गोखलेंचं पुराण!

vikram gokhale Explanation in his comment kangana right about india freedom in 2014
गोखलेंचं पुराण!

1947 च्या भारतीय स्वातंत्र्याचं महत्व न कळलेल्यांची सध्या धावाधाव सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने भारतीय स्वातंत्र्यावर चिखलफेक केल्यावर तिचं म्हणणं खरं ठरवणारे मराठी कलावंत विक्रम गोखले यांचीही धावपळ सुरू आहे. प्रचंड आणि प्रखर टीकेने त्यांचे कान अक्षरशः बेकाम झालेत. कंगनाच्या म्हणण्याचं समर्थन करणं किती महाग जातं याची जाणीव गोखलेंना आता झाली असावी. तरी शेपूट सरळ व्हायचं नाव घेत नाही. स्वातंत्र्याच्या संग्रामाला कमी लेखणं हे आपल्यावर शेकेल याची जाणीव गोखलेंना झाली नाही असं नाही. अनेकदा काही व्यक्ती चिखलावर दगड भिरकावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. तेव्हा त्याचे परिणाम काय होतील याचा विचार ते करत नाहीत. नको त्या विषयावर उफराटं बोललं की आपण खूप महान आहोत, असं काहींना वाटत असतं. त्याच कुळातले आपण आहोत, गोखलेंची एकूणच देहबोली हेच सांगते. कंगना काय चिज आहे, हे सार्‍या देशाने विशेषत: महाराष्ट्राने गेल्या दीड वर्षात पाहिलं आहे. अशा समज नसलेल्या कलाकाराच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचं याचं भान गोखलेंसारख्यांनी ठेवायला हवं होतं.

आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा तीच री ओढणं आणि कंगना योग्य होती, असं सांगणं हा कोडगेपणा झाला. याच कोडगेपणाने देशभर काहूर माजले आणि स्पष्टीकरणाची वेळ ओढावली हे गोखले लक्षात घेणार आहेत की नाहीत? निर्लज्ज व्यक्तीला याची गरज नसते. कंगनाने तो निर्लज्जपणा जोपासलाही असेल. पण गोखलेंचं तसं नाही. ते सुशिक्षित आणि समजदार आणि स्वतःस देशभक्त समजत आहेत. असं असेल तर त्यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती असायलाच हवी. तेव्हा गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्यावर असं वाहत जाण्याची आवश्यकता नव्हती. स्वातंत्र्याच्या लढ्याला भीक म्हणून संबोधणं हे अतिरेकी वक्तव्य कोणा संघ आणि भाजपेतर वा मुस्लीम व्यक्तीने केलं असतं तर देशात काय परिस्थिती असती, हे एकदा गोखलेंनी पडताळून पाहायला हवं. देशभर त्याच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले असते. सोकॉल्ड म्हणून ज्यांच्यावर गोखलेंचा आक्षेप आहे त्यांच्यामुळेच हे गुन्हे गोखलेंवर दाखल झाले नाहीत याची जाणीव गोखलेंनी ठेवायला हवी होती.

एका चांगल्या कलाकाराला दिल्या जाणार्‍या गुण-दोषांची जंत्री मोजण्याबाहेर गेल्यावर पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची वेळ येणं हा गोखलेंच्या एकूणच वर्तनाचा परिपाक होय. आता आपल्या म्हणण्याचा अनर्थ केल्याची तक्रार ते करू लागले आहेत. राजकारणातील माणसंही अंगावर बेतलं की असेच पळतात. तास सव्वातासाच्या पुराणात आपल्या कृतीवर जराही पश्चाताप व्यक्त न करणारे गोखले यासाठी वर्तमानपत्राच्या संपादकांचा दाखला देतात तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.स्वातंत्र्याच्या लढ्यावर कोणी टीका करावी? त्या लढ्याशी काडीचाही संबंध नसताना त्यावर अनुमान काढण्याची आवश्यकता नव्हती. आपल्याला तो अधिकार पोहोचतो काय हे कंगनाला कळलं नसेल इतपत ठिक. हे गोखलेंना कळलं नाही, असं थोडच आहे? कळूनही त्यांनी स्वत:ला रोखलं नाही. झाल्या प्रकरणावर माघार घेण्याची तयारीही दाखवता येऊ शकते. पण त्याऐवजी मी म्हणतो ते योग्य असल्याचा सूर लावत गोखलेंनी आपल्या हेकेखोरीला आगाऊपणाची फोडणी दिली. पत्रकार परिषदेतील गोखलेंचा तोरा इतका आततायी होता की त्यांनी घडल्या घटनेला पत्रकारच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

मालकाला काय हवं, तेच तुम्ही देता असं सांगता सांगता त्यांची जीभ पुन्हा घसरली. तुम्हाला जाग आली आणि तुम्ही आलात, प्रश्न होणार नाहीत, मी एकटाच बोलणार अशी ब्रम्हवाक्य सोडत त्यांनी स्वत:चीच टिमकी वाजवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार एकांगी काम करतात, हे गोखलेंना आताच बरं कळलं? गेल्या सात वर्षात देशातल्या पत्रकारितेचे सत्तेने कसे धिंडवडे उडवले ते गोखले सोयीने विसरलेले दिसतात. सत्तेविरोधात लिखाण केलं म्हणून किती पत्रकारांना नोकर्‍या सोडाव्या लागल्या याची खातरजमा करण्याचीही तजवीज त्यांनी घ्यायला हवी होती. पत्रकारांना बोलवायचं आणि त्यांना अवमानित करायची गोखलेंची कला भलतीच अशी म्हटली पाहिजे. तुम्ही नाही दाखवलं तर माझं काहीही बिघडणार नाही, असं सांगणार्‍या गोखलेंनी अन्यायाची बाजूही याच ‘अविश्वासू’ माध्यमांपुढे मांडली.

स्वातंत्र्याविषयी कंगना काय म्हणाली हे तिचं वैयक्तिक मत आहे. तिच्या मतांवर व्यक्त होणं हा आपला अधिकार असल्याचं सांगत गोखलेंनी त्याच विषयांना पुन्हा हात घातला. राज्यातील सत्तेविषयी पुन्हा भाजप-सेना सत्तेची गणितं मांडली. गोखलेंना सत्तेचं हे गणित 2014 मध्येच सोडवता आलं असतं. पण ज्यांनी उध्दव ठाकरेंना जुमानलं नाही तिथे आपली डाळ शिजली नसती हे उघड सत्य गोखालेंना कळलं असणार. आता आदळआपट करणार्‍या भाजपला ते शहाणं करत असावेत. महाविकास आघाडीची सत्ता त्यांना नकोशी झाली म्हणून ती असल्या इच्छाआकांक्षाने जाणार नाही हे आता सगळेच जाणून आहेत. ज्यांच्यासाठी गोखले मोठमोठ्या शब्दांचे खेळ करत आहेत, त्या नेत्यांची अवस्था आधीच्या सत्तेत काय झाली हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं होतं. पण सोयीचं विसरणं ही गोखलेंची खासियत दिसते. मुख्यमंत्रीपदाची लालसा असलेल्यांसाठी गोखले इतके उतावीळ झाल्याचं पाहून आश्चर्य वाटणारच.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी सारं देशाप्रति फुंकून टाकलं ते वीर फासावर जात असताना म्हणे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, असे गोखले म्हणाले. हा आरोप करणार्‍या गोखलेंकडे दस्तावेजाचा कोणताही पुरावा नाही, हे स्वतःच सांगत आहेत. तरी ते थेट गांधी आणि नेहरूंना दोष देतात यावरून त्यांच्या चराचरात गांधी-नेहरू यांच्याविषयी किती घृणा आहे हे लक्षात येते. असं समजुया की या दोघांनी फासावर जाणार्‍या वीरांकडे दुर्लक्ष केलं. म्हणून स्वातंत्र्याचा संग्राम ही भीक कशी असू शकते, याचं उत्तर गोखलेंकडे आहे का? भारतीय नागरिक म्हणून 2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं, असं सांगणार्‍या गोखलेंना गेल्या सात वर्षांपासून देशात स्वातंत्र्याची काय स्थिती आहे, हे मोदी प्रेमापोटी ते बोलत नाहीत असं म्हणावं लागतं. लोकांना विश्वासात न घेता घेतलेल्या अनेक निर्णयांनी देशाचं कंबरडं मोडलं. नोटबंदीसारख्या अवसानघातकी निर्णयाने कधी नव्हे इतकी मंदी देश सोसतो आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात आणि नव्या शेतकरी कायद्याविरोधात सरकारने दाखवलेला निर्दयीपणा गोखलेंच्या गावीही नाही. देशात खासगीकरणाचं पेव फुटल्याने रोजगार मिळणं दुरापास्त बनलं आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा तर नित्याचा भाग आहे. अशातही शेतकरी नव्या कायद्यांविरोधात वर्षभर आंदोलन करताना गोखलेंना दिसले कसे नाहीत? ६८ वर्षांनंतर आता मोदींच्या काळात देश जागतिक स्तरावर उभा राहिल्याचं मत नोंदवणारे गोखले आपल्या बचावासाठी कर्तबगार पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचाही अवमान करत आहेत. असो कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, तेव्हा गोखले काय बोलतात याची तमा बाळगण्याचं कारण नाही.