घरफिचर्सगीतमितवा एक उषा!

गीतमितवा एक उषा!

Subscribe

उषा खन्नांना संगीत दिग्दर्शनासाठी खूप मोठे मोठे बॅनर्स मिळाले नसतील, पण तरीही त्यांनी जिंदगी प्यार का गीत हैं, तेरे गलियों में ना रखेंगे कदम, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया हैं, मधुबन खुशबू देता हैं यासारखी गाणी केली. हिंदी सिनेमाच्या दुनियेला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. उषा खन्नांची आज ही आठवण निघण्याचं कारण, परवाच त्यांना महाराष्ट्र राज्याचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला...या निमित्ताने त्यांचं मनापासून अभिनंदन!

शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, ओ. पी. नय्यर, सलील चौधरी, सचिन देव बर्मन यांच्यासारखी धडाडीची नावं असण्याचा तो काळ होता. त्यातलं प्रत्येक नाव म्हणजे संगीताच्या भवसागरातलं समृद्ध बेट होतं. त्यांनी हिंदी सिनेमाचं संगीत ऐश्वर्यसंपन्न करून टाकलं होतं. त्यांच्यासमोर इतर कुणाचं नाव येणं ही अशक्यकोटीची बाब होती, पण अशाच काळात एक नाव पुढे आलं आणि तेही एका महिलेचं…आणि तेही एक संगीतकार म्हणून! उषा खन्ना असं ते नाव होतं.

त्या काळात एका महिलेने संगीतकार म्हणून पुढे येणं हे जगातल्या सात आश्चर्यांसारखंच होतं, पण उषा खन्ना नावाची एक हरहुन्नर महिला संधी मिळताच हार्मोनियम घेऊन सगळ्यांच्या कोंडाळ्यात बसली आणि तिने ‘दिल दे के देखो’ नावाच्या सिनेमासाठी आपल्या मनातल्या चाली वाजवून दाखवल्या. त्या सगळ्यांना पसंत पडल्या. शम्मी कपूर-आशा पारेख जोडीचा तो सिनेमा यथावकाश हिट झाला आणि उषा खन्नांचा त्या दिग्गजांच्या मांदियाळीत शिरकाव झाला. तसं पाहिलं तर सरस्वती, जद्दनबाई यांच्या रूपाने आधी महिला संगीतकार मायानगरीत होऊनही गेल्या होत्या. त्यामुळे उषा खन्ना या पहिल्याच महिला संगीतकार नव्हत्या, पण आधी म्हटल्याप्रमाणे शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, ओ. पी. नय्यर, सलील चौधरी, सचिन देव बर्मन यांच्यासारख्यांचा चक्रव्युह भेदून शिरकाव करणं हे अतिशय कठीण काम होतं आणि त्यासाठी तरी तो मान उषा खन्ना यांना द्यावा लागेल.

- Advertisement -

झालं होतं असं की उषा खन्नांचे वडील मनोहर खन्ना हे गीतकार आणि गायकही होते. त्यामुळे घरात संगीताचं वातावरण होतं. या संगीताच्या वातावरणातच उषा खन्नांचं गाणं तरळू लागलं. वडिलांचा गाण्याचा छंद आपण जोपासावा असं त्यांना वाटू लागलं. सुरुवातीला त्यांनी आपल्या गाण्यावर जास्त भर दिलार, पण अधुनमधून त्यांच्या वडिलांच्या गाण्यांना चाली लावण्याचाही त्या प्रयत्न करू लागल्या. विशेषत: वडिलांच्या गझलांना चाली लावणं त्यांना विशेष आवडू लागलं, पण तरीही गाणं, हार्मोनियम घेऊन रियाझ करणं ही त्यांची पहिली पसंती असायची.

पुढे अशीच कुठेतरी त्यांची इंदिवरजींशी ओळख झाली. इंदिवर हे तोपर्यंत एक जानेमाने संगीतकार झाले होते. त्यांची सिनेनगरीतल्या बड्या बड्या असामींशी चांगलीच जानपहेचान होती. उषा खन्नांचा गाणं बजावण्यातला गुण इंदिवरजींच्या लक्षात आला होता. त्यांनी एकदा उषा खन्नांना फिल्मालयचे मालक शशधर मुखर्जींकडे नेलं.

- Advertisement -

‘ही मुलगी छान गाते म्हणून मी आपल्या ऑफिसमध्ये हिला घेऊन आलोय! ‘इंदिवरजी शशधर मुखर्जींना म्हणाले. शशधर मुखर्जींनी एकवार तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘तुम्ही गाणं गाता हे ठीक आहे, पण तुम्ही लता मंगेशकर आणि आशा भोसलेंपेक्षा चांगलं गाऊ शकाल काय?‘

शशधर मुखर्जींंच्या डोक्यात लता-आशा ही चौकट फिट बसलेली होती. ते लता-आशाखेरीज दुसर्‍या कुणाचा विचार करू शकत नव्हते. त्यांना लता-आशापलीकडे दुसरं कुणाचं नाव अजिबात मंजूर नव्हतं. साहजिकच इंदिवरजी त्यांच्या ऑफिसात घेऊन आलेल्या उषा खन्ना नावाच्या मुलीची गायकी त्यांनी साफ निकालात काढून टाकली होती.

बरं, शशधर मुखर्जींच्या त्या थेट प्रश्नावर उषा खन्नांकडेही काही उत्तर असण्याचं कारण नव्हतं. त्यांनी त्या प्रश्नावर ओशाळून काही उत्तरही दिलं नाही. त्यांनी सरळ नकारार्थी मान हलवली. त्याचं कारणही सरळ होतं. लता-आशाइतक्या गाण्याची उंची कुणाची असणार होती!

शशधर मुखर्जींसारख्या रोखठोक माणसाने मग उषा खन्नांना पुढचा रोखठोक प्रश्न विचारला, ‘मग तू या फिल्म इंडस्ट्रीत येऊन काय करणार?’

शशधर मुखर्जींंच्या या प्रश्नावरही उषा खन्ना गप्प बसल्या. खरं तर शशधर मुखर्जींचे प्रश्नच मुळी एखाद्या नवख्या कलाकारासाठी त्याचा हुरूप घालवून टाकणारे होते, पण तितक्यात संगीत दिग्दर्शनाचा विषय निघाला. शशधर मुखर्जी म्हणाले, ‘आज गाण्यात लता-आशा ही आपल्याकडे दोन उत्तुंग शिखरं आहेत, त्यांच्या जवळपास जाणारं दुसरं कुणी नाही, पण संगीत दिग्दर्शनात तशी परिस्थिती नाही. त्यात का नाही कुणी येत?’

इंदिवरजींनी शशधर मुखर्जींच्या बोलण्यातला नेमका हाच धागा पकडला. ते उषा खन्नांकडे बोट दाखवत म्हणाले, ‘ही मुलगी गाण्याच्या चाली वगैरे करते. हिला संगीत दिग्दर्शनात चांगली गती आहे.’

आता मात्र शशधर मुखर्जींनी उषा खन्नांकडे चमकून पाहिलं. त्यांनी उषा खन्नांना त्यांच्या वडिलांच्या गाण्यांना, गझलांना त्यांनी लावलेल्या चाली ऐकवायला सांगितल्या. शशधर मुखर्जींच्या आधीच्या प्रश्नांनी नाउमेद झालेल्या उषा खन्नांची कळी लगेच खुलली. त्या शशधर मुखर्जींना आपण केलेल्या चाली ऐकवण्यासाठी सज्ज झाल्या.

पुढच्याच क्षणी त्यांनी सूर लावला आणि आपण केलेली दोन-तीन गाणी त्यांनी जीव ओतून गायली. मोठ्या अपेक्षेने शशधर मुखर्जींकडे गेलेल्या उषा खन्नांना ही संधी मात्र सोडायचीच नव्हती…आणि ती गाणी ऐकून शशधर मुखर्जींचीही कळी खुलली. त्यांनी उषा खन्नांमधली ती गुणवत्ता, क्षमता ओळखली आणि उषा खन्नांना त्यांनी ‘दिल दे के देखो’ या आपल्या सिनेमासाठी साइन करून टाकलं.

त्या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन करताना उषा खन्नांची ती वाट सरळ नव्हती. त्या मायानगरीतल्या काही गोष्टी समजून घेताना काही जणांनी सरळ सरळ त्यांना अपमानित केलं, टोमणे मारले. काही वेळा उषा खन्ना यांना चक्क रडू आलं, पण त्यांनी चिकाटीने संगीत दिग्दर्शक म्हणून उभं राहायचं ठरवलं. काहींनी तरीही त्यांची निंदानालस्ती करण्याचं आपलं धोरण चालूच ठेवलं. काहींनी त्यांना ओपींची कॉपी म्हणूनही हिणवलं. उषा खन्नांना संगीत दिग्दर्शनासाठी खूप मोठे मोठे बॅनर्स मिळाले नसतील, पण तरीही त्यांनी सौतन, साजन की सहेली, लैलासारखे सिनेमे केले. जिंदगी प्यार का गीत हैं, तेरे गलियों में ना रखेंगे कदम, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया हैं, मधुबन खुशबू देता हैं यासारखी गाणी केली. हिंदी सिनेमाच्या दुनियेला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली.

उषा खन्नांची आज ही आठवण निघण्याचं कारण, परवाच त्यांना महाराष्ट्र राज्याचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला…या निमित्ताने त्यांचं मनापासून अभिनंदन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -