घरफिचर्सपरंपरा जपणारे शारदा भवन.........

परंपरा जपणारे शारदा भवन………

Subscribe

कोणत्याही इराणी हॉटेलात तुम्ही शिरलात तर इंटिरियर हे किमान ६०, ७० वर्षे जुनेच आढळले. मात्र पदार्थांची चव तिच जुनी. अशाप्रकारेच मुंबईतील इराणी हॉटेलसारखी परंपरा जपली आहे ती माटुंगा, सेंट्रलच्या शारदा भवन या हॉटेलाने.

मुंबई शहर म्हणजे आता जास्तीतजास्त भपकेबाज होऊ लागले आहे. मुंबईकरांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगात या भपक्याला अनावश्यक महत्त्व प्राप्त झाले आहे. मग तो भपका खाण्याच्या गोष्टीतही त्याला अपवाद राहिलेला नाही. मुंबईच्या अनेक हॉटेलांमध्ये तर केवळ इंटिरियर, नीटनिटके कपडे घातलेले वेटर्स, डोळ्याला सुखावणारी रोषणाई यांनाच महत्त्व दिल्याचे दिसते. मग त्यात मिळणारे अन्न कितीही सुमार दर्जाचे असले तरी या भपक्याला भुलणारे मुंबईकर अशा हॉटेलांच्या बाहेर रांगा लावून तेथे खाऊ लागले आहेत. या परिवर्तनात काही हॉटेलांनी मात्र या भपकेबाजपणाला फाटा देत आपले लक्ष्य फक्त आणि फक्त आपल्या पदार्थांवरच दिल्याचे दिसून येते. मुंबईतील इराणी हॉटेल पाहिली तर त्याची प्रचिती येते.

- Advertisement -

कोणत्याही इराणी हॉटेलात तुम्ही शिरलात तर इंटिरियर हे किमान ६०, ७० वर्षे जुनेच आढळले. मात्र पदार्थांची चव तिच जुनी. अशाप्रकारेच मुंबईतील इराणी हॉटेलसारखी परंपरा जपली आहे ती माटुंगा, सेंट्रलच्या शारदा भवन या हॉटेलाने.
माटुंगा स्टेशनच्याजवळ, लखमशी नप्पू मार्गावरील हे हॉटेल अजूनही त्याच इंटिरियरमध्ये, जुन्या हिंदी चित्रपटात दाखण्यात येणार्‍या अवतारात उभे आहे. हे पारंपरिक उडपी हॉटेल १९५० साली तेथे उघडण्यात आले होते. आज या हॉटेलला सुमारे सत्तर वर्षांची परंपरा आहे. माटुंगा, सेंट्रलमध्ये दक्षिण भारतीयांची लोकवस्ती जास्त आहे. येथे गेल्यास खास दक्षिण भारतीय वस्तू तेथील दुकानात हमखास आढळतात. शारदा भवन हे हॉटेल मंगळुरी न्याहारीच्या पदार्थांसाठी आजही प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये पदार्थांची विविधता जास्त नाही. पण जे पदार्थ मिळतात ते खास मंगळुरी चवीचे.

मी या हॉटेलमध्ये १९८९ सालापासून जात आहे. या हॉटेलमधील पदार्थांची तेव्हाची चव आणि आजची चव यात जराही फरक पडलेला नाही. कडी इडली ही या हॉटेलची स्पेशालिटी आहे. शारदा भवनमध्ये पदार्थांसोबत मिळणारी चटणी आणि सांभारची चव सर्वात वेगळी आणि चीभेला भुरळ पाडणारी अशीच आहे. त्यामुळे अनेकवेळा मुख्य डीश बाजूलाच रहाते आणि अनेकजण या सांभार, चटणीवरच ताव मारताना दिसतात.

- Advertisement -

या शिवाय भवनमधील उपमा, रस्सम वडा, क्रिस्पी डोसा हे सर्वच पदार्थ खास आहेत. पण येथील पोटोबा दक्षिण भारतीय फिल्टर कॉपीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. शारदा भवनमध्ये मिळणारी वाफाळणारी फिल्टर कॉपी म्हणजे अमृत योग. अनेकवेळा तर मी फक्त फिल्टर कॉपी पिण्यासाठी शारदा भवनमध्ये गेलो आहे.

शारदा भवन हे हॉटेल नाहीच मुळी ती एक परंपरा आहे, जी त्या हॉटेलच्या मालकांनी आणि तेथे पोटोबासाठी जाणार्‍या गिर्‍हाईकांनी वर्षानुवर्षे जपली आहे. हॉटेलमध्ये शिरायचे. एक फिल्टर कॉफी मागवायची आणि चर्चा करत बसायचे. ही एक जुनी संस्कृती होती. कॉलेजच्या वर्षात रुईया कॉलेजमधील मित्रांना भेटायला गेलो की तासनतास शारदा भवनमध्ये जायचे. पण आता हे शक्य नाही. कारण येथे गर्दी वाढली आहे. आपल्याला हॉटेलमध्ये कधी शिरायला मिळते याची वाट पाहत अनेकजण बाहेर उभे असतात. त्यामुळे पोटोबा करून चटकन बाहेर पडावे लागते. असे असले तरी साऊथ इंडियन पदार्थांसाठी शारदा भवन हे खासच आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -