घरफिचर्सगर्भाशयांच्या व्यथांचे गार्‍हाणे!

गर्भाशयांच्या व्यथांचे गार्‍हाणे!

Subscribe

पाळी सुरू आहे आणि त्यामुळे त्रास होतो आहे हे मोकळेपणाने सांगायचे नाही, भावांबापासमोर पाळी सुरू आहे याबद्दल विषयही काढायचा नाही, सारे काही लपूनछपून करायचे, सॅनिटरी पॅडसुद्धा कागदात गुंडाळून स्वतः आणायचे वगैरे गोष्टी लहानसहान आहेतच... पण याच सार्‍या लहानसहान गोष्टींचा एकत्रित परिणाम अखेर टोकाच्या असंवेदनशीलतेत होत असतो हे आपण सर्वांनी आपल्या घरापासून ओळखायला हवे.

गर्भाशय असणे, ते विकसित होऊन गर्भधारणेच्या क्षमतेपोटी मासिक पाळी येणे, ती पाळी येताना कधी असह्य वेदना होणे, गर्भ रहाणे वा न रहाणे, गर्भपात होणे किंवा प्रसूत होणे हे सारे स्त्रियांच्या वाटचे भोग. मातृत्वाच्या सोहळ्याचं कौतुक असतंच. पण त्यापूर्वीच्या सार्‍या भोगांना मात्र तेवढंसं महत्त्व नाही. म्हणजे असं मुलीचा जन्म झाला तर अजूनही अरेरे म्हणणारा बथ्थड समाज अवतीभवती आहे. पण मग त्याच मुलीचं मातृत्व मात्र थोर. मातृत्व म्हणजे देव्हार्‍यात बसवण्याची गोष्ट असा आपल्या थोर संस्कृतीचा आव असतो खरा, पण त्याच मातृत्वाच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या मासिक पाळीबद्दल मात्र बहुतांश समाजात तिरस्कार, तुच्छता अधिक असते आणि काळजी घेण्याची मनःपूर्वक भावना अजिबातच नसते.

काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात कामकरी स्त्रियांच्या बाळंतपणांचा वैताग नको म्हणून त्यांची गर्भाशयेच काढून टाकण्याच्या घटना समोर आल्या आणि देशाला हादरा बसला. त्यावर बसवलेल्या चौकशी समितीचा निर्णय अजूनही यायचाय.

- Advertisement -

 आता एक नवेच प्रकरण तामिळनाडूतील कपडा कारखान्यांमधून समोर आले आहे. पाळीच्या दिवसात पोटात वेठ फिरतात, पायातलं, कंबरेतलं बळ जातं हे तर अनेकींच्या ओळखीचं आहे. विशेषतः पोषण कमी पडत असेल, लोह कमी पडून हिमोग्लोबिन कमी असेल तर हे त्रास वाढतच जातात. घर सांभाळून चार पैसे कमावण्यासाठी बाहेर पडणार्‍या अनेक स्त्रिया या वेदना नकोत, दिवस वाया जायला नको म्हणून दुःखशामक औषधे घेतात. जरा बर्‍या आर्थिक स्तरातील स्त्रिया चांगल्यातली वेदनाशामके घेऊ शकतात, डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकतात. नोकरीची कसलीच सुरक्षा नसलेल्या स्त्रियांचे काय… घरकाम करायला येणार्‍या बायकांनाही निदान काही भल्या घरांतून फार त्रास होत असेल तर चांगल्या वेदनाशामकाची एखादी गोळी सहज मिळून जाते, विशेषतः दुसर्‍या दिवशी वेदनांचा कल्लोळ असतो तेव्हा किंवा मग सुट्टीही घेता येते.

पण संवेदनाहीन कारखान्यांमधून कंत्राटी किंवा रोजगार पद्धतीने कामावर असलेल्या स्त्रिया एकेका दिवसाचा रोजगार बुडू नये म्हणून जीव पाखडत असतात.

- Advertisement -

तामिळनाडू हे आज देशाचे सर्वात मोठे वस्त्र निर्मितीचे केंद्र आहे. तिरुपुर हे सुप्रसिद्ध शहर तयार कपड्यांच्या कारखान्यांनी व्यापलेले आहे. याच कारखान्यांतील ही स्त्रीजन्माची चित्तरकथा थॉम्सन रॉयटर्स फाउंडेशनने समोर आणली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या प्रश्नावर माहिती जमा करण्याचे काम चिकाटीने केले आणि आता हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सोळा-सतराव्या वर्षापासून मुली या कारखान्यांत शिलाईकामावर रुजू होतात. कायद्याने ठरलेल्या तासांपेक्षा अधिक तास काम तर करावेच लागते. कायमस्वरुपी नोकरी नाही, बाकीही नोकरीतले फायदे नाहीत ही रडकथा तर सगळीकडचीच. पण उद्योग क्षेत्रात केलेल्या नियमांनुसार स्त्रिया कामाला असतील तेथे वीस स्त्रियांसाठी एक प्रसाधनगृह असावेच, ते स्वच्छ असावे, स्त्रियांना कामावर असताना सॅनिटरी नॅपकिन्स मिळावीत, औषधपाण्याची सोय प्रशिक्षित नर्स आणि डॉक्टर्सच्या देखरेखीखाली उपलब्ध असावी वगैरे गोष्टींनाही हरताळच फासलेला असतो.

कुणी कितीवेळ प्रसाधनगृहात काढला यावर कावळ्यासारखे लक्ष ठेवून असलेले पुरुष मुकादम या गोष्टीवरून अपमानित करतात, हसतात हे तर नेहमीचेच. कुणाला पोटात दुखत असेल तर सांगायची सोय नाही. सारे मुकाट सोसत रहायचे.

मग यावरचा एक सोप्पा उपाय सर्वांनाच सापडला. दुखणे थांबवण्याच्या गोळ्या. या गोळ्या सहजपणे उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या. दुखणे थांबले की बाई आपली टुणटुणीत काम करू लागते. बाईलाही बरं नि मुकादमांच्या मालकांनाही. श्रमकौशल्य की काय म्हणतात ते हेच.

थॉम्सन रॉयटर्स फाउंडेशनने शंभर स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. त्यांतील अनेकजणींना या गोळ्यांचे दुष्परिणाम जाणवू लागले होते. त्यांचे मासिक चक्र गोळ्या घेऊ लागल्यापासून बिघडून गेले होते. पाळी अनियमित येणे, ताप भरणे, अशक्तपणा, पांढरा स्राव जाणे या तक्रारी वाढल्या तेव्हा काहींनी गोळ्या घेणे बंद केले. आणि दिवस मोडू नये म्हणून गोळ्या घेऊन कमवलेल्या रोजीच्या दुपटीतिपटीने पैसा डॉक्टरकडे जाऊन खर्च होत गेला.

या गोळ्यांवर निर्मात्यांचे नाव, त्यातील घटकद्रव्ये वगैरे काहीही माहिती नसे. मुकादम आपल्यासमोर गोळ्या गिळून टाकण्याचा आग्रह धरत. गोळ्यांचे विश्लेषण अहवाल लेखनात भाग घेणार्‍या डॉक्टरांनी केले तेव्हा ती स्टेरॉयडल नव्हती, त्यात इबुप्रोफेन आणि ऍडविलसारखी काही द्रव्ये असावीत असे त्यांना आढळून आले. पण पॅकेजवर काहीही लिहिलेले नसल्याने नेमकी कोणती औषधी द्रव्ये त्यात होती तेही कळत नाही आणि एक्स्पायरीची तारीख उलटून गेली आहे की नाही तेही कळत नाही. या औषधांच्या दीर्घकालीन वापरामुळे स्त्रियांच्या जननेंद्रियांवर विपरीत परिणाम होतो हे तर सिद्धच झाले आहे.

आता एथिकल ट्रेड इनिशिएटिव्ह या जागतिक संस्थेने तामिळनाडूत घडणारा हा प्रकार उजेडात आल्यावर त्याची दखल घेतली आहे आणि त्यांचे निर्बंध किंवा बंदी जर या उद्योगावर आली तर कठीण परिस्थिती ओढवेल, म्हणून तरी हा प्रकार थांबवण्यासाठी शासन पावले उचलेल अशी शक्यता आहे. हा अहवाल प्रसिद्ध होताच तामिळनाडू सरकारने तातडीने यावर कारवाई करून हे प्रकार थांबतील, आणि पीडित स्त्रियांना उपचार मिळतील असे आश्वासन दिले आहे.

पण हा प्रश्न केवळ इतकाच मर्यादित नाही. स्त्रीची जननक्षमता, त्यामुळे होणारे सारे व्यापताप हे स्त्रियांसकट सर्वांनी सन्मानाने मान्य करून तिची काळजी घेणे हा आधुनिक युगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

अगदी शहरांमध्ये, आर्थिक स्तरांतील विषमतेच्या पार जाऊन पाळी लांबवण्यासाठी, गर्भनिरोधासाठी, वेदना कमी व्हाव्यात म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे सर्रास चालते.

घरात लग्न किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य असेल, गणपती-नवरात्रासारखे लांबलचक सणवार असतील तेव्हा अनेक घरांतून स्त्रिया एकमेकींना सल्ले देतात आणि आपल्या मासिक स्रावाशी खेळ करतात. पाळी म्हणजे भयंकर अपवित्र, अमंगळ आणि म्हणून पाळी सुरू असलेल्या मुलीने, बाईने देवाजवळ जायचं नाही, उत्सवात सहभागी व्हायचं नाही वगैरे कसोशीने पाळले जाते. सार्‍या वातावरणातून बाजूला रहावं लागू नये म्हणून मुली पटापटा पाळी लांबवण्याच्या गोळ्या खातात. आणि उत्सवाचा किंवा सोहळ्याचा काळ संपला की पाळी येऊ देतात. हे सारे आपल्या स्त्रीशरीरविषयक किडक्या दृष्टीकोनातूनच होत असते.

तामिळनाडूतल्या या स्त्रियांना आर्थिक कारणांमुळे विवेक बाजूला ठेवून वेदनाशामके गिळावी लागली हे वाईटच, पण आर्थिक कारणे नसतानाही स्त्रिया हे करतात तेव्हा आपल्या समाजाचा भीषण बथ्थड चेहरा आपल्यासमोर येतो. गर्भलिंग चिकित्सा करून स्त्रीभ्रूण पाडणे, गर्भाशय काढून टाकणे, पाळी लांबवणे, पाळीच्या वेदनांमुळे काम करता येत नाही म्हणून वाटेल तसली औषधे खाणे हे सारे याच चेहर्‍याचे नाकडोळे आहेत. पाळी सुरू आहे, आणि त्यामुळे त्रास होतो आहे हे मोकळेपणाने सांगायचे नाही, भावांबापासमोर पाळी सुरू आहे याबद्दल विषयही काढायचा नाही, सारे काही लपूनछपून करायचे, सॅनिटरी पॅडसुद्धा कागदात गुंडाळून स्वतः आणायचे वगैरे गोष्टी लहानसहान आहेतच… पण याच सार्‍या लहानसहान गोष्टींचा एकत्रित परिणाम अखेर या टोकाच्या असंवेदनशीलतेत होत असतो हे आपण सर्वांनी आपल्या घरापासून ओळखायला हवे.

कोण जाणे आपल्या भोवतीच्या बारीकसारीक कारखान्यांतही असल्या गोष्टी घडत असतील… मुंबईतल्या अनेक टपरीवजा कारखान्यांत काम करणार्‍या अर्धशिक्षित मुली दिवसभर लघवी अडवून ठेवून काम करतात कारण योग्य सोय नसते. पाळीच्या दिवसांत त्यांचे हाल किती असतील कल्पनाच केलेली बरी. त्यांनासुद्धा अशाच पाळीच्या वेदना दूर करणार्‍या बिननावाच्या गोळ्या देणारे कुणी असू शकतील.

सारे सांस्कृतिक राक्षस आपल्या डोळ्यासमोरच वावरत असतात. आणि आपण अंधार पांघरून झोपी जातो. बाईपणाचे भोग म्हणून अंधाराचेच घोट पीत रहातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -