घरफिचर्सयंदा तरी विघ्नहरण व्हावे!

यंदा तरी विघ्नहरण व्हावे!

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांच्या विरोधात पोलादपूर येथे आंदोलनाची सुरुवात झाली. तर दुसरीकडे राजापूरमधल्या बारसू येथे येऊ घातलेल्या रिफायनरीच्या समर्थनासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर आले. कारण कोकणाला विकासापासून दूर लोटण्यासाठी एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे. तिचा बिमोड करण्यासाठी राजापुरात हजारो स्त्री-पुरुष रस्त्यावर आले.

विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. गणेशोत्सवाची धूम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपल्याला अनुभवायला मिळते, पण त्याहीपेक्षा गणपतीचा उत्सव ओतप्रोत उत्साहाने साजरा केला जातो तो मुंबई-पुण्याबरोबरीनं कोकणकिनारपट्टीवर. एकाबाजूला कोकणातल्या या सगळ्यात मोठ्या उत्सवाची लगबग दिसून येतेय. आधी ही लगबग कोकणाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळं नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे होती; आता ती गणरायाच्या आगमनामुळे आहे. पण त्याच वेळेला रविवारचा दिवस कोकण किनारपट्टीवरील आंदोलनांनी गाजला. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांच्या विरोधात पोलादपूर येथे आंदोलनाची सुरुवात झाली. तर दुसरीकडे राजापूरमधल्या बारसू येथे येऊ घातलेल्या रिफायनरीच्या समर्थनासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर आले. कारण कोकणाला विकासापासून दूर लोटण्यासाठी एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे. तिचा बिमोड करण्यासाठी राजापुरात हजारो स्त्री-पुरुष रस्त्यावर आले.

एका बाजूला मुंबई नागपूर हा बहुचर्चित समृद्धी महामार्ग शेवटच्या टप्प्यात आला आहे. १८ डिसेंबर २०१८ रोजी या महामार्गाचं भूमिपूजन झालं. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग डिसेंबर २०२२ साली पूर्ण होणार आहे. अवघ्या चार वर्षात देशातला सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळाने पूर्ण केला आहे. त्याच वेळी मुंबई-गोवा महामार्ग मात्र गेली बारा वर्षे रखडलेल्या अवस्थेत कोकणी माणसाला फक्त बघायलाच नव्हे तर भोगायलाही लावत आहे. या महामार्गावर पडलेले खड्डे कोसळणार्‍या दरडी, नागमोडी अरुंद वळणे, यामुळे आजपर्यंत हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नितीन गडकरी यांच्यासारख्या खर्‍याखुर्‍या अर्थानं विकासपुरुष असलेल्या नेत्याकडे केंद्रीय मंत्रालयामधील ही जबाबदारी असतानादेखील हा मार्ग महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे कोकणातील विविध लहान-मोठ्या ३८ संघटनांनी एकत्र येऊन यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनाचं नेतृत्व राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुखथनकर हे करीत आहेत. प्रत्येक विकासाला वेगळ्यावेगळ्या मार्गातून खोडा घालत आपल्याच मंडळींचे पाय खेचणे ही कोकणी माणसाची प्रवृत्ती आहे आणि आता तीच दुर्दैवाने त्याची ओळख झाली की काय असं या महामार्गाकडे पाहिल्यानंतर वाटत आहे. कोकणाला समुद्र किनार्‍याबरोबरच हिरव्यागार वृक्ष संपदेची उधळण निसर्गानं मुक्त हस्ताने केली आहे. असं असतानासुद्धा इथल्या कोत्या मानसिकतेमुळे या भागाचा विकास होऊ शकलेला नाही. आणि या विकासाचंच आश्वासन देत वर्षानुवर्षं इथले लोकप्रतिनिधी आपल्याला इच्छित स्थळी पोचण्याचं आपलं काम फत्ते करून घेत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर स्थानिकांच्या बाधित होणार्‍या बांधकामांमुळे आणि जमिनींच्या मोबदल्यामुळे काही कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुंबई ते गोवा हा साधारण सहाशे किलोमीटरचा महामार्ग एक तप पूर्ण झालं तरी कोकणी माणसाला पूर्णतः वापरायला मिळालेला नाही. दर वर्षी गणेशोत्सवामध्ये या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल सगळेचजण आगपाखड करत असतात. मुंबई, ठाणे-पुण्याकडे राहणारी चाकरमानी मंडळी गणेशोत्सवासाठी गावी जाताना याच महामार्गाचा वापर करतात. या महामार्गावर पडलेले तितकेच महाखड्डे प्रवास करताना वृद्ध, गरोदर स्त्रिया आणि रुग्णवाहिकेमधून प्रवास करावा लागणारे रुग्ण या सगळ्यांनाच मरण यातना देत असतात. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. जमिनीची झीज होते. त्याच वेळेला या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूकदेखील वाळूमाफिया बिनदिक्कतपणे करत असतात. दिवसभर सुरू असलेलं या वाळूमाफियांचं इथलं साम्राज्य हेदेखील इथल्या रस्त्याच्या दुरवस्थेसाठी एक मोठं कारण आहे. ज्या ठिकाणी रस्ते बनलेले आहेत तिथले रस्ते पुन्हापुन्हा खचणे, रस्त्यांवर खड्डे पडणे यासारख्या गोष्टी या वाळूमाफियांनी जणू काही कोकणाला आजीव भेट म्हणून दिलेल्या आहेत की काय असं वाटण्याइतपत परिस्थिती बिघडलेली आहे. इथल्या गावागावांना जोडणार्‍या रस्त्यांची आहे तीच अवस्था महामार्गाचीही झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा काही पट्ट्यांमध्ये पूर्ण झालेला आहे. पण अद्यापही रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातला काही भाग पूर्ण होणे बाकी आहे. या रस्त्यांची कामं ज्या ठेकेदारांना मिळालेली आहेत ते ठेकेदार कामाच्या विलंबामुळे झालेल्या खर्चासाठी प्रशासनाला वेठीला धरत वारंवार काम बंद करत आहेत. त्याच वेळेला स्थानिक पुढार्‍यांकडून आणि फुटकळ स्थानिक नेत्यांकडून या ठेकेदारांचाही छळ करण्यात येतोय, हेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या कामाचं वर्क ऑडिट हे ज्या गांभीर्यानं व्हायला हवं तसं ते होत नसल्याचं इथे लक्षात आलेलं आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यांच्या नावानं बनत असलेला हा महामार्ग आपली संपूर्ण राजकीय हयात त्यांच्या चरणावर डोकं ठेवून उभी करणार्‍या राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंडळाचे प्रमुख राधेश्याम मोपलवारांनी या समृध्दी महामार्गाचे बहुतांश काम हातावेगळे केले आहे. मोपलवार हे राज्यातील वादग्रस्त आणि बहुचर्चित प्रशासकीय अधिकार्‍यांपैकी एक समजले जातात. त्याच मोपलवार यांनी मुंबई-नागपूर महामार्गाची समृद्धी आकाराला आणली हे विसरून चालणार नाही. कारण एखादा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी त्या स्वरूपाचे अधिकारी ताकदीनं काम करण्यासाठी हवे असतात. तसंच अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज असते. ही इच्छाशक्ती एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या बाबतीत दाखवलीय. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाबद्दल एकमत करत हा महामार्ग अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा पण केला. सहाजिकच तो आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील काम हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाप्रमाणेच काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांची शिवसेना आणि कोकणी माणूस यांचं एक वेगळं नातं आहे. एका बाजूला मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, केंद्रीय मंत्रीपदी नव्यानं आरूढ झालेले नारायण राणे आहेत. आणि या रस्त्याचं कामकाज ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू आहे तिथे तर सगळ्यात धडाकेबाज असे नितीन गडकरी आहेत, असे असतानाही १२ वर्षं प्रशासकीय दुरवस्थेमुळे आणि दुर्लक्षामुळे हा महामार्ग होऊ शकलेला नाही, हे कोकणी माणसाचं दुःख आहे आणि तितकाच प्रशासनाबद्दल आणि सत्ताधार्‍यांबद्दल संतापही आहे. मुंबई उच्च न्यायालयानेदेखील या रस्त्याबाबत वेळोवेळी आपली नाराजी दर्शवत सरकारला खडे बोल सुनावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टींनाही सरकार, प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातायत. ही गोष्ट अधिक गंभीर आहे जेव्हा उच्च न्यायालयासारखी व्यवस्थाही मानायला एखाद्या विकासकामाच्या संदर्भात प्रशासन तयार नसेल तर विषय खूपच हाताबाहेर गेला आहे, असं समजायला खूप मोठा वाव आहे. विघ्नहर्ता यंदा तरी कोकणभूमीवरचं हे विघ्न दूर करेल का? देवभोळ्या कोकणाचा आता मात्र फक्त सुखकर्ता असलेल्या गणपती बाप्पावरच विश्वास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -