Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे

सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे

Related Story

- Advertisement -

विष्णुपंत छत्रे यांचा आज स्मृतिदिन. भारतीय सर्कस ही युरोप-अमेरिकेच्या तुलनेत काहीशी उशिरा सुरू झाली. भारतीय सर्कसचे जनक होते विष्णुपंत मोरेश्वर छत्रे! छत्रे घराणे मूळचे बसणीचे. हे छोटेसे खेडेगाव गणपतीपुळे देवस्थानापासून सात-आठ किमी अंतरावर आहे. विष्णुपंतांचे वडील संस्थानी चाकरी करीत. त्यानिमित्त फिरत असताना, त्यांच्या मातोश्री व पत्नी, मुलेबाळे अंकलखोप येथे रहात असत. सांगली जिल्ह्यातील तासगावजवळ हे गाव आहे. १८४० मध्ये विष्णुपंत छत्रे यांचा जन्म येथे झाला.

विष्णुपंत शाळेत फारसे रमले नाहीत. सवंगड्यांबरोबर हुंदडण्यात आणि कुत्री, माकडे, ससे, कबुतरे यांच्यात ते रमून जात. १६व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. जमखिंडीकर पटवर्धन संस्थानिकांच्या घोड्यांच्या पागेत, घोड्यावर स्वार होऊन घोडदौड करायला ते शिकले. पाठोपाठ रामदुर्ग संस्थानात चीफसाहेब श्रीमंत भावे यांच्या आश्रयाखाली ते चाबुकस्वार म्हणून नेमले गेले. मात्र, तेथे ते दोन वर्षेच राहिले. दररोजच्या कसरतीमुळे काटक व पिळदार बनलेली शरीरयष्टी, घौडदौडीतील चपळाई आणि धाडस करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना.

- Advertisement -

शास्त्रीय संगीताचेही त्यांना विलक्षण आकर्षण होते. त्यामुळे नशीब आजमावयाला ते ग्वाल्हेर संस्थानाकडे निघाले. तेथे श्रीमंत बाबासाहेब आपटे हे घोडी शिकवून तयार करण्याच्या कामात वाकबगार होते, तर नावाजलेले गायक हदद खाँ तेथेच दरबारी होते. आपली दोन्ही स्वप्ने पूर्ण होतील; म्हणून विष्णुपंत ग्वाल्हेरला निघाले. पैशाचे पाठबळ नव्हते. जेमतेम जळगावपर्यंत त्यांनी रेल्वेने प्रवास केला. पैसे संपले. मग माधुकरी मागत ते चक्क पायी काही महिन्यांनी ग्वाल्हेरला पोहोचले.

श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे व विष्णुपंतांचे गुरू-शिष्याचे नाते जडले. घोड्यांच्या कसरतीत त्यांनी अथक मेहनत घेऊन प्रावीण्य मिळवले. अनेक अवघड कसरती ते लीलया करू लागले. सुमारे ८ ते १० वर्षांच्या या कालावधीत श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे ते पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्रात परतले, ते ‘अश्वविद्या पारंगत’ म्हणूनच! इंदूर, विंचूर, कुरुंदवाड, जव्हार अशा अनेक संस्थानांत ते घोड्यांना चाल आणि कवायतीचे शिक्षण देऊ लागले. त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली. अनेक संस्थानिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले.

- Advertisement -

मुंबईत बोरीबंदर येथे चर्नी विल्सनची ‘हर्मिस्टन सर्कस’ही चालूच होती. मात्र, छत्र्यांच्या ‘ग्रँड इंडियन सर्कस’ला तुफान प्रतिसाद मिळाला. कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच भारतीय सर्कसचा पाया रचला जाऊ लागला. विष्णुपंत छत्र्यांनी तरुण कलाकार आणि तेजदार घोडे घेऊन कुरुंदवाड येथे सर्कशीची तालीम सुरू केली आणि अवघ्या 8-10 महिन्यांत सर्कस मूर्त स्वरूपात आणली. खुद्द छत्र्यांच्या घोड्यांच्या कसरतींनी सारे अवाक् व्हायचे. यामुळेच हर्मिस्टन सर्कसपुढची गर्दी ओसरली आणि अखेरीस ती सर्कसच बंद पडली.

हर्मिस्टन सर्कसचे तंबू, गॅलरी व इतर साहित्य छत्र्यांनी विकत घेतले; शिवाय त्या सर्कशीतील परदेशी कलाकारही आपल्या सर्कशीत कामाला ठेवून घेतले. छत्र्यांच्या या पहिल्या भारतीय सर्कसने नवा इतिहास घडवला होता. विष्णुपंत छत्रे यांच्या या पहिल्या भारतीय सर्कशीत पाश्चात्यांचे कसलेही अनुकरण नव्हते, तर स्वतंत्र अशा भारतीय बाण्याने ती उभी होती. देशभक्ती हा जणू तिचा आत्माच होता. अशा या भारतीय सर्कसच्या जनकाचे 20 फेब्रुवारी 1905 रोजी निधन झाले.

- Advertisement -