दिवस सुगीचे सुरू जाहले

मनप्रीतच्या टीम हॉकीने सुगीचे दिवस सुरू झाल्याची आता साक्ष पटवून दिली आहे. मात्र या यशाचा पाया भक्कम होता. मधल्या फळीत खेळणार्‍या मनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय पुरुष हॉकी संघाने याआधी 2017 मध्ये आशिया चषक, 2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 मध्ये एफआयएच सिरीज फायनल यांसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच भारताने भुवनेश्वर येथे झालेल्या 2018 हॉकी वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मनप्रीतच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असून ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळवून त्यांनी आपण जगात पहिल्या तीन संघात असल्याचे दाखवून दिले.

indian men's hockey team
भारतीय पुरुष हॉकी संघ

दिवस सुगीचे सुरू जाहले
हॉकी पदकाने  मन प्रफुल्ल झाले
भारतीय हॉकीप्रेमी सुखावले
छन झुन, खळ झण – झण खळ्म झुन झिन, विजय रंगे जोरात!

मनप्रीत सिंगच्या भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिंपिक पदक मिळवत जो काही आनंद मिळवून दिलाय त्याने मन फक्त भरूनच आलेले नाही तर ते झुळझुळ वाहतेय. पदक दुष्काळाची चार दशके ही काही कमीची नाहीत. दोनएक पिढ्या हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ हे विसरल्या होत्या. क्रिकेटवेड्या भारतात आधीच जगात इतर खेळ खेळले जातात आणि त्याची ऑलिंपिक तसेच जागतिक स्पर्धासुद्धा असते, याचे भान नाही. तशी आपल्या देशाची क्रीडा संस्कृती नाही. तशी ती बनेल अशी राज्यकर्त्यांची इच्छा नाही. खेळांच्या संघटकांना आपल्या खुर्च्या कशा टिकतील आणि बाकी खेळ, खेळाडू मेले तरी चालतील, अशी गेंड्याच्या कातडीची मानसिकता असते अशा देशात हॉकीसह ऑलिंपिक खेळ कसे बहरणार? हा प्रश्न आहे.

जातीपातीच्या, भेदभावाच्या, बरबटलेल्या समाजमनाच्या, अंधश्रद्धेच्या भारतात कला आणि क्रीडा संस्कृती एक निकोप देश घडवू शकते, यावर अजूनही विश्वास नाही. रामभरोसे हिंदू हॉटेल असलेला हा देश ऑलिंपिक आला की, जागा होतो. अरे रे भारताला एक सुद्धा पदक नाही, तळाचा भारत तळाला आहे, काय फायदा नाही… असे रडगाणे या जागतिक क्रीडा महोत्सवाचे 15 दिवस गात राहतो. एकदा सूप वाजले की, मग पुन्हा क्रिकेट एके क्रिकेट सुरू. कसोटी, वनडे, ट्वेन्टी-20, आयपीएल… बस्स. वाजवा टाळ्या. करा बेटिंग. आठ दहा देशांमध्ये भारत क्रिकेटमध्ये कसा सरस आहे, अशा ट्रेन, बस, नाक्या नाक्यावर करत बसा… यातच आपण आनंदी… आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे क्रिकेट चोहीकडे! सचिन किती कमावतो, कोहलीची गाडी कशी झुळझुळीत आहे आणि धोनीची संपत्ती किती यावर आपण बोलणार असू तर आपल्याला ऑलिंपिकमध्ये भारताला किती पदके मिळाली, हे विचारण्याचा हक्क नाही.

आपण फक्त चीन, अमेरिका, जपानने किती पदके मिळवली, हे बघून शांत बसूया… जगातील महासत्ता बनत चाललेला चीन ऑलिंपिकमध्ये अव्वल का आहे? माहितीय तुम्हाला : वयाच्या पाचव्या वर्षी गुणवान मुलांची निवड करून त्यांना एका अभेद्य भिंतीच्या आड रात्रीचा दिवस करत घडवले जाते. एखाद्या मशिनप्रमाणे हे काम चालते. भावभावनांना तिथे थारा नाही. एकदा तुम्ही मुलाला देशाला सोपवला का आईवडिलांनी तिथे फिरकायचे नाही. जागतिक विजेता होऊन तो जगाच्या समोर येईल तेव्हाच त्याला पाहता येते. हा आहे जगज्जेत्याचा फॉर्म्युला. आहे असे काही भारतात. आपण सणवार, नाचगाणे, राजकारण, कुंभमेळा करत राहू. तळाचा भारत तळाला राहील…

अशा अंध:कारात भारताला ऑलिंपिक एखादे पदक मिळणे म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यासारखे ठरते. म्हणून मीराबाई चानू, रवी दहिया यांची स्वतःला झोकून देत मिळालेली पदके वेगळी ठरतात. हॉकीतसुद्धा तसेच आहे. या आपल्या राष्ट्रीय खेळाला कोणी वाली उरलेला नसतो. जेव्हा मनप्रीत आणि त्याचे सहकारी यश मिळवतात, तेव्हा त्यांनी इतिहास रचलेला असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर खुद्द फोन करून हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्याशी बातचीत केली. फोनवर हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहला पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मनप्रीत खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या संघाने जे केले आहे त्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष आहे. तुम्ही इतिहास रचला’.

पण, आता मोदी यांनी फक्त मनप्रीत आणि इतर भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करून भागणार नाही. ज्या दिवशी ऑलिंपिक संपेल त्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय ऑलिंपिक महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा मंत्रालय यांची तातडीची बैठक घेऊन एक क्रीडा धोरण आखायला हवे. मुख्य म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) बरखास्त करून त्याची नव्याने रचना करायला हवी. हे प्राधिकरण गुणवत्ता केंद्र राहिले नसून सरकारी बाबूंची कार्यालये झाली आहेत. येथे खेळाडू घडवण्यापेक्षा फाईली रंगवल्या जातात आणि खोटी माहिती देऊन सरकारची फसवणूक केली जाते.

सातव्या वेतन आयोगाचा गलेलठ्ठ पगार घेणार्‍यांकडून खेळाडू घडणार नाहीत. त्यासाठी जे जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करणारे पायाभूत काम करू शकतील, अशा अभ्यासक लोकांना एकत्र करून एक टीम उभारावी लागेल. यासाठी परदेशातील विविध खेळांतील अव्वल प्रशिक्षकांना आमंत्रित करावे लागेल. मुख्य म्हणजे यात शिस्त हवी. पंतप्रधान मोदी यांनी आता या ठिकाणी लक्ष घातले तरच पाच वर्षांनी थोडा फरक पडेल. तळाचा भारत तळाला राहणार नाही. खर्‍या अर्थाने दिवस सुगीचे सुरू होतील…

मनप्रीतच्या टीम हॉकीने सुगीचे दिवस सुरू झाल्याची आता साक्ष पटवून दिली आहे. मात्र या यशाचा पाया भक्कम होता. मधल्या फळीत खेळणार्‍या मनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय पुरुष हॉकी संघाने याआधी 2017 मध्ये आशिया चषक, 2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 मध्ये एफआयएच सिरीज फायनल यांसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच भारताने भुवनेश्वर येथे झालेल्या 2018 हॉकी वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मनप्रीतच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असून ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळवून त्यांनी आपण जगात पहिल्या तीन संघात असल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेतील मनप्रीतचा खेळ पाहण्यासारखा होता. खेळ नियंत्रित करण्यापासून ते आघाडीच्या फळीबरोबर विरुद्ध संघाची बचाव फळी खिळखिळी करण्याचे सामर्थ्य मनप्रीतच्या हॉकी स्टिकमध्ये दिसले.

जर्मनीविरुद्धच्या ब्रॉन्झ पदकाच्या लढतीत अवघ्या एका गोलच्या फरकाने भारताने विजय मिळवला असला तरी जर्मनीची बरीच तगडी आक्रमणं नाकाम करण्यात महत्त्वाचा वाटा होता तो भारताचा गोलकिपर पी. आर. श्रीजेश  याचा. श्रीजेशने संपूर्ण सामन्यात अगदी एका संरक्षक भिंतीप्रमाणे कामगिरी करत जर्मनीला भारतावर आघाडी घेऊ दिली नाही. त्यामुळे भारताच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा ठरला. संपूर्ण स्पर्धेत श्रीजेशने अनेक गोल अडवले आहेत. श्रीजेशने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध केलेल्या शानदार गोलकिंपिंगमुळे तो सामना जिंकण्यात भारताला यश आलं. जर्मनी संघाला 13 पेनल्टी कॉर्नर मिळाल्या ज्यातील केवळ एकच कॉर्नर गोलमध्ये बदलण्यात जर्मनीला यश आलं. बाकी सर्व वेळी श्रीजेशने गोलपोस्टमध्ये भिंत बनून उभा होता. जवळपास 13 वर्षे संघासाठी खेळणार्‍या श्रीजेशने भारतीय संघाला अनेक अप्रतिम विजय मिळवून देत स्वत:ला एक अप्रतिम गोलकिपर म्हणून सिद्ध केले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला कुठलं पदक मिळालं नसलं, तरी इथवरचा भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास सोपा नव्हता. हॉकी खेळून तिचं काय होणार आहे? शॉर्ट स्कर्ट घालून मैदानात धावत बसायचं नि घरच्यांचं नाव खराब करायचं, एवढंच ना! राणी रामपालच्या आईवडिलांना असे उद्गार ऐकून घ्यावे लागत होते. हॉकी खेळणं पोरींना शोभत नाही या कारणावरून वंदना कटारियाला खेळण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न झाले. शिवाय वंदनाच्या जातीचा उद्धार करण्यापर्यंत मजल गेली होती. दारूच्या आहारी गेलेल्या आणि मारहाण करणार्‍या वडिलांच्या घरात जन्मलेल्या नेहा गोयलने स्वतःच्या मनाला सावरण्यासाठी हॉकीच्या मैदानाचा आधार घेतला. निशा वारसीच्या वडिलांना 2015 साली पक्षाघाताचा झटका आला, त्यानंतर कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी निशाची आई फोम फॅक्ट्रीमध्ये काम करू लागली.

झारखंडच्या आदिवासी पट्ट्यातून आलेली निक्की प्रधान भाताच्या शेतात कष्ट करत होती. त्यातच तुटलेल्या स्टिक उधारीने घेऊन तिने खडी पडलेल्या मैदानात हॉकी खेळायला सुरुवात केली. या मुली अडथळ्यांना सामोर्‍या गेल्या, त्यांनी नकारघंटा वाजवणार्‍यांकडे दुर्लक्ष केलं आणि अखेरीस टीकाकारांची तोंड बंद करणारी कामगिरी करून दाखवली. रामपाल, कटारिया, गोयल, वारसी आणि प्रधान या इतिहास घडवायला निघालेल्या भारतीय हॉकी संघातील नायिका आहेत.

ब्रॉन्झ पदकाच्या लढतीत त्या पराभूत झाल्या तरी टोकियोत त्यांनी मिळवलेला चौथा क्रमांक कायम लक्षात राहील. त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना झाल्या तेव्हाही त्यांना बाद फेरीपलीकडे जाता येईल, असे अंदाज कोणी वर्तवले नव्हते. पण या संघाने उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली. उपांत्यपूर्व फेरीत सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला मात दिली. भारतीय हॉकीपटू जगभरात कुशलतेसाठी ओळखले जातात आणि ही कुशलता या महिला संघाच्या खेळात दिसून आली. त्यांच्याकडून इतक्या वेगवान खेळाची अपेक्षा कोणीच ठेवली नसेल. परंतु, त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच ऑलिंपिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

माजी ऑस्ट्रेलियन हॉकीपटू नील हॉगूड 2012 साली भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून आले, तेव्हा या संघातील खेळाडूंमधला आत्मविश्वासाचा अभाव त्यांना जाणवला. अपयशाचं खापर या खेळाडूंवर न फोडता त्यांना विजयासाठी मदत करण्यासाठी आपण आलो आहोत, हे हॉगूड यांनी संघातील मुलींना पटवून दिलं. हॉगूड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघ 36 वर्षांत पहिल्यांदाच ऑलम्पिकसाठी पात्र झाला. 2016 मध्ये रिओ ऑलिंपिकमधील त्यांची कामगिरी नियोजनानुसार पार पडली नसली, तरी त्यांना अनुभव मिळाला आणि काही प्रमाणात आत्मविश्वास आला. हे पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरलं.

योग्य संसाधनं व सामुग्री दिली तर हा संघ विस्मयकारक कामगिरी करू शकेल, हे यातून सिद्ध झालं. त्यानंतर प्रशिक्षक सोर्ड मारजेन यांनी भारतीय हॉकी संघाच्या मार्गदर्शनाची धुरा हाती घेतली. भारतीय महिला हॉकी संघातून टोकियोला गेलेल्या 16 खेळाडूंपैकी आठ जणी 2016 साली रिओ ऑलिंपिकमध्ये खेळल्या होत्या, त्यामुळे संघाचा पाया भक्कम होता. राणी रामपालच्या संघातील सर्वच मुलींनी आपापला खडतर प्रवास करून इथवर मजल मारली आहे, यातल्या प्रत्येकीची एकेक संघर्षगाथा आहे. पण सामायिक ध्येयाने त्यांच्यात सामर्थ्य निर्माण केलं. यातील बहुतेक मुलींनी स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं जगणं शून्यातून पुन्हा उभं केलं आहे. आता त्या भारतीय हॉकीला नवीन शिखरं सर करण्याच्या दिशेने घेऊन जात आहेत. एकूणच हॉकीत दिवस सुगीचे सुरू झालेत…