घरफिचर्सजगाची चिंता वाढली!

जगाची चिंता वाढली!

Subscribe

आततायीपणाने, एकांगीपणाने धडाकेबाज निर्णय घेण्याची आणि कोलांटउड्या मारण्याची सवय असणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सीरिया व अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय अत्यंत धोकादायक ठरणारा आहे. ओबामांच्या काळात अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतरच आयसिसचा उदय झाला होता हे याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आजही आयसिस कमकुवत झाली असली तरी ती संपलेली नाही. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यास तेथे तालिबानला मोकळे रान मिळणार आहे. थोडक्यात, ट्रम्प यांचा हा निर्णय जगाची आणि विशेषत: भारताची चिंता वाढवणारा ठरला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यापासून अनेक धक्कादायक निर्णय घेऊन जगाला सातत्याने अचंबित करण्याचा जणू विडाच उचलला आहे. गेल्या दोन वर्षांतील त्यांची कारकीर्द पाहिल्यास ते अपारंपरिक धक्कादायक निर्णय घेत आले आहेत. ट्रान्स पॅसिफिक भागीदारीतून बाहेर पडणे, संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार समितीतून माघार घेणे यांसह विश्व व्यापर संघटनेमधून माघार घेण्याची धमकी देणे अशा निर्णयांची शृखंलाच गेल्या दोन वर्षांत दिसून आली आहे. याच मालिकेतील आणखी एक निर्णय म्हणजे सीरिया आणि अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य परत बोलावण्याचा निर्णय. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय ट्विटरवरून घोषित केला आहे. हा निर्णय पश्चिम आशिया, दक्षिण एशिया आणि मध्य आशिया संदर्भातील अमेरिकेच्या निर्णयावर परिणाम करणारा आहे. अर्थात केवळ अमेरिकेच्याच निर्णयावर परिणाम होणार नाही तर तो एकूणच या उपखंडातील सत्तासमतोल पूर्णपणे बिघडवून टाकणारा ठरणार आहे. अमेरिकेच्या बहुपक्षीय बहुराष्ट्रीय बांधिलकीसाठी ज्या वचनबद्धता होत्या त्यासाठी अनेक मित्र देशांच्या संरक्षणाची, सामूहिक संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती. ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यापासूनच त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अमेरिकेच्या धोरणांबाबतची विश्वासार्हता ट्रम्प यांच्या या निर्णयप्रक्रियेमुळे धोक्यात येत आहे. अनेक राष्ट्रे अमेरिका त्यांना आता मदत करेल की नाही याविषयी साशंक आहेत. अनेक मित्रपक्ष दुखावले जात आहेत. यामुळे अमेरिकेचा जगाच्या राजकारणातील दबदबा कमी होत आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या विरोधातील देश रशिया, चीन, इराण यांचे पारडे जड होताना दिसते आहे. अशा स्थितीत हा सैन्यमाघारीचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.

सीरियात केवळ 2 हजार सैन्य आहे तर अफगाणिस्तानात 14 हजार सैनिक आहेत. पश्चिम आशिया किंवा मध्य आशियामध्ये या सैन्यामुळे स्थैर्य टिकले आहे असे नाही. पण या सैन्याचे एक प्रतिकात्मक महत्त्व आहे. या थोडक्या सैन्यामुळेही त्या परिसरात अमेरिकेचा एक दबदबा आहे. 2011 सालामध्येही अमेरिकेने सीरियातून सैन्य काढून घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तेव्हा अमेरिकेने सीरियातून सैन्य काढूनही घेतले होते. त्यानंतर तिथे सत्तेची पोकळी निर्माण झाली. ती पोकळी इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटनेने भरून काढली. 2014 मध्ये इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा जन्म झाला. अमेरिकेचा धाक न उरल्यामुळे जन्मलेल्या आयसिसने तीन चतुर्थांश इराक आणि एक चतुर्थांश सीरिया काबीज केला होता .पाहता पाहता आखाती प्रदेशामध्ये तिचा प्रभाव वाढला. त्यानंतर इसिसचे वाढते प्रस्थ आटोक्यात आणण्यासाठी साठ देशांचे संयुक्त सैन्य तयार करून इसिसचा सामना करावा. इसिस आता लयाला जाते आहे तिचा प्रभाव कमी झाला आहे; पण ती संपलेली नाही.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाने (पेंटागॉनने )नुकत्याच दिलेल्या एका अहवालात असे नमूद केले आहे की, अजूनही 14 हजार इसिसचे लढवय्ये असून त्यांचे पाठिराखे संपूर्ण जगात विखुरलेले आहेत. आखाती प्रदेशात गनिमी काव्याने होणारे हल्ले आयसिसच करत असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ इसिसचे अस्तित्व अजूनही तिथे आहे. असे असताना अमेरिकेने तिथून सैन्य काढून घेणे चुकीचे आहे.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प ट्विटमध्ये असे म्हणतात की, ज्या उद्देशाने आम्ही सीरियात अमेरिकेचे सैन्य उतरवले त्या इस्लामिक स्टेटचा पूर्णपणे बंदोबस्त केला आहे. त्यामुळेच सीरियातून आम्ही सैन्य काढून टाकतो आहोत; पण इस्लामिक स्टेट पूर्णपणे संपलेली नाही. एवढेच नव्हे तर इसिसविरोधात लढणारे आणि अमेरिकेचे मित्र असलेले कुर्दीश सैन्य तसेच अरब देश त्यांचा आत्मविश्वासच यामुळे ढासळणार आहे. कारण त्यांना एकटे सोडून अमेरिका सीरियातून बाहेर पडली आहे. या देशांच्या पाठीशी राहणारे आता कोणीही नाही. सौदी अरेबियासारख्या अमेरिकेचे मित्र असणार्‍या इतर अरब देशांमध्येच प्रवाहात सोडून दिल्याची भावना आहे.

या निर्णयाचे परिणाम अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणावर उमटणारच होते. कारण हा निर्णय घेताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टॉन यांच्याशी सल्लामसलत केलेली नव्हती. तसेच परराष्ट्र मंत्री जॉन पंपिओ, संरक्षण मंत्री जीम मॅटिस या कोणाशीही सल्लामसलत केलेली नव्हती. थोडक्यात, हा निर्णय ट्रम्प यांचा एकांगी निर्णय आहे. ह्या निर्णयामुळे संरक्षण मंत्री जीम मॅटिझ यांचे ट्रम्प यांच्याबरोबर मतभेद झाले आणि मॅटीझ यांनी राजीनामा दिला आहे. ही गंभीर बाब आहे. कारण केवळ ट्रम्प यांच्या एकांगी निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यांत ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सारासार विचार न करता, मंत्र्यांशी चर्चा न करता निर्णय घेत जातात ही बाब जगापुढे उघड झाली आहे. मॅटीझ यांचे मतभेद होण्याचे कारणही हेच आहे. त्यांच्या मते आत्ता सैन्य माघारी घेण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. कारण इसिस नियंत्रणाखाली असली तरीही कुर्द सैन्याना पाठिंब्याची गरज आहे. अरब देशांना अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज आहे. अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यानंतर तिथे रशिया आणि इराण यांचे प्राबल्य वाढणार आहे. सध्या इराण हा अमेरिकेचा आखातातील पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. असे असूनही अचानक सैन्य माघारी घेतल्यास इराणचे प्रस्थ वाढून त्यांचा दबदबा वाढणार आहे. आताचा सत्तासमतोल इराणच्या पक्षामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे एकूणच अमेरिकेच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण या निर्णयाचा फायदा इसिसला होणार आहे. या निर्णयामुळे इस्लामिक स्टेटचा पुनर्जन्म होण्याची भीती आहे. त्यामुळे आखातात अस्थिर स्वरुपाची परिस्थिती निर्माण होणार आहे. अफगाणिस्तानात तालिबान आल्यास पाकिस्तानची ताकद वाढणार आहे. त्याचा परिणाम भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरही होणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांना सुबुद्धी होवो हीच अपेक्षा आहे.

- Advertisement -

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -