घरपॉझिटिव्ह न्यूजसलाम वेंकी...क्यूंकी ‘आनंद’ कभी मरते नही

सलाम वेंकी…क्यूंकी ‘आनंद’ कभी मरते नही

Subscribe

संवेदनशील अभिनेत्री रेवतीच्या दिग्दर्शनाखाली ‘सलाम वेंकी’ दर्जेदार बनणारच असावा… महिला दिग्दर्शिका पुरुषांच्या तुलनेत मानवी जाणिवा, संवेदनेबाबत खचितच जास्त संवेदनशील असाव्यात अशी शंका यावी. नंदिता दासचा ‘मंटो ’किंवा दिपा मेहताचा ‘वॉटर’ किंवा गौरी शिंदेचा ‘इंग्लिश विंग्लीश’ किंवा अगदी मिरा नायरचा ‘सलाम बॉम्बे’ असावा, या दर्जेदार सिनेमांच्या रांगेत रेवतीला ‘सलाम वेंकी’ने थेट नेलं आहे. ‘सलाम वेंकी’ का पहावा, यासाठी कित्येक भरपूर कारणं आहेत.

काजोलच्या आजपर्यंतच्या अभिनयाचा परमोच्च टप्पा तिनं इथं गाठला आहे. वेंकी साकारलेल्या विशाल जेठवाची वेदनादायक निरागस हतबलता, राहुल बोस, आहाना कुमरा, राजीव खंडेलवाल, कमल सदाना आणि प्रकाशराज आणि त्यांना साथ देणार्‍या सहकलाकारांच्या संयत अभिनयासाठी की आमिर खानच्या लक्षात राहणार्‍या गेस्ट अपियरन्ससाठी…बरीच कारणं आहेत, पण ‘सलाम वेंकी’ पहावा लागतो तो विशाल आणि काजोलसाठी आणि रेवतीच्या परिणामकारक दिग्दर्शनासाठी. गाणी, संवाद, कथा, पटकथा असं सगळंच परिणाम करणारं आहे.

- Advertisement -

श्रीकांत मूर्तींच्या ‘द लास्ट हुर्रह’ वर आधारित सलाम वेंकी पडद्यावर येतो, वेंकीची वेदना दिग्दर्शिका रेवती उत्तमपणे समजू शकते, तिचा सलमानसोबतचा लव्ह आठवत असेल त्यात उठता बसता अँटीबायटीक्स औषधांमुळे मरणाच्या दाराशी किंवा नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला रेवतीनं अंजली नावाचा सिनेमा केला होता. त्यात तीनचार वर्षांच्या गतीमंद मुलीची हतबल आई रेवती झाली होती, आपल्या मुलीसाठी भवतालसोबत संघर्ष करणारी रेवती आठवत असेल, हाच धागा तिनं आता काजोलच्या हाती दिला आहे. यावेळी इथं स्वतःला तिनं काजोलमध्ये पुरेपूर उतरवलं आहे. काजोलनंही तिचा अभिनयाचा हा दर्जेदार पैलू रेवतीच्याच ताकदीनं आत्मसात केला आहे.

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए…ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’मधल्या राजेश खन्नाचं हे सूत्र या ‘सलाम वेंकी’तही आहे, मात्र वेंकीच्या वेदनेचा अवकाश आनंदपेक्षा खूप मोठा आहे. ही वेदना वेंकीच्या ठरवलेल्या मृत्यूसोबत संपणार आहे, मात्र त्यानंतर त्याच्या जगण्याच्या वाट्याला न आलेला आणि आयुष्यात वापरला न गेल्याने मागे उरणारा अमर्याद आनंद अवयवदानातून तो जगासोबत वाटू इच्छितो, मात्र मरणोत्तर अवयवदानासाठी ब्रेन डेडची अट त्यासाठी अडचणीची ठरतेय, त्यासाठी कौटुंबिक, सामाजिक स्थिती, वैद्यकीय आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींचे समोर असलेले डोंगर पार करताना चित्रपटाचे समांतर जाणारे कथानक ‘सलाम वेंकी’चा पडदा व्यापून उरते, ‘सलाम वेंकी’मध्ये काजोलमधल्या आईचा तिच्याच अंतर्मनाशी होणारा संवाद त्यासाठीच महत्वाचा आहे.

- Advertisement -

पटकथेची उत्तम बांधणी झाल्यामुळे ‘सलाम वेंकी’चं कथानक संयत आणि काहीसं संथ असूनही निरस होत नाही. कथानकाची गरज म्हणूनच त्यातला संथपणा संवादातील पॉजमध्ये बदलत जातो. या अवकाशात बरंच काही सांगितलं बोललं अनुभवलं जातं. पडद्याचे अडीच तीन तास डॉक्टर्स, हॉस्पिटल, सीसीयुतला बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन मशीनने व्यापलेला आहे, तर उरलेला अवकाश इच्छामरणासाठीच्या अवयवदानाच्या संवादाने भरलेला आहे. यात कथानकावर परिणाम करणारा आजुबाजूचा भवताल समजून घ्यायला आहाना कुमराने साकारलेली पत्रकार कारण ठरते.

हा संघर्ष आहे तो काजोलमधल्या आईचा आपल्या मरणासन्न मुलासाठी केला गेलेला. मृत्यू नकारात्मक नसावा, ती इतरांमध्ये जिवंत राहण्याची संधी असावी, असा विश्वास मुलाकडून मिळवलेली ही आई आहे. केवळ नावाला जिवंत असलेल्या मुलामुळे बायकोपोराला टाकून गेलेल्या नवर्‍यासोबतचा परंपरागत संघर्ष नावालाही नसावा, रेवतीनं हे टाळलेलं आहे. कथा, पटकथा आणि संवादाची बांधणी इतकी अचूक आहे की त्यातून कथानकातून निसटून जावेत असे कुठल्याही चोरट्या वाटा रेवतीने ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे नातेसंबंध, कौटुंबिक भाव भावनांचे अवाजवी दर्शन इथं केवळ ओझरतंच होतं, चित्रपटाचा आशय विषय एकाच वेळेस वैश्विक मानवतावाद, आनंद आणि जन्म मृत्यूतली दरी नाहीशी करणारा आहे, त्यामुळे कथानक संपल्यावरही पडदाभर उरतो तो कुणाला काहीतरी दिल्याचा आनंद….याला दानाचं नाव देण्याची गरज नसावी, हे देणं नाही, आनंद मिळवणंही असतं, मरणाला असा आनंदसोहळ्यात बदलणारा असा समाज समुदाय, या बदलासाठी तयार असलेली राज्य आणि न्यायव्यवस्था आपण अद्याप निर्माण करू शकलो नाही, यावर ‘सलाम वेंकी’ बोट ठेवतो. ‘सलाम वेंकी’ एकाच वेळेस आनंद देतो, संवेदनशील बनवतो, दुःखी करतो आणि या दुःखाचे कारणही नाहीसे करतो.‘सलाम वेंकी’ यातील दर्जेदार अभिनयासाठी नक्कीच पहावा, अनुभवावा..

मरण, मृत्यू असलं काही नसतं, त्यामुळे इच्छामरण हा शब्दही चुकीचा आहे. मृत्यू म्हणजे सगळं काही संपतं, संपवलं जातं, राख होतं, ही आजपर्यंत चालत आलेली नकारात्मक धारणा सलाम वेंकी संपवून टाकतो. त्यामुळेच पडद्यावरचा वेंकी देहाने जरी संपला तरी तो प्रेक्षकांच्या मनात त्याची स्पंदनं सोडून जातो..ही सोडलेली स्पंदनं पुढच्या माणसांपर्यंतही पोहचावीत अशी वेंकीची इच्छा असते, ‘सलाम वेंकी’च्या पडद्यावरच्या मौनातून ‘विदां’ची कविता ऐकू येते…. घेता घेता घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावे, ‘सलाम वेंकी’ या सिनेमाची हीच ‘वनलाईन’ असते, ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’मध्ये ‘आनंद कभी मरते नही’ असा संवाद गुलजारांनी लिहला होता. 60 वर्षांनंतर ‘वेंकी’ नावाच्या या ‘आनंद’चा अमर मृत्यूसोहळा थिएटरमध्ये जाऊन साजरा व्हायला हवा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -