घरफिचर्सबाता नव्हेतर पुन्हा लाथाच योग्य!

बाता नव्हेतर पुन्हा लाथाच योग्य!

Subscribe

उर्दू ही पाकिस्तानची राजभाषा आहे. तिथे काही लोक इंग्रजीतही बोलतात. भारताला त्या दोन्ही भाषा अवगत आहेत. पण वाटाघाटीला बसायचे तर पाकिस्तान त्या दोन्ही भाषेत बोलत नाही. वाजपेयी असोत किंवा मोदी, त्यांनी तसा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानने हिंसा व घातपातानेच उत्तर दिले होते. मग संवाद व्हायचा कसा? तर त्या भाषेचा शोध मोदींनी सुरू केला आणि त्यांना सर्जिकल स्ट्राईक वा हवाई हल्ले अशी भेदक हिंसक भाषा आता सापडलेली आहे आणि पाकिस्तानच नव्हेतर भारताचा आणखी एक शेजारी चीनलाही ती भाषा हळूहळू समजू लागली आहे.

सध्या पाकव्याप्त काश्मिरची भूमी भारत कधी परत घेणार, असा एक विचार अनेकांच्या मनात घोळतो आहे आणि त्याचवेळी भारतीय काश्मिरात होणार्‍या घातपात व जिहादी हिंसाचाराने अनेकांना व्यथित केले आहे. साहजिकच आपण असे हतबल का आणि अमेरिका वा इस्त्रायल यासारखे देश इतके स्वयंभू कशाला, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्याचे कारण सोपे आहे. उपरोक्त दोन्ही देश खरेच स्वयंभू आहेत आणि त्यांना राष्ट्रप्रेम व राष्ट्रवाद ही निरूपयोगी बाब वाटत नाही. पण भारताप्रमाणे त्याला कोणी स्वातंत्र्य आंदण दिलेले नाही. खरोखरीचे रक्त सांडूनच देशाची स्थापना करावी लागलेली आहे. मागली सात दशके सातत्याने रक्त सांडूनच त्याचे अस्तित्व टिकवावे लागले आहे. त्याच्या तुलनेत भारताची भूमी खंडप्राय व लोकसंख्या अफाट असली, तरी देशासाठी व अस्तित्वाला आवश्यक असलेला अभिमान ही गोष्ट आपण काहीसे विसरून गेलो आहोत.

पॅलेस्टाईन व हिंदुस्तान यांची दोनतीन वर्षांच्या फरकाने फाळणी झाली आणि ब्रिटिश दोन्हीकडून सत्ता सोडून गेले. त्याचे परिणाम हिंदुस्तानला जसे भोगावे लागले, तसेच पॅलेस्टाईनलाही भोगावे लागले. कारण दोन्हीकडे फाळणीचा वरवंटा सारखाच फिरलेला होता. हिंदुस्तानची फाळणी निदान दाखवायला अधिकृत होती; पण पॅलेस्टाईनची फाळणी अरब आणि ज्यू यांच्या तुंबळ लढाईने झाली आणि आजही अनेक अरब देशांनी इस्रायलचे अस्तित्व मान्य केलेले नाही. आपण शस्त्रबळाने इस्रायल नामशेष करू, अशी त्यांची भूमिका होती आणि अजूनही ती मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे देश समाज व राष्ट्र म्हणून टिकून रहायचे, तर कायम युद्धसज्ज रहाणे ह्यालाच इस्त्रायलचा कारभार असे मानले जाते. परिणामी हल्ला झाला किंवा नुसती तशी शक्यता वाटली; तरी इस्रायलच्या फौजा थेट शेजारी अरब देशांवर हल्ले करून त्यांना नामोहरम करीत असतात. मग भारत इस्रायलप्रमाणे आधीच हल्ला करून पाकला नामोहरम कशाला करीत नाही? मागल्या दोनतीन पिढ्यातील भारतीयांना सतावणारा असा हा प्रश्न आहे.

- Advertisement -

हिंदीमध्ये एक उक्ती आहे, ‘लातो के भूत बातोसे नही मानते.’ पाकिस्तान हा जगातला एक देश असा आहे की ज्याला कुठलीच मानवी भाषा कळत नाही. त्याला कंबरेत लाथ किंवा बंदुकीचीच भाषा कळत असेल तर त्याच भाषेत त्याच्याशी संवाद करण्याला पर्याय उरत नाही. पण प्रश्न पाकिस्तानचा असण्यापेक्षाही आपल्याच देशातल्या बुद्धीचे अजिर्ण झालेल्या दिवाळखोरांचा आहे. मागली तीन दशके पाकिस्तान सतत दहशतवाद व जिहादी हिंसेचे हत्यार उपसून भारतात थैमान घालत असतानाही त्याच्याशी संवाद साधावा आणि दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यात भारताने पुढाकार घ्यावा, अशी मुक्ताफळे उधळणारे बुद्धीमंत इथेच बसलेले आहेत. पाकिस्तानने कितीही उच्छाद मांडला तरी त्याच्याशी दोन हात करण्यापेक्षा वाटाघाटी कराव्यात, असा त्यांचा कायम आग्रह राहिला आहे. पण त्या देशाशी संवाद करायचा तर कुठल्या भाषेत करावा, याचे उत्तर यापैकी कोणालाही देता आलेले नाही. म्हणूनच तो संवाद होऊ शकत नव्हता.

उरी व पुलवामाच्या घातपाती घटनांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती भाषा शोधून काढली आहे, असे मानायला हरकत नाही. कारण ज्या भाषेत संवाद करायचा ती भाषा पाकिस्तानला समजली पाहिजे आणि भारतालाही बोलता यायला हवी ना? उर्दू ही पाकिस्तानची राजभाषा आहे. तिथे काही लोक इंग्रजीतही बोलतात. भारताला त्या दोन्ही भाषा अवगत आहेत. पण वाटाघाटीला बसायचे तर पाकिस्तान त्या दोन्ही भाषेत बोलत नाही. वाजपेयी असोत किंवा मोदी, त्यांनी तसा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानने हिंसा व घातपातानेच उत्तर दिले होते. मग संवाद व्हायचा कसा? तर त्या भाषेचा शोध मोदींनी सुरू केला आणि त्यांना सर्जिकल स्ट्राईक वा हवाई हल्ले अशी भेदक हिंसक भाषा आता सापडलेली आहे आणि पाकिस्तानच नव्हेतर भारताचा आणखी एक शेजारी चीनलाही ती भाषा हळूहळू समजू लागली आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी उरी येथे पाकिस्तानने प्रायोजित केलेल्या घातपाती संघटनांनी लष्करी तळावर हल्ला केला आणि अनेक सैनिक हकनाक मृत्युमुखी पडले होते. त्याच्याही आधी असे अनेक हल्ले झालेले आहेत आणि मोदी सरकारच्या काळात पठाणकोटचा हल्ला तसाच झालेला होता. असे काही घडले मग भारतानेही सैनिकी कारवाईतून पाकला चोख उत्तर द्यावे, अशी सामान्य भारतीयांची इच्छा असते. पण नुसते तसे कोणी बोलले तरी तात्काळ आपल्याच देशातले विद्वान व बुद्धीमंत दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने युद्धाचा पर्याय असू शकत नसल्याची भीती घालू लागायचे. किंबहुना म्हणूनच कारगिल युद्ध झाले तेव्हा घुसखोर पाकिस्तान्यांना हुसकून लावताना भारताच्या हवाई दलाने युद्धात भाग घेतला तरी साधी नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. आपल्या हद्दीत राहूनच युद्धही खेळले गेले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अशा प्रकारचे घातपाती हल्ले होत राहिले आणि पाकिस्तानशी संवाद करण्याचे आग्रह चालूच राहिले. अणुयुद्धाची भीती घालण्याचेही डाव चालूच राहिले. दरम्यान अनेक सरकारे आली आणि गेली. मोदी सरकार त्याला अपवाद ठरले. म्हणून दोन वर्षांपूर्वी आधी हे अणूयुद्धाच्या भितीचे ओझे मानगुटीवरून उचलून फेकून देण्यात भारत यशस्वी होऊ शकला.

उरीच्या घटनेनंतर नेहमीप्रमाणेच सैनिकांचे बलिदान वाया जाणार नाही अशी भाषा इथे भारतात बोलली गेली. पण त्यात पाकला दम वाटला नाही. कारण मागल्या तीन दशकात तीच भाषा नेहमी बोलली गेलेली होती. मोदी त्यात कुठलाही बदल करायला धजावणार नाहीत, याची पाकिस्तानी नेते व सेनापतींना खात्री होती. म्हणूनच ते गाफील राहिले आणि पहिलावहिला सर्जिकल स्ट्राईक भारताने केला. त्याचा अर्थ होता नियंत्रण रेषा ओलांडून पाक प्रदेशात घुसून शत्रूला मात देणे. अर्थात त्यामुळे पाकला अक्कल येईल, अशी कोणाची अपेक्षा नव्हती. पाकिस्तान धडा शिकेल वा शहाणा होईल, अशी अपेक्षाच मुर्खपणाची आहे. त्यामुळे आता पुन्हा धाडस करू पाहणार्‍या पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणेच योग्य आहे. देश करोनाविरुद्ध झुंजत असताना पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे.

या कुरापती थांबणे शक्य नाही. कारण पाकिस्तानचे लष्कर हे पाकिस्तानी सरकारच्या हातात राहिलेले नाही. तसेच पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांचे प्राबल्य इतके आहे की, त्यांच्या इच्छेविरोधात पाकिस्तानला आपल्या देशातील करोना रुग्णांवर अपेक्षित उपचारही करता येत नाहीत. एका बाजूने करोना पाकिस्तानला पोखरून टाकत असताना भारताला रोखण्यासाठी चीनही पाकिस्तानला फूस लावत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या उरात पुन्हा धडकी बसेल अशी कारवाई करणे आवश्यक आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे पुन्हा जाहीर करून भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे. मग भारतातील सेक्युलरांनी पाकिस्तानची कितीही बाजू घेतली तरीही आता तोच खात्रीशीर इलाज आहे. त्याची सुरुवात तर झाली आहे. लवकरच त्याचे परिणामही दिसून येतील, अशी आशा बाळगूया.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -