थोडं तरी डोकं वापरा !

मित्रहो, दिवसेंदिवस असंवेदनशीलता वाढतच आहे. डोकं वापरण्याची नितांत गरज आहे. परवा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी म्हणाले, मला काय त्याचं हे वाक्य वाढलं आहे म्हणून समाज अधिक हिंसक झाला आहे. हे थांबवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत पडायला हवं, असं का घडलं याचा विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं आणि असं घडणार नाही यासाठी कृतीत सहभागी व्हायला हवं.

सध्या लग्नाचा सिझन आहे. सकाळ, दुपार, रात्री कुठल्याही वेळांना लग्न असते. काल आम्ही एका गोरज मुहूर्त असलेल्या लग्नाला गेलो होतो. मुलगी आणि मुलगा दोन्हींकडचे कुटुंब आमच्या नात्यातलेच होते. आम्ही तिघेही दिवसभर खूपच कामात अडकल्यामुळे घरी उशिरा पोहोचलो आणि लगेच लग्नाला गेलो. आम्ही लग्नाला पोहोचलो तेव्हा रात्रीचे 9.30 वाजले होते. आत गेल्यावर कळले की, लग्न 15 मिनिटांपूर्वीच लागले आहे. लग्नाला किमान दोन ते अडीच हजार लोक होते. पण आयोजकांना याचा विचारच डोक्यात येत नाही की, एवढ्या लोकांचा वेळ वाया जात आहे तेव्हा वेळेत लग्न लावावं. पूर्वी ज्यांची लग्नं अगदी वेळेत लागतात अशा कथा सांगितल्या जायच्या त्यांच्या लग्नातही आता उशीर होताना दिसत आहे. आमचा एक मित्र एका विशिष्ट समूहाबद्दल म्हणायचं की, यांच्या पत्रिकेत जर …..धर्म पद्धतीने लग्न होणार आहे असे लिहिले असेल तर पत्रिकेत छापलेल्या वेळेच्या आधी लग्न लागणार नाही, पण मात्र कधी लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. याला काय म्हणावं तेच सुचत नाही. तक्रार करावी तरी कोणाकडे? कोणाला या विषयावर बोललोच तर त्याचं उत्तर अगदी ठरलेले असते, कशाला जाता अशा लग्नांना?

दुसरा याच्या लग्नांमधला सीन म्हणजे पत्रिकेत लग्नाची जी वेळ लिहिलेली असते तेव्हा नवरदेव नावाची व्यक्ती मिरवायला निघते. मग भर उन्हात सगळे मनसोक्त काळे निळे होईपर्यंत नाचतात. त्यांच्या नाचण्याच्या अ‍ॅक्शन पाहून कुठल्याही भल्या व्यक्तीला त्यांना थांबवण्याची हिंमत होत नाही. एकदा माझ्या नात्यातल्या एका लग्नात अशीच नवरदेवाची वरात अगदी शांत चित्ताने नाचत नाचत सुरू होती. त्या गावातला तो मुख्य रस्ताही अगदी छोटा होता. या मिरवणुकीमुळे गावातून जाणार्‍या गाड्या अडकल्या. लोक हताशपणे ती मिरवणूक एका जागेवरून पुढे जाण्याची वाट पहात होती. त्या मिरवणुकीत असलेले स्त्री-पुरुष सगळेच झिंगत नाचत होते. त्यांच्याकडे बायकांना फक्त असं मिरवणुकीतच जाहीर नाचण्याची परवानगी असते. त्यामुळे त्या स्त्रियाही ती संधी सोडायला तयार नव्हत्या. कितीही दमल्या तरी त्या नाच काही सोडेनात. आणि पुरुष तर हवेतच तरंगत होते त्यामुळे त्यांचा थांबण्याचा प्रश्नच येत नव्हता.

असं बराच वेळ चालल्यानंतर मला अगदीच राहवेना म्हणून मी त्या ‘नवरदेव’ नावाच्या व्यक्तीकडे गेले आणि त्याला सर्व परिस्थिती सांगितली तर त्याचं उत्तर होतं, ‘जावू द्याना ताई, परत अशी संधी कधी मिळेल, माणसाचे आयुष्यात एकदाच लग्न होते’, आता याचे काय उत्तर द्याल. शहरात आता मुख्य रस्त्याने मिरवणूक काढता येत नाही, दहा नंतर वाद्य वाजवता येत नाही, या सर्व नवीन नियमाप्रमाणे जरा बरी परिस्थिती आहे. अर्थात काहींना ही पण भाषा कळत नाही. पोलीस आपल्या खिशात आहे याचा त्यांना इतका विश्वास असतो की त्यांना जाऊन सांगितले तरी काही फरक पडत नाही. बरं असे लोक बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे अशा सर्व समाज सुधारकांचे कट्टर समर्थक आहेत असा त्यांचा दावा असतो. ज्या बाबासाहेबांनी परदेशात शिक्षण घेत असताना कधीही दारू प्यायली नाही त्यांचे हे समर्थक यांना पोटात दोन घोट जात नाही तोपर्यंत हळद नावाचा विधी समजतच नाही. बर्‍याच तरुण मुलग्यांचा दारू पिण्याचा प्रवेश एपिसोड अशा हळदीत किंवा निवडणुकीतच होत असतो. याबद्दल काहीही बोलायचे नसते. अनेक घरांमधून दारुमुळे त्या पूर्ण कुटुंबाचे नुकसानच नाही तर पूर्ण वाताहत झालेली असते; पण पुढची पिढी त्यातून काहीही शिकत नाही. ती परत त्याच रस्त्यावर चालायला शिकते आणि आपलीही वाताहत करून घेते.

तुम्हाला मी कालच्या त्या लग्नाचे सांगत होते आणि विषय इथपर्यंत आला. कालच्या सारख्या अनेक मध्यमवर्गीय लग्नाच्या मध्ये होणार्‍या खर्चाबद्दल तर न बोललेलं बरं. किती खर्च करावा याला काही धरबंदच राहिला नाही. मला खर्चाच्या आकड्यापेक्षा हा खर्च ज्या गोष्टींवर केला जातो त्याचा त्रास आहे. अनेक वर्षे कौटुंबिक हिंसाचारामुळे त्रस्त कुटुंबांबरोबर काम करते आहे तिथला अनुभव सांगतो की, लग्नाच्या या वाह्यात खर्चामुळे ते नाते छान बनायला, दोन वैवाहिक जोडीदारांची जोडी अधिक आनंदी व्हायला काहीही मदत होत नाही. लग्नात लोक डेकोरेशन, लग्नातले वर वधूचे कपडे, मानपानाचे कपडे यातच रमतात. अनेक लग्नांमध्ये फेटे नावाची जी गोष्ट पुरुषांना बांधली जाते, ज्यामुळे त्यांना ते खरे मर्द आहेत असे वाटते आणि ते वेगळ्याच आवेशात त्या आवारात फिरत असतात, त्याच आवारात थोड्या वेळाने ते फेटे जमिनीवर पडलेले असतात आणि सर्वजण त्यावर पाय देवून जात असतात. कोणीच कसं डोकं वापरत नाही की, या फेट्यांचा आणि त्या लग्नातून निर्माण होणार्‍या नात्याचा काय संबंध? प्रत्येक लग्नात मला वाटतं की, कोणीतरी डोकं वापरा राव.

दुसरा घाणेरडा प्रकार म्हणजे तो मानपान. माझ्या परिचयातील अनेक लग्नांमध्ये त्या वर आणि वधूचे पालक विशेषतः आया, मावश्या, काकू या ते मानपान वाटण्यात आणि त्याचे टेन्शन घेऊन बळजबरी खोटं खोटं हसत फिरत असतात. चुकूनही कोणी मानपानाशिवाय राहता कामा नये यावर त्यांचे लक्ष असते. गेली वीस वर्षे मी, मनोहर किंवा कल्याणी कोणाकडून मानपान घेतही नाही आणि आहेरही करीत नाही. पण आमच्या या निर्णयाबद्दल फारच दुर्मिळ लोकांना आनंद होतो. बाकीचे तर आम्ही कसे जगण्यास लायक नाही हेच चाळवत बसतात. पूर्वी याचा त्रास व्हायचा; पण आता आपण तरी डोकं वापरुयात या विचारांमुळे हा त्रास होणे बंद झाले आहे. या सर्व भानगडीत तिकडे लग्न कसं लागलं, मुलगी मुलगा कसे आहेत, ते विधी कसे चालले आहेत याकडे या ‘बायांचे’ अजिबात लक्ष नसते. लग्न त्या एन्जॉयच करीत नाही. त्यांच्याच मुलींची किंवा मुलाचे लग्न असूनही त्या त्या आनंदात छान सहभागी होत नाही. कोणीच कसा हा प्रश्न विचारत नाही की, हे मानपान कशासाठी? जर त्या मानपानाच्या साड्या ज्यांना दिल्या आहेत त्या घालणारच नाही ज्या पुरुषांना दिलेली टॉवेल टोपी थोड्या वेळाने तिथेच जमिनीवर सापडेल तरी का द्यायचा असा हा खोटा मानपान? का द्यायचे ते फेटे नावाचे चिरगूट?

खरं तर आजकाल शहर, आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी मुलंमुली सहजपणे एकत्र वावरतात. खूप सहजतेने एकमेकांशी मैत्री करतात, मोकळेपणाने बोलतात, एकमेकांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी एकमेकांना सहज शेअर करतात. मग काय फरक आहे मित्र आणि नवरा यात? तर लग्नाच्या प्रसंगामुळे, विधीनंतर ती दोघे आता एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात याला समाजाने मान्यता दिली आहे याचा तो सोहळा आहे. एवढा एकच फरक आहे मित्र/मैत्रिण आणि नवरा/बायको या नात्यात. मग ज्या नात्यासाठी एवढा खर्च त्या शारीरिक संबंधाबद्दल मात्र लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर लगेच काहीही त्या दोघांशी बोलले जात नाही. पाण्यात पडले की, शिकतील आपोआप असं बोललं जातं. आमच्यासारखे काही कार्यकर्ते-कार्यकर्त्या प्रयत्न करतात तर हे एक विचित्र काम करत आहेत, अशा प्रतिक्रिया शिकलेल्या लोकांच्या असतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या कामाचा अनुभव असं सांगतो की, लग्नामुळे निर्माण झालेल्या नात्यात शारीरिक संबंधांची चर्चा मोकळेपणाने न झाल्यामुळे, त्या विषयातल्या अज्ञानामुळे ही नाती छान विकसित होत नाहीत.

याविषयात डॉ. निशी यांनी केलेला अभ्यास सांगतो की, वैवाहिक जोडीदार यांच्यात जी भांडणे होतात त्यातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त भांडणे लैंगिक संबंधांची किळस, अपूर्ण माहिती, माहितीच नसणे, चुकीची माहिती असणे, या नात्यात काही अडचण आली तर कोणाशी बोलायचे यासाठी साधनं / योग्य व्यक्ती उपलब्ध नसणे यामुळे निर्माण होतात. बरं आपल्याकडे या विषयात काम करणारे पोलीस, कोर्ट, सामाजिक संस्था यांच्याकडेही या विषयात बोलण्यासाठी आवश्यक असलेली भाषा, मोकळेपणा उपलब्ध नसल्यामुळे, तज्ज्ञ व्यक्तींचा वानवा, बोलण्यासाठी आवश्यक असणारी प्रायव्हसी नसल्यामुळे समाजात भांडणांची जी घिसीपिटी कारणे आहेत तीच दिली जातात. उदा. ज्या घरांमध्ये आख्ख्या खानदानीचे पैसे एकत्र केले तरी जी रक्कम तयार होणार नाही तेवढे पैसे हुंडा म्हणून मागितला असे सांगितले जाते. किंवा मी कामावरून आलो आणि हिने मला साधे पाणी दिले नाही, लगेच मला जेवायला विचारले नाही. किंवा लग्नाला पाच वर्षे झाली; पण यांची मला फुटकी बांगडी माहीत नाही किंवा दोन रुपयांचा गजरा माहीत नाही अशी कारणे सांगितली जातात.

जी मुलगी लग्नाच्या आधी माहेरी 5 ते 6 व्यक्तींचा स्वयंपाक छान करायची तिच्या स्वयंपाकाबद्दल तक्रारी सुरू होतात. ती खारटच स्वयंपाक करते किंवा आळणीच करते असं काहीतरी. अशा सर्व तक्रारींमध्ये जेव्हा अगदी साधा, आवश्यक प्रश्न विचारला जातो की, तुमचे हनिमून झाले आहे का? कुठे झाले? त्या हनिमूनमध्ये आनंद किंवा समाधान मिळालं का? या एका प्रश्नाने आपल्या समाजाचा खोटारडा, नाटकी चेहरा बाहेर पडतो. चांगल्या शिकलेल्या लोकांमध्ये हा प्रश्न असतो की, कशाला हवे हनिमून? आम्ही नव्हतो गेलो, पण त्याने काही अडचण नाही आली, मग कशाला तुम्हाला जायला हवे? लग्नानंतर किंवा खरं तर आधी शारीरिक संबंध याविषयावर त्या दोघांचे एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे होणे हे अत्यावश्यक आहे हे अजूनही आपल्या समाजाला पटलेले नाही. मग असा हा खोटारडा समाज डोक्याचा वापर न करता स्टेजवर प्लास्टिकच्या फुलांच्या डेकोरेशनला दहा हजार देईल, त्या फेटे नावाच्या चिरगुटावर खर्च करतील, एकदम भोकाड्या दिसतील असा मेकअप करणार्‍या ताईना पैसे देतील, जेवणात कारण नसताना दहा पदार्थ ठेवतील, पण हनिमून साठी खर्च करणार नाही.

तिसरा मुद्दा आहे हळदीत, लग्नात, वरातीत वाजणार्‍या वाद्यांची. नाचणारे पाच/दहा किंवा अगदी पन्नास असतील; पण आवाज मात्र आजूबाजूच्या सर्व परिसराला दणाणून टाकणारा. त्या लग्न घरातही कोण कोणाशी काय बोलतोय ते समजत नाही, स्पिकरच्या त्या आवाजामुळे प्रत्येकजण उच्च स्वरात बोलत असतात किंवा एकमेकांच्या पार कानात घुसून निरोप देण्याचा प्रयत्न करतात; पण कोणीच डोकं वापरत नाहीत की, आरे आपल्याकडे आपल्या घरात कार्यक्रम आहे तर गावभर स्पिकर कशासाठी? साधी वाद्य वाजवून खूप नाचायला काय हरकत आहे? पण नाही…

अशा सर्व डोकं न वापरता पैशांचा चुराडा करणारे लोक कोणाच्याचसाठी संवेदनशील नसतात. त्यांना आसाम जळतोय की, स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय ती गरजू असताना बळाचा वापर करून आयुष्य संपवणार्‍या अनेक पुरुषांची संख्या वाढते आहे असे काहीही जाणवत नाही. असे लोक घरात फोटो तर मोठ्या क्रांतिकारक व्यक्ती, समाज सुधारकांचा लावतील; पण आचरण मात्र त्या माणसाला अजिबात न शोभणारे करतील. मित्रहो, दिवसेंदिवस ही असंवेदनशीलता वाढतच आहे. डोकं वापरण्याची नितांत गरज आहे. परवा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी म्हणाले, मला काय त्याचं हे वाक्य वाढलं आहे म्हणून समाज अधिक हिंसक झाला आहे.

हे थांबवायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत पडायला हवं, असं का घडलं याचा विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं आणि असं घडणार नाही यासाठी कृतीत सहभागी व्हायला हवं. ते तर म्हणाले, लफड्यात पडायला नवीन येणार्‍या पिढीला शिकवायलाच पाहिजे. स्वातंत्र्य आंदोलनाच्या लफड्यात शेकडो स्वातंत्र्यसैनिक / सैनिका पडल्या, गुलामगिरी घालवण्यासाठीच्या लफड्यात जोतिबा पडले, स्त्रियांच्या शिक्षणाच्या हक्काच्या लफड्यात सावित्रीबाई आणि जोतिबा पडले, अस्पृश्यता निर्मूलनाच्या लफड्यात बाबासाहेब आणि गांधीजी पडले म्हणून आपण आज सार्वभौम, स्वातंत्र्य असलेल्या देशात सर्व आनंदाने जगत आहोत हे लक्षात ठेवून डोकं वापरायला सुरुवात करायलाच हवी…..

हा देश असाच सर्वसमावेशक, सार्वभौम, सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणारा आणि कायद्यापुढे सर्वांना समान मानणारा ठेवायचा असेल तर मला काय त्यात? असा संकुचित प्रश्न घालून स्वतःला कोंडून न ठेवता आपल्याला लफड्यात पडावेच लागेल आणि डोक्याचा वापर करावाच लागेल. सर्वांना त्यासाठी शुभेच्छा.– अनिता पगारे