घरफिचर्ससूर्य पाहिलेला माणूस

सूर्य पाहिलेला माणूस

Subscribe

१२ फ्रेब्रुवारी २००२ या दिवशी ’सूर्य पाहिलेला माणूस’चा शंभरावा आणि शेवटचा प्रयोग करायचा असे ठरवून तो प्रयोग मुंबईला ’शिवाजी मंदिर’ या दादरच्या नाट्यगृहात केला. प्रमुख पाहुणे मेधा पाटकर, जावेद अख्तर, गुलजार आणि साने गुरूजी स्मारक समितीचे कार्यवाह गजानन खातू. ’शिवाजी मंदिर’चा हाऊसफुल्ल प्रयोग आणि प्रयोगाच्या शेवटी संबंध प्रेक्षागृहाने उत्स्फूर्तपणे उभे राहून केलेला टाळ्यांचा प्रचंड गजर! हुंदका आवरता आवरेना ! नाटकाचे उत्पन्न, खर्च वजा करून ’नर्मदा बचाव आंदोलन’ आणि ’साने गुरूजी-स्मारक’ या दोन मोठ्या कार्यांना देऊन टाकले. दोघांना चाळीस, चाळीस हजार! नाटकाच्या एकंदर कारकिर्दीवर कळस चढवणारा शेवट झाला. सन्मानाने आणि अतीव समाधानाने नाटक बंद केले. असा हा आजपर्यंतचा सगळा नाट्यप्रवास झाला. म्हणजे, तो आता संपला असे नाही; पण पुढे चालू राहिलच याची खात्री नाही. कारण आता या वयात आपल्याला साजेलशा आणि झेपतीलशा भूमिका मिळणे कठीण वाटते. आणि आपल्याला आवडेल तीच आणि शोभेल तीच भूमिका करायची, हा हट्ट कायम आहेच. ’ तुघलक’ किंवा ’फुलराणी’तला प्रा. जागीरदार करायला मिळाला नाही याची फार खंत वाटते; पण आता या वयात, त्या भूमिका मिळाल्या तरी त्या करणे म्हणजे मुर्खपणा होईल! ज्या करायला मिळाल्या त्यातही प्रचंड तोलामोलाच्या होत्याच की! फार आधाशीपणा करणेही बरे नाही! म्हणजे आता निवृत्ती पत्करावी लागली तरी ना खंत ना खेद या वृत्तीने पत्करता येईल.

पन्नासेक वर्षांपेक्षा अधिक काळ अव्याहत चाललेला हा नाट्यप्रवास अगदीच भाकड होता असे कुणालाच म्हणता येणार नाही. केवळ माझ्या वैयक्तिक दृष्टीने पाहिले, तर या प्रवासाने मला खूप भरभरून दिले. खरे म्हणजे माझ्या जीवनाला सुंदर अर्थ दिला. ‘मी कृतार्थ आहे’, असे अजिबात अतिशयोक्ती न करता किंवा अलंकारिकतेला स्पर्शही न करता, मी म्हणू शकतो !आपल्याला नेमके काय करायचे आहे- जीवनाचा गाभा उजळून टाकणारे, आत्यंतिक मनापासून काय करायचे आहे याचा साक्षात्कार व्हायला खूप वेळ लागला हे खरे. नाटक अभिनय याला आपल्या आयुष्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान आहे, हा आपल्या आयुष्याचा मुलाधार आहे हे ठामपणे जाणवून, तो मार्ग पकडायला आयुष्याची बेचाळीस वर्षे जावी लागली ! पण उशिरा का होईना हा साक्षात्कार झाला! आणि तो झाल्यानंतर पुढचे सगळे आयुष्य त्या मार्गावरून प्रवास करता आला हे भाग्यच. फार थोड्यांच्या वाट्याला ते येते. मी कृतज्ञ आहे.

वैयक्तिकदृष्ट्या, माझे संबंध आयुष्य रंगभूमीने उजळून टाकले; पण मी रंगभूमीला काय दिले? बाकी सगळ्या वाटा सोडून मी ही रंगभूमीची, निबिड जंगलातून जाणारी, खडतर तरीही रमणीय वाट पकडली आणि आयुष्यभर त्या वाटेने प्रवास करत राहिलो ते काही केवळ स्वतःला आनंद मिळावा, समाधान मिळावे एवढ्याच माफक हेतूने नव्हे, तर रंगभूमी या माध्यमाचे, समाजाच्या सांस्कृतिक जीवनात जे महत्त्वाचे स्थान आहे आणि ज्या स्थानावरून ती आज भ्रष्ट झालेली दिसते आहे ते स्थान तिला सन्मानाने परत मिळवून द्यावे, या महत्त्वाकांक्षेने देखील! अर्थात ही महत्त्वाकांक्षा काही सुरुवातीपासून नव्हती. सुरुवातीला फक्त, नाटक करायला अद्भूत आनंद प्राप्त करण्याची आत्यंतिक निकड तेवढी जाणवायची. पण जसजशी नाटके करत गेलो, मराठी आणि पाश्चात्य रंगभूमीची एकूण परिस्थिती लक्षात घेऊ लागलो, तसतशी ही महत्त्वाकांक्षा मनात उमलून आली.

- Advertisement -

‘नाटक हा डोळ्यांनी आणि कानांनी करण्याचा यज्ञ आहे,’ असे महाकवी कालिदासाने म्हटले होते, हे मला माहीत होते. वैदिक संस्कृतीच्या काळात यज्ञाला जे महत्त्व होते ते कालिदासाने ‘नाटक’ या कलाप्रकाराला दिले. इतके महत्त्व जर नाटकाला हजार-बाराशे वर्षांपूर्वी समाजात होते तर ते महत्त्व नाहीसे होत होते, नाटक हा एक हलक्या दर्जाच्या लोकांनी, हलक्या दर्जाची करमणूक करण्याचा सवंग प्रकार कधी आणि कसा झाला? पाश्चात्य समाजात तो इतका अभिजात आणि प्रतिष्ठित कलाप्रकार कसा मानला जातो? आपल्या देशात तो आज तसा मानला जात नसेल तर त्याला ते पूर्वीचे स्थान प्राप्त करून द्यायला नको का? मग ते कुणी करायचे? लोकशाही समाजात, सधन आणि सुसंस्कृत शासन त्याच्या पाठीशी उभे असले पाहिजे हे तर खरेच आहे; पण आम्ही नाटकवाल्यांनी त्यासाठी जिवापाड प्रयत्न करायला हवेत, ते आम्ही करतो का? त्यासाठी आम्ही नुसते रंगकर्मी असून पुरेसे नाही तर, अत्यंत धार्मिक असे रंगधर्मी असायला हवे! ते आम्ही आहोत का? आम्ही फक्त पैसा, प्रसिद्धी, सरकार-दरबारी प्रतिष्ठा असल्या गोष्टींच्या मागे लागून नाट्यकलेला तिची खरी प्रतिष्ठा समाजाला अधिकाधिक सुसंस्कृत, शहाणे, सभ्य, विवेकी बनवण्याचे तिचे अंगभूत कार्य तिला परत बहाल करण्याच्या आमच्या महत्त्वाच्या कार्यात कुचराई आहोत की नाही?

नाट्य व्यवसायात कुणी कसलीच खात्री देऊ शकत नाही आणि त्यामुळे, ‘सुगीच्या दिवसात जास्तीत जास्त कमाई करून घ्या, उद्याचे कोणी सांगितले आहे?’ अशी बहुतेक व्यावसायिकांची वृत्ती असते आणि आजच्या परिस्थितीत ते साहजिकही आहे. पण या व्यवसायात व्यावसायिकांच्या स्थैर्याची खात्री देणारी काही यंत्रणा उभी राहू शकली, मग ती शासकीय असो वा अशासकीय असो- तर व्यावसायिक कलावंतांना केवळ आपल्या प्रतिभेला साक्षी राहून आपले सर्वस्व केवळ कलेच्या सर्वोच्च आविष्कारात गुंतविता येईल. केवळ कर्मकांडात अडकून पडलेले रंगकर्मी न राहता खर्‍या अर्थाने रंगधर्मी म्हणून जगता येईल.आपल्या देशात सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परिस्थितीकडे पाहता नाट्य व्यावसायिकांसाठी अशी काही स्थैर्याची यंत्रणा शासकीय पातळीवर उभी राहणे सध्या तरी अशक्य दिसते. आणि समाजातल्या धनवंतांना या कामाची निकड पटवून देण्याइतकी शक्ती आज तरी रंगधर्मीयांत दिसत नाही. पण निदान, ‘रंग-कलेला तिची ‘यज्ञा’ची प्रतिष्ठा परत मिळवून द्यायची आहे.’ या ध्येयावरून नजर ढळू तरी नये.

- Advertisement -

अर्थात, खर्‍या धार्मिकांनी स्थैर्याची अपेक्षा करावीच का? हा प्रश्न आहेच! खर्‍या अर्थाने धार्मिक असण्यातच धार्मिकतेचे सार्थक असायला हवे. मग तो रंगधर्म असो किंवा आध्यात्मिक धर्म! मग कला हा धर्म मानायचा तर कलेची निरपवादपणे साधना करायचे सोडून, अंधश्रद्धा-निर्मूलन, सामाजिक कृतज्ञता निधी असल्या उचापती कशाला कराव्यात? मेधा पाटकरांनी सांगितले म्हणून, सगळे उद्योग सोडून मणिबेलीला कशाला जायचे? अण्णा हजारेंबरोबर उपोषणाला का बसायचे? डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर शनीशिंगणापूरच्या सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास का पत्करायचा? बाबा आढावांच्या एकात्मता मोर्चात का सामील व्हायचे? ताहिर पूनावालांसारख्या निधर्मी आणि म्हणून बहिष्कृत मुसलमानाबरोबर का नाते जोडायचे? रझिया पटेलसारख्या निधर्मी आणि म्हणून मुसलमान स्त्रीबरोबर का बंधुभाव जपायचा? कलेच्या साधनेत या गोष्टी कुठे बसतात? अभिनय-साधनेत तर नक्कीच बसतात! नव्हे आवश्यक आहेत!

नटाने अ‍ॅथलीट-फिलॉसॉफर असले पाहिजे ना? अ‍ॅथलीट असण्यासाठी सातत्याने शरीराची काळजी घेतली पाहिजे. नियमित आणि संतुलित आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे हे जसे आवश्यक आहे, तसेच ‘फिलॉसॉफर’ असण्यासाठी सातत्याने वाचन, मनन, चिंतन करत राहिले पाहिजे. भोवतालच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदी परिस्थितीचे डोळस भान ठेवून तिच्याशी आपली नाळ जोडलेली असली पाहिजे, आपल्या जीवनविषयक जाणिवा जास्त जास्त समृद्ध, संपन्न करत राहिले पाहिजे. कलावंताने आपला हस्तिदंती मनोरा बांधून त्यात बंदिवान होऊन राहता कामा नये, त्याने जास्तीत जास्त जीवनाभिमुख राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः अभिनेत्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की जितके स्वतंत्र, समृद्ध, संपन्न असे त्याचे भावविश्व – विचारविश्व असेल, तितका समृद्ध, संपन्न असा त्याचा अभिनय असणार! तंत्रावर त्याची हुकूमत असो- पण व्यक्तिमत्त्व संपन्न नसेल तर त्याचा अभिनय समर्थ असणार नाही.

पाश्चात्य रंगभूमीला आज असलेली संपन्नता आणि समृद्धी कधी काळी आपल्या रंगभूमीला प्राप्त झाली, आणि शासनालाही, रंगभूमीचे सांस्कृतिक महत्त्व कळले आणि तिला तिचे ‘यज्ञा’चे स्थान पुन्हा बहाल करण्याइतकी सुबत्ता प्राप्त झाली तर इथे रंगधर्मीची चणचण भासता कामा नये, या ध्येयाने रंगभूमीशी संबंधित प्रत्येक कार्यकर्त्याने ‘रंगधर्मी’ होण्याचा ध्यास घेतला पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची व्यापकता, खोली आणि स्पष्टता वाढवली पाहिजे. म्हणजे आमच्या सारख्यांचे निवृत्त होणे फारसे जाणवणार नाही. प्रत्येक रंगकर्मीने ‘रंगधर्मी’ होण्याचा ध्यास घेतला पाहिजे. हे जसे महत्त्वाचे आहे तसेच नाटकाच्या प्रेक्षकाचे प्रबोधन करणे हेही महत्त्वाचे आहे! आणि ती जबाबदारी नाटकवाल्यांनी संघटितपणे उचलली पाहिजे.
‘नाटक’ ही एक सांघिक कलाकृती आहे हा विचार आपण आता स्वीकारला आहे. पण त्याच्या पुरेशा खोलात आपण शिरलेलो नाही. सांघिक कलाकृतीच्या या संघात आपण नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, नटसंच, नेपथ्यकार, प्रकाश-योजना, रंगभूषा या सगळ्या घटकांचा पुरेशा गांभीर्याने विचार करू लागलो आहोत ही जमेची बाजू आहे. परंतु या संघाचा आत्यंतिक महत्त्वाचा घटक जो ’प्रेक्षक’, त्याचा विचार मात्र आपण गांभीर्याने केलेला दिसत नाही. एकतर आपण प्रेक्षकाला ‘मायबाप- अन्नदाते’ असे संबोधून त्याची लाचारी पत्करली; किंवा पुढे नवनाट्याच्या काळात ‘प्रेक्षक गेले उडत! आम्ही प्रेक्षकांसाठी नाटक करीतच नाही,‘असे म्हणत त्या घटकाला आपल्यापासून तोडूनच टाकले! नाटकवाल्यांच्या नव्या नाटकाबद्दलच्या कल्पना, त्याबद्दलचे विचार, नवनाट्यामागच्या प्रेरणा, त्याचे स्वरूप, त्यातला सघन आशय आणि जीवनावश्यक जाणिवांबरोबर बदलत जाणारी नाटकांची मांडणी, नाटक या कलामाध्यमाचे गांभीर्य, त्याचे मानवी संस्कृतीमधले महत्त्वाचे स्थान, जीवनविषयक जाणिवा अधिकाधिक संपन्न करण्याची नाटकाची ताकद, या सार्‍या गोष्टींबद्दल आपण प्रेक्षकाला विश्वातच घेतले नाही! नाटकाने प्रेक्षकांची करमणूक केली पाहिजे आणि कसला तरी टाळ्याखाऊ ‘संदेश’ प्रेक्षकांना दिला पाहिजे. एवढेच पुरेसे नाही तर नाटकाने प्रेक्षकाला अधिक सुसंस्कृत केले पाहिजे. आणि प्रेक्षकाने सुसंसकृत होण्यासाठी उत्सुक झाले पाहिजे !

मला वाटते, भारतीय समाजात हे ध्येय फार दूरचे आहे. संपूर्ण समाजपरिवर्तनाचेच हे काम आहे. पण रंगधर्मीयांनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे. कारण आजच्या या माथेफिरू अण्वस्त्र स्पर्धेच्या युगामध्ये मनुष्यप्राणी जर या पृथ्वीच्या पाठीवर टिकून राहायचा असेल तर त्याला अन्न-वस्त्र-निवारा या जीवनावश्यक गोष्टींपेक्षा, सुसंस्कृत होण्याची निकड जास्त आहे ! हे लिहित असतानाच परवा माझ्याकडे एक नवीन नाटक माझ्याकडे आले आहे. चांगले असावेसे वाटते आहे. मी त्यात काम करावे अशी नाटककाराची इच्छा आहे. माझ्या वयाच्या माणसाचेच काम आहे. मलाही मोह होतो आहे! ऑस्कर वाईल्डने म्हटलेच आहे. ‘द ओन्ली वे टु डी विथ टेम्पटेशन इज टु यील्ड टु इट! ” आव्हान टाळणे काही खरे नाही! हे आपले विश्व आणि त्याचा सारा पसारा हा अनादिअनंत आणि आपल्या कल्पनेच्या कल्पनेतही मावणार नाही एवढा अमर्याद आहे, हे खरेच आहे. त्याच्या संदर्भात माझ्यासारखा, नाटककाराचा मोल प्रेक्षकाकडे नेऊन टाकणार्‍या, एका लमाणाचे आयुष्य, एखाद्या धूलिकणाइतके नगण्य आणि क्षुद्र आहे हेही खरेच आहे.या मानवी आयुष्यात ’सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे’ हेही निरपवाद सत्यच आहे. पण, अगदी अंतःकरणाच्या गाभ्यापासून कराव्याशा वाटणार्‍या एखाद्या गोष्टीचा आयुष्यभर पाठपुरावा करता येण्याचे भाग्य लाभणे, यातले सुख ’जवापाडे’ असले तरी त्या तीळभर सुखात ’पर्वता एवढ्या दुःखाला’ शरमेने मान खाली घालायला लावण्याचे सामर्थ्य असते, हा केवळ दिलासा आहे!

( डॉ. श्रीराम लागू यांच्या ’लमाण’ या आत्मचरित्रातील एक भाग )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -