि तोवर जास्त करून साहित्यिक वर्तुळातच गाजत असलेले या तरुणाचे नाव सर्वत्र झाले, हमीद दलवाई!

- Advertisement -

असे असले, तरी लेखक म्हणून त्यांच्यातील कार्यकर्ता सदैव जागा होता म्हणूनच, नंतरच्या पंधरा वर्षांत त्यांनी वैचारिक लेखन करून भारतातील मुस्लीम मानस, राजकारण यांचा वेध घेतला. मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी त्यांचे वर्णन ‘अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट’ असे केले होते. रामचंद्र गुहा यांनी त्यांना ‘द लास्ट मॉडर्निस्ट’ म्हटले आहे. केवळ 45 वर्षांच्या आयुष्यात त्यांचे कार्य एवढे मोलाचे आहे की, रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात भारतीय स्तरावरील 19 व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला आहे. सर्वांनी प्रथम माणूस बनायला हवे, नंतर भारतीय, त्यानंतर मुस्लीम, हिंदू, इ.इ. स्वतः मात्र ते म्हणतः मी प्रथम माणूस आहे, नंतर भारतीय आणि नंतरही भारतीयच. कारण त्यांना धर्म मान्य नव्हता. तरीही आपण मुस्लीम म्हणून जन्मलो हे त्यांना मान्य होते.

नुकतेच 13 व 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात, विद्यापीठाचा मराठी विभाग, साधना साप्ताहिक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या वतीने हमीद दलवाईंचे साहित्य आणि समाजकार्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याच चर्चासत्राचा भाग म्हणून अभिनेत्री ज्योती सुभाष (आणि सहदिग्दर्शक ओंकार अच्युत बर्वे) यांनी दलवाईंवर ‘द अनसंग ह्युमॅनिस्ट’ या नावाने तयार केलेला माहितीपट दाखवण्यात आला. दलवाईंची फारशी ओळखही ज्यांना नाही, त्यांना ती अगदी सहजपणे होईल एवढेच नाही, तर त्यांच्या कार्याची महतीही जाणवेल, असे हा माहितीपट पाहिल्यावर जाणवते, एवढा तो प्रभावी, प्रत्ययकारी आहे. चर्चासत्रानंतर हा माहितीपट चर्चासत्रातील विवेचनाचा सारांशच वाटला. कारण चर्चासत्रात राजन गवस, विनय हर्डीकर, शमसुद्दिन तांबोळी, इक्बाल मुल्ला, अन्वर राजन आणि सय्यदभाई अशा त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्यांनी, जे काही सांगितले, आणि त्यांच्या कथांबाबत नव्या पिढीतील कथाकार प्रवीण बांदेकर आणि नितीन रिंढे जे बोलले, तेच या माहितीपटात दिसत होते.

- Advertisement -

विनय हर्डीकर यांनी इतिहासातील विविध घटना सांगून त्या प्रसंगी दलवाई असते, तर त्यांनी काय केले असते, वा ते काय बोलले असते, ते सांगितले. अर्थात ते बीजभाषण करताना बोलत होते. हा विचार अर्थातच माहितीपटात नाही; पण पुढे मागे तो समाविष्ट करताही येऊ शकेल. बाकी दलवाईंची स्वतःच्या कामावरील निष्ठा अविश्रांत परिश्रम, मी धर्म मानत नसलो, तरीही जन्माने मुस्लीम आहे. त्यामुळेच त्यातील महिलांचे दुःख जाणून ते दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी त्यांची भूमिका. म्हणूनच त्यांनी भारतीय मुस्लिमांमध्ये आधुनिक, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी जाणीव निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली, तसे सहकारीही लाभले. चित्रे यांनी म्हटले आहे, आधी हिंदूंना यवन असलेल्या हमीदने त्यात भर म्हणून की काय, कर्मठ मुस्लिमांच्या दृष्टीेने काफिर अशी ओळखही प्राप्त करून घेतली आहे.

आजच्या परिस्थितीचे भाकितच जणू त्यांनी केले होते, असे सांगून चर्चेमध्ये नि:धर्मीपणाचा प्रचार करण्याची त्यांची महती आता सर्वांना कळेल, असाही सूर होता. आजची सामाजिक धार्मिक स्थिती, धर्म व श्रद्धेचे वाढलेले स्तोम, तसेच गोवंश हत्या, रामजन्मभूमी वादातील निर्णय, कलम 370, नागरिकत्व पडताळणी यामुळे समाजात विचारांचा कल्लोळ माजला आहे. त्यावेळी दलवाई यांच्या विचारांचा प्रवाह महत्त्वाचा वाटतो, असेही सर्वांचे मत दिसले. राजन गवस यांनी आज नि:धर्मी व पुरोगामी विचारांची होत असलेली टिंगल समाजासाठी घातक आहे. धर्माचा मूळ आशयच हरवला जात आहे, त्यामुळेच पुरोगामी चळवळींची आपली रणनीती ही वर्तमान परिस्थिती समोर ठेवून बदलण्याची गरज आहे. म्हणूनच दलवाई यांचे लेखक व समाजसुधारक म्हणून मोलाचे कार्य आहे, असे सांगितले.

हमीद दलवाई यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना तत्कालीन परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते की, आज हिंदूंनाही एका दलवाईची आवश्यकता आहे. त्यांचे हे बोल किती खरे होते, याची जाणीव आज प्रकर्षाने होते, असेही या चर्चासत्रात सांगितले गेले. समारोपाच्या सत्रात न्या. हेमंत गोखले यांनी जगभरातच धर्म आणि जातीच्या नावावर संकुचितपणा वाढत आहे. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ते धोक्याचे आहे. त्यामुळे अल्संख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तरीही जगण्यापेक्षा धर्माच्या प्रश्नांना महत्त्व दिले जात आहे असे सांगितले. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, 1990 नंतरच्या बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक बदलाच्या पार्श्वभूमीवर दलवाईंचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत.

केवळ मुस्लीम महिलांनाच नाही तर हिंदू महिलांनाही जुन्या प्रथांचा जाच होतो. सध्या तर त्याचेच पुनरुज्जीवन करण्याचा राज्यकत्यार्र्चा चंग दिसतो. तिहेरी तलाक केवळ मुस्लिमांत असेल; पण हिंदूंमध्येदेखील टाकून दिलेल्या महिलांची संख्या प्रचंड आहे हेही निदर्शनास आणले गेले. एकापेक्षा जास्त विवाह करणार्‍यांच्या आकडेवारीतही हेच आढळते. कुटुंब नियोजनाची गरज तर आहेच; पण ते सक्तीचे करावे असेही दलवाईंचेे मत होते. हे सारे तर माहितीपटात आहे. त्याबरोबरच त्यांच्या कोकणातील गावाचा निसर्गरम्य परिसर आणि जेथे त्यांचा वावर असे ती ठिकाणेही यात पाहायला मिळतात.

या माहितीपटात नसिरुद्दिन शाह यांचा सहभाग आहे. याबाबत ज्योती सुभाष यांनी साप्ताहिक साधनामध्ये एका मुलाखतीत म्हटले आहे, लहान डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट करायचं ठरवलं तेव्हा नसीरला फोन केला. हमीद दलवाई यांनी लिहिलेली इंधन ही कादंबरी दिलीप चित्रे यांनी फ्युएल या नावाने इंग्रजीत अनुवादित केली आहे. ती त्याला वाचायला दिली. काही वेळातच त्याने ती चाळली असावी. आणि त्याचा मला फोन आला की, त्याला यात सहभागी व्हायला आवडेल. नसीरचं मला हे वैशिष्ट्य वाटतं की, तो सारखा माणसांशी जोडलेला असतो. अगदी तळागाळातल्या माणसांपासून ते प्रस्थापित लोकांपर्यंत. आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याशी एक आपला सांधा असतो, याबद्दलचं त्याचं भान फार तीव्र आहे. म्हणून तर त्याला हे पटलं की, हमीद दलवाई या विषयावरच्या कामात आपण सहभागी व्हायला हवं. या महान व्यक्तीबाबत काहीच कसे माहीत नव्हते, असेही नसिरुद्दिननेे बोलून दाखवले होते.

माहितीपटात नसिरुद्दिन यांच्याबरोबरच अमृता सुभाष, हमीद दाभोळकर, ज्योती सुभाष यांचाही सहभाग आहे, आणि त्याबरोबरच त्यांच्याबरोबर काम करणारे, तसेच काही मान्यवरांच्या मुलाखतीही आहेत. त्यात त्यांनी दलवाई यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. माहितीपटाचा कथानायक प्रत्यक्ष कोठेही दाखविण्यात आलेला नाही. केवळ लाँग शॉटसमधूनच त्याचे अस्तित्व जाणवून दिले आहे, पण कदाचित त्यामुळेच ते प्रभावी ठरले आहे. त्यांनी मनोहर साप्ताहिकात वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांची मते समजावून देतात. ती प्रश्नोत्तराच्या स्वरुपात माहितीपटात आली आहेत. कधी नसिरुद्दिन तर कधी स्वतः ज्योती सुभाष दलवाई म्हणून प्रश्नकर्त्यांना उत्तरे देताना दिसतात. त्यामुळे वेगळाच परिणाम साधतो.

हमीद दलवाई यांचे कार्य पाहता त्यांचे संपूर्ण जीवनदर्शन आणि कार्य दाखवणारा पूर्ण लांबीचा चित्रपट तयार व्हायला हवा. त्यांचे सपूर्ण जीवनच नाट्यमय होते त्यामुळे असा चित्रपट अवघड जाऊ नये. एक अडचण जाणवते, त्यांचे संपूर्ण चरित्र अद्याप लिहिले गेलेले नाही, तसेच मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या वाटचालीबाबतचा ग्रंथही. त्यामुळेच चित्रपटात अपूर्णत: राहील, म्हणून तो केला गेला नसावा. या दोन्हीबाबत प्रयत्न सुरू असले, तरी अजूनही यश आलेले नाही ही खेदाची बाब आहे. त्यांचे सहकारी आणि जिवलग यांच्या सहकार्याने हे साध्य होऊ शकेल. ते ज्या बाबींसाठी लढा देत होते त्यापैकी एक बाब आता काहीशी पुरी झाली आहे, त्रिवार तलाक कायदेशीर बंदी. मात्र उरलेल्या दोन बाकी आहेत. चित्रपट नाही, तरी त्यांच्या कथांवर मात्र मालिका तयार करता येईल हे नक्की. पूर्वी कथांवरील मालिका सह्याद्री वाहिनीवर होत. तशी.

दलवाईंबाबत गोविंद तळवलकर यांनी म्हटले होते, हमीद केवळ समाजावर टीकास्त्र का सोडतात, असा प्रश्न त्यांचे अनेक धर्मबांधव विचारत असत; परंतु समाजपरिवर्तनाचे काम करणार्‍या अनेक परिवर्तनवाद्यांनी पूर्वापार हेच केले आहे. ज्या समाजात आपण जन्मलो, वाढलो, त्याच्यासंबंधी लिहिणे ओघानेच येते. लोकहितवादी, आगरकर, कर्वे, फुले आदी सर्वांचा हाच परिपाठ असल्याचे दिसेल.

अशा थोरांच्या मालिकेत बसणारे हमीद होते!

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -