थोरली काकी…

आमचं गाव म्हणजे अगदी खेडेगाव, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो काळ. तेव्हा एका खेडेगावात सुविधा त्या काय असणार. गावचे इनामदार म्हणून नावावर भरपूर जमीन पण त्यातून उत्पन्न ते काय! त्यामुळे सांसारिक भोग जे त्या काळच्या स्त्रियांना भोगावे लागले ते काकीला पण भोगावे लागले. त्यात काकीचा स्वभाव म्हणजे गरीब गाय. कोणाला उलटून उतर देणे तिला माहीतच नव्हतं. काकीचा दिवस चालू व्हायचा मुळी पहाटेच्या अंधुक उजेडात. साधारण कोंबडा आरवला की, दिवस सुरू. काकीला पहाटे उठण्यावाचून गत्यंतर नसे.

सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजमधील नित्याची कामं करत होतो. मार्च महिना म्हणजे परीक्षांची धावपळ त्यामुळे नित्याची काम जोरदार चालू होती तेवढ्यात मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. कॉल उचलला समोरच्याने ओळख करून दिली आणि एक बातमी सांगितली-काकी गेली. तसं ही बातमी कधीतरी येणार होती हे अपेक्षितच होतं. गेली अनेक महिने काकी अंथरुणात होती. आयुष्यभर कष्ट केलेलं शरीर म्हातारपणात एकदम थकलं आणि अंथरुणात बसलं ते न उठण्यासाठीच. बातमी तपासून बघावी म्हणून मी गावी फोन केला. अशा बातम्या कधी खोट्या नसतात. काकी आदल्यारात्रीच गेली होती. त्या दिवशी भावकीत कोणाकडे काही कार्यक्रम होता म्हणून बातमी गावभर केली नव्हती, पण अशा गोष्टी कळायच्या रहातात का ? आज सोशल मीडिया एवढं प्रचलित झालं आहे की विचारता सोय नाही.

ही थोरली काकी म्हणजे मोठ्या काकांची पत्नी. हे काका म्हणजे माझे सख्खे काका नव्हेत तर चुलत काका. पण घरात हा सख्खा, हा चुलत असा भेद कधी कोणी केलाच नाही त्यामुळे ही काकी आमची सख्खी की चुलत हा प्रश्न गौण होता. काकीच्या निधनाची बातमी ऐकली आणि बालपणी गावात घालवलेल्या मे महिन्याच्या सुट्ट्या आठवल्या. आमचे काका म्हणजे गावातले लोक त्यांना पांडू इनामदार म्हणायचे, आम्ही त्यांना दादा म्हणत असू. दादांनी गावचं पुढारपण घेतलं होतं. त्यामुळे घराची, शेतीची सगळी जबाबदारी काकीवर असायची. माझ्या आजोबांनी जी काही जुनी टिपणं लिहून ठेवली त्यानुसार दादांचा आणि काकीचा विवाह १९४८ च्या मे महिन्यात झाला.

आमचं गाव म्हणजे अगदी खेडेगाव, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो काळ. तेव्हा एका खेडेगावात सुविधा त्या काय असणार. गावचे इनामदार म्हणून नावावर भरपूर जमीन पण त्यातून उत्पन्न ते काय! त्यामुळे सांसारिक भोग जे त्या काळच्या स्त्रियांना भोगावे लागले ते काकीला पण भोगावे लागले. त्यात काकीचा स्वभाव म्हणजे गरीब गाय. कोणाला उलटून उतर देणे तिला माहीतच नव्हतं. याबाबतीत माझ्या आजीचं आणि काकीचं खूप जमायचं. काकीची सासू म्हणजे दादांची आई तशी खमकी. तिचा घरात मोठा दरारा होता. दादा नेहमी गावच्या चिंतेत. सणवार असला की दादा घरातून जे बाहेर पडत ते घरात पुन्हा कधी येतील याचा नेम नसायचा, मग काकी त्यांची वाट पहात बसे. दादा घरी आले की, मग जेवण. दुपारचा आराम काय असतो ते बहुतेक या पिढीला माहीतच नसावं. काकीचा दिवस चालू व्हायचा मुळी पहाटेच्या अंधुक उजेडात. साधारण कोंबडा आरवला की, दिवस सुरू. मग जात्यावर दळण कांडण. त्यावेळी गावात साधी वीज नव्हती, मग चक्की कुठे असणार? सकाळी घरातली माणसं शेतावर जाणार तेव्हा त्यांना भाकरतुकडा तर द्यावा लागेल ? त्यामुळे काकीला पहाटे उठण्यावाचून गत्यंतर नसे.

दळण-कांडण होतना तोपर्यंत दादांनी गोठ्यातील गुरं सोडलेली असायची, मग त्याचा गोठा साफ करणं, शेण काढणं ही कामं वाटच बघत असायची. दिवसभर घरात आणि शेतात राबणं हा एकच धर्म तिला माहित होता. सांसारिक जबाबदार्‍या वाढत होत्या. आज चहा पावडर आहे तर गूळ संपला. गूळ आहे तर मीठ संपलं. दादांना भेटायला जिल्ह्यातील मोठमोठी माणसं यायची. गावच्या विकासाची चर्चा करायची. त्यात आप्पा गोगटे, अमृतराव राणे, रामभाऊ मुंज असायचे. त्यांची उठबस तर चालूच असायची, हे तर सोडा पण गावातला कोणी माणूस बसायला आला तर सदरेवरून दादा काकीला हाक मारून आयकलस कांय गो, एवढी सोन्यासारखी माणसा इली हत वायच चायचा पाणी कर, हे दादांनी एकदा सदरेवर सांगितलं तर काकी काय नाही म्हणणार ! पण त्यावेळी घरात चहा पावडर नाहीतर गूळ संपलेला असायचा. मग दादांचा शब्द कसा मोडायचा ? मग पाटल्यादाराने काकी हळूच माझ्या आजीकडे म्हणजे-ताईकडे यायची. तिला नड सांगायची आणि वेळ मारून न्यायची. आत काय झालं याची दादांना भनकदेखील लागलेली नसायची. तिने दादांचा काय पण कोणाचाच शब्द खाली पडू दिला नाही.

गावभर शेती करूनदेखील मिळणारे उत्पन्न सहा महिने पण पुरत नसे, कारण धान्य पिकवण्यासाठी आधुनिक यंत्रणा त्याकाळी प्रचलित नव्हत्या. त्यामुळे काकी वर्षभर शेतीच्या कामात असायची. आयुष्याच्या वळणावर किती सांसारिक दुःखाला तिला सामोरं जावं लागलं याचा अंदाज बांधता येणार नाही. नियती थोडी आशा दाखवते आणि मग दुःखाचा प्याला प्यायला लावते. काकीचा मोठा मुलगा-मोहन जो माझ्या बाबांच्या वयाचा होता. त्यावेळी म्हणजे १९७१ च्या सुमारास मुंबईला नोकरीसाठी म्हणून आला, त्यावेळच्या भारत-बांगलादेश युद्धाच्या वेळी झालेल्या ब्लॅक आउटमध्ये काहीच न समजल्यामुळे रेल्वे अपघातात सापडून मृत्युमुखी पडला. हा काकीसाठी मोठा धक्का होता.

काकीला काय किंवा त्या काळच्या ग्रामीण स्त्रीला स्वतःची ओळख किंवा मत मांडायचा प्रश्नच नव्हता. कारण घरातील करतील ती पूर्व दिशा. या बाबतीत आमचं घर अगदीच मागासलेलं होतं असही नाही, पण तेव्हाचे ग्रामीण लोकजीवन हे सर्वसाधारणपणे असेच होते. काळ बदलत गेला तरी काकी काही बदलायला तयार नव्हती. काकीचा दुसरा मुलगा बाळा तो कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला. त्याच्यामागचा अनिल गावीच राहून गावचं पोस्ट ऑफिस सांभाळत होता. कालांतराने दादांचं निधन झालं. घरात सुख सोयी आल्या. कामाचा व्याप कमी झाला. पण काकीचा दिवस तेव्हाही पहाटे सुरू व्हायचा. घरातलं कोण उठो वा न उठो सकाळी उठून काकी खळ्यात केर काढायची. आमच्या तात्यांनी आपली गुरं सोडली की, काकी आपले बैल सोडायची.

वयानुसार काकीची स्मरणशक्ती कमी झाली. एखादा प्रश्न ती अनेकवेळा एकाच माणसाला विचारायची. लोकदेखील तेवढ्या वेळा त्याची उत्तर द्यायची. काकीची पंच्याहत्तरी साजरी केली तेव्हा ती खरंच खूप आनंदात होती. तिला महत्व मिळेल असा तिच्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा सोहळा. कारण आयुष्यभर दुसर्‍यांसाठी कष्ट उपसलेली काकी तेवढ्या क्षणाची तर नक्कीच दावेदार होती. काकीच्या नातीच्या लग्नाला म्हणून मी दोन दिवस गावी गेलो होतो. माझा चुलतभाऊ -आबा काकीच्या बाजूला बसला होता, तो काकीची असून नसून गंमत करायचा. तो बसला आणि काकी वायच पाट दाब गे माझी. कोणाला नाही म्हणणे काकीला माहीतच नाही. काकी पाठ दाबू लागली त्यावर आबा लगेच म्हणाला, म्हातारे काय हात तुझे किती खरखरीत ! पाटीक टोपतत माझ्या त्यावर काकी म्हणाली ते कोणाला कितपत कळलं माहीत नाही, पण जन्मभर केलेल्या कष्टाचं वर्णन तिने तेवढ्या एका वाक्यात केलं. रे शेतकर्‍याच्या बायलेचे हात आसत. पाटीक टोपतले पण पोटाक सुकावतले…. .तळकोकणातल्या ज्या पिढीने मोठ्या कष्टाने राबून आपले संसार उभे करून पुढच्या पिढीला वाव करून दिला त्या पिढीत काकी होती.

आयुष्याच्या शेवटी काकी अंथरुणात बसली. त्याचं तिला वाईट वाटत असावं, आयुष्यभर कोणाकडे पाणीदेखील मागितलं नाही त्या स्त्रीचं सर्व अंथरुणात करावं लागतं हा कुठला दैवयोग म्हणावा ? या व्यथेमधून काकी सुटली. तिचे डोळे पैलतीरी लागले हे बहुतेक घरात सर्वांना कळालं. त्यांनी धावाधाव केली पण एव्हाना काकीने डोळे मिटले होते. काकी कोकणातल्या त्या पिढीच प्रतिनिधित्व करत होती ज्या पिढीतल्या स्त्रियांनी समाजाभिमुख कोणतेही कार्य केले नाही, पण समाजभिमुख कार्य करणार्‍या आपल्या यजमानांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्यापाठी त्यांचा संसार सांभाळला. त्या स्वतः शिकल्या नाहीत पण त्यांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत पुढची पिढी घडवली. आपले विचार आपल्या भावना त्यांनी मनात दडपून ठेवल्या.

आजही गावी गेलो की, चुलीपुढे भाकरी भाजत बसलेली काकी दिसते. उगाचच कधी हाक मारावीशी वाटते, काकी खय आसस ? आता काकीचं उत्तर मिळणं अपेक्षित नसतं, घरातली गौरी काळरुपी वाघाने केव्हाच पळवली…..