विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्मय समीक्षक होते. त्यांचा जन्म २९ जून १८७१ रोजी विदर्भातील बुलढाण्याला झाला. अकोला, पुणे आणि मुंबई येथे त्यांनी बी.ए., एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचा व्यवसाय वकिलीचा होता. त्यांनी आपल्या वाङ्मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. ‘संगीत वीरतनय’ (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी ‘मूकनायक’ (१९२२), ‘गुप्तमंजूष’ (१९०३), ‘मतिविकार’ (१९०७), ‘प्रेमशोधन’ (१९११), ‘वधूपरीक्षा’ (१९१४), ‘सहचारिणी’ (१९१८), ‘जन्मरहस्य’ (१९१८), ‘परिवर्तन’ (१९२३), ‘शिवपावित्र्य’ (१९२४), ‘श्रमसाफल्य’ (१९२९) आणि ‘मायाविवाह’ (१९४६) ही नाटके लिहिली. उपर्युक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली.

‘साक्षीदार’ हा त्यांचा पहिला विनोदी लेख विविधज्ञानविस्तारात प्रसिद्ध झाला (१९०२). ‘सुदाम्याचे पोहे’ अर्थात ‘अठरा धान्यांचे कडबोळे’ (१९१०) हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह. त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (१९३२) या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. ‘दुटप्पी की दुहेरी’ (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) या दोन कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक म्हणून त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवरून गेली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षित होऊ शकत नाही.

त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटीत्व आणले. कोल्हटकरांचे वाङ्मय समीक्षात्मक लेखन प्रत्येक प्रश्नाचा खोलवर जाऊन शास्त्रशुद्धपणे विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे. पुस्तक परीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे व खास लिहिलेले अभ्यासलेख यामधून त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचे वाङ्मयीन प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले, त्यामुळे मराठी वाङ्मय विचाराला योग्य दिशा मिळाली. अशा या महान साहित्यिकाचे १ जून १९३४ रोजी निधन झाले.