घरक्रीडाआदित्य छा गया !

आदित्य छा गया !

Subscribe

क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ. क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यात क्रिकेट कॉमेंट्रीचा (धावते समालोचन) मोठा वाटा आहे. श्याम सरवटे हे नागपूरमधील नामवंत क्रिकेट कॉमेंटेटर. विदर्भाच्या रणजी विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा आदित्य हा श्याम सरवटे यांचा नातू. आदित्य हा नवनिकेतन क्लबचा खेळाडू. फिरकीपटू तसेच उपयुक्त फलंदाज अशी त्याची ख्याती. स्थानिक गझदर शिल्ड तसेच दोरायस्वामी क्रिकेट स्पर्धा यात त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने छाप पाडली आणि त्याचा विदर्भ रणजी संघातील प्रवेश सुकर झाला.

यंदाचा रणजी मोसम आदित्यसाठी सुरेखच ठरला. या मोसमात बळींचे अर्धशतक त्याने अंतिम लढतीतच साजरे करताना विदर्भ क्रिकेटच्या इतिहासातील अनेक विक्रम मोडून त्यावर आपले नाव कोरले. एकाच मोसमात ५० विकेट घेताना त्याने आपला फिरकीचा साथीदार अक्षय वखरेचा ४९ विकेटचा विक्रम मागे टाकला, शिवाय रणजी कारकिर्दीतील विकेटचे शतक सर्वात जलद करण्याचा मानही संपादन केला. विदर्भातर्फे प्रितम गंधेचा २५ सामन्यांत १०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड तोडताना २२ रणजी सामन्यांतच सरवटेने ही किमया केली. अंतिम सामन्यात विदर्भाचा दुसरा डाव गडगडत असताना व्हीसीएच्या मंद-संथ खेळपट्टीवर ४९ धावांची खेळी करत त्याने रणजीतील एक हजार धावांचा टप्पाही पार केला. या अंतिम झुंजीत अष्टपैलू खेळाचा ठसा उमटवत विदर्भाच्या जेतेपदात मोठी भूमिका बजावली.

- Advertisement -

सरवटेचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे बालपण अतिशय खडतर अवस्थेत गेले. तो ४-५ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा अपघात झाला. पनवेल येथे झालेल्या या अपघातानंतर आनंद सरवटे यांना कायमचे अपंगत्व आले. आनंद हे पंजाब नॅशनल बँकमध्ये नोकरीला होते. वडिलांच्या आजारपणात आदित्यने आई अनुश्री सरवटेच्या साथीने त्यांची काळजी घेतली, तसेच कॉलेज शिक्षणही पूर्ण केले आणि क्रिकेटचे मैदानही गाजवले.

रणजीच्या अंतिम सामन्यातील आदित्यच्या कामगिरीवर त्याचे आई-बाबा खूप खूश आहेत. लेकाने संघाच्या विजेतेपदात महत्त्वाचे योगदान दिले याचा सार्थ अभिमान सरवटे कुटुंबीयांना आहे. भारताचे माजी कसोटीपटू चंदू सरवटे हे आदित्यचे दूरचे नातेवाईक. ते होळकर आणि भारतीय संघाकडून खेळले ते फिरकीपटू म्हणूनच. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आदित्यही त्यांचा वारसा पुढे चालवतो का ते बघायचे. मार्ग अवघड आहे, पण अशक्य नाही. फिरकीपटूंसाठी भारतीय संघात चुरस आहे, पण मेहनत केल्यास फळ मिळतेच याची आदित्यला जाणीव आहे.

- Advertisement -

विजयाचे श्रेय आईला – आदित्य सरवटे

रणजी चषक सलग दुसर्‍यांदा जिंकल्यानंतर या विजयाचे श्रेय सामनावीर ठरलेल्या आदित्य सरवटेने आई अनुश्री सरवटेला दिले. ‘२४ वर्षे आईने मला सांभाळले, वडिलांची काळजी घेतली, तसेच तिने बँकेतील नोकरी सांभाळून आपली भूमिका चोखपणे बजावली’, असे आदित्य म्हणाला.

-शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -