साकव

Subscribe

साकव हे तसं पाहिलं तर गावच्या सौंदर्यात भरच टाकतात. दोन्ही बाजूला पसरलेले मळे, खाली ओसंडून वाहणारी नदी, त्या नदीचं विस्तृत पात्र, खळखळणारे पाणी आणि त्या नदीवरचा साकव. त्या साकवाच्या मध्यावरून त्या नदीच्या पात्राकडे टक लावून बघणारे काही गावकरी. हे वर्णनदेखील किती सुखद वाटतं. हे साकव केवळ दोन वाड्या किवा दोन गाव किंवा दोन तालुके जोडतात असे नव्हे तर हे साकव दोन संस्कृती एकत्र जोडतात. गावातली मनं एकत्र जोडतात.

लहान असताना घरात कोणती वस्तू हवी असली की, घरातले पलीकडे सोनारांच्या दुकानात पाठवायचे. हातात पैसे आणि त्याबरोबर एक सूचना द्यायला विसरत नसत. साकवावरसून सोयन पाय ठेवन जावा हा ….. पलीकडच्या खोलीत आजी बसलेली असायची ती मग या वाक्याला पुस्ती जोडायची साकव निसारडो झालो हा …. मस्ती करत जाशां तर मोटलो खाली पडात.. या साकवाची घरच्यांनी बरीच धास्ती घेतली होती. साकव म्हणजे काही अजब गोष्ट नाही. नदीवर किंवा ओहोळावर बांधलेला लाकडाचा पूल. गावागावातील रहदारी पूर्वी या लाकडी पुलाच्या माध्यमातून व्हायची. अलीकडून पलीकडे जाताना जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडावा लागे.

दोन टोकाला बाजूने मोठी लाकडं टाकून त्यावर बारीक लाकडं आडवी बांधून येजा करायला एक पूल बांधलेला असतो. यालाच कोकणात साकव म्हणतात. हल्ली मुंबईत जुने पूल कोसळून नवे पूल बांधले गेले तसेच कोकणातील गावागावात नवीन पूल बांधले गेले आहेत. जुने साकव कोसळून त्याठिकाणी नवीन चांगले पूल बांधले गेले आहेत. पण साकवाची मजा काय वेगळीच. लाकडाच्या टोणक्यापासून बनवलेले हे साकव वर्षाकाळात मृत्यूची दारं बनतात. अगदी उन्हाळ्याच्या दिवसातदेखील या साकवावरून जाताना कितीतरी वेळा माझा पाय या साकवाच्या फटीत अडकला आहे आणि बरोबरीच्या गड्याने तो काढून घेतला की, मग पुढचा प्रवास होतो. तळकोकणातल्या गावात आजच्या घडीला रस्त्याच्या चौपदरीकरणावर चर्चा सुरू आहे. पण गावातले हे मृत्यूचे जबडे अजूनही उघडेच आहेत.

- Advertisement -

साकव हे तसं पाहिलं तर गावच्या सौदर्यात भरच टाकतात. दोन्ही बाजूला पसरलेले मळे, खाली ओसंडून वाहणारी नदी, त्या नदीचं विस्तृत पात्र, खळखळणारे पाणी आणि त्या नदीवरचा साकव. त्या साकवाच्या मध्यावरून त्या नदीच्या पात्राकडे टक लावून बघणारे काही गावकरी. हे वर्णनदेखील किती सुखद वाटतं. हे साकव केवळ दोन वाड्या किवा दोन गाव किंवा दोन तालुके जोडतात असे नव्हे तर हे साकव दोन संस्कृती एकत्र जोडतात. गावातली मनं एकत्र जोडतात. हे साकव उगाच बदनाम झाले आहेत. गावतल्या प्रेमीयुगुनांना भेटण्याचे ठिकाण म्हणजे हे साकव. याअर्थी साकव बदनाम आहेत. कोणाही युगुलाला साकव जवळचा वाटतो त्याला साकवाची काय चूक?

पावसाळ्यात या साकवावरून तरव्याची पेंडकं फाटीत भरून म्हातारे पाय लटपटत चालू लागतात तेव्हा काळजात प्रचंड कालवाकालव होते. पण या म्हातार्‍या पायांना कुठून तरी हा साकव आपल्याला तारून नेणार याची खात्री असते. साधकाला जशी ही भवनदी तरुन जाण्याचा विश्वास असतो त्यापेक्षाही कित्येक पट या गावकर्‍यांना या साकवाची खात्री असते. पावसाळ्यात रात्रीच्यावेळी जेव्हा मासे पकडण्यासाठी लोक या साकवावरून जाऊ लागतात तेव्हा त्याच्या ठिकाणी असलेली ती खात्री खूप काही सांगून जाते, खाली ओसंडून वाहणारी नदी आणि वर साकवावरून जाणारे गावकरी त्यांची पावलं त्या साकवावर रपरप पडत असतात तेव्हा बहुतेक तो साकवदेखील उसासे टाकत असावा. कारण साकव कोसळला की, खाली पुरात कोण कुठे वाहून जाईल याची कल्पना करवत नाही. तरी गावाचा कारभार या साकवावरून अखंड वाहत असतो. काहीवेळा हा गावकर्‍यांच्या नाइलाजाचा भाग असतो. रोजचा जीवनक्रम तर थांबवू शकत नाही, मग रोज त्या जीवघेण्या कसरती करत साकव ओलांडावा लागतो.

- Advertisement -

शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले पूल ते कोसळतात तिकडे साकवाची काय अवस्था! मुंबईत रेल्वे जशी शहराची जीवनवाहिनी आहे तशी खेडेगावात साकव हे तिथली जीवनवाहिनी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साकव बांधायला कोणी इंजिनिअर बोलावलेला नसतो. गावातली चार पावसाळे अधिक बघितलेली माणसं एकत्र येऊन हाती चार शाळकरी पोरं घेऊन साकव बांधून पूर्ण करतात. हा साकव बांधायला सरकारी अनुदान कधी येईल तेव्हा येवो, पण आज साकव बांधणं गरजेचं आहे. मग चला तर …म्हणत चार मेढी रानातून आणून त्यावर बांबू टाकून एका दिवसात हा साकव बांधला जातो. मेढी पण कुठल्या ? ….तर अशा लाकडाच्या, ज्याच्यावर वाळवी बसणार नाही किंवा जे लाकूड कुजणार नाही. अशा लाकडाची माहिती असणारे अनेक लोक गावात असतात. ही कामगत करण्यासाठी गावातले सगळेच जमा होतात.

मिरगाची तारीख जशी जवळ येऊ लागते तशी वाडीतला साकव बांधायला सुरुवात होते. पहिला पाऊस पडला की, साकवावरून रहदारीला सुरुवात होते. साकवावर लोक दिसू लागतात. कधी नव्हे तो साकव डगमगू लागतो, पण तो पेलून धरतो सर्वांना त्याच्यावर रहदारी करणार्‍यांना, हे मात्र वैशिष्टच आहे. पूर्वी पावसाळा सुरू झाला की, अनेकजण नांगर घेऊन या साकवावर येजा करताना आढळायचे. त्याला कारणदेखील तसंच होतं. अनेक गावातल्या सुतारशाळा या नदीच्या पलीकडे असत. नांगर भरणे, ईशाड करणे ही शेतीची अवजार सुताराकडेच दुरुस्त करून मिळायची. मग त्यासाठी सुताराकडे जावे लागे, त्यासाठी साकवावरून जाणे आलेच. साकव हा ग्रामसंस्कृतीचा एक भाग आहे. तो प्रत्येक गावच्या विकासाशी निगडित आहे. त्या संस्कृतीचा अन्वयार्थ निराळ्या पद्धतीने लावता येतो. कितीतरी वेळा साकवावरून येताना आणि जाताना कोणी समोरासमोर आले की, समजुतीने कसं घ्यावं हे साकव शिकवतो.

मोठमोठे पूल बांधताना या साकवांना कसं विसरून चालेल? इतकी वर्षे हे साकव समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. या साकवावर पाणी आलं की, शाळेला सुट्टी! खेड्यातल्या लहान मुलांची पावसाची सुट्टी मिमी एककात मोजली जात नाही, ती साकवावर जमा होणार्‍या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्या निसरड्या साकवावरून दप्तर आणि छत्री सांभाळत साकव पार करण्यात जी मजा असते ती शब्दात सांगणे खरच कठीण आहे.

या साकवाचा खरा उपयोग भाद्रपद महिन्यात गणपती आणण्यासाठी होतो. गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन अगदी एकेक पाउल जपून टाकत त्या साकवावरून गणपती सुखरूप घरी आणणं म्हणजे एक मोठ्ठ दिव्यच म्हणावं लागेल. मागून गणपती बाप्पा मोरया म्हणून ओरडत कोणातरी मुलाचा पाय घसरतो आणि इतर सगळे हसू लागतात तेव्हा गणपतीची कथा आठवायला लागते. घसरलेला गडी पँन्टीला लागलेला चिखल झाडत पुन्हा उभा रहातो आणि बेंबीच्या टोकापसून ओरडायला लागतो, गणपती बाप्पा मोरया. साकवाची ही गंमत न्यारीच आहे. या साकवांनी दोन संस्कृती एकत्र जोडल्या. एक समाज एकोप्याचा मूलमंत्र गावागावात रूढ केला. संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेऊन जबाबदारी कशी पार पाडायची ही शिकवण साकवाने दिली. निसर्ग आपल्याला भरभरून शिकवत असतो. आम्ही फक्त त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघत नाही.

आज लोखंडी पुलांची बांधकामे जोरात सुरु असताना साकव संस्कृती जरी लोप पावत असली तरी अजूनही दुथडी भरून वाहणारा ओहोळ पार करायला साकवाशिवाय पर्याय नाही. ठिकठिकाणी सरकारी कागदावर पूल बांधलेले आहेत, पुलांची उद्घाटने झाली आहेत, पण हे पूल अजूनही अस्तित्वात नाहीत. आजही दादा मडकईकरची मालवणी कविता आठवते.

तारया मामा तारया मामा
होडी हाड रे
बेगिन पोचय माका पैलाडी रे……
आजही पलीकडे जायला साकव नाहीतर होडीत बसून जावे लागते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -