घरफिचर्सतर मी राजकारण सोडून दिलं असतं - मनोहर पर्रिकर

तर मी राजकारण सोडून दिलं असतं – मनोहर पर्रिकर

Subscribe

दिवंगत नेते मनोहर पर्रिरकर यांच्या जीवनातील एक भावनात्मक प्रसंग...

(ऋतुरंग दिवाळी अंक २०१७)

“मला ते दिवस आजही आठवतायत. आमच्या लग्नाला १५ वर्ष होऊन गेली होती. एकीकडे फॅक्टरीचं वाढणारं काम तर दुसरीकडे राजकारणात नव्याने आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे अतिशय व्यस्त दिनक्रम झाला होता. सत्तेत येण्याचा मार्ग जवळ दिसत होता त्यामुळे मी त्या धामधुमीत होतो. यातच मेधाला काही दिवसांपासूनअधून मधून ताप येत होता. बरेच दिवस ती हे दुखणं अंगावर काढत होती. यासगळ्या गडबडीत तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणं मला जमत नव्हतं. घरातल्या कोणालातरी बरोबर घेऊन डॉक्टरांकडे जाऊन ये असं आमचं बोलणं झालं आणि तशी ती डॉक्टरांकडे जाऊन आली होती. तिचे रिपोर्ट येणं बाकी होतं. अतिशय महत्वाच्या मिटिंगसाठी आम्ही सगळे पक्ष कार्यालयात जमलो होतो. मिटिंग सुरु असतानाच डॉक्टर शेखर साळकर याचा मला सतत फोन येत होता. मी गडबडीत फोन घेतला. मेधाचे रिपोर्ट चांगले आले नव्हते. पुढच्या चेकअपसाठी मेधाला तातडीने मुंबईला न्यायला हवं असं तो सांगत होता. त्याक्षणी काही सुचेनासं झालं. दुसऱ्याच दिवशी तातडीनं तिला आम्ही मुंबईला नेलं. अभिजात लहान होता. त्याला समजत नव्हतं आईला का घेऊन चाललेत ते. मुबंईत गेल्यावर तिला ब्लड कॅन्सर आहे हे स्पष्ट झालं. पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय असतं ते मला त्याक्षणी समजलं. मेधाच्या बाबतीत ती कायम आपल्या बरोबरच असणार, तिला काही होणार नाही असं गृहीत धरून टाकलं होतं आणि अचानक आता ती पुढचे काही महिने, काही दिवसच सोबत असेल अशी स्थिती निर्माण झाली. तिला तिथेच लगेच उपचार सुरु केले. पण जेमतेम महिन्याभरात तिचं निधन झालं. आहे आहे म्हणता अचानक ती नाहीशी झाली.

आज मेधा असती तर कदाचित मी तिला वचन दिलं त्याप्रमाणे राजकारण सोडून दिलं असतं. कदाचित आज माझं आयुष्य काही निराळंच असतं. ती नसल्यामुळे मी राजकारणात स्वतःला झोकून दिलं. अनेकजण मला तुम्ही दिवसातले २४ तास कार्यरत असता त्यामागचं कारण विचारतात. जिच्यासाठी मी राजकारण सोडून देणार होतो तीच राहिली नाही. पण यामध्ये मी फॅक्टरीकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिला नाही. एक वेळापत्रक आखून दिवसातील काही तास मी फॅक्टरीसाठी देऊ लागलो. आजही मी कितीही व्यस्त असलो तरी फॅक्टरीच काम मी स्वतःच बघत असतो. मी राजकारणात नसतो तर फॅक्टरीसाठी मला अनेक गोष्टी करता आल्या असत्या. मेधा आज माझ्याबरोबर असती तर नक्कीच मी ते सगळं करू शकलो असतो.

- Advertisement -

मेधाची मला किंमत नव्हती असं अजिबात नव्हतं पण माणूस परतून कधी येणार नाही इतकं दूर निघून गेल्यावर त्याची खरी किंमत कळते. माझ्या षष्ट्यब्दिपूर्ती वाढदिवसानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी पणजीमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात केंद्रीय स्तरावरील अनेक कार्यकर्तेही आले होते. त्यातील एकांना माहित नव्हतं कि मेधा या जगात नाहीये. ते आपल्या शुभेच्छापर भाषणात ‘पर्रीकरजी आपनेभी कभी ये गाना गुनगुनाया होगा – हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन कि…. ‘ हे शब्द ऐकताच मन थोडंसं दुखावलं गेलं. त्या बिचाऱ्याला मेधा या जगात नाही हे माहीतच नव्हतं. पुढचे क्षण मेधाचा चेहरा डोळ्यासमोर येत गेला. मी तर झालो साठ वर्षांचा पण जी पचपनची व्हायला हवी होती ती मात्र त्याच्या आधीच संपून गेली. या विचारानेच मी व्याकुळ झालो. बोलायला उठल्यावर मी याचा उल्लेख केला पण मला पुढचे काही क्षण बोलताच येईना. आयुष्यातील या टप्प्यावरही जी माझ्यासोबत तेवढ्याच ताकदीने उभी राहिली असती. एक छान आयुष्य जिने जगायला हवं होतं तीच नव्हती. माझ्याजवळ आज सगळं आहे पण जिची सोबत हवी होती तीच नाहीये.”

– मनोहर पर्रीकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -