घरफिचर्सआता कागदी शेअर्स ट्रान्स्फरसाठी निरुपयोगी!

आता कागदी शेअर्स ट्रान्स्फरसाठी निरुपयोगी!

Subscribe

ज्यांच्याकडे अजूनही शेअर्स-कागदी शेअर सर्टिफिकेट स्वरुपात असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडील अशी निद्रिस्त मालमत्ता बाहेर काढावी आणि दिलेल्या मुदतीच्या आत त्यांचे इलेक्ट्रॉनिक रूपात - म्हणजेच ‘डिमॅट’मध्ये रुपांतर करावे. कारण त्यानंतर ते कागदी शेअर्स ‘हस्तांतरणासाठी योग्य’ राहणार नाहीत. आणि ट्रान्स्फर नाही म्हणजे त्यांची किंमत असून नसल्यासारखीच होईल!

सुमारे वीस वर्षांपूर्वी आपल्या शेअर बाजारात एक ‘इलेक्ट्रॉनिक क्रांती’ झाली आणि कागदी शेअर्सना डिमॅट (Demat) पद्धतीचा शह दिला गेला. यंदा त्याला वीस वर्षे होत असताना, कागदी शेअर्स ‘ट्रान्स्फर’साठी निरुपयोगी ठरवण्याचे धोरण सेबीने-शेअरबाजार व्यवहार नियंत्रकांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार ५ डिसेंबर २०१८ नंतर कागदी शेअर्स हे हस्तांतरणासाठी निरुपयोगी ठरतील. शेअर्स जर का दुसर्‍याच्या नावे ट्रान्स्फर करायचे असतील, तर ते फक्त इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्येच असावे लागतील. म्हणजे त्याआधी तुमच्या आमच्याकडील कागदी शेअर्सचे रुपांतर डिमॅटमध्ये करावे लागेल. या क्रांतिकारी निर्णयाबद्दल शास्त्रीय माहिती असणे आवश्यक ठरते.

जेव्हापासून आपल्या देशात शेअर बाजार अस्तित्वात आहे, तेव्हापासून शेअर्स हे एखाद्या प्रमाणपत्राप्रमाणे छापले जात असत. ते नीट जपून ठेवणे आणि जेव्हा विकायची वेळ येईल तेव्हा दलाल-एजंट ह्यांच्याकडे देवून त्याबदली त्याच्या बाजारातील किमतीचे पैसे घ्यायचे अशी रितसर प्रक्रिया होती. म्हणून एखादा मौल्यवान दागिना, रोकड रक्कम जशी कडी-कुलुपात, तिजोरीत ठेवली जायची तसेच अशी शेअर्स सर्टिफिकेट्स सांभाळून ठेवली जायची. पुढे काळ बदलला, शेअरबाजारात संगणकीय व इलेक्ट्रॉनिक क्रांतीने अभूतपूर्व परिवर्तन झाले. १९९६ मध्ये आपल्याकडील शेअर्स व्यवहार आणि उलाढाली यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करायला सुरुवात झाली. दोन नामांकित डिपॉझिटरिजच्या अथक परिश्रमातून कोट्यवधी डिमॅट खाती उघडली गेली आणि शेअर्स-व्यवहार इलेक्ट्रॉनिक-द्वारे होऊ लागले.

- Advertisement -

कागदी शेअर्सबाबत झालेला ताजा निर्णय घेण्याची काही कारणे-

इतकी वर्षे होऊनदेखील आजच्या घडीला कित्येक नामवंत कंपन्यांचे शेअर्स अनेक शेअरहोल्डर्सकडे अजूनही कागदी रूपात ठेवले गेलेत. अनेक कारणांमुळे त्यांचे रुपांतर रखडते, पुढे-पुढे जाते आणि शेवटी होतच नाही. असे असंख्य शेअर्स लोकाच्या घरात, तिजोरीत, बँका-कंपन्या तसेच ट्रस्ट किंवा अन्य ठिकाणी पडून आहेत. त्याबाबत ठोस नियम आणि अंमलबजावणी केल्याशिवाय त्यांचे ‘इलेक्ट्रॉनिक’मध्ये रुपांतरण काही होणार नाही. म्हणून सेबीने असा नियम केला आणि ५ डिसेंबर २०१८ची अंतिम मर्यादा जाहीर केली.

त्यामागची काही ठोस कारणे –

१) खोट्या-बोगस शेअर ट्रान्स्फरवर करडी नजर ठेवून यापुढे असे गैर-प्रकार रोखण्यासाठी
२) शेअर ट्रान्स्फर व्यवहारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी
३) आज अनेकांकडे कागदी शेअर्स आहेत, परंतु त्यांचे पत्ते बदलले आहेत किंवा अन्य कारणांनी त्यांना लाभांश आणि बोनस शेअर्सची अद्ययावत माहिती मिळू शकत नाही. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होते आणि काही मंडळी गैरमार्गाने ते उत्पन्न आपल्याकडे वा इतरत्र वळवतात आणि मूळ शेअर-मालकाचे नुकसान होते त्यांना आळा घालण्यासाठी हे करता येईल.
४) अलीकडेच एका मोठ्या प्रकरणात अनेक कंपन्यांच्या शेअर्सबाबत घोर फसवणूक झाल्याचे आढळले, पुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून ही प्रतिबंधात्मक योजना आहे.

- Advertisement -

अशा नियमामुळे तरी अपेक्षित परिणाम

१) शेअर्स व्यवहारातील गफलती, गैर-व्यवहार आणि फसवणूक कमी होईल
२) शेअर्स ट्रान्स्फर-विक्री-खरेदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने झाल्याने चुका कमी होऊ शकतील
३)डिमॅटमार्फत ट्रान्स्फर केल्याने एकूणच व्यवहारात सोय, सुरक्षितता आणि सुटसुटीतपणा येईल
असे खाते हे बँक किंवा अधिकृत शेअर्स व्यवहार करणार्‍या वित्तीय-गुंतवणूक कंपनी/फर्म, शेअर ब्रोकर्स-दलाल, तसेच ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म -ह्यांना ‘डीपी’ असे संबोधले जाते. त्यांच्याकडे खाते उघडावे, ही खास शेअर्ससाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे.
‘डीपी’ म्हणजे (Depositary Participant) -ज्यांना शेअर्सबाबतचे खरेदी-विक्री ह्याबाबत ‘डिम्याट’खाते उघडण्याची मान्यता असते. असे डीपीज हे वास्तवात मोठ्या स्तरावर कार्यरत असलेल्या ‘डिपॉझीटरिज’चे अधिकृत प्रतिनिधी म्हणून नेमलेले असतात.

देशातील दोन प्रमुख डिपॉझीटरिज

१) एन.एस.डी.एल.- (National Security Depositary Limited)
२) सी.डी.एस.एल.- (Central Depositary Services – (India Limited)
डीपीज हे वरील दोन डिपॉझीटरिजमार्फत आपल्या शेअर्सचे व्यवहार पूर्ण करीत असतात.

आपण नवीन ‘डीमॅट’ खाते कसे उघडावे?

एखादे बँक खाते उघडण्याइतके असे खाते उघडणे सोपे आहे. आपल्या जवळच्या डीपीकडे आपण डिमॅट खाते उघडता येते का, कसे दरपत्रक आकारले जाते आणि सेवा पुरवण्याबाबत बँक किती कार्यक्षम आहे अशा काही व्यवहारिक बाबींचा विचार करून फॉर्म मागवावा. डीपीकडील फॉर्म आणि कोणती कागदपत्रं द्यावी लागतात याची एक यादी (चेक-लिस्ट) मागून घ्यावी. के.वाय.सी साठी जी कागदपत्रे लागतात, ती तयार ठेवावीत

उदा. आपल्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून – पॅनकार्ड, निवडणूक कार्ड, विजेचे बिल, आय.टी.रिटर्न्स, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स. निवासाचा पुरावा म्हणून – रेशनकार्ड, जागा खरेदी केल्याचे करार-पत्र, लिव्ह आणि लायसन्सवर घेतली असल्यास त्याचे करारपत्र, मासिक भाडे पावती-मेंटेनन्स बील, लाईट बील, टेलिफोन बील, पासपोर्ट साईज फोटोज अशी सर्व कागदपत्रं आपण स्वतः जावून डीपीच्या ऑफिसात सादर केली आणि तिथे त्यांनी तपासून खातरजमा केली की आपले ‘डिमॅट’ खाते उघडण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यानंतर आपल्याला खाते वापरण्यासाठी आवश्यक असा एक विशिष्ट नंबर दिला जाईल आणि मग आपण आपले कागदी शेअर्सचे रुपांतर इलेक्ट्रॉनिकमध्ये करू शकतो. असे आपले डिमॅट खाते पुढे शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी नियमितपणे वापरता येवू शकेल.
तेव्हा लवकरात लवकर आपल्याकडील कागदी शेअर्स बाहेर काढा आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिकमध्ये रुपांतर करा. कागदी शेअर्सना कायमची सोडचिठी द्या !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -