घरफिचर्सहे विघ्नहर्ता, व्यवस्थेला सुबुद्धी दे बस्स..!

हे विघ्नहर्ता, व्यवस्थेला सुबुद्धी दे बस्स..!

Subscribe

बाप्पा,आपलं आगमन समीप येऊन ठेपलंय. आम्ही तुझी डोळ्यात तेल घालून वाट बघतोय. आता आमचा रक्षणकर्ता तूच आहेस हे ध्यानात घेऊन तू ये.. हे विनायका, आम्ही तुझं स्वागत नेहमीच्या थाटात करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला माफ कर. आपण शुर्पकर्ण असला तरी नेहमी ढोल-ताशांच्या गजरात आपल्याही कानठळ्या बसत असणारच. यंदा ढोल-ताशांचा हा धुमधडाका तुला ऐकू येणार नाही. पण तरीही तू सुखावणार नाहीस. यंदा तुझ्या आगमनावेळीही खूपच सुनं-सुनं वातावरण आहे. मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये लगबग दिसून येत नाही की, बाजारपेठेतही तुझ्या येण्यानं ऊर्जा संचारलेली नाही. वातावरणात भयाण शांतता आहे.

हे आरोग्यदाता, तू भक्तांच्या आरोग्याची काळजी वाहतोस हे मान्य आहे; पण यंदा तूच जरा प्रकृतीला सांभाळ रे बाबा. कोरोनाच्या वैश्विक महामारीनं जगभर थैमान घातल्यानं तू सोंडेला चांगल्या प्रतीचा मलम लावून ये. येताना मोठासा मास्क लाव. सॅनिटायझरचे ‘तिर्थ’ही सोबत असू दे.. हे संकटमोचका, हे संकट इतकं मोठं आहे की, तुझ्या दर्शनालाही आम्ही मोहताज होतोय. तुझे मंदिरांचं व्दारच बंद असल्यानं आम्ही आता घरच्या घरीच तुझा धावा करतोय. पण तुझी कमी आमचे आरोग्यसेवक आणि पोलीस बांधव भरून काढताहेत. दिवसरात्र जीवाचे रान करून ते आमचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे या आरोग्यसेवकांना आणि पोलिसांनाच आम्ही सध्या तुझ्या रूपात बघतोय. त्यांना अनुभवतोय. पण या क्षेत्रातील काही राक्षसी वृत्तीच्या डॉक्टरांनी देवतांचं सोंग पांघरलंय. त्यांना ओळखणं जरा कठीण होऊन बसलंय. त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. पण या मंडळींनी त्यांची ‘दक्षिणा’ आमच्या भेदरलेपणाचा फायदा घेत  वाढवलीय. रयतेच्या श्रद्धेचं ही मंडळी श्राद्ध घालतायत. अशा लोभी डॉक्टरांना सुबुद्धी दे. त्यांना म्हणा काही मूठभर अपप्रवृत्तींमुळे पुण्याचे काम करणार्‍या समस्त डॉक्टर जमातीकडे संशयानं बघितलं जातंय. त्यांच्यावर हल्ले होतायत. त्यामुळे नैतिकतेच्या पलीकडील अनैतिकतेचं क्षितीज गाठणार्‍यांना बाप्पा खरंच सुबुद्धी दे..

- Advertisement -

हे लंबोदरा, हे महोदरा, तुझी लीला अगाध आहे. तुझी माया अतर्क्य आहे. तशीच प्रशासकीय बाबूंचीही लीला अगाध आहे. या लीलेतून त्यांनी रयतेची प्रचंड ‘माया’ संकलित केलीय. कोरोनाचा काळही याला अपवाद ठरत नाहीये. ही माया कोणकोणत्या मार्गाने जमा होतोय हे आम्हा बापुड्यांसाठी अतर्क्यच आहे. या मायेनेच ही मंडळी लंबोदर झाली आहेत. त्यांचे उदर ‘मायेनं’ इतके भरलेय की त्याचा आतल्या आत कधी विस्फोट होईल याचा नेम नाही. कोरोनाच्या साधन-सामग्री खरेदीतही खाबुगीरी सुरू आहे. पण आज निकड आहे ती सामग्रीची. त्यामुळे आम्हाला सगळं कळत असूनही रुग्णहित लक्षात घेऊन नाईलाजास्तव तोंडावर बोट ठेवावं लागतंय. पीपीई किटच्या नावानं रुग्णांची अक्षरश: लुबाडणूक सुरू आहे. अव्वाच्या सव्वा बिले रुग्णांच्या हातात देत त्यांना कंगाल केलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं प्रशासनाला ठाऊक असूनही संबंधित हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई होत नाही. यातच सारं काही आलं. म्हणूनच प्रशासनाला सुबुद्धी दे. कोरोनानंतर या लंब उदरातून मोठी ‘साधनसामुग्री’ बाहेर येईलच म्हणा ! दुसरीकडे या काळात स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचीही ‘प्रसाद’ सर्वत्र वाटला जातोय. ते टाळण्यासाठी आमचे सरकारी बाबू काळजी वाहत नाहीत, असे बिलकूलच नाही. औषध फवारणीचे कोटी-कोटी खर्चाचे कंत्राट देऊन साथ आटोक्यात आणण्याचा ही मंडळी आटोकाट प्रयत्न करताहेत; पण या औषधांनी डास मरतच नाहीत. उलट ते मदिराप्राशन केल्यागत काही काळ झुलतात अन् नंतर पुन्हा नव्या दमानं चावण्यासाठी सज्ज होतात. त्याला प्रशासन ते काय करणार? बरं, त्यात ठेकेदाराचीही काय चूक. त्याला मिळणार्‍या निधीतून इतके वाटप करावे लागते की फवारणीच्या औषधालाही निधी शिल्लक राहत नाही. अशा वेळी तो औषधात पाणी ओतणार नाही तर मग काय करणार? त्यापेक्षा तूच हातापायांना क्रीम लावून मंडपात बस.

हे सुखकर्त्या, तू दु:खहर्ता आहेस. पण याचा प्रत्यय आम्हाला येताना सध्या तरी दिसत नाही. सत्ताधारी आणि त्यांना लटका विरोध करणार्‍यांच्या ‘सुखा’ला आणि रयतेच्या दु:खाला पारावार उरलेला नाही. या संकटकाळातही राजकारण करणं ही मंडळी सोडत नाही. या काळात आरोग्य सेवेला प्राधान्य देणं गरजेचं असताना कुणाला खुर्चीवरून खाली खेचायचं, कुणाच्या नातवाला फितूर करायचं, कुणाच्या आत्महत्येचं ‘भांडवल’ करायचं, कुणाला  सीबीआय चौकशीपासून वाचवायचं, कुणाला पाण्यात बघायचं आणि कुणाला पाणी पाजायचं हे आणि यासारखी असंख्य खलबतं या काळातही अव्याहतपणे सुरूच आहेत. हे काम जितकं प्रभावीपणे सुरू आहे, तितकं प्रभावीपणे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही हे देखील खरं. लोक रस्त्यावर मरो वा तडफडो, त्यांना हॉस्पिटल मिळो वा ना मिळो, त्यांना व्हेंटिलेटर्स मिळो वा श्वास कोंडो, या मंडळींना त्याच्याशी काहीएक देणंघेणं नाही. या उलट ‘देणंघेणं’च्या विषयात हे सर्वच एकदिलाने एकत्र येतात, हे तुला नव्यानं सांगायला नको !

- Advertisement -

हे बुद्धिदायिनी देवता, सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो श्री गणेश तो तूच आहेस; तूच महामती आहेस. पण कारभार्‍यांच्या बाबतीतच तू ‘लोडशेडिंग’ का करतोस, हे गणित उमजतच नाही. बाप्पा, ही मंडळी बुद्धीचा वापर करीत नाहीत, असा तुझा गैरसमज असेल, तर तो तू कृपया काढून टाक. ही मंडळी बुद्धीचा वापर तहकूब प्रस्ताव गुपचूप मंजूर करण्यासाठी, इच्छित कंत्राटदाराला ठेका मिळवून देण्यासाठी आणि पदोन्नती तालिकेतील अखेरच्या क्रमांकाच्या अधिकार्‍याला पहिल्या क्रमांकावर आणून ठेवण्यासाठी करीत असतात.  कोरोनाकाळातही हे सारं सुरूच आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेला दाद द्यावी तितकी थोडीच आहे. राज्याचा विकासाचा आराखडा ही मंडळी करणार नाहीत; पण टक्केवारीची समीकरणं मात्र चुटकीसरशी सोडवतात, हे विशेष. या मंडळींना सुबुद्धी दे.

हे संकटमोचना, जगातील सार्‍याच संकटांचा तारणहार तूच आहेस; पण येत्या चतुर्थीच्या दिवशी वाहनांच्या गर्दीला ‘ओव्हरटेक’ करण्यात तुमच्या मूषकराजाची खूप दमछाक होणार याची खूणगाठ आजच बांधून ठेव. कारण पावसानंतर आता रस्तेच असे झालेयत की रस्त्यांना छोटेखानी पर्वतरांगांचं स्वरूप आलंय. हे पर्वत आणि त्यांच्याजवळील दर्‍या पार करताना त्याला किती कष्ट सहन करावे लागतील याची कल्पनाच न केलेली बरी. लॉकडाऊनमुळे रस्ते रिकामे आहेत, त्यामुळे मूषक ‘पार्क’ करायला जागा मिळेल वगैरेसारख्या कल्पना तू करू नकोस. कारण आम्ही आजही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर हिंडतोय. ट्रॅफिक नेहमीसारखीच जाम होतेय. गर्दीतून कोरोनाचा फैलाव झाला तरी बेहत्तर, पण आम्ही आमचा बेशिस्तपणा सोडणार नाही, असाच जणू संकल्प आम्ही केलाय. त्यामुळे बाप्पा मूषक राजांना कोठून आणायचे याचा रस्ता तू आजच शोधून ठेव. मूषक राजांना अगदीच टेन्शन आलं तर ‘मेट्रो’, ‘निओ मेट्रो’ येतेय म्हणा, शहरात. त्याचा वापर माणसांना किती होईल यात साशंकता आहे, पण उंदरांना मात्र हक्काची जागा मिळेल हे निश्चित.

हे शक्तीदाता, भक्तांना मानसिक बळ देण्याचं महत् कार्य तूच करतोस. मात्र, सध्या कोरोनाच्या बातम्या ऐकून ऐकून आमचं बळ पुरतं गळून गेलंय. रोजच मृत्यूच्या तांडवांचं ‘टेलिकास्ट’ आता असह्य होतंय. कोरोनाच्या भीतीपेक्षा आम्हाला सामाजिक बहिष्काराच्या भीतीनं अधिक पछाडलंय. त्यातून रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होतेय. केवळ लोकांनी बहिष्कृत करू नये म्हणून अनेक रुग्ण कोरोना चाचणी न करता घरगुती उपाय करतायत. त्यातून हे संकट अधिक गहिरं होत चाललंय. हे विघ्नहर्त्या, लोकांच्या बुद्धीत प्रकाश टाक. बहिष्कार टाकणार्‍यांना म्हणावं, तुमच्याही कुटुंबात असा बाका प्रसंग उद्भवू शकतो. तुम्हालाही शेजारच्यांची मदत लागू शकते. अशा वेळी शेजारधर्म पाळला गेला नाही तर तुम्हीही हतबल व्हाल.. हे गणराया, अशा स्वार्थी शेजार्‍यांना सदबुद्धी दे..

हे कृष्णपिंगाक्षा, तुझ्या काळेभोर अन् नक्षीदार नयनांची मोहिनी सार्‍यांनाच पडते. या नयनांनी तू विश्वावर लक्ष ठेवतो. पण आता आमच्या नयनांमधील आसवं पुसण्यासाठी तू आमच्यात ये. आमच्या डोळ्यातील दु:ख समजून घेण्याची ताकद ‘व्यवस्थे’ला दे. या काळात कुणाचे पितृछत्र हरपलंय, तर कुणी मातृप्रेमाला पोरकं झालंय, कुणी आपल्या बछड्यांना गमावलं, तर कुठं सख्या शेजार्‍यांना हिरावून नेलं. या सर्वांच्याच कुटुंबियांना हे अभाळाएवढं दु:ख पेलण्याची शक्ती दे.. त्यांना या दु:खातून बाहेर काढण्याचे बळ दे.. हे विघ्नाधिपती, तू एकाएकी चमत्कार घडव आणि आलेल्या संकटाचा नाश कर अशी अपेक्षा आम्ही मुुळीच करणार नाही. हे संकट आम्हीच ओढवलंय. तुझ्या निसर्ग नियमांना आम्हीच फाटा दिलाय. तू बनवलेल्या सृष्टीशी आम्हीच खेळलोय. त्यामुळे तुला दोष देणार नाही की तुझ्या अस्तित्वावर शंकाही घेणार नाही, पण या काळात ‘संकट हीच संधी’ समजणार्‍यांना सुबुद्धी दे इतकंच कर, बस्स !

हे विघ्नहर्ता, व्यवस्थेला सुबुद्धी दे बस्स..!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/hemant-bhosale/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -