घरफिचर्सलिंगनिरपेक्षतेच्या दिशेने

लिंगनिरपेक्षतेच्या दिशेने

Subscribe

सरसकट पुरुष बाईवर उठसूट अन्याय अत्याचार करतो असं वाटत नाही मला. खूप चांगले वागणारे पुरुषही आहेत. छोट्या छोट्या गोष्टींतून स्त्री दाक्षिण्य दाखवणारे पुरुष असतात. माणसाच्या माणूसपणाच्या खाणाखूणांच्या अजूनही जागा आहेत. मुळातच आपण कुठल्याही स्तरावर लिंगभेद बाळगळण्याची गरजच नाही. लिंगभेद टाळण्याच्या प्रवासात बाईंने निर्भय आणि हिंमतवान व्हायला हवं. आणि पुरुषांनी मृदू आणि न्याय्य होण्याची गरज आहे. आपला प्रवास लिंगनिरपेक्षतेच्या दिशेने व्हायला हवा.

प्रिय मित्रांनो, मागच्याच महिन्यात जागतिक महिला दिवस झाला. यंदाच्या वर्षी ‘बॅलन्स फॉर बेटर’ अशी थीम महिला दिवसासाठी घेण्यात आली. या थीमचा विचार करता करता तुम्हाला एक पत्र लिहावंसं वाटलं..आपल्या प्रत्येकालाच तोल हवाय. आपापल्या आयुष्यात आणि समाजातल्या आपल्या सहजीवनातही..

- Advertisement -

तुम्ही सारेच फार सच्चे, सद्सद्विवेकाने जगणारे आहात याची मला खात्री आहे. तुम्ही स्त्रीद्वेष्टे नाहीत. स्त्रियांचा आदर करणं, त्यांची जपणूक करणं तुम्हाला आवडतं, पण तरीही काही वेळा तुमच्या विवेकाची गाडी राँग ट्रॅकवर जाते असा अनुभव आहे. अजाणतेपणाने तुम्ही परंपरेने लादलेल्या आणि कदाचित ते तुमच्या थेट जीनमधूनच वर्षानुवर्षे हस्तांतरित होत आलेले आहे. तुमचा उद्देश महिलांचा निरादर करणं, त्यांना कमी लेखणंं असा नसतो. उलट तुम्ही त्याच्या फार पुढं जाण्याचा विचार करताय. तुमच्या आधीच्या पिढीत बाईंचं होणारं दमन तुम्ही पाहिलंय आणि तुम्ही ते पाहून चिडलातही. आपण असं कधीच वागायचं नाही हेही ठरवून टाकलेलं असणार. तरीही काहीवेळा असं घडतंच.

म्हणजे पहा, असं कधी झालं आहे का की, तुम्ही तुमच्या मैत्रिणीसह बाहेर कुठं तरी जेवायला गेला आहात आणि जेवण झाल्यानंतर वेटरने तुमच्या पुढ्यात बिल ठेवलंय? आणि सवयीने तुम्हीदेखील पाकिट काढून जेवणाचं बिल दिलंत. बहिणीच्या किंवा बायकोच्या गाडीवर मागे बसताना कधीतरी कमीपणा वाटला का? अगदी कमीपणा नसेल पण गाडी तिची असली तरी तुम्ही सरसावून तिला म्हणालात, ‘बस मागे, मी घेतो गाडी.’ रस्त्यावरुन जाताना एखाद्या मुलीनं कुणाच्या गाडीला ठोकलं किंवा सिग्नल मोडला तर तुम्ही म्हटलंय, मुली किती वाईट गाडी चालवतात. एखादा पुरुष नजाकतीने एखादं काम, प्रोजेक्ट किंवा वस्तू हाताळत असेल तर त्यानं नजाकतीतून कमावलेल्या सूक्ष्म दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करत त्याची खिल्ली उडवलीय का? मुलगा स्वयंपाकघरात गेला की त्याला काय रे तू काय बाई आहेस का इथं कडमडायला असं म्हणालात..

- Advertisement -

किंवा कधी असं केलंय का की, आपल्या घरातल्या बाईच्या हातून धुतलेल्या कपड्यांची बादली घेतली आणि टेरेसमध्ये उभे राहून कपडे वाळत घातलेत. अगदी घरातल्या बाईचे इनरवेअर्सही. नियमितपणे स्वयंपाकात लुडबूड न करता स्वयंपाकच केलाय. कधी घर मी स्वच्छ करतो तू गाडी धुवून काढ असं आपल्या बहिणीला म्हटलंय..! कधीही आपल्या बायकोच्या आर्थिक स्वावलंबनात आडकाठी आणली नाही. कधी लहानग्या चिमुरड्याला वाहनांची खेळणी देण्याऐवजी त्याला आवडतं म्हणून बाहुली आणून दिलीत, भातुकलीची भांडी आणून दिलीत आणि मुलींना दरवेळी बाहुली न देता धावण्यापळण्याची खेळणी आणून दिलीत.

कसं आहे ना आपण कळत नकळत जे करायला हवं ते करत नाही आणि जे करण्याची जरुरच नाही ते करुनही टाकतो. आपली मैत्रिण स्वतंत्र, कमवती असेल तर दरवेळी तुम्हीच बिलाचा भार घेण्याचं काहीच कारण नाही. ती बिल देऊ शकत असते आणि देऊ द्यावं की तिलाच. पण कुठंतरी तुमच्या मनातच ते रुजलेलं असतं की बाहेर गेल्यावर पुरुषाने खर्च करावा. कुणी शिकवलं हे तुम्हाला… पुरुषसुद्धा असा घडवला जातो मित्रा. मग ते घडताना आपण डोळस नको का रहायला. आता मला सांग, उत्तम गाडी चालवण्याला कौशल्य लागतं की ते तुमच्या जन्मजात लिंगावरुन ठरतं.

गाडी चालवणं हे कौशल्याचं काम आहे ना, ते शिकूनच घ्यावं लागतं. मग एखाद्या मुलीने गाडी वाईट चालवली तर ती त्या विशिष्ट मुलीने वाईट चालवलेली असते त्यासाठी समस्त मुलींच्या जातीचा उद्धार का करावा लागतो. बरं, मुलींच्या पगाराचा, पैशांचा हिशोब पुरुष का मागतात असं विचारलं की तुम्ही लोक लगेच म्हणता, घर जर दोघांचं आहे, समानता आहे तर आर्थिक खर्चही बरोबरीचा नको? म्हणणं बरोबरच आहे. घरासाठी लागणारा हातभार वेगळा आणि तिनं कमावलेल्या पै-पैचा हिशोब ठेवणं वेगळं एवढं तर मानशील. सगळा पैसा घरात देऊन पेट्रोल-भाड्याचे पैसेही तुम्हाला मागायला लागणार असेल तर ते कसं? कुठलाही खर्च तुम्हाला विचारुन करु शकत नसले तर त्याचं काय? आर्थिक स्वातंत्र्य इथं हवंय. तू कमावलेले पैसे घरात न सांगता बँकेत किंवा कुठंतरी गुंतवतोस ना..तसंच तिने तिची गुंतवणूक ठरवली तर..अर्थात इथं कुणीही कुणाकडून काहीही लपवण्याची अगर गुपचूप करण्याची अपेक्षाच नाही. पण ते करण्याचं स्वातंत्र्य दोघांकडे अबाधित हवं हे तर मान्य आहे..!

ही वाणगीदाखल उदाहरणं. आपल्या वागण्या-बोलण्यातून आपण स्त्रीयांचा अगर पुरुष वर्गाचा उद्धार अगर खोटा अभिमान झळकणार नाही असं वागून पहायला काय हरकत आहे. मागे मी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, पुरुषांना न्याय तर द्यायचा आहे, पण तो देववतही नाही. मग बायका ते आग्रहीपणे मागतात तेव्हा पुन्हा पुरुष उफाळून उठतो की का बरं द्यावा म्हणत तेही सरसावतात. त्यामुळे दोघांत संघर्ष खूप आहे. हो पण आपल्या देशात सूक्ष्मपद्धतीने अन्याय होतो. सरसकट पुरुष बाईवर उठसूट अन्याय अत्याचार करतो असं वाटत नाही मला. खूप चांगली वागणारे पुरुषही आहेत. अनेकदा मी एकटीने फिरते. तर बर्‍याचदा प्रवासात मला माझी बॅग उचलून ठेवता येत नाही, पण कुणीतरी उंचापुरा पुरुष पटकन मदत करतो. झटकन तो बॅग उचलून ठेवतो. निघताना कुणीतरी खाली काढून देतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींतून स्त्री दाक्षिण्य दाखवणारे पुरुष असतात की. माणसाच्या माणूसपणाच्या खाणाखूणांच्या अजूनही जागा आहेत. मुळातच आपण कुठल्याही स्तरावर लिंगभेद बाळगळण्याची गरजच नाही. लिंगभेद टाळण्याच्या प्रवासात बाईंने निर्भय आणि हिंमतवान व्हायला हवं. आणि पुरुषांनी मृदू आणि न्याय्य होण्याची गरज आहे.

किती नेमका विचार त्यांनी मांडला होता. पुरुष म्हणजे अन्याय करणाराच आणि बाई म्हणजे शोषितच असाही जो समज आहे तोही तर आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यातून खोडून काढायला हवा. मुळतातच भावे सांगतात तसं आपल्याला अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यात महिलांना निर्भय, हिंमतवान व पुरुषांना मृदू व न्याय होण्यासाठी अवकाश द्यावा लागणार आहे. यासाठी आपण आपल्या स्वत:च्या हालचाली, आपली भाषा यांकडे सजगपणे नको का बघायला. हे फक्त पुरुषांनीच करायचं असं नव्हे तर ही सजगता स्त्रीयांनीही बाळगायला हवी.

आणि आपल्या अशा सहज छोट्या छोट्या कृतींनी आपण आपल्यातील संवेदनशीलता आणि मैत्रीचं मूल्यही विकसित करु लागतो. दोन व्यक्तींमधील मैत्री तुम्हाला नेहमी समान पातळीवर आणते. आता कालचीच घटना. मी माझी पहिल्या मजल्यावरची मिटींग संपवून संध्याकाळच्या सातच्यावेळेला तळमजल्यावरच्या आपल्या क्युबिकलमध्ये शिरले. बॅगेत आपलं सामान भरताना लक्षात आलं मिटींगच्या प्रेजेंटेशनसाठी माझाच लॅपटॉप घेतला होता आणि तो वरच्याच मजल्यावर राहिला. टेबलावरची बाकीची आवराआवरी करताना मी लॅपटॉप विसरल्याचं माझा सहकारी समीरला सांगितलं. तसा तो तिथून निघून गेला. मी वरच्या मजल्यावर पोहचले तेव्हा तो पटकन म्हणाला, ‘अग तुझा लॅपटॉप घेण्यासाठीच वर आलेलो, तर तुही आलीस का वर? ’ त्याच्या अशा निव्वळ मृदू बोलण्यानेच मी सुखावले. मानवतेचा हा भाव आपल्याला असा आतमध्ये झिरपवून, मुरवून घ्यावा लागेल.

शेवटी इतकंच म्हणेन, आपल्याला फक्त लिंगभेदापासून मुक्त व्हायचं नाहीये तर आपल्याला लिंगनिरपेक्षतेकडे प्रवास करायचा आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एक कथाकथनाचा कार्यक्रम ठरवत होतो. त्यावेळी एक लेखक एक लेखिका असं घेण्याचं ठरवू लागलो तेव्हा पटकन एकजण म्हणाला, मुळातच आपल्याला उत्तम कथा हवी आहे. ती लिहिणारा पुरुष आहे की स्त्री असा का विचार करायचा आणि लिंगसमता दिसावी म्हणून एका लेखकानं आणि एका लेखिकेनं असायलाच हवं असा आग्रह कशाला हवा..जर दोन्ही कथा लेखकाच्या किंवा लेखिकेच्या असतील तर आपण विचार कथांनुसार करायला हवा…त्याचं म्हणणं याच लिंगनिरपेक्षतेकडे जाणारं होतं. अर्थात ती वाट ज्यांना सापडेल त्यांनी त्यावर नक्कीच चालायला लागावं, पण किमान तोवर लिंगभेदाच्या इमारतींच्या एकेक विटा तरी लांघायला घेऊयात.
काय मग येताय ना सोबत…

-हिनाकौसर खान- पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -