घरफिचर्सआनंद मानूया की...

आनंद मानूया की…

Subscribe

ऑलिम्पिक स्पर्धा, अपेक्षा आणि भारत यांचे एकमेकांशी तसे फार पटत नाही. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांत भारताकडून दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. भारताने या ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात 'हम होंगे कामयब' असे म्हणत केली होती. भारताला कामयाबी मिळालीसुद्धा. भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. परंतु, भारताला यंदा एकूण ७ पदकेच जिंकता आली. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला पदकांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठता येऊ नये, हे निराश करणारे आहे. भारताच्या काही खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धांच्या उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंतची मजल मारली. त्यामुळे यंदाही फार पदके मिळाली नसली तर काय, आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली यातच आनंद मानूया की, अशी म्हणण्याची वेळ भारतीयांवर आली आहे.

जपान या उगवत्या सूर्याच्या देशाची राजधानी टोकियोमध्ये यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. कोरोना, त्यामुळे लावण्यात आलेली आणीबाणी, विविध निर्बंध, स्थानिक नागरिकांचा विरोध यानंतरही ऑलिम्पिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले याबाबत टोकियो शहराचे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आणि आयोजकांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. भारतीय लोक या ऑलिम्पिक स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत होते. यंदा भारत काहीतरी दमदार कामगिरी करणार, ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच पदकांचा दुहेरी आकडा गाठणार अशी देशवासियांना आशा होती. परंतु, तसे काही झाले नाही.

यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारताने आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक टोकियोमध्ये पाठवले. भारताच्या या पथकात तब्बल १२० खेळाडूंचा समावेश होता आणि ते विविध अशा ८५ क्रीडा प्रकारांत खेळले. टोकियोमध्ये ऑलिम्पिक होत असल्याने भारतीयांना सकाळ-सकाळीच आपल्या लाडक्या क्रीडापटूंना जागतिक स्तरावर खेळताना पाहण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून सर्वांनाच खूप मोठ्या अपेक्षा होत्या. काही वेळा दिवसाची सुरुवात खूप आनंदात झाली, तर बरेचदा निराशेनेच!

- Advertisement -

भारताचा ऑलिम्पिक स्पर्धांतील इतिहास खूप बोलका आहे. १९०० सालापासून ऑलिम्पिकमध्ये खेळणार्‍या भारताच्या खात्यात टोकियोतील स्पर्धांपुर्वी केवळ एका वैयक्तिक सुवर्णासह २८ पदके आहेत. त्यापैकी ११ पदके ही भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये आली होती. यंदा यात मोठा बदल होईल, भारत आता जगातील इतर बलाढ्य देशांना ऑलिम्पिकमध्ये टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु, टोकियो ऑलिम्पिकची सांगता होत असताना, काही खेळ आणि खेळाडूंचा अपवाद वगळता, आपले खेळाडू उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचले, त्यांनी वर्ल्ड-क्लास खेळाडूंना झुंज दिली, यातच आनंद मानूया की! ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे सोपे नाही, असे म्हणत स्वतःची समजूत काढावी लागत आहे.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक अपेक्षा होती. मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांसारख्या १९ वर्षीय युवकांसह राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत या अनुभवी नेमबाज भारताच्या ताफ्यात होत्या. याच नेमबाजांनी मागील तीन-चार वर्षांत राष्ट्रकुल, एशियाड आणि वर्ल्डकप स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत भारताचे नाव उंचावले होते. परंतु, २०१६ पाठोपाठ २०२० ऑलिम्पिकमध्ये ते खाली हाथच राहिले. इतकेच काय, तर भारताच्या १५ नेमबाजांपैकी सौरभ चौधरीचा अपवाद वगळता एकाही भारतीय नेमबाजाला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्यामुळे आता नक्की कोणत्या खेळाडूंकडून आणि काय अपेक्षा ठेवायच्या? असा प्रश्न भारतीय चाहत्यांना पडू लागला आहे.

- Advertisement -

तिरंदाजीत दीपिका कुमारीच्या कामगिरीचे वर्णन पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच करावे लागेल. दीपिकाने टोकियो ऑलिम्पिकपूर्वी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली होती. या कामगिरीसह ती पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली. २०१२ लंडन ऑलिम्पिकच्या वेळीही दीपिकाच जगातील नंबर वन महिला तिरंदाज होती. त्यावेळची दीपिका आणि यंदाची दीपिका यांच्यात फारसा फरक नव्हता. मागील दोन ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी न केल्याचे माझ्या डोक्यात आहे. माझ्यावर थोडे दडपणही आहे, असे ऑलिम्पिकपूर्वी दीपिका म्हणाली होती. हेच दडपण तिच्या खेळात दिसून आले. उपांत्यपूर्व फेरीत ती पराभूत झाली आणि सलग तिसर्‍या ऑलिम्पिकमध्ये तिला पदक जिंकण्यात अपयश आले. पुरुषांमध्ये दीपिकाचा पती अतानू दास, तसेच प्रविण जाधव यांनी झुंजार खेळ केला, हेच काय ते समाधान!

बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूला यंदा सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. सिंधूने पदक जिंकले खरे, पण ते सुवर्ण नाही, तर कांस्य होते. सिंधूची कामगिरी ऐतिहासिक ठरली. २०१६ मध्ये ऑलिम्पिक पदार्पणात रौप्य आणि यंदा सलग दुसर्‍या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची तिने कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धांत दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. परंतु, सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्याचे दुःख मानायचे की कांस्यपदक जिंकल्याचा आनंद साजरा करायचा? असा प्रश्न तिला पडला होता. चाहत्यांचीही हीच स्थिती होती असे म्हणायला हरकत नाही. पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागला तीन पैकी दोन साखळी सामने जिंकण्यात यश आले खरे, पण स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही.

बॉक्सिंगमध्ये अखेरचे ऑलिम्पिक खेळणार्‍या मेरी कोमकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. परंतु, मेरीला उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरीचे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. कोलंबियाच्या बॉक्सरकडून पराभूत झाल्यानंतर मेरीने पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. तसेच लढतीपूर्वी काही मिनिटे जर्सी बदलायला लावल्याने माझ्याविरुद्ध कट असल्याचा दावाही तिने केला. मात्र, निर्णय होता तोच कायम राहिला. पुरुष गटात अमित पांघलला ऑलिम्पिक पदार्पणात पहिल्याच लढतीत पराभवाचा धक्का बसला. परंतु, याच बॉक्सिंगने भारताला लोव्हलिना बोर्गोहेनच्या रूपात एक नवी स्टार दिली. लोव्हलिनाने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली.

भारतातील मोठ्या शहरांपेक्षा आता खेड्यापाड्यांत अधिक प्रतिभावान खेळाडू असल्याचे म्हटले जाते आणि यंदा हेच पाहायला मिळाले. आसामच्या लोव्हलिनाने कांस्यपदक जिंकले, तर त्याआधी मणिपूरसारख्या फार विकसित नसलेल्या भागातून पुढे आलेल्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकाची कमाई करत टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडून दिले होते. मीराबाईला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये एकही वजन उचलता आले नव्हते. परंतु, हार मानेल ती भारत की बेटी कशी? मागील कामगिरीतून धडा घेत मीराबाईने यंदा उत्कृष्ट कामगिरी केली.

भारतीय हॉकीसाठी यंदाचे ऑलिम्पिक नवसंजीवनी देणारे ठरले. भारताच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांपासूनचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपवला. मनप्रीत सिंगच्या संघाने जर्मनीला ५-४ असे पराभूत करत कांस्यपदकाची कमाई केली. तसेच या स्पर्धेत भारताला एकूण सात पैकी पाच सामने जिंकण्यात यश आले. केवळ जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावरील ऑस्ट्रेलिया आणि विश्वविजेत्या बेल्जियमने त्यांना पराभूत केले. महिला संघानेही यंदाच्या स्पर्धांत झुंजार खेळ केला. भारतीय महिला हॉकी संघाला यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धांची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले, पण पदकाने त्यांना हुलकावणी दिली. असे असले तरी दोन्ही हॉकी संघांची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आणि भविष्याचे आशादायी चित्र निर्माण करणारी ठरली.

भारताच्या मातीतला खेळ कुस्तीने मात्र भारताला तारले. रवी कुमार दहियासारख्या युवा मल्लाने जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करताना रौप्यपदकाची कमाई केली. त्यामुळे त्याने खाशाबा जाधव, सुशील कुमार (२ पदके), योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या ऑलिम्पिक पदकविजेत्या भारतीय कुस्तीपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवले. तसेच दीपक पुनियाही कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत पोहोचला. भारताचा हुकमी एक्का बजरंग पुनियाला यंदा सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. त्याने कांस्यपदक जिंकले.

भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ८७.५८ मीटरचे अंतर गाठत सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. याव्यतिरिक्त इतर खेळांत मात्र भारताची निराशाच झाली. भारतीय खेळाडूंनी घेतलेली मेहनत, घेतलेले परिश्रम आणि केलेले त्याग याबाबत जराही शंका नाही. परंतु, आता भारतीय खेळाडूंमध्ये किलर इंस्टिंक्ट येणे खूप गरजेचे आहे. तसेच आपण किती काळ अल्पसंतुष्ट राहायचे याचाही विचार झाला पाहिजे. अन्यथा आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पोहोचले, अंतिम किंवा उपांत्य फेरीत खेळले यावर आपल्याला आनंद मानत राहावा लागेल, हे नक्की!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -