घरफिचर्सउन्मादी राजकारणाचा विषाणू

उन्मादी राजकारणाचा विषाणू

Subscribe

पालघरमध्ये चोर समजून दोन जणांची समूहाने हत्या केल्याची घटना महाराष्ट्रातल्या पालघर जिह्यात घडल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय शीतयुद्ध सुरू झाले. हे असले प्रकार महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा सरकारने दिला आहे. झालेला प्रकार गैरसमजुतीतून जरी झाला असेल तरीही त्याचे गांभीर्य निश्चितच कमी होत नाही. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. यातील काही आरोपी हे अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्याविषयी कारवाई होत आहे. तसेच या प्रकरणातील म्होरकेही कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नयेत. झालेला प्रकार गंभीर आहेच सोबतच तो महाराष्ट्राची चिंता वाढवणाराही आहे. या प्रकरणाचे राजकारण करण्याचा प्रकार हा या घटनेपेक्षा कमी निंदनीय निश्चितच नाही. झालेली घटना गैरसमजातून झाली किंवा ही एक घटना होती, असे जरी समजून चालले तरी त्यानंतर या घटनेला धार्मिक रंग देण्याचा जो प्रयत्न होत आहे, तोही निंदनीय आणि चिंताजनकच आहे.

या घटनेला धार्मिक रंग देऊन लॉकडाऊनच्या काळात आपले धार्मिक राजकारण खेळणार्‍यांचे गट सक्रिय होत असतील तर त्यावर लक्ष ठेवायलाच हवे. सोशल मीडियाचा याहीवेळेस एखाद्या हत्यारासारखा उपयोग केला जाईल.आपल्या देशात मॉब लिंचिंग या शब्दाला धार्मिक उन्मादाचा गंध आहे. त्यामुळे पालघरमधील घटनेलाही असा धार्मिक रंग देऊन एखाद्या समूहाच्या विरोधात या घटनेचा राजकीय उपयोग करण्याचा धोकादायक खेळ सुरू केला जाऊ शकतो. त्यासाठी राज्यातील पोलिसांच्या सायबर सेलने समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह आणि संबंधित घटनेला उन्मादाचे रूप देण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांवर बारीक लक्ष ठेवायला हवे. लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात काही लोक घराबाहेर पडणार नाहीत. त्यावेळी त्यांचा बराचसा वेळ इंटरनेटवर अशाच प्रकारच्या उन्मादी कुचाळक्या करण्यात जाणार आहे. सत्तेच्या राजकारणातले काही मेंदू हे करोना विषाणूपेक्षाही जास्त धोकादायक व्हायरसने भरलेले असू शकतील. अशा मेंदूतले सत्तापिपासू व्हायरस नियंत्रणात आणण्याचे काम राज्याच्या गृहविभागाला करावे लागेल.

- Advertisement -

संपूर्ण राज्य, देश, नव्हे तर जगाविरोधात कोविड १९ च्या विषाणूने युद्ध पुकारले आहे. या युद्धाच्या धगीतही आपला स्वार्थ शोधणारे आपल्या देशातही आहेतच. ते या विषाणूपेक्षा जास्त धोकादायक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवरून पालघरमधील घटनेविषयी चर्चा केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो भाग आंतरराज्य सीमेच्या जवळ आहे. या भागात चोर शिरल्याची अफवा पसरलेली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. ज्यांची या घटनेत हत्या झाली त्यांना दादरा आणि नगर हवेली सीमाभागात अडवलं गेले आणि परत पाठवले गेले. या भागातून रात्रीच्या वेळेत दोन साधू मार्गक्रमण करत होते.

त्यावेळी त्यांची जमावाने चोर समजून हत्या केली. या ठिकाणी रात्रीच्या वेळेतही पोलीस पोहचले, त्यांनी तातडीने कारवाई करत शंभर पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यातून ही घटना कुठल्याही जमातवादी गटांना टार्गेट करण्यासाठी हेतूपुरस्सर ठरवून घडवण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही या घटनेला जमातवादाचा रंग देऊन करोना विषाणूलाही लाजवेल असा मानवी सडक्या मेंदूतला उन्मादाचा विषाणू फैलावण्याचा प्रयत्न करणार्‍यांचीही गय करायला नको. तबलिगी प्रकरणानंतर जमातवादी गट असेच समाज माध्यमांवर सक्रिय झाले होते. यात दोन्ही बाजूच्या काही उन्मादी झुंडींनी आपल्या सडक्या मेंदूतून करोनाच्या विषाणूलाही लाज वाटेल असा अमानवतेचा विषाणू बाहेर काढला होता. सोशल मीडियावर या विषाणूच्या पिलावळींनी आपले रंग दाखवले होते. त्यांना वेळीच नियंत्रण आणून समाजापासून क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे उन्मादाचा हा विषाणू समाजात फैलावण्याआधीच त्याचा नायनाट करण्यात यश आले.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात वांद्रे स्टेशनवर गोळा झालेल्या गर्दीच्या घटनेलाही जमातवादी रंग देण्याचा प्रयत्न राज्याच्या संयमी नेतृत्वाने हाणून पाडला. तसाच प्रयत्न पालघरच्या घटनेनंतरही होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून त्याबाबतही योग्य ती पावले उचलली जात आहेत. याबाबत केंद्राकडून राज्याला काळजी घेण्याचे सूचवण्यात आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही केंद्राला याबाबत माहिती दिलेली आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाला दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी काही भागातील कारखाने, उद्योग अटी शर्ती आणि कठोर नियमांवर योग्य प्रमाणात सुरू करण्याविषयी राज्य सरकार विचार करत आहे. करोनाचा विषाणू योग्य नियंत्रणात आल्यास लॉकडाऊनचा कालावधी निश्चितच कमी होईल.

अशा परिस्थितीत सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची आहे. नागरिकांकडून तसे पालनही केले जात आहे. राज्यातील काही भागात रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार दैनंदिन व्यवहारही सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी सरकारच्या बाजूने करोनाविरोधातील लढ्यात उतरण्यासाठी नागरिकांनी सहकार्याच्या भूमिकेत असायला हवे. परंतु, नागरिकांमधील कर्तव्यापेक्षा त्यांच्यातील उन्मादाला खतपाणी घालणार्‍या प्रवृत्तींचा कावा पालघर घटनेनंतर ओळखायला हवा. सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणार्‍यांची देशात कमतरता नाही. करोनाचे संकट नियंत्रणात आल्यावर आर्थिक आणि औद्योगिक संकटाचाही सामना करावा लागणार आहे. त्यावेळी आरोप प्रत्यारोपाचे राजकारण होणार आहेच. तूर्तास करोनाच्या संकटाला थोपवणे गरजेचे आहे. मरणाच्या संकटकाळातही आपले जमातवादी राजकारण करणार्‍यांनी एवढे जरी समजून घेतले तरी पुरेसे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -