घरफिचर्सअनिश्चिततेचे कोरोनाष्टक

अनिश्चिततेचे कोरोनाष्टक

Subscribe

कोरोना महासाथीने केवळ रोगराईच्या खाईत नव्हे तर सर्वांनाच अनिश्चततेच्या गर्तेत ढकलंलं आहे. उत्तरं माहिती नाहीत, असं कसं चालेल ? नंदीबैलाला आम्ही विचारु. ज्योतिषाला विचारु. करीयर काउंसिलरला विचारु. जस्ट डायलवर विचारु. उत्तरं मिळायला हवीत, असा आपला अट्टाहास असतो. पण जगणं ‘21 अपेक्षित’ नसतं ! ही अनिश्चतता, अनप्रेडिक्टेबल असणं ठायीठायी आहे; पण आपण आजवर त्याकडे कानाडोळा केला. आजच्या परिस्थितीमुळे अचानक या सार्‍याचा प्रचंड प्रकाशझोत आपल्या डोळ्यांवर आला. त्या प्रकाशझोतानं डोळ्यांना पुढची वाट दिसत नाही. उलट अधिक संभ्रमकल्लोळ निर्माण झाला आहे.

तू मोठेपणी कोण होणार ?, पाहुण्याने आठवीत शिकणार्‍या पोराला प्रश्न विचारला. पोरगा हुशार. तो म्हणाला, मोठेपणी काहीपण होईन; पण लोकाच्या घरी जाऊन असले प्रश्न मात्र विचारणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारा हा मेसेज एकाने पाठवला. तो वाचताना माझ्या पुन्हा लक्षात आलं – लहान पोरांना ‘मार्गदर्शन’ करुन ‘संस्कार’ प्रदान करताना त्यांच्या आयुष्याची दिशा अमुक प्रकारचीच असावी, असं आपण निर्धारित करतो. त्याबाबत आपण कमालीचे आग्रही असतो. पुढेही आयुष्यात ‘सेट’ होण्याकरताचे काही ठोस ठोकताळे आपल्या मनात असतात.

- Advertisement -

बावीसाव्या वर्षी नोकरी, पंचविसाव्या वर्षी लग्न, तिसाव्या वर्षी घर, दोन मुलं अशी सारी आयुष्याची ब्लूप्रिंट माझ्या एका मित्राने ज्युनियर कॉलेजात असतानाच मांडली होती. तेव्हाही मला त्याचं आश्चर्य वाटलं होतं. अशा अनेक प्रकारच्या जगण्याच्या नियोजन पत्रिका असू शकतात.

इंग्लिश मिडियममधून दहावी, मग लातूर पॅटर्नला अकरावी/ बारावी मग कोट्याला IIT ची तयारी मग नोकरी, लग्न, पोरंबाळ- ‘रांकेला’ लागण्याचे एक नियोजन पत्रक.
किंवा इंजीनीयरिंग+ एमबीए= मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी+हिंजवडीत फ्लॅट.
किंवा MPSC/UPSC पोस्ट मग सत्ताधारी राजकीय वर्गात चंचुप्रवेश.
अशी अनेक ‘यशस्वी’ समीकरणं असू शकतील.

- Advertisement -

पण या सार्‍या नियोजन पत्रिकांमध्ये काही एक गृहीतकांचा आराखडा आहे. कधी इतरांवर तर कधी स्वतःवरच आपण हे गृहीतकांचं ओझं लादत असतो. या सगळ्याचा सर्वात मोठा तोटा हा असतो की या गृहीतकांच्या मुळांनाच सुरुंग लागतो तेव्हा निर्माण होणार्‍या अनिश्चिततेला आपण अजिबातच तयार नसतो.

गंमत अशी आहे की आयुष्य हे आपल्या गृहीतकांप्रमाणे चालणारी गाडी नसते. गणिताच्या भाषेत सांगायचं तर जगणं म्हणजे वन टू वन फंक्शन नसतं. चलपद आणि अचलपद या दोहोंचं गतिशास्त्र सतत बदलत असतं. बदल हीच शाश्वत गोष्ट, असं गुळगुळीत झालेलं वाक्य आपण कित्येकदा म्हटलं तरी बदल कसा होईल, याची आपली एक धारणा असते.

पत्त्यांचा इमला कोसळतो तसा गृहीतकांना कधी ना कधी तडा जातोच. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यानंतर उद्भवलेली अभूतपूर्व परिस्थिती यातून आपल्या सर्वांच्याच नियोजन पत्रिका कोलमडल्या. धारणांना धक्का बसला. ‘एक्स्प्रेसवे’ वरुन धावणार्‍या आपल्या जगण्याच्या बुलेट ट्रेनला करकचून ब्रेक लागला आणि अजूनही आपण या धक्क्यातून सावरतोच आहोत.

परीक्षा होणार का, नोकरी राहणार का / मिळणार का, ऑफिस सुरू होणार का, धंदा चालणार का असे असंख्य प्रश्न समोर आहेत. उत्तर एकच आहे – माहीत नाही. कोणापाशी याची ठोस उत्तरं नाहीत. ‘करोनानंतरचे जग’ कसं असेल, यावर परिसंवाद, व्याख्यानं, अभ्यासपूर्ण लेख यांची रेलचेल आहे पण हे ‘नंतर’ कधी आहे, हे आपल्याला माहीत नाही. या निमित्ताने जगाची कुंडली मांडून भविष्याचा बाजार मांडणार्‍या ज्योतिषींवर ज्यांचा अजूनही विश्वास आहे त्यांनी एकवार आरशात पहायला, थोडा विचार करायलाही हरकत नाही.

मुद्दा हा आहे की आपल्याला अनिश्चितता आवडत नाही. धूसर, अस्पष्ट असणं सोसवत नाही. सारं मूर्त आणि ठोस असेल तर जगणं सोपं असेल असा आपला होरा असतो. मात्र हे सत्य आहे की मीटरच्या अब्जांश आकाराच्या एका अत्यंत सूक्ष्म विषाणूने महाकाय जगाला शब्दशः श्वास रोखून धरायला लावलं आहे.

या महासाथीने केवळ रोगराईच्या खाईत नव्हे तर सर्वांनाच अनिश्चततेच्या गर्तेत ढकलंलं आहे. उत्तरं माहिती नाहीत, असं कसं चालेल ? नंदीबैलाला आम्ही विचारु. ज्योतिषाला विचारु. करीयर काउंसिलरला विचारु. जस्ट डायलवर विचारु. उत्तरं मिळायला हवीत, असा आपला अट्टाहास असतो.
पण जगणं ‘21 अपेक्षित’ नसतं !

ही अनिश्चतता, अनप्रेडिक्टेबल असणं ठायीठायी आहे; पण आपण आजवर त्याकडे कानाडोळा केला. आजच्या परिस्थितीमुळे अचानक या सार्‍याचा प्रचंड प्रकाशझोत आपल्या डोळ्यांवर आला. त्या प्रकाशझोतानं डोळ्यांना पुढची वाट दिसत नाही. उलट अधिक संभ्रमकल्लोळ निर्माण झाला.

‘दहा वर्षांनंतर तू स्वतःला कुठं पाहतोस?’ एका प्राध्यापकाने मला प्रश्न विचारला. मी नेहमीप्रमाणे गोंधळलेलो होतो. अगदी पुढच्या महिन्यात काय करायचं याचं नियोजनही तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतं तेव्हा दहा वर्षांनी काय असेन, हे सांगणं केवळ अवघड होतं. आजही अवघड आहे. याचा अर्थ नियोजन करु नये असं नव्हे. नियोजन करणारे वेडे असतात, असंही नव्हे मात्र जगण्याच्या नियोजनपत्रिकेच्या आखीव रेखीव ब्लूप्रिंटवरच पूर्णपणे भिस्त असता कामा नये.

कितीही विमे काढले तरी सार्‍याच हंगामांची मुदतपूर्व हमी कशी देता येईल ? कुणाला देता येईल ? पीकविमा काढता येईल; पण गारपीट वेळ सांगून होत नाही. ऋतूंचा भरवसा नाही. मोसमी वार्‍यांचा नेम नाही. अचानक चक्रीवादळ येतं आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. जगणं असं भिरभिरत्या पाचोळ्यासारखं दूर उडून जातं.

या अनिश्चततेचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. जे कृष्णमूर्ती यांनी म्हटलं आहे – The root of fear is uncertainty of security. सुरक्षेबाबतची अनिश्चितता हे भीतीचं मूळ आहे. शरीर कितीही वज्रधारी केलं तरीही दुर्योधनावर मर्मभेदी हल्ला होतोच आणि ऍकिलेसला नदीत बुडवूनही पायाची टाच असुरक्षित राहतेच. चिलखतं घातली, रेनकोटस परिधान केले, विमे उतरवले आणि कितीही SIPs केल्या तरी आयुष्याचे ‘फिक्स डिपॉझिट’ शाबूत असतेच असे नाही.

हाइजीनबर्ग या भौतिकशास्त्रज्ञाने एक नियम सांगितला. क्वांटम मेकॅनिक्समध्ये हा नियम अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचा मानला जातो. ढोबळ भाषेत सांगायचं तर कोणत्याही अणुचा किंवा कणाचा संवेग आणि स्थान एकाच वेळी सांगता येत नाही.

आज वेगाच्या प्राणघातक आकर्षणात आकंठ बुडालेल्या आपल्या सामूहिक जीवनाची काहीशी अशीच गत झाली आहे. निश्चित ठोस सारं आपल्याला कळेलच असं नाही, पण आपल्याला हे माहीत नाही किंवा हे अनिश्चित आहे, हे तरी आज समजून घेण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी अनिश्चिततेचा स्वीकार नम्रपणेच करावा लागेल आणि तथाकथित ज्ञानाच्या मक्तेदारीचा अहंगड सोडून द्यावा लागेल. आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘द मॅन हू न्यू टू मच’ या सिनेमात Que Sera Sera हे सुप्रसिद्ध गाणं आहे. त्याचा अर्थ असा की – भविष्य आपल्या हातात नाही, जे काही असेल ते स्वीकारायला हवं. आणि फार उत्तरांची आस असेलच तर बॉब डिलनने सांगून ठेवलं आहेच- द आन्सर माय फ्रेंड इज ब्लोइंग इन द विंड !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -