घरफिचर्सजिंदादील व्यक्तिमत्वाचा अनपेक्षित निरोप

जिंदादील व्यक्तिमत्वाचा अनपेक्षित निरोप

Subscribe

त्याला कधीही ताण तणावात पाहिले नाही. नेहमी हसतमुख चेहरा, आत्मविश्वासपूर्वक वावर, नवोदितांच्या शंकांचे निरसन करण्यात सतत आघाडीवर असणारा तो एक जिंदादील व्यक्तिमत्व होता.

काहींचे आपल्यातून निघून जाणे इतके अनपेक्षित असते की तशा बातमीवर विश्वासच बसत नाही. त्यातच एखाद्या व्यक्तिबरोबरचे नाते नेहमीच्या प्रचलित नात्यापेक्षा वेगळे असले तर धक्का हा बसतोच. सलिम शेखचेही असेच. २ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सलिम गेल्याची बातमी ऐकली खरी पण ती पचवताच आली नाही. मी अगोदर काम करत असलेल्या मर्स्कमधील जुन्या सहकार्‍यांचे एकामागून एक फोन येत राहिले. व्हॉट्सअ‍ॅपवरून विचारणाही झाली. तरीसुद्धा मन अजूनही त्या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. शेवटी सलिमच्याच मोबाईल क्रमांकावरून फोन आला. पण यावेळी सलिमची नेहमीची हे दीपू ही हाक नव्हती. त्याच्या छोट्या मुलाने अंकल, पापा अब नहीं रहे’ असे सांगितल्यावर मात्र पायाखालची वाळू सरकली. मागच्याच आठवड्यात २७ सप्टेंबरला त्याने वयाची अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण केली होती. त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. परंतु, मिनिटभरातच आमचे बोलणे आटोपले होते. त्याचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळे इतरांचे फोनही आले असणार. म्हणूनच जास्त वेळ बोलता आले नाही. त्याच्या फेसबुक खात्यावर तर सर्वांनीच दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसात तो गेल्याची बातमी मन हेलावून गेली. पन्नाशी गाठायचे राहूनच गेले. मागच्या वर्षीच्या २३ ऑक्टोबरला तर लग्नाची पंचविशी त्याने साजरी केली होती.

तसे आम्ही समवयस्क. माझ्यापेक्षा फक्त चार महिन्यांनी तो लहान होता. परंतु मर्स्कमध्ये मात्र साधारण दोन महिन्यांनी तो ज्येष्ठ होता. तेव्हापासूनचा म्हणजे जवळजवळ २५ वर्षांचा आमचा स्नेह. मर्स्कच्या सुरुवातीच्या दिवसात माझा जम बसेपर्यंत त्याचेच मार्गदर्शन लाभले. त्याच्याच प्रशिक्षणात मी तयार झालो. बहुराष्ट्रीय कंपनीत आपला वावर कसा असावा याचे उत्तम उदाहरण तो होता. अगदी शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीपासून ते उच्चपदावर असलेल्या व्यक्तीपर्यंत त्याची ओळख होती. इंग्रजीवर तर त्याचे प्रभुत्व होतेच. परंतु, मराठीही तो उत्तम बोलत असे. लिफ्टमन, रखवालदार, सफाई कामगार यांचीही तो आस्थेने विचारपूस करत असे. त्याच्या हाताखाली शेकडोंनी प्रशिक्षण घेतले. त्या प्रत्येकाला तो नावानिशी ओळखत असे. त्यांच्यांशी संपर्क ठेवून असे. कंपनीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात तर आपल्या अदाकारीची छाप पाडत असे. फुटबॉलची सुरुवातीपासून आवड असल्यामुळे कंपनीच्या संघातही महत्त्वाची भूमिका बजावताना छान कामगिरीही करत असे. लांब कुरळे केस त्याच्यातील फुटबॉलप्रेमीची साक्ष देणारेच होते. त्याला कधीही ताण तणावात पाहिले नाही. नेहमी हसतमुख चेहरा, आत्मविश्वासपूर्वक वावर, नवोदितांच्या शंकांचे निरसन करण्यात सतत आघाडीवर असणारा तो एक जिंदादील व्यक्तिमत्व होता. त्याने अर्ध्यावरती मैफल सोडून इहलोकातून असे निघून जाणे यावर विश्वास ठेवणेच कठिण जातेय. मन ती गोष्ट मानायलाच तयार होत नाही.

- Advertisement -

प्रशिक्षण ( Training) हा सलिमच्या आवडीचा प्रांत. नव्याने भरती झालेल्यांना कंपनीचा इतिहास, सध्याची कामगिरी, कामकाज पद्धत, वापरात असलेल्या विविध कार्यालयीन systems यांची माहिती करुन देणे आणि नंतर विविध परीक्षेची तयारी करून घेऊन प्रशिक्षित कर्मचारी तयार करणे हे त्याचे महत्त्वाचे काम. आवडीचा प्रांत असल्यामुळे ते तो न कंटाळता करत असे. प्रशिक्षित झालेले सहकारी नंतरही त्याच्याशी आवर्जून संपर्क करत असत. काही कालावधीनंतर त्याच्याकडे टीम सोपवली गेली. ती जबाबदारीही त्याने व्यवस्थित सांभाळली. सलिमला reporting, targets यापेक्षा हसतखेळत टीमकडून काम कसं करुन घ्यायचं हे चांगल जमायचं. बावीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर काही कारणास्तव त्याने नोकरीला रामराम केला होता. तसे त्याच्याबरोबर फोनवरून अधूनमधून बोलणे होत असे. मी मर्स्कमधून निघाल्यानंतर प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मागचे दीड वर्ष तो घरीच होता. परंतु तरीही तो समाधानी होता. मार्चमध्ये मोठ्या मुलीला बारावी परीक्षेसाठी किर्ती महाविद्यालय परीक्षा केंद्र होते. त्यावेळी तिथून जवळच असलेल्या सलिमच्या घरी प्रथमच गेलो होतो. त्यावेळी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. तर तीन महिन्यांपूर्वी त्याने रमजान ईदच्या दुसर्‍या दिवशी (१७ जूनला) खास आग्रह करुन शिरकुर्मा खायला बोलावले होते. भविष्याची चाहूल कदाचित सलिमला लागली असावी कारण इतर मित्रांनाही भेटण्याची इच्छा त्याने त्यावेळी व्यक्त केली होती.

माझ्या उमेदीच्या सुरुवातीच्या कालखंडातील उत्तम मार्गदर्शक, २० वर्षांचा सहवास लाभलेला कार्यालयीन सहकारी, २५ वर्षांचा स्नेह टिकवून ठेवणारा मित्र, हसतमुख जिंदादील व्यक्तिमत्व असलेला सलिम आठवणीच्या रुपाने अमर राहिल हे नक्की.

- Advertisement -

-श्री. दीपक काशिराम गुंडये, वरळी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -