घरफिचर्सअमेरिका-इराण युद्ध न परवडणारेच!

अमेरिका-इराण युद्ध न परवडणारेच!

Subscribe

इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची ड्रोन हल्ल्याने हत्या करून अमेरिकेने युद्धाची ठिणगी पाडलीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे पाऊल उचलून इराणला डिवचलेय. त्यामुळे आता मर्यादित स्वरुपातील तिसरे महायुद्ध सुरू होते की काय अशी भयशंका जगभरातील शांतताप्रेमींना डाचतेय. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, सुलेमानीने अमेरिकन व्यक्ती आणि ठिकाणांवर हल्ले करण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी एअर स्ट्राइक करण्यात आले. इराणच्या सांस्कृतिक ठिकाणांवर हल्ले करून युद्धासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन करणार नसल्याचे स्पष्टीकरणही अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी दिले होते. मात्र, इराणने प्रतिहल्ल्याची कारवाई केली, तर ५२ सांस्कृतिक ठिकाणांवर हल्ला करू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. त्यानंतर इराणने अमेरिकेशी लढाईला तोंड फोडले आणि त्या देशाच्या इराकस्थित लष्करी तळावर डझनभर शक्तिशाली क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात ८० जण ठार झाल्याचे म्हटले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र, या हल्ल्यानंतर ‘ऑल इज वेल’ असे ट्विट करत इराणला हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देऊ, इराणपेक्षा आमच्या फौजा अधिक शक्तिशाली व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत, असे म्हटले. त्यालाच उत्तर देताना अयातुल्ला अली खामेनी यांनी, ‘खरा बदला अजून बाकी आहे,’ असा इशारा दिला. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये युद्ध होणे अटळ आहे.खरे तर ट्रॅम्प यांच्या निशाण्यावर इराण सुरुवातीपासूनच आहे. ओबामा सरकारने महत्प्रयासाने इराणसोबत आण्विक करार केला होता. हा करार अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचारापासून ट्रम्प यांना खुपत होता. ओबामांच्या ‘ओबामा केअर’पासून या आण्विक करारापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तिटकारा असणार्‍या ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुका जिंकल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सभेत दिलेल्या भाषणात त्यांच्या करारविरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केला तेव्हाच अमेरिका-इराण संबंध चिघळू शकतात, हे स्पष्ट झाले होते. ८ मे २०१८रोजी जेव्हा इराणसोबतचा बहुराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करून निर्बंध नव्याने लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली तेव्हाच आखाती युद्धाची ठिणगी पडली. असे युद्ध करून साध्य काय होते हादेखील यक्षप्रश्न आहे. दुसरे महायुद्ध तब्बल सहा वर्षे सुरू होते. या युद्धातून काय मिळाले तर अनेक देशांच्या फाळण्या झाल्या. शहरच्या शहरं नेस्तनाबूत झाले. लाखो निष्पापांचे बळी गेले. अनेक चिमुरड्यांना अनाथ केले. अपंगांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जपानी शहरांना व तेथील नागरिकांना अनेक दशके जे भोगावे लागले, त्याच्या खुणा आजही दिसत आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निष्पापांचे प्राण पणास लावले जातात की काय अशी भीती व्यक्त होतेय. 2015 मध्ये केलेल्या अणुकरारानुसार ज्या अटींना मान्यता दिली होती, त्या अटी आता मान्य करणार नाही, अणुकरार पाळणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास विनाश हा अटळ आहे. खरे तर दुसर्‍या महायुद्धानंतर जग बुद्धाच्या मार्गाने वाटचाल करेल, असा आशावाद होता; पण अमेरिका आणि इराण यांच्यातील शीतयुद्धाने ही आशाही धूळीस मिळाली आहे. या युद्धात भारताला नामानिराळे राहून चालणार नाही. युद्धाचा भारताशी काहीएक संबंध नाही, भारताने दोघा देशांच्या भानगडीत पडूच नये असेही आपण म्हणू शकत नाही. कारण हे युद्ध झाले तर त्याचा मोठा फटका भारताला बसू शकतो. पण लबाड ट्रम्प या युद्धात भारतालाही अमेरिकेच्या बाजूने ओढू पाहत आहेत. इराणचा दहशतवादी धोका भारतालाही अशी भीती घालून ट्रम्प आपली खेळी खेळत आहेत. तसे पाहिल्यास इराणचा भारताशी जुना दोस्ताना आहे. उत्तम दर्जाचे इराणी खनिज तेल भारताची गरज अनेक दशके भागवत आहे. युद्ध झाल्यास पहिला परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर होईल. तसेच, तेलाचा हा पुरवठा बंद होण्याची दाट शक्यता आहे. कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यावर, किमतीवर या युद्धाचा परिणाम होणार आहे. शिवाय परदेशातून भारतात येणार्‍या चलनावर युद्धाचा प्रभाव पडू शकतो. आखाती देशांत भारतीयांची संख्या तब्बल ८० लाखांइतकी आहे. युद्धामुळे याच भारतीयांचे जगणे मुश्किल होऊन जाईल. एकट्या सौदी अरेबियामध्ये तीस लाख भारतीय राहतात. यापूर्वी जी युद्धे झाली, त्याचा थेट परिणाम या देशातील भारतीयांवर झाला होता. आता पुन्हा युद्ध झाले तर आखाती देशातून भारतीय येथे जे पैसे पाठवतात तो पुरवठाच बंद होऊन जाईल. ही रक्कम अब्जावधींची आहे. त्यामुळे हा पैसा येणे बंद झाल्यास आर्थिक मंदीच्या काळात भारताचे मोठे हाल होतील. युद्धाचा भारताच्या रणनितीवरदेखील प्रभाव पडू शकतो. भारत इराणमध्ये चाबहार बंदर विकसित करत आहे. या बंदरामुळे पाकिस्तानला टाळून भारताला थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येईल. शिवाय येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनार्‍यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे रणनितिक दृष्टीने भारतासाठी हे बंदर महत्त्वपूर्ण आहे. मात्र, युद्ध झाल्यास या बंदराचेही नुकसान होऊ शकते. खरे तर युद्ध अजून सुरू झालेले नाही. तरीही त्याचा परिणाम मात्र आता भारतात दिसायला सुरुवात झाली आहे. इंधन आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रतिबॅरल 3 डॉलरने वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढणार आहेत. गुंतवणुकदारांनी शेअर बाजारातील पैसा काढून सोन्यात गुंतवला. त्यामुळे सोन्याच्या किमतीत 752 रुपये प्रतितोळा वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी 44 पैशांनी घसरला. रुपयाचे मूल्य 71.81 प्रतिडॉलर इतके झाले आहे. म्हणूनच युद्ध हे आजच्या काळात कोणत्याही देशाला परवडणारे नाही, हेच खरे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -